Wednesday, 29 October 2014

 Reflections for Homily By: Nevil Govind


सर्व मृत भाविकांचा स्मृतिदिन

दिनांक: २/११/२०१४
पहिले वाचन: यशया २५:६-९.
दुसरे वाचन: पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र १५: ५१-५७
शुभवर्तमान: योहान १२:२३-२६

‘अनंतकाळाच्या शाश्वत जीवनाची आशा’

प्रस्तावना:
आज अखिल ख्रिस्तसभा सर्व मृत भाविकांचा स्मृतिदिन साजरा करत आहे. आजच्या दिवशी आपण सर्व मरण पावलेल्यांची तसेच आपल्या प्रिय नातेवाईकांची आठवण करतो. मृत्युमुळे माणसाच्या जीवनाचा शेवट होत नाही, तर त्यात फक्त बदल होतो; मृत्युनंतर अनंतकाळाच्या शाश्वत जीवनाला सुरुवात होते ही आपली ख्रिस्ती श्रध्दा आहे. येशू ख्रिस्ताने मरणातून पुन्हा उठून आपल्या जीवनाला नवीन दिशा दिली आहे. ह्या जगात असताना आम्हीं सर्वांशी शांतीने वागावे, ऐकमेकांना क्षमा करून देवाच्या क्षमेस पात्र व्हावे व ख्रिस्ती विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे, ह्यासाठी आपणांस परमेश्वराची कृपा-शक्ती लाभावी म्हणून आपण ह्या पवित्र मिस्सा बलिदानात विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन: यशया २५:६-९.
यशया प्रवक्ता ह्या उता-यातून स्पष्ट करतो की, ‘परमेश्वर मृत्यू कायमचा नाहीसा करणार आहे, सर्वांच्या चेह-यावरील अश्रू पुसणार आहे आणि ह्याच देवाची आपण आशा धरून राहिलो पाहिजे कारण तो आपले तारण करील.

दुसरे वाचन: पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र १५: ५१-५७
            ख्रिस्त येईल तेव्हा विश्वासणारे आपल्या शरीराने स्वर्गाला जाऊ शकणार नाहीत (ओवी.५०); ते त्या समयी बदलून जातील (ओवी.५१). हा बदल क्षणात घडून येईल (ओवी.५२अ). ख्रिस्त आपल्या मंडळीला घेऊन जाण्यास येईल तेव्हा कर्णा वाजेल व जे ख्रिस्तावर विश्वास ठेऊन मरण पावले आहेत ते उठविले जातील. त्यांना व जगातील विश्वासणा-यांना अविनाशी व गौरवी शरीर मिळेल (ओवी.५२, ५३). अशाप्रकारे ख्रिस्त मरणावरील आपला विजय प्रगट करील. त्यानंतर प्रभूच्या लोकांना मरणाचा अनुभव कधीच येणार नाही.

शुभवर्तमान: योहान १२:२३-२६
            “गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो”(ओवी.२४). येशू ख्रिस्ताने हे त्यांना दिलेले उत्तर अतिशय सखोल अर्थाचे आहे(ओवी.२४). येशूने जी सेवा केली होती त्यामुळे सर्व यहूदी लोकांना येशूविषयी समजले होते. तरी ख्रिस्त एकटाच होता. जगातील सर्वांना येशूचा लाभ व्हावा यासाठी ख्रिस्ताला मरणाची गरज होती हे येशूने त्यांना गव्हाच्या दाण्याचे उदाहरण घेऊन सांगितले. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, हे किती खरे आहे. तो दाणा कितीही उत्कृष्ट प्रकारचा असला तरी जमिनीत पडून मेल्याशिवाय त्याच्यातील जीवनव्यर्थ ठरते. जो ख्रिस्तासाठी स्वतःचे समर्पण करील तोच अनेकांना आशीर्वाद देणारी सेवा करील.

