Tuesday, 2 September 2014


Reflections for Homily By: Leon D'Britto.




सामान्य काळातील तेविसावा रविवार
दिनांक: ०७/०९/२०१४
पहिले वाचन: यहेज्केल ३३:७-९.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:८-१०
शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०

प्रत्येक माणूस हा देवाला प्रिय आहे.
प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील तेविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला एकमेकांचा हात पकडून एकत्र प्रभूच्या मार्गावर चालण्यासाठी बोलावित आहे. यहेज्केलच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचानाद्वारे आपल्याला आपला बंधू अथवा बहिण पापाच्या आहारी गेली असता त्यांना त्यांची चूक समजावून सांगण्याची जबबदारी आपली आहे हे सांगण्यात येते तर रोमकरांस लिहिलेल्या पत्राद्वारे संत पौल रोममधील ख्रिस्ती लोकांना आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्याच्या आपल्या कर्तव्याविषयी जाणीव करून देत आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभूच्या मार्गावरून दूर जाऊन पापात गुरफटलेल्या आपल्या बंधू वा भगिनीला आपण कश्या प्रकारे परत प्रभूच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करायचा हे सांगण्यात आले आहे. आजच्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना खरोखर आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करण्यास, व एक ख्रिस्ती समुदाय म्हणून एकत्र प्रभूच्या मार्गावर चालण्यास प्रभूने आपल्याला शक्ती, सामर्थ्य व प्रेरणा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

पहिले वाचन: यहेज्केल ३३:७-९.

यहेज्केल हा इ.पू. ५९३-५७१ मध्ये संदेष्टा होता. इ.पू. ५९७ मध्ये बाबेलोनचा राजा नबुकेथनझ्ह्रर ह्यानी यहेज्केलला यहुदाचा राजा जोकिम, व राज्यातील ईतर नामवंत लोकांबरोबर बाबेलोन मध्ये वनवासात पाठवले. बाबेलोन मध्ये चार वर्ष राहिल्यानंतर आपला संदेश वनवासात असलेल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देवाने यहेज्केल्ची निवड केली. यहुदी लोक देवापासून दुरावल्यामुळे त्यांना वनवास सहन करावा लागला होता व आता तर संपूर्ण येरूसलेम शहर व येरुशलेमचे मंदिर जमीनदोस्त होणार होते व ५८७ मध्ये वर्तविल्याप्रमाणे सर्व लोकांना गुलाम म्हणून बाबीलोनात आणले जाणार होते.
त्या नंतरच्या काळात यहेजकेल भाकीत करू लागला की देवाच्या विरुद्ध गेल्याबद्दल लोकांना योग्य ती शिक्षा मिळालेली आहे. आता देव त्यांना त्यांचा देश परत मिळवून देईल. परत एकदा येरुसलेम शहर व मंदिर उभारण्यात येईल. वनवासाद्वारे शुद्ध झालेले त्याचे लोक पवित्र मनाने व हृदयाने देवाची सेवा करतील. “ते परत येतील. तेथल्या साऱ्या किळसवाण्या गोष्टी आणि घाणेरड्या वस्तू तेथून काढून टाकतील, त्यांना मी एकादिलाचे करीन. “नव्या चैतन्याने त्यांचे पाषाणहृद्य काढून मांसमय हृद्य देईन.”(११:१८-१९).
आजच्या वाचानाद्वारे संदेष्टयांना दिल्याप्रमाणे देव आपल्याला ताकीद देत आहे. एक ख्रिस्ती म्हणून आपण सर्व देवाचे संदेष्टॆ आहोत. आपण जोपासत असलेला विश्वास व श्रद्धा संपूर्ण जगापुढे आणण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. जेव्हा आपला बंधू अथवा बहिण पापाच्या आहारी जाते तेव्हा त्याला त्याची चूक समजावून सांगण्याची जबबदारी आपली आहे व त्यात आपण कमी पडलो तर त्याच्या पापाबद्दल आपल्यालाही जाब विचारण्यात येईल. त्यामुळे एक खरा ख्रिस्ताचा अनुयायी म्हणून आपले कार्य बजावण्यात आपण सदा सक्षम राहिले पाहिजे.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:८-१०

या अध्यायातील पहिल्या सात ओवीमध्ये पौल रोममधील ख्रिस्ती लोकांना सरकारी नियम व कायदे पाळण्याविषयी सांगत आहे तर पुढे आजच्या वाचनात तो ख्रिस्ती लोकांना आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्याच्या आपल्या कर्तव्याविषयी जाणीव करून देत आहे. समजा एखाद्याने खरोखर आपल्या शेजाऱ्यावर प्रीती केली तर तो कधीच  दहा आज्ञांतील दुसऱ्या भागाचे उल्लंघन करणार नाही. दहा आज्ञांपैकी पाचवी ते दहावी आज्ञा आपल्या शेजाऱ्यांबरोबर आपण कश्या तऱ्हेने वागावे ह्याविषयी माहिती देते. व जो व्यक्ती आपल्या शेजाऱ्यांवर खरोखर प्रीती करितो तो कधीच व्यभिचार करणार नाही, खून करणार नाही, चोरी करणार नाही किंवा लोभ सुटू देणार नाही.

शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०

सोळाव्या अध्यायाद्वारे मत्तय पुन्हा एकदा ख्रिस्तसभेसबंधीच्या प्रश्नाकडे वळताना दिसतो. प्रत्येक ख्रिस्ती बंधू-भगिनीने एकमेकाशी कश्या प्रकारे सबंध ठेवले पाहिजेत? मत्तायला या विषयावर उगाच चर्चा करायची होती अथवा प्रबंध लिहायचा होता असे नाही. तर त्या वेळेला हळू-हळू ख्रिस्ती समाजात निर्माण होणाऱ्या परिस्तिथीमुळे त्याला हे लिहावे लागले. मत्तयने सांगितल्याप्रमाणे नम्रता हा प्रत्येक ख्रिस्ती परस्पर संबंधाचा प्रमुख घटक बनला पाहिजे कारण प्रत्येक माणूस हा देवाला प्रिय आहे. “सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. (मत्तय १८:१०). परंतु जेव्हा एखादा ख्रिस्ती व्यक्ती पापाच्या अधीन जातो तेव्हा हा एकोपा कसा जपून ठेवायचा? अश्या परिस्थितीत मत्तय आपल्याला येशूने सांगितल्याप्रमाणे आपल्या बंधूला समजावून सांगण्याच्या आपल्या कर्तव्याचे आठवण करून देतो. योग्य वेळी आपला मुद्दा मांडणे व आपली भूमिका स्पष्ट करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जेव्हा निदर्शनास येते की आपला बंधू किंवा बहिण देवाच्या इच्छेविरुद्ध कार्य करीत आहे तेव्हा त्याने जाऊन ती चूक त्या व्यक्तीच्या निदर्शनास आणणे गरजेचे आहे व त्या आपल्या बंधूला किंवा भगिनीला परत एकदा देवाच्या मार्गावर चालण्यासाठी मदत केली पाहिजे.
प्रभूच्या मार्गावरून दूर जाऊन पापात गुरफटलेल्या व्यक्तीला कश्या प्रकारे परत प्रभूच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करायचा हेही आपल्याला चांगल्या प्रकारे सांगण्यात आले आहे.
  •  त्याचा अपराध किंवा चूक तो एकांतात असताना त्याच्या निदर्शनास आणा.
  •  एका-दोघांस आपणाबरोबर नेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न करा.
  •  तरीही मानत नसेल तर संपूर्ण मंडळीला कळवा.

