Tuesday, 9 September 2014

Reflections for homily, by:Fr.Amol Tuscano

Fr.Amol Tuscano hails from Holy Spirit Church, Nandakhal. 
He belongs to St.Bonaventure capuchin province, Maharashtra.
At present he is serving at Our Lady of Fatima Church, Vidyavihar as Assistant Parish priest.

पवित्र क्रुसाचा विजयात्सोव

दिनांक: १४/०९/२०१४.
पहिले वाचन: गणना २१:४-९.
दुसरे वाचन: फिलीपिकारांस पत्र २:६-११.
शुभवर्तमान: योहान ३:१३-१७.

प्रस्तावना:
आज आपण पवित्र क्रुसाचा विजयात्सोव साजरा करीत आहोत. क्रूसचं आपल्या ख्रिस्ती जीवनाचं ओळख पत्र आहे. क्रूस हे लाच्छादपणाचं, अपमानाचं व गुन्हेगारीचं प्रतीक होतं परंतु ख्रिस्ताच्या स्पर्शाने ह्या क्रुसाचं रूप व प्रतीक बदललं गेलं. हाच क्रूस तारणाचा, ऐक्याचा, प्रेमाचा व संजीवनाचा प्रतीक बनला गेला आहे. प्रभू येशूने आपल्यावर इतकं प्रेम केलं की तो आपल्यासाठी क्रुसावर मरण पावला. कोणताही गुन्हा नसताना गुन्हेगार म्हणून क्रुसावर त्याला खिळलं गेलं परंतु क्रुसावरच्या ह्या मरणाने दु:ख, अडी-अडचणीशिवाय तारणाचा व गौरवाचा मुकुट मिळणे अशक्य आहे हे सत्य आपल्याला सांगितले. आजच्या ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण प्रभूकडे प्रार्थना करूया की; आपणा सर्वांना क्रुसाचा खरं अर्थ समजावा व आपल्या जीवनात येणाऱ्या दु:ख व संकटामुळे हतबल व निराश न होता क्रुसाकडून आपण प्रेरणा घ्यावी.

पहिले वाचन: गणना २१:४-९.
इस्रायल लोकं देवाच्या विरुद्ध गेल्यामुळे त्यांच्यावर सर्पदंशाची आपत्ती ओढवलेली होती. पण परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे त्याने त्यांच्या नाशाकडे पाहिले नाही तर उद्धाराकडे पहिले. मोशेला पितळेचा साप बनवायला सांगितला आणि जो कोणी सापाने दंश केल्यानंतर ह्या मोशेने बनविलेल्या सापाकडे बघतील ते वाचतील. त्यांना नवजीवन प्राप्त होईल.
  
दुसरे वाचन: फिलीपिकरांस पत्र २:६-११.
प्रभू येशू ख्रिस्त जो देव होता तो आपल्यासाठी मानव झाला. आपल्या प्रेमाखातीर क्रूसावरील मरण पत्कारले. आपल्या पित्याशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिला. त्याचं प्रतिफळ म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थानाद्वारे व स्वर्गरोहणाद्वारे गौरविण्यात आले व सर्व नावांहून श्रेष्ट असे नाव त्याला बहाल केले.