बोधकथा:
एका गावात एक विधवा स्त्री आपल्या एकुलत्या एक मुलासह राहत होती. तिचा देवावर खूप विश्वास होता. ऐके दिवशी अचानक तिचा मुलगा मरण पावला. तिला आपला एकुलत्या एका मुलाच्या विरहाने धक्का बसला. आपल्या मुलाच्या मृत्यूवर तिचा विश्वास बसे ना. तो केवळ झोपी गेलेला आहे असे तिला मनोमन वाटू लागले. शेजारी जे तिच्या सांत्वनासाठी आलेले ते तिची समजूत काढू लागले, ‘तुझा मुलगा झोपी गेलेला नसून तो मृत्यू पावला आहे’. ती विधवा कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हती. ती विधवा आपल्या मृत मुलाला घेऊन अनेक देवळात आणि साधू संतांकडे घेऊन गेली. पण सर्व ठिकाणी तिला एकच उत्तर मिळाले, ‘स्त्री तुझा मुलगा झोपी न गेलेला असून मृत पावला आहे’. अखेर ती विधवा स्त्री आपल्या मुलाला घेऊन गौतम बुद्धाकडे गेली आणि त्यांस म्हणाली, ‘स्वामी माझा एकुलता एक मुलगा झोपी गेला आहे त्यास तुम्ही उठवा’; त्यावर गौतम बुद्ध तिला म्हणाला, ‘मी तुझ्या मुलाला झोपेतून उठवू शकतो; परंतु तुला माझी एक अट पूर्ण करावी लागेल. सांगा स्वामी, तुम्ही जे सांगाल ते करावयास मी तयार आहे’, ती स्त्री उद्गारली. गौतम बुद्ध तिला म्हणाला,‘ज्या घरी कोणाचाही मृत्यू झालेला नसेल अशा घरातून मला मूठभर तांदूळ घेऊन ये’. आनंदाने ती विधवा शेजारच्या गावात गेली परंतु तिला कुणीही मूठभर तांदूळ देई ना कारण प्रत्येकाच्या घरी कुणी ना कुणीतरी मरण पावलेले होते. ती निराशेने गौतम बुद्धाकडे परतली.
            मग गौतम बुद्ध तिला म्हणाला, ‘कुणाच्या घरी आई, तर कुणाच्या घरी वडील, तर कुणाच्या घरी भाऊ किंवा बहिण नाहीतर कुणी ना कुणीतरी मरण पावलेले आहेत! मृत्यू हा अटळ आहे तो सर्वांच्याच पदरी पडणार आहे. तुझा मुलगा झोपी गेलेला नसून मृत पावला आहे व ह्या सत्य स्थितीला सामोरे जा’.
 
मनन चिंतन:
१.    मृतांसाठी प्रार्थना करणे ही एक ख्रिस्ती लोकांची प्राचीन प्रथा होती. ही प्रथा इ.स. सातव्या शतकापासून मठात सुरू होती. इ.स.९९८ साली संत ओदिलो (मठवाशी) आपल्या मठात ही प्रथा सर्व संतांच्या स्मृतिनंतर म्हणजेच २ नोव्हेंबरला साजरी करीत असे. इ.स. सोळाव्या शतकापासून ही प्रथा ख्रिस्तसभेने पाळण्यास सुरुवात केली. इ.स. १९१५ मध्ये पोप महाशय बेनेडिक्ट ह्यांनी प्रत्येक धर्मगुरूंना तीन मिस्सा साजरा करण्यास सांगितले होते एक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या हेतूंसाठी, दुसरी म्हणजे सर्व विश्वासू मृतांसाठी आणि तिसरी म्हणजे पोप महाशयांच्या हेतूसाठी; ही प्रथा आजपर्यंत चालू आहे.
२. पुनरुत्थान व जीवन मीच आहे
प्रत्येक पास्काच्या दिवशी आपण ख्रिस्ताचा विजयौत्सव साजरा करतो कारण ख्रिस्त मरणाला जिंकुनिया उठला आहे. ख्रिस्त पास्काच्या दिवशी मरणांतुनी उठला म्हणून आज सर्व ख्रिस्तसभा येशू ख्रिस्ताच्या ह्या विजयी पुनरुत्थानावर खंभीरतेने उभारलेली आहे.
आपण पुष्कळ वेळा म्हणतो, ‘हा माणूस फक्त बोलतो परंतु करत काहीही नाही!ख्रिस्त जे करणार होता तेच तो बोलला. पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही”(योहान ११:२५-२६). मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही”(योहान १४, ६). तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरांत राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते; मी तुम्हांस जागा तयार करावयास जातो; आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हींही असावे”(योहान १४:१-३), “तुझा भाऊ पुन्हा उठेल”(योहान ११:२३), ख्रिस्त स्वतः मरणातून उठला म्हणून ख्रिस्ताच्या या शब्दांवर विश्वास ठेवने लोकांना सोपे झाले.
३. भूतकाळ संत जाहीर करतो आणि भविष्यकाळ पापी मनुष्य घडवितो’!
गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो”(योहान १२:२४). नितीमानांचे आत्मे देवाच्या हाती आहेत. कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही”(शलमोनाचा ज्ञानग्रंथ ३:६-९). संतांनी आपल्या जीवनाद्वारे भूतकाळ घडविला आणि ते आज स्वर्ग राज्यात देवाच्या सानिध्यात राहतात असा आपला विश्वास आहे.
आपण ह्या जगातील रहिवाशी नसून प्रवाशी आहोत’! आपल्या प्रिय जणांचा मृत्यु आपणास एकच गोष्ट सांगुन जातो, ‘आपण ह्या जगातील रहिवाशी नसून प्रवाशी आहोत’! माणूस असो श्रीमंत वा गरीब, लहान किंवा मोठा, असो संत वा पापी सर्वांना आहे अंत! आपण मृत्यूला लांबनीवर टाकू शकतो परंतु टाळू शकत नाही. मृत्यू हा अटळ आहे आणि ह्या वास्तविकतेला आपणांस सर्वांना सामोरे जायचे आहे. आपला विश्वास आहे की, संतगण आणि पवित्र माणसे स्वर्गीय-सु:ख उपभोगत आहेत. ते आपणासाठी देवाजवळ मध्यस्थी करतात म्हणून आपण त्यांच्याकडे प्रार्थना किंवा विनंती करत असतो.
मृत्यूनंतर स्वतःहून आपण स्वर्ग-राज्य प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी भूतलावर जीवन जगत असताना प्रयत्न करावे लागतात. येशूच्या वचनांवर विश्वास ठेऊन त्याच्या शिकवणुकीनुसार एक पवित्र जीवन जगले पाहिजे. त्रास सोसून व इतरांना क्षमा करून त्यांना मदत केली पाहिजे. मृत पावलेल्या आपल्या प्रिय जणांना स्वर्गीय सु:ख-शांती प्राप्त व्हावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे ख्रिस्ता आम्हांला तुझ्यात नवजीवन दे.
  1. आपले परमगुरु, महागुरू आणि सर्व धर्मगुरूंना येशू ख्रिस्त हाच खरा मार्ग-सत्य आणि जीवन आहे ही शुभवार्ता जगजाहीर करण्यासाठी दैवी-सामर्थ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. धर्मगुरु व धर्मभगिनी ह्यांनी लोकांना मृत्यूविषयी योग्य ते मार्गदर्शन करावे; आपण सर्वांनी मृत्युच्या भयाने न भिता सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालावे व जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. आपल्या कुटुंबातील प्रियजनांच्या आत्माला प्रभूपरमेश्वराने स्वर्ग-राज्यात चिरंतर शांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. ज्या मृत व्यक्तींसाठी प्रार्थना करण्यासाठी कुणीही नाही व सर्व शुद्धी-स्थानातील आत्म्यांना परमेश्वराने त्याच्या स्वर्गीय सु:खाचा आनंद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपण हे ऐहिक जीवन जगत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवावा व आपणा सर्वांना एक दिवस चांगले मरण लाभवे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  6. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.   



Wednesday, 22 October 2014

Reflections for homily By: Wikie Bavighar











            सामान्य काळातील तीसावा रविवार





दिनांक: २६/१०/२०१४
पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पत्र १:५-१०
शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०

“स्वतःवर प्रेम करतोस तसेच शेजाऱ्यावरही कर.”
प्रस्तावना:
आजच्या उपासनेचा विषय “प्रीती” आहे. जेथे प्रीती असते तेथे विश्वास असतो. कारण देव प्रीती आहे आणि त्याची प्रीती अवर्णनीय आहे. म्हणून प्रभू येशूने देवप्रिती आणि परस्पर प्रीतीची आज्ञा आपल्याला दिलेली आहे.
आजच्या पहिल्या वाचनामध्ये देव इस्राएली प्रजेला आठवण करून देतो की, त्यांनी जारकर्माच्या पापांसून व अशुद्ध कर्मांपासून तसेच मुर्तीपुजेच्या सर्व प्रकारांपासून दूर रहावे. तसेच दुस-या वाचनात संत पौल म्हणतो की, ‘देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली आहे’.
शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे की, “तू आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने व पूर्ण मनाने प्रीती कर आणि आपल्या शेजा-यांवर स्वतःसारखी प्रीती कर”. ह्या दोन आज्ञावर आपले ख्रिस्ती जीवन अवलंबून आहे. तर ह्या मिस्साबलीत सहभागी होत असताना आपण देवाच्या प्रीतीची आज्ञा श्रद्धेने आचरणात आणण्यासाठी विशेष प्रार्थना करू या.

पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६
ह्या वाचनाद्वारे दोन गोष्टी साधल्या आहेत. १) समाजातील दीन दुबळ्या घटकांविषयी (परके, विधवा, अनाथ, गरजू आणि गरीब) सहानभुतीची, कळकळीची वृत्ती वाढावी. २) न्यायव्यवस्था सर्वस्वी नि:पक्षपाती असावी.

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पत्र १:५-१०
आपल्या बहुतेक पत्रांच्या प्रारंभीच पौलाने आपल्या वाचकांच्या जीवनात देव जे करीत आहे त्यासाठी त्याची उपकारस्तुती केली आहे. प्रार्थनेसंबंधीच्या या उल्लेखातून आपल्या मित्रांविषयी त्याची स्वतःची प्रीती व आस्था स्पष्टपणे दिसून येते आणि यांतूनच त्यांना आपल्या जीवनात धीर व उत्तेजन मिळते.

सम्यक विवरण:
शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०
  1. देव प्रीती आहे: हा पवित्र शास्त्राचा मुख्य विषय आहे. मनुष्य पापी असला तरी परमेश्वराची त्याच्यावर प्रीती आहे. ही गोष्ट देखील निर्विवाद आहे. परमेश्वर अखिल मानवजातीवर प्रीती करतो. आपण मानव आहोत, या एकाच कारणामुळे तो आपणावर प्रीती करतो. देवाची प्रीती प्राप्त करून घेण्यास हे एवढेच एक कारण पुरे आहे. जगातील तुमचा सर्व आधार तुटला तरी देवाची प्रीती तुम्हाला सोडणार नाही, ती तुम्हाला खरा आधार देईल. मानवी प्रीतीची पराकाष्ठा होऊन ती संपुष्टात आली तरी देवाची प्रीती तुम्हाला अंतर देणार नाही. पवित्र शास्त्रात ह्या संबंधी पुढील अभिवचने आढळतात:

·     “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला” (योहान ३:१६).
· “देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला” (रोमन ५:८).
· “मी सार्वकालिक प्रेमावृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो” (यिर्मया ३:१३).
· “माझ्या आई-बापांनी मला सोडिले आहे तरी परमेश्वर मला जवळ घेईल” (स्तोत्र २७:१०).
· उधळ्या पुत्राच्या दाखल्यात देवाच्या प्रीतीचे सुरेख चित्रण केले आहे (लूक १५:11-३२). उधळा पुत्र मार्गभ्रष्ट होऊन जरी पापाच्या खोल गर्तीत पडला होता तरी त्याच्या बापाची त्याच्यावरची प्रीती कमी झाली नव्हती.
2. देव मानवाच्या ठायी राहतो: “देवाच्या आज्ञा कठीण नाहीत. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय” (१योहान ५:३). देवाची आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, ह्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्याठायी राहतो (१योहन३:२१-२४).
३) देवाशी आज्ञाधारक: देवाचे नियम, आज्ञा पाळणे म्हणजे देवावर प्रीती करणे. ह्याचीच येशू ख्रिस्त आपल्याकडून अपेक्षा करत आहे. येशू ख्रिस्त सर्व लोकांवर प्रीती करतो असे नवीन करारात पुन:पुन्हा आढळते. जे त्रासलेले व गांजलेले आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्त जगत होता. तो हरवलेले शोधावयास व तारावयास आला होता. हे सत्य देवाला दाखवून द्यायचे होते. ख्रिस्त देव आहे हे ओळखून त्याच्या शिष्यांनी त्याला नमन केले, ते देवाचा धन्यवाद करत राहिले. (लूक २४:५२-५३).
४) विश्वासाशी आज्ञाधारक: ख्रिस्ताद्वारे विश्वासामध्ये आम्हाला कृपा व प्रेषितपद मिळाले. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपदही मिळाली. अशासाठी की तू आपल्या शेजा-यावर स्वत:सारखी प्रीती कर. ख्रिस्ताने मरेपर्यंत आज्ञाधारक राहून आपल्याला कित्ता घालवून दिला आहे. परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही. पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो, “पुत्रावर श्रद्धा ठेवणा-याला अनंत जीवन मिळाले आहे! पण पुत्राचं नाव न ऐकणा-याला ते जीवन मिळणार नाही. उलट त्याच्यावर देवाचा कोप भडकेल!!” (योहान ३:३६).
     मत्तय २२:३४-४० या अध्यायात येशू ख्रिस्ताला परुश्यांनी विचारलेला दुसरा प्रश्न महत्वाचा होता परंतु त्या प्रश्नाला तसेच महत्वपूर्ण उत्तर मिळाले: “नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे” (५:१७). तसेच दहा आज्ञांचा पूर्वार्ध व उत्तरार्ध (देवाविषयीचे कर्तव्य आणि आपल्या शेजा-याविषयीचे कर्तव्य) यावर लक्ष केंद्रित केल्याने येथे आपणाला संपूर्ण आचरणाचा आधार मिळतो आणि हे कर्तव्य “प्रीती” या एकाच शब्दात सामावले आहे.