थोडक्यात त्याला पुन्हा प्रभूच्या मार्गावर आणण्यास सर्व प्रकारचे प्रयत्न करा परंतु हे करीत असताना हिंसेचा वापर केला जाऊ नये व शेवटचा मार्ग म्हणजे आपल्या समाज्याचे मूल्य व आपला देवाबरोबर असलेल्या सालोख्यामुळे त्याला आपल्यापासून दूर राहू देणे. आपल्यापासून दूर ठेवण्याचासुद्धा उद्देश हाच की त्याला आपल्या समाज्याची कमतरता भासावी व पापामुळे आपण काय गमावून बसलो आहोत ह्याची त्याला जाणीव होऊन त्याने पापाकडे पाठ करून परत एकदा प्रभूच्या मार्गावर चालावे.
     जो आपला बंधू पापाच्या आहारी गेला आहे त्यासाठी देवाचे काय महत्व असू शकते? तो आपल्या समाजाचा एकोपा, त्यांच्याकडून मिळणारा आधार व समाजात असलेल्या देवाच्या उपस्थितीचे भान हरवून बसतो. त्यामुळे जेव्हा एखादा पापाच्या आहारी जातो तेव्हा त्याला समजावून सांगण्याचा उद्धेश हा की आपण आपल्याला असलेला देवाचा अनुभव त्या आपल्या बंधूला सांगावा व त्यांना देखील देवाचा अनुभव घेण्यास मदत करावी. तसेच बंधू अथवा बहिण ह्या शब्दात असलेल्या नात्याचा मायेचा ओलावा अबाधित राहावा.

बोध कथा:-

एका धर्माग्रमात एका व्यक्तीला मद्यपानाचे व्यसन लागले होते, परंतु मी ह्या व्यसनाच्या आहारी गेलो आहे हे मानण्यासाठी तो व्यकी तयार नव्हता. अश्या वेळी त्याचे काही जवळचे मित्र त्याच्याजवळ येत होते व त्याला एकांतात नेऊन ह्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी विनवणी करत होते परंतु मी एकदम सभ्य आहे व मला मद्यपानाचे तसे व्यसन नाही ह्या मतावर तो व्यक्ती ठाम होता. जरी तो व्यकी मला मद्यपानाचे व्यसन नाही ह्या मतावर ठाम होता तरी त्याच्या मित्रांना परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना होती. त्यांच्यासाठी आपल्या मित्राला ह्या व्यसनातून बाहेर काढणे महत्वाचे होते. तो कोणाचे ऐकत नाही म्हणून त्या सर्वांनी एकत्र जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे एके दिवशी सर्व मित्र त्या आपल्या मित्राच्या घरी गेले व त्याला परिस्थितीची कल्पना दिली, मद्यपानाच्या व्यसनाचे गांभीर्य सांगितले व ह्यातून त्याला बाहेर येणे हे त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी व त्या सर्वांसाठी किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितले. ह्यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्याने आपण ह्या व्यसनाच्या आहारी गेलो आहोत हे मान्य केले तसेच ह्या व्यसनातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी सुद्धा दाखवली. पुढे त्या मित्रांच्या मदतीने त्या व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करण्यात आले व पुढे तो ह्या व्यसनातून मुक्त झाला.
(शुभवर्तमानामध्ये अश्याच तऱ्हेने आपला बंधू जो देवापासून दुरावलेला आहे त्याला परत देवाकडे आणण्यासाठीच प्रयत्न करण्यास सांगितलेले आहेत.)

