Wednesday, 8 October 2014

Reflections for the homily, by: Fr. Sandeep Koshav.
Fr. Sandeep Koshav belongs to St. Bonaventure Province Maharashtra. At present he is rendering his service as a secretary to the provincial at Vidyavihar.








            सामान्य काळातील अठठाविसावा रविवार























दिनांक: १२/१०/२०१४   
पहिले वाचन: यशया २५:६-१०
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र ४:१२-१४
शुभवर्तमान: मत्तय २२:१-१४

बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत”

प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील अठ्ठावीसावा रविवार साजरा करीत आहे. मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागे कारण असते. जर हे कारण उचित असेल तर कृतीही उचित घडत असते परंतु जर कृती चुकीची घडली तर त्यामागे मनुष्य चुकीची अनेक कारणे देत असतो. आजच्या शुभवर्तमानाद्वारे येशू ख्रिस्त आपणांस देवाच्या राज्याचा अविभाज्य भाग होण्याचे आमंत्रण देत आहे. देवाच्या आमंत्रणाला होकार दिल्यावर माणसाची प्रगती होते, समृद्धी होते व नकार दिल्यावर त्याचा –हास होतो व तो लयास जातो याचा अनुभव आपल्याला प्रतिदिनी येतो. या आमंत्रणाचा स्वीकार करावा किंवा नकार द्यावा हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. देवाने दिलेल्या आमंत्रणाला योग्य तो प्रतिसाद देण्यासाठी लागणारी कृपा आपण या प्रभू भोजनामध्ये मागू या.

पहिले वाचन: यशया २५:६-१०

आजच्या पहिल्या वाचनात प्रवादी यशया देवाच्या आमंत्रणांस होकार दिलेल्या लोकांसाठी कशाप्रकारे देवाने मिष्टान्नाचे टेबल सज्ज ठेवलेले आहे याचे वर्णन करतो. देवाच्या डोंगरावर त्याच्या शब्दाने तारलेल्या लोकांसाठी सर्व प्रकारच्या वस्तूंची विपुलता आहे. देवाने सज्ज केलेले हे मिष्टान्नाचे टेबल ज्यांनी-ज्यांनी त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे त्या सर्वांसाठी खुले आहे.

दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र ४:१२-१४  

आजच्या दुस-या वाचनात संत पौल म्हणतो की दैन्या अवस्थेत व संपन्नतेमध्ये कसे रहावे हे मला समजले आहे. तृप्त आणि अतृप्त याच्यामधील भेद मी जाणलेला आहे परंतु या सर्व अवस्थेमध्ये परमेश्वर सर्वकाही पुरवतो याचा अनुभव घेणे महत्वाचे  आहे.

शुभवर्तमान: मत्तय २२:१-१४ 

मागील काही रविवार आपण देवाचे राज्य या दाखल्यावर विचार-विनिमय करत आहोत. या सर्व दाखल्यातून येशू एकच गोष्ट आपणासमोर ठेवू इच्छितो, जो परमेश्वराच्या आमंत्रणाचा स्विकार करतो त्याला देवाच्या राज्याचा आनंद (सार्वकालिक जीवनाचा अनुभव) सदैव प्राप्त होतो. आजच्या दाखल्यात देखील दोन भाग आहेत.
पहिल्या भागात- देवाचे भोजनासाठी सर्वांना आमंत्रण आहे. तारणाच्या पूर्ण इतिहासात अनेक संदेष्टे, प्रवादी पाठवण्यात आले परंतु निवडलेल्या लोकांनी त्यांचा स्विकार केला नाही. आता ते ख्रिस्ताचा देखील स्विकार करणार नाहीत आणि म्हणून आपल्या शिष्यांद्वारे ख्रिस्त हा तारणाचा संदेश इतर न निवडलेल्या लोकांपर्यंत पोहोचवेल व त्यांना आपल्या आपल्या प्रीती भोजनाच्या (पवित्र मिस्सामध्ये) विधीमध्ये वाटेकरी करील.
दुस-या भागात- आपणांस आढळते की, ज्याने ख्रिस्ती जीवन व ख्रिस्ताला स्वीकारलेले आहे, त्यांनी ख्रिस्ताला कशाप्रकारे स्वीकारलेले आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने शुद्धतेचे, न्यायाचे व विश्वासाचे नवे वस्त्र धारण केले आहे का?