बोधकथा
एकदा एक व्यापारी दुस-या गावी व्यापारासाठी निघाला. वाटेत दाट जंगल लागले तेथे त्याला पायाने लुळा असलेला एक धष्टपुष्ट कोल्हा दिसला. व्यापारी विचारात पडला, पाय लुळे असून हा कोल्हा एवढा धष्टपुष्ट कसा? एवढ्यात बाजूने तोंडात शिकार घेऊन एका सिंहाला येताना पाहून व्यापारी घाबरून झाडावर चढून बसला. सिंहाने आपली शिकार तेथेच खाल्ली व त्यातील थोडा भाग कोल्हयापाशीच सोडून तो पुन्हा जंगलात निघून गेला. कोल्हा खुरडत-खुरडत पुढे आला व सिंहाच्या शिकारीतला उरलेला भाग खाऊ लागला. व्यापारी मनातल्या मनात म्हणाला, ‘देव प्रत्येकाची काहीना-काही सोय करतच असतो कारण तो प्रेमळ आहे. मग आपणच असे गावो-गावी कशाला भटकायचे? ज्याप्रमाणे देवाने कोल्हयाला जागेवरच अन्न पुरविले त्याचप्रमाणे देव मलाही जागेवरच अन्न पुरवील!’ म्हणून तो माघारी फिरून देव आपली घरीच सोय करेल या आशेने घरातच पडून राहिला. तीन चार दिवसात तो भुकेने अति व्याकूळ झाला व देवाचा धावा करू लागला. तेव्हा त्याला देव-वाणी ऐकू आली, सिंह स्वतःचे अन्न स्वतः तर मिळवतोच परंतु त्यातला काही भाग परोपकारासाठी ठेवतो, तर मग तू सिंह होण्याचे का ठरवले नाहीस? व्यापा-याला आपली चूक लक्षात आली. त्याने पुन्हा नवीन जोमाने व्यापाराला सुरवात केली नंतर समाज कल्याणाचीही खूप कामे केली आणि देवावरची प्रीती त्याने इतरांबरोबर वाटून घेतली.

मनन चिंतन:
प्रेम किंवा प्रीती हा शब्द आपण ब-याच वेळा वापरतो. पण त्याचे स्पष्टीकरण निरनिराळे असू शकते. एखादी गोष्ट दुस-या गोष्टीपेक्षा जास्त आवडते किंवा तिचे मोल मोठे असते तेव्हा आपण म्हणतो, ‘I love this’. एखाद्या व्यक्तीविषयी आपुलकीची भावना असते तेव्हा आपण म्हणतो, ‘मी त्या व्यक्तीवर प्रेम करतो’. खरे पाहता आपल्याला जे अधिक आवडते, आनंद देते किंवा आपण ज्याच्याविषयी आकर्षित होतो, ते प्रेम असतेच असे नाही. संत मत्तय आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तासारखे प्रेम करावयास आवाहन करत आहे.
स्वत:चे समर्पण, म्हणजेच अगदी अंत:करणापासून दुस-यासाठी आपण आपले सर्वस्व देणे. परस्पर प्रीती करणे हे कठीण आहे. आपण प्रत्येकजण आपले सर्वस्व इतरांना देण्यासाठी पुढाकार घेत नाही. आपले आनंदी व सुखी जीवन स्वतःपुरतेच जगणे आपण पसंत करतो. मात्र प्रभू येशूला त्यागमय जीवनातील प्रेम अपेक्षित आहे. आपण प्रभू येशूच्या प्रीतीत मुळावणे गरजेचे आहे. गरजवंत व ज्याचे कुणी नाही अशांसाठी आपण आपल्या अंत:करणाचे दरवाजे उघडायला हवेत. प्रभू येशू सर्वदा आपल्यावर प्रेमपूर्वक कृपादानाचा वर्षाव करीत असतो. आपल्या प्रिय भक्तगणांसाठी आणि त्याला शरण येणा-या प्रत्येक श्रद्धावंतांसाठी प्रभू येशू अदभूत चमत्कार करण्यास तयार आहे. आपण त्याच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याची प्रीती-आज्ञा आचरणात आणून, श्रद्धेने जीवन जगण्यास सदा तत्पर असलो पाहिजे. संत योहानाचा देखील संदेश हाच आहे कि, “शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी”. म्हणूनच ह्या पवित्र मिस्सा बालीदानामध्ये प्रार्थना करुया की, ‘हे प्रभू येशू तुजवरील श्रद्धा दृढ करण्यास व तुझ्यावर आणि शेजा-यांवर प्रीती करण्यास मला प्रेरणा व शक्ती दे आणि इतरांसाठी मी तुझ्या प्रीतीचे माध्यम बनण्यास मला सामर्थ्य व कृपा दे, आमेन’.
       
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्यावरील आमच्या प्रीतीत वाढ कर.
  1.  जे परमेश्वराच्या मळ्यात काम करत आहेत, ह्या सर्वांनी प्रभूच्या मार्गाची घोषणा करून प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी लोकांना मदत करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून तसेच भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांस शेजा-यांवर प्रीती करण्यास व आपले प्रेम इतरांना देण्यास प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून, आपण प्रार्थना करूया.
  4.  जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत अशा सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व देवावरील त्यांचा विश्वास अधिक बळकट व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5.  आपण आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.  

Tuesday, 14 October 2014

Reflections for the homily by: Valerian Patil.













सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार







दिनांक: १९/१०/२०१४
पहिले वाचन: यशया ४५:१, ४-६
दुसरे वाचन: १ थेसलोनिकाकरांस १:१-५ब
शुभवर्तमान: मत्तय २२: १५-२१

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार व त्याचबरोबर मिशन रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया आपल्याला सांगतो की, आपला देव एकच आहे व त्याची ओळख पृथ्वीच्या कानाकोप-यातील लोकांना झाली पाहिजे. तर दुस-या वाचनात संत पौल थेसलोनिकाकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हणतो, ‘बंधुजनहो, तुम्ही देवाला प्रिय आहात आणि त्याने तुमची निवड केली आहे, त्याची तुम्हांला जाणीव व्हावी’. तसेच शुभवर्तमानात येशू, ‘जे कैसराचे आहे ते कैसराला द्या व जे देवाचे आहे ते देवाला द्या’ असे सांगून कर देणाचा प्रश्न सोडवतो.
आज आपण मिशन रविवार साजरा करीत असताना जे मिशनकार्य करत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात योग्य अशी मदत मिळावी व सर्व वाईटापासून त्यांचे संरक्षण व्हावे व आपणसुद्धा आपल्यापरीने ह्या मिशनकार्यात सहभाग घ्यावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ४५:१, ४-६

देव हा सर्वसामर्थ्य आहे त्याचे जगव्यापी प्रकटीकरण त्याच्या सत्याच्या समर्थनाच्या पार्श्वभुमीवर आधारित आहे. अभिषिक्त ही संज्ञा ‘मसिहा’ या अभिधानाचा आधार आहे पण जुन्या करारात ही संज्ञा विशेषकरून देवाचा अभिषिक्त राजाच्या  संबंधात वापरली आहे (उदा.१ शमु.२४:६ मध्ये शौल). सायरसला एक सवौच्च कार्यासाठी नेमले व सज्ज केले आहे आणि त्याचे सर्व विजय या कार्याची प्रारंभिक प्रस्तावना आहे यावर ह्या संज्ञेने भर दिला आहे.

दुसरे वाचन: १ थेस्सलोनीकाकरांस १:१-५ब

आपल्या बहुतेक पत्रांच्या प्रारंभीच पौलाने आपल्या वाचकांच्या जीवनात देव जे करीत आहे त्यासाठी त्याची उपकार स्तुती केली आहे. प्रार्थनेसबंधीच्या या उल्लेखातून आपल्या मित्राविषयी त्याची स्वतःची प्रीती व आस्था स्पष्टपणे दिसून येते आणि यातूनच त्यांना आपल्या ख्रिस्ती जीवनात धीर व उत्तेजन मिळते. वाचकांनी आपला मुळचा विश्वास तेवढयाच उत्साहाने व चिकाटीने दृढ ठेवला आहे. परिणामी ते इतर लोकांना ख्रिस्ताचे साक्षीदार झाले आहेत हाच मुद्दा येथे आहे. सुवार्तेद्वारे देवाने त्यांना पाचारण केले एवढेच नव्हे तर त्यांनीही विश्वासाने त्याला यथार्थ प्रतिसाद दिला हे मुलभूत ख्रिस्ती गुण सर्वांच्या अंगी असावेत. कारण आपण देवाचे प्रिय आहोत.

शुभवर्तमान: मत्तय २२: १५-२१

येशूच्या विरोधात परुशी नेहमीच होते. त्याला बोलण्यात पकडावे, त्याच्या तोंडाची उलट-सुलट विधाने त्याच्यावरच उलटवावी हा त्यांचा उद्देश होता. ......    रोमन सरकारला द्यावा लागणा-या कराविषयी होता. देशप्रेमी यहुदयांना या कराची वचनबद्धता होती, हे राजकीय अधिनतेचे चिन्ह असे त्यांना वाटे. सुमारे पंचवीस वर्षापूर्वी गालीलातील एक लोकप्रिय पुढारी यहुदा याने या कराच्या विरोधात मोठी बंडाळी माजवली होती. ‘जीलोत’ गटाला प्रेरणा देणारा हा यहुदा होता. तसा हा फसवा, कावेबाज प्रश्न होता. कर दिला पाहिजे असे म्हटले तर तो देशद्रोही ठरतो आणि त्याला विरोध करणे राजकीय दृष्टीने धोक्याचे होते.
येशूने त्याच्याकडे एक नाणे पाहायला मागितले आणि त्यातून त्याने त्यांचा दाभिकपणा उघड केला. कोणताही देशप्रेमी यहुदी माणूस हे नाणे बरोबर घेऊन फिरला नसता. या नाण्यावर बादशहाचा मुखवटा होता आणि त्यावर त्याची ‘देवाचा पुत्र’ ही पदवी कोरली होती. ही एक प्रकारे मूर्तीपूजा होती. ते कैसराचे चलन वापरतात तर त्यांनी त्याचा कर भरणे वाजवीच आहे या प्रकारे येशूने स्वतःला त्या ‘जीलोत’ गटापासून निश्चयाने दूर ठेवले आणि विधर्मी सरकारशी निष्ठा ठेवणे ही गोष्ट देवावरच्या निष्ठेशी विसंगत नाही हे यातून स्पष्ट केले.

बोधकथा:

एकदा एक तरूण चित्रकार, एक बाई तिच्या लहानशा बाळाबरोबर भयंकर अशा वादळ वा-यात सापडलेली आहे अशा प्रकारचे चित्र रंगवत होता. त्याने चित्र इतक्या उत्कृष्टरित्या रेखाटलेले होते की, त्या चित्रातून जिवंत भावना व्यक्त होत होत्या. हे चित्र पाहून तो चित्रकार स्वत:चे भान विसरून गेला. ते ह्दयस्पर्शी चित्र पाहून त्या तरूण चित्रकाराने आपल्या हातातील रंगकामाचा ब्रश बाजूला ठेवला आणि स्वत:शीच म्हणाला,खरतर मी अशा परिस्थितीत असलेल्या लोकांना माझ्या मदतीचा हात पुढे केला पाहिजे, त्यांचे मी फक्त चित्र रंगवून त्यांना काय लाभ? ह्या प्रश्नावर भारावून गेलेल्या ह्या चित्रकाराने आपल्या कलेचा त्याग केला व गरीब लोकांची सेवा करू लागला आणि हाच तरूण चित्रकार आफ्रिकेतील युगांडा येथील लोकप्रिय मिशनरी बिशप बनला.