मनन-चिंतन

“आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको;आपल्या शेजारयाची अवश्य कानउघडणी कर, नाही तर त्याच्यामुळे तुला पाप लागेल.”(लेवीय १९:१७). यहुदी लोकांत ‘शेजारी’ हा शब्द एकाच देशातल्या लोकांना उद्देशून म्हटलेला आहे तर ‘बंधू’ ह्या शब्दाचा उपयोग आपल्या धर्माच्या लोकांना संबोधण्यासाठी वापरला जात असे. त्या वेळेला देवापासून दूर गेलेल्या आपल्या बंधूला परत आणण्याची जबाबदारी इतर बांधवांची होती. त्यामुळे येशूच्या शिष्यांवरही त्यांच्या इतर बांधवांची जबाबदारी होती. “सध्या जसे तुम्ही एकमेकांचे समाधान करीत आहात व एकमेकांस पुष्टी देत आहात, तसे करीत राहा.”(१ थेस्लोनीकरांस पत्र ५:११). “बंधुजनहो, निष्क्रिय असतील त्यांची कानउघडणी करा. कच्च्या दिलाचे असतील त्यांना धीर द्या. दुर्बलांना आधार द्या. सर्वाना सहीष्णूता दाखवा, असे आमचे आग्रहाचे सांगणे आहे. कुणीही अन्यायाचा सूड अन्यायाने उगविणार नाही याकडे लक्ष ठेवा. एकमेकांच्या व सर्वांच्या भल्यासाठी झटा.”(१थेस्लोनीकरांस पत्र ५:१४-१५) व जो आपल्यापासून दूर गेलेला आहे किंवा जो पापाच्या आहारी गेला आहे त्याचा मान राखण्यासाठी पहिली मुलाखत एकांतात घ्यावी. त्याला ‘परत मिळवणे’ ह्या शब्दाच्या वापरातून आपल्याला दाखवण्यात आले आहे की तो पापाच्या आहारी गेलेला आपला बंधू आपल्याला आपला समाज पवित्र व निष्कलंक ठेवण्यापेक्षा महत्वाचा आहे.
     “या भूतलावर तुमच्यापैकी दोघांनी जरी एखाद्या बाबतीत एकमत होउन काही मागणी केली तर माझा स्वर्गीय पिता त्या प्रमाण करील” मत्तय १८:१९ मधील हे आश्वासन पेत्राला दिल्याप्रमाणेच संपूर्ण समाजाला दिले आहे. येथे ‘बांधणे’‘मोकळे करणे’ हे ज्याने अपराध केला आहे त्याला उद्धेशून म्हटले आहे आणि योहान २०:२३ मध्ये असे म्हटले आहे की, “पापांबद्दल ज्यांना तुम्ही क्षमा कराल त्यांना क्षमा झालेली असेल! ज्यांना तुम्ही क्षमा करणार नाही, त्यांना क्षमा झालेली नसेल.” इथे सर्व शिष्यांना एखाद्याला दोषी ठरविण्याचा अथवा निर्दोष ठरविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. हा अधिकार जे कोणी येशूने दिलेल्या मार्गाला अनुकरतात त्यांना दिलेला आहे. आधी जो अधिकार फक्त पेत्राला देण्यात आला होता तो आता येशूला अनुकरणाऱ्या सर्वाना मिळालेला आहे.
  •      मत्तयचा पापाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. व विशेषकरून त्याला पापाच्या आहारी गेलेल्या आपल्या प्रत्येक बंधूला परत येशुच्या कळपात आणण्याची काळजी होती व इतरांबद्दल असलेली हीच काळजी ख्रिस्ती समाजाला इतर समाज्यापासून वेगळी करते. कारण खुपश्या सामाज्याचे डोळे एक शुद्ध, निष्कलंक समाज तयार बनविण्याकडे लागलेले असतात परंतु यथे समाजातील प्रत्येक व्यकी ही महत्वाची मानली जाते. ह्याचा अर्थ असाही नाही की ख्रिस्ती समाजात पाप हा अविभाज्य घटक आहे तर येथे लोक पापाला दूर ठेवून ख्रिस्ताला जवळ करण्यास झटत असतात. ह्याचा उद्धेश हा की, “साऱ्या मानवजातीचा उद्धार व्हावा व तिला सत्याची ओळख व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.” (१ तीमथी २:४)

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद:- हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.
  1. आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना देवराज्याची मुल्ये आपल्या शब्दांद्वारे व कृत्यांद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरूण-तरूणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देवराज्याविषयी शिकवण द्यावी, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.


     

No comments:

Post a Comment