बोधकथा:

 एकदा एका शहरात विशेष प्रकारे आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेसाठी दोन प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी बोलाविले होते. त्यांनी गरिबी, मुलभूत तत्वे, शोषण, दडपशाही किंवा समाज्यात होणारे जुलूम अशा विविध विषयांवर मार्गदर्शन/प्रबोधन केले. ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी मोठमोठ्या संस्थेच्या अधिका-यांना, धार्मिक पुढाका-यांना सहभागी होण्यासाठी बोलावले होते त्याचबरोबर शहरातील सर्व धर्मीय युवकांना देखील ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रण होते. सर्व धर्माचे युवक ह्या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शंभरपेक्षा जास्त आमंत्रण पत्रे पुढाका-यांना आणि अधिका-यांना पाठवण्यात आली होती मात्र फक्त दोन वा तीन अधिकारी ह्या सभेसाठी उपस्थित होते. त्या दोन सामाजिक कार्यकर्त्यांचे वक्तव्य फक्त शाब्दिक नसून त्यांच्या दररोजच्या जीवनावर देखील आधारित होते. त्यांनी फक्त शब्दांवरच भर न देतो जे काही ते बोलले त्याचा आपल्या दररोजच्या जीवनात देखील आणण्याचा प्रयत्न केला हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून दाखवले. जे युवक सभेसाठी आले होते त्या सर्वांनी मिळालेल्या ह्या संधीमुळे आयोजकांचे आभार मानले कारण जे बोलतात तेच आपल्या आचरणात आणतात हे फारच थोड्यांना ऐकण्याची संधी भेटत असते.
कार्यक्रमानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी आमंत्रित मान्यवर ह्या विशेष अशा सभेसाठी का म्हणून आले नाही ह्याची विचारपुस केली. जी उत्तरे त्यांनी दिली ह्यावरून त्यांच्या जीवनात प्राधान्य/अग्रस्थान किंवा मूल्य कोणत्या गोष्टींना आहे हे निदर्शनास आले: एकजण म्हणाला, मी माझ्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलो होतो, दुसरा म्हणाला, मी खरेदारीसाठी गेलो होतो, तिसरा म्हणाला, मी माझ्या शाळेत होणा-या खेळांचे आयोजन करत होतो, येत्या शनिवारी आमच्या सणाची व त्याच्या सजावटीमध्ये मी मग्न होतो, आणि नाना प्रकारची कारणे जी न सांगितलेली बरी. ते काय गमावून बसले होते ह्याचे त्यांना भान नव्हते कारण जे वक्ते होते त्यांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीची त्यांना काहीच कल्पना नव्हती परंतु जे युवक मोठ्यासंख्येने  ह्या सभेसाठी आले त्यांना ह्या वक्त्यांच्या पार्श्वभूमीची व ह्या सभेला उपस्थित राहून काय परिणाम होईल ह्याची त्यांना पुरेपूर जाणीव होती.  

मनन चिंतन:

आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण राजाच्या उदारतेचा अनुभव घेतो. हा राजा जो आपणाला आमंत्रित करतो तो दयाशाली व सहनशील आहे. आपणासमोर हा जो उतारा प्रभू येशू ठेवत आहे तो पूर्णपणे त्याच्या जीवनाशी निगडीत आहे. आमंत्रित करणारा राजा हा खुद्द परमेश्वर आहे; आणि ज्या लग्न मंडपात तो बोलावत आहे ती ख्रिस्तसभा आहे. राजाचे पहिले आमंत्रित हे जुवीश (यहुदी) बंधू आहेत परंतु त्यांनी राजाच्या आमंत्रणाला होकार दिला नाही तर त्याला क्रुसावर ठार केले, आणि म्हणून ज्याप्रमाणे राजाने आपल्या सैन्याला पाठवून इतरांना आमंत्रित केले व राजभोजनात वाटा घ्यायला सांगितला. परंतु राजाने आमंत्रित केलेल्या लोकांनी दोन चुकीच्या गोष्टी केल्या. सर्वप्रथम ज्या राजाच्या राजहद्दीत ते राहत होते, त्या राजाचा मान-सन्मान त्यांनी केला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी राजाच्या सैनिकांना चुकीची वागणूक दिली व काहींना जिवे देखील मारले. राजाच्या सहनशीलतेचा व औद्याचा त्यांनी गैरवापर केला आणि म्हणून ते राजाच्या क्रोधाला बळी पडले.
आपणाला आमंत्रित करणारा राजा पिता परमेश्वर हा दयेचा सागर आहे, त्यांनी आपणासाठी टेबल सज्ज ठेवलेले आहे. तो आपणांस बोलावीत देखील आहे परंतु परमेश्वराच्या या आमंत्रणाला मी साद घालतो का? जेव्हा आपल्याला एखाद्या श्रीमंत किंवा प्रतिष्ठित व्यक्तीकडून एखाद्या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळते तेव्हा मी किती पूर्वतयारी करत असते, त्याच्या आमंत्रणाला आपण कधी नकार देत नाही, उच्च प्रतीचे, सुशुभ्र असे कपडे आणि सर्वकाही टापटीप आहे याची आपण खात्री घेतो, मग परमेश्वर खुद्द जेव्हा मला आमंत्रित करत आहे तेव्हा कशा प्रकारची आध्यात्मिक, शारीरिक तयारी मी करत असतो. आजच्या उता-यामध्ये आपण लग्नाची वस्त्र परिधान न केलेल्या व्यक्तीचे ऐकतो, त्याला लग्नमंडपातून बाहेर घालवण्यात आले. का? कारण