शुभवर्तमान: योहान ३:१३-१७.
ज्याप्रमाणे मोशेने जंगलात साप उंचावला व ज्यांनी त्याकडे पाहीले ते मरणापासून वाचले त्याचप्रमाणे देवाचा पुत्र क्रुसावर उंचाविला जाईल आणि जो कोणी त्याच्याकडे बघून विश्वास ठेवील त्याला सार्वकालिक मरणाचा अनुभव येणारच नाही. त्यांना तारण प्राप्त होईल. योहानाच्या शुभवर्तमानातील सर्वात जास्त वेळा वापरलेलं वचन व जे सर्वांच्या तोंडवळणी पडलेलं वचन ३:१६ ‘देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र देणगीदाखल दिला’. सर्व तारणाचा उगम प्रीती आहे कारण देव प्रीती आहे.
सुवार्तिक संत योहान प्रभु येशूचं महत्व पटवुन देताना जुन्या करारातील गणना २१:४ मध्ये सांगतात की इस्राएल लोक परमेश्वराने नेमलेल्या प्रदेशाकडे जात असताना देवाविषयी कुरकुर करत होते व इजिप्तची गुलामगिरी सोडल्याबद्दल पश्चाताप व्यक्त करत होते. तेव्हा देवाने त्यांना शिक्षा म्हणून विषारी साप त्यांच्यामध्ये पाठवले. लोकांनी देवाच्या दयेची याचना केली. तेव्हा देवाने मोशेला पितळेचा साप बनवुन उंच करण्यास सांगितला आणि ज्यांनी त्यावर पाहिले ते बरे झाले. लोकांना वाटलं पितळेच्या सापामुळे ते बरे झाले म्हणून ते सापाची मूर्ती बनवून त्याची भक्ती करू लागले. संदेष्टा यहेजकेलने ह्या मूर्तीचा नाश केला कारण पितळेच्या सापामुळे ते वाचले नव्हते तर परमेश्वरामुळे ते वाचले होते. बरे होण्याचे सामर्थ्य पितळेच्या सापात नव्हते; ते तर त्याचं लक्ष देवाकडे लावण्यासाठी एक चिन्ह होतं जेव्हा त्यांनी त्याचं लक्ष देवाकडे लावले तेव्हा ते बरे झाले.
सुवार्तिक संत जॉन जुन्या गोष्टीचा वापर करून सांगतात ज्याप्रमाणे सापाला उंच केल्यावर लोकांचे विचार देवाकडे लागले ते देवावर विश्वास ठेवू लागले आणि देवावरील विश्वासामुळे ते बरे झाले त्याचप्रमाणे प्रभु येशूला उंचावले जाईल आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रभू येशूला उंचावणे हे दोन प्रकारचं आहे: १. क्रुसावर २. स्वर्गरोहनच्या वेळी. दोघांमध्ये नातं आहे जर प्रभू येशू क्रुसावर उंचावला गेला नसता तर स्वर्गरोहनात म्हणजेच गौरवात उंचावला नसता. म्हणून म्हटलं जाते क्रुसाशिवाय गौरवाचा मुकुट नाही.

बोधकथा:
संत थॉमस अक्वायनस व संत बोनावेंचर हे दोघे तत्वज्ञानी व ईशज्ञानी होते. एक दिवस संत थॉमसने संत बोनावेंचरला विचारले की, ‘आपण दोघे तत्वज्ञानी व ईशज्ञानी आहोत पण तुम्हचे विचार जे आहेत ते फार खोल विचार आहेत. त्यासाठी तुम्ही कोणते पुस्तक वापरता?’ तेव्हा संत बोनावेंचरने सांगितले ‘जा आणि माझ्या टेबलावर एकच पुस्तक आहे ते पहा’ मी तेच पुस्तक वापरतो’. संत थॉमस बोनावेंचरच्या खोलीत गेले आणि पाहिले तर त्यांना एकही पुस्तक टेबलावर सापडलं नाही. त्यांनी बोनावेंचरला सांगितले की, ‘तुमच्या टेबलावर एकही पुस्तक नाही’. तेव्हा संत बोनावेंचरने त्यांना सांगितले, ‘नीट जाऊन पहा’. संत थॉमसने पुन्हा जाऊन पाहिलं तरी त्यांना टेबलावर एकही पुस्तक सापडलं नाही. त्यांनी बोनावेंचरला सांगितले’ ‘तुमच्या टेबलावर एकही पुस्तक नाही, टेबलावर फक्त एक क्रूस आहे’. संत बोनावेंचर लगेच उत्तरले, ‘तेच माझं प्रेरणादायी पुस्तक आहे’.

मनन चिंतन:
एकदा एक धर्मगुरू नवीनच नेमणूक झालेल्या धर्मग्रामामध्ये भेटी देत होते. त्यांनी एका घरी भेट दिल्यानंतर त्या घरातील माणसांना विचारले शेजारचं घर आपल्याच पैकी आहे का? त्यावर ते म्हणाले हो. फादरांनी सांगितले, ‘मग मला त्या घरात घेऊन चला’. त्यांनी उत्तर दिलं, ‘आमचं आणि त्या घराचं थोड पटत नाही म्हणून आम्हीं त्यांच्याशी बोलत नाही’. क्रुसाचा इतिहास जर पाहिला तर क्रूस हा अपमानाचं चिन्ह होतं. क्रुसावर गुन्हेगाराला मारत असे व  क्रूस गावाच्या वेशीपासून दूर बांधले जात असत. परंतु ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या मरणाने त्या क्रुसाचे रूप व चिन्ह बदलले आहे. जसं परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे क्रूस हे प्रेमाचे, ऐक्याचे व तारणाचे प्रतीक झाले आहे. क्रुसाचा अर्थ सांगताना सांगितले जाते –उभे लाकूड हे देवाचं मानवावरील असलेलं प्रेम व्यक्त करते म्हणजेच देव व मानवाला जोडलं जाते तर आडवं लाकूड हे माणसाचं माणसावरील असलेले प्रेम व्यक्त करते, म्हणजेच ते माणसा-माणसाला जोडण्याचं काम करते. क्रुसाचा खरा अर्थ माणसाला जोडण्याचा आहे. पण त्याच क्रॉसचा वापर एकमेकांना संभाषण बोलणं तुटल्यावर केला जातो: म्हणतात त्याच-माझं क्रॉस आहे.
‘क्रुसाचे लाकूड पहा हे ख्रिस्त टांगला ह्या वरती’ ख्रिस्तामुळे तो लाकडी क्रूस पवित्र झाला. ख्रिस्तामुळे आपण सुद्धा पवित्र झालो आहोत कारण आपण ख्रिस्ताला स्विकारले आहे पण आपण आपले पवित्रपण जपून ठेवलं आहे. आपण नावाने ख्रिस्ती आहोत परंतु ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे आपण वागतो का? आपण म्हणतो क्रुसाचा मला अभिमान आहे परंतु जीवनात क्रूस म्हणजेच दु:ख, अडी-अडचणी, संकट आल्यावर त्याचा आपण स्विकार करतो का? येशू ख्रिस्त म्हणतो, ‘जर कोणाला माझे अनुयायी व्हायचं असेल तर त्यांनी आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे या’. आपल्या जीवनात आलेले कठीण प्रसंग आपल्याला ख्रिस्ताकडे येण्यास मदत करतात की आपण ख्रिस्तापासून दूर जातो? प्रभू येशू जो देवाचा पुत्र त्याने केवळ आपल्या प्रेमाखातीर क्रूसावरील गुन्हेगारचं, लुटारुचं मरण सोसलं. निरपराध्याला अपराधी बनवण्यात आलं परंतु क्रूसावरील मरणाने आपल्या सर्वांचे तारण झाले. प्रभू येशू आपणाला दाखवून देतो की दु:खाशिवाय सुख नाही, क्रुसाशिवाय स्वर्गाच्या गौरवाचा अनुभव घेता येत नाही. क्रूस आपल्या ख्रिस्ती जीवनात तारणाचा व आशेच प्रतीक आहे. ह्याच तारणदायी आशेने आपण जीवन जगायला हवं.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: प्रेमळ पित्या तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

  1. आपले चर्चचे अधिकारी परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांनी आपल्या शब्दाद्वारे व कृत्याद्वारे क्रुसाचे सामर्थ्य व पावित्र्य लोकांना पटवून द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आपल्या धर्मग्रामानी क्रुसाच्या विजयोत्सवाचा सण प्रभावीपणे व धार्मिकपणे साजरा करून लोकांना अधिकाधिक देवाच्या जवळ आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. सर्व ख्रिस्ती लोकांना क्रुसाचा खरं अर्थ समजावा व क्रुसाद्वारे आपल्या सर्वांचे तारण झाले आहे ह्याची जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. आपल्या जीवनात येणाऱ्या दु:ख व संकटामुळे हतबल व निराश न होता क्रुसाकडून आपण प्रेरणा घ्यावी आणि जीवनात नेहमी आशावादी रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5.  आपण आपल्या वैयाक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.   

No comments:

Post a Comment