मनन चिंतन:

1) येशू ख्रिस्ताला कसेही करून नजरेआड करण्याचा यहुदी धर्मपुढा-यांनी निश्चय केला होता. कोणत्याही मार्गाचा उपयोग करण्याची त्यांची तयारी होती. ते रोमी लोकांना आपले कट्टर शत्रू मानत. मात्र, येशू ख्रिस्ताला ठार करण्यासाठी ते त्यांच्याशी तडजोड करण्यास तयार होते. येशू ख्रिस्ताला बोलण्यात पकडण्याचा डाव त्यांनी रचला. येशूला रोमी सरकारविरुद्ध बोलण्यास लावून आपणास आरोप ठेवण्यास चांगलेच कारण मिळेल असे त्यांना वाटले.
त्यांनी आपले शिष्टमंडळ पाठविले. त्या शिष्टमंडळाने येशूची तोंडस्तुती करून आरंभ केला. नंतर त्यांनी एक प्रश्न विचारून आपला डाव टाकला. “कैसराला कर देणे योग्य आहे किंवा नाही” व त्याने “होय” म्हटले असले तर येशू इस्राएल राष्ट्राचा शत्रू आहे असं प्रचार त्यांनी केला असता. “नाही” म्हटले असते तर रोमी सरकारविरुद्ध अप्रचार करणारा आरोप ठेवता आला असता. येशूने त्यांचे ढोंग व दुष्टपणा ओळखले. सरकारला कर मागण्याचा हक्क आहे व त्याच वेळी देवाचे ऐकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे त्याने दाखवून दिले.

2) मिशन कार्य ही येशूने दिलेली आज्ञा आहे. दिलेली आज्ञा तोडता येत नाही तर ती पाळली जाते. आपले ख्रिस्ती मिशन म्हणजे केवळ paying, praying and obeying नव्हे तर देवाने दिलेले कार्य करणे देखील आहे. मिशन कार्य करणे म्हणजे फक्त दूरवर जाणेच नव्हे. परमेश्वराने आपणाला आठवड्यातून सात दिवस दिलेले आहेत, ह्यापैकी जे देवाचे आहे म्हणजेच चर्चला येऊन त्याची भक्ती करणे, त्याची पुजा करणे व उरलेल्या दिवसात आपण जेथे काम करत आहोत, जेथे आपण राहत आहोत, जेथे कुठे आपण जात आहोत त्या-त्या सर्व ठिकाणी आपल्या शब्दातून आणि आचरणातून परमेश्वर इतरांना देणे हे देखील मिशनच आहे. यशया संदेष्टा देखील आजच्या वाचनात अप्रत्यक्षरित्या मिशनविषयी म्हणत आहे. तुझी ओळख नसतानादेखील मी तुझी चांगल्या कार्यासाठी नेमणूक केली आहे, तुला पदवी बहाल केली आहे जेणेकरून खरा परमेश्वर कोण आहे ह्याची ओळख लोकांना तुझ्याद्वारे होईल. संत पौल देखील आपण प्रत्येकजण देवाचे प्रिय आहोत असे सांगत आहे कारण त्याने त्याच्या शुभसंदेशासाठी आपली निवड केली आहे. तो शुभसंदेश केवळ शाब्दिक नसून प्रभावी व पवित्र आत्म्याने प्रेरित झालेला होता व पूर्ण प्रत्ययकारी होता. मग आपण कुठे आहोत? आपण प्रभूच्या मिशन कार्यात सहभागी होऊन जे देवाचे आहे ते देवाला आणि जे कैसराचे आहे ते कैसरला देत आहोत का?    

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक.
  1. आपले पोप, कार्डीनल्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना त्यांच्या मिशन कार्यात प्रभूचा आशीर्वाद लाभवा व सर्व संकटापासून त्यांचे संरक्षण व्हावे  म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. जे कोणी जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी कार्य करत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात अधिकाअधिक मदत व्हावी व त्यांच्या कार्याद्वारे ह्या जगात शांतीमय वातावरण निर्माण व्हावे  म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. येणा-या नवीन सरकारने आपल्या राज्याच्या उन्नतीसाठी निस्वार्थीपणे झटत राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. आपल्या धर्मग्रामातील सर्व आजारी लोकांना देवाने आरोग्यदायी स्पर्श करावा व त्यांना परत एकदा चांगले आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5.  आता आपण शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करुया.