Reflections for Homily By: Manuel Fernandes.
सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार
दिनांक: ०५/१०/२०१४
पहिले वाचन: यशया ५:१-७
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस
पत्र ४:६-९
शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करत आहोत. आजच्या पहिल्या
वाचनात आपण द्राक्षमळ्याच्या दुष्टांताविषयी ऐकतो. ह्या दुष्टांताद्वारे यशया
संदेष्टा, सेनाधीश प्रभू हा द्राक्षमळ्याचा अधिकारी आहे व ज्या वेलीची त्याने
आवडीने लागवड केली ते यहूदी लोक आहेत हे सत्य प्रकट करतो. दुस-या वाचनात संत पौल
फिलिप्पैकरांस परमेश्वराचे आभार स्तवन करण्यास प्रोत्साहित करून सदैव आनंद करण्यास
सागत आहे.
तसेच शुभवर्तमानात येशू ख्रिस्त द्राक्षमळा आणि माळेकरी यांचा दाखला देत आहे. यहुदी
धार्मिक अधिका-यांनी व पुढाका-यांनी त्यांच्या अधिकारांचा दुरूपयोग केल्यामुळे त्याचा
त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे हे येशू ख्रिस्त ह्या दाखल्याद्वारे स्पष्ट
करतो. आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या अधिकारांचा दुरूपयोग न करता त्यांचा
वापर इतरांच्या सेवेसाठी करावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५:१-७:
हा छोटासा दाखला अतिउत्कृष्ट आहे. याचा आरंभ प्रेमगीतासारखा आहे. तो कर्णमधुर,
कल्पक आहे. हा दाखला वाचत असताना आपण स्वतःचीच चौकशी करून घेत आहोत असे आढळते.
तसेच ह्या दाखल्याद्वारे पापाचे खरे स्वरूप स्पष्ट होते व ते सर्वस्वी असमर्थनीय
आहे हे जाणवते.
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र ४:६-९:
या पत्रामध्ये आनंद हा विषय मांडला आहे. प्रेषिताने आपल्या वाचकांना सदोदीत
आनंद करण्यास सांगितले आहे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा हेच त्याचे आवाहन आहे.
‘प्रभूमध्ये स्थिर राहा’. ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन आणि नातेसबंध यातून जीवनाचा एक
विशिष्ट गुण सर्वांना उघडपणे कळून यावा असे तो सांगतो. ख्रिस्ती लोकांच्या जीवनात
चिंतेला अजिबात थारा नसावा कारण त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना, विनंती
करता येते व ती करावी.
ख्रिस्ती व्यक्तीचे विचार जीवनाला धरून असावेत अशा गीष्टीचा उल्लेख पौलाने येथे
केला आहे. ह्या गोष्टींचे मनन केल्याने आपल्या वृत्ती-प्रवृत्तींना आकार मिळतो. आपले
उच्चार व आचार-कृती सर्वांना चांगले वळण लावतील कारण या गोष्टी ख-या, प्रामाणिक,
योग्य, शुद्ध, सन्माननीय आणि प्रिय अशा आहेत.
शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३
या दाखल्यात द्राक्षमळा व माळेकरी यांचे उदाहरण दिले आहे. परगावी राहणारा
जमीनदार व त्याचे माळेकरी ह्यांचा हा वृतांत आहे. मळ्याचा खंड म्हणून उत्पन्नाचा
काही ठराविक हिस्सा मालकास देण्यास ते नकार देत होते व ह्याच कारणावरून त्यांना काढून
टाकणे हे पुरेसे कारण होते परंतु जमीनमालकाच्या मुलाचा खून केल्याने प्रकरण अधिकच
गंभीर झाले. या दाखल्याचे मर्म याजक आणि परुशी ह्यांना ताबडतोब उमजले कारण
संदेष्ट्याचे पुस्तक माहीत असणा-या कोणालाही ते समजले असते. इस्राएल देवाच्या अपेक्षा
पूर्ण करण्यास सर्वथा उणे पडले हे यशयाने त्या सर्वश्रुत द्राक्षमळ्याच्या
दाखल्यातून प्रतिक रूपाने दाखवले आहे. हे पुढारी आता लवकरच देवाच्या पुत्राला ठार
करणार होते. त्यातून गतकाळात त्यांनी देवाच्या संदेष्ट्याचा पुन्हा-पुन्हा अव्हेर
केला होता. या वाचनातून या दाखल्याचा गर्भीव अर्थ स्पष्ट केला आहे; इस्राएलच्या
पुढा-यांनी ज्याला नाकारले त्याला सन्मानाच्या सर्वोच्च पदासाठी निवडलेले आहे, हे
सप्रमाण सिद्ध होते. द्राक्षमळा या चिन्हाचे दर्शविलेले राज्य त्यांचे नव्हे तर
देवाचे आहे आणि देव ते जबाबदार व्यक्तीस सोपवून देईल.
बोधकथा:
डॉक्टर अडोल्फ लॉरेन्स हे विएन्ना मध्ये त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी
प्रख्यात झाले होते. हिच प्रकिया कशी करावी व त्याचा वापर कसा करावा ह्याचे
प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना अमेरिकेला बोलावण्यात आले होते. जेव्हा ते अमेरिकेला
पोहचले तेव्हा त्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली व
त्याच बरोबर त्यांना विशिष्ट प्रकारची सुरक्षा प्रदान करण्यात आली. परंतु एके
दिवशी ते गुपचुपपणे बाहेर टहळण्यासाठी निघून गेले, त्याचवेळी मुसळधार पाऊस चालू
झाला. आसरा शोधण्यासाठी ते ऐका घरापाशी जाऊन त्यांनी त्या घराचा दरवाजा ठोठावला.
त्या घरातील बाईने दरवाजा उघडून घरात पहिलेच दुःखाचे डोंगर आहेत असे म्हणून त्यांच्या
तोडावर दरवाजा बंद केला. काही क्षणांनतर त्या हॉटेलचे सुरक्षाव्यवस्थापक येऊन
त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले.
दुस-या दिवशी सर्व वर्तमानपत्रात डॉक्टर अडोल्फ लॉरेन्सविषयी त्यांच्या फोटोसह
माहिती देण्यात आली होती. ही माहिती जेव्हा त्या महिलेने वाचली तेव्हा तिला कळून
चुकले की हेच डॉक्टर माझ्या दारापुढे उभे होते आणि लागलीच तिला जाणीव झाली की,
तिच्या मुलीचा जो आजार आहे त्या आजरावर फक्त तेच एकमेव डॉक्टर यशस्वी शस्त्रक्रिया
करू शकत होते. (देवाने सुद्धा इस्त्राएल लोकांच्या तारणासाठी अनेक अशे संदेष्टे
पाठविले व सरतेशेवटी आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपल्या तारणासाठी पाठविले परंतु
लोकांनी त्याससुद्धा ओळखले नाही.)
मनन चिंतन:
आजच्या उपासनेत आपल्याला जबाबदारी व विश्वास ह्या दोन मुख्य गोष्टी आढळतात.
शुभवर्तमानात द्राक्षमळा व माळेकरी ह्यांचे उदाहरण आहे. तसेच इस्राएल राष्ट्राने
संदेष्टे व ख्रिस्ताचा कसा धिक्कार केला याचे वर्णन केले आहे.
इस्राएली लोकांना यहोवाचा द्राक्षमळा म्हटले
आहे, आजच्या दाखल्यात द्राक्षमळ्याच्या माळ्यांना इस्राएली लोकांच्या पुढा-यांची
उपमा दिलेली आहे. देवाने आपले संदेष्टे इस्राएली लोकांपुढे पाठविले परंतु त्यांनी
बहुतेकांचा छळच केला. शेवटचा संदेष्टा बाप्तिस्मा करणारा योहान हा होता, त्याचा देखील
वध करण्यात आला. शेवटी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यालाही त्यांनी जीवे मारले
त्यामुळे इस्राएली लोकांचा न्याय करण्यात आला.
आज जगात कितीतरी गोष्टी घडत आहेत; कामगार मालकाचा खून करतो, कामगार आपल्या
मालकाच्या घरी चोरी करतो, इत्यादी. कामगार व मालक ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे.
आपण कितीतरी वेळेला आपल्या मालकाविषयी वाईट विचार करतो. कधी-कधी आपण एवढे दूर जातो
की आपली आपल्याला लाज वाटते. आजच्या शुभवर्तमानात येशू म्हणत आहे, “जी शिळा
गवंड्यांनी नापसंत केली तोच कोनशीला झाला”. ह्यावर विश्वास ठेवून आपल्या जीवनात
येशूला प्रथम स्थान देऊया कारण तोच आपल्या जीवनाचा कोनशीला आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
- ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू ह्या सर्वांना देवाचा शब्द जगाच्या कानाकोप-यात पसरविण्यासाठी विशेष शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
- सर्व ख्रिस्ती लोकांचे वाईटांपासून रक्षण व्हावे व प्रार्थनेद्वारे त्यांचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपल्या गावातील तरुण पिढीला देवाने स्पर्श करावा जे देवापासून दूर गेले आहेत ते परत यावे तसेच जे देवाचे कार्य करत आहेत त्यांनी ते अधिक तन्मयतेने करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
- जे लोक बेरोजगार आहेत त्यांना परमेश्वरी कृपेने त्यांच्या कुवतीप्रमाणे योग्य तो रोजगार मिळवा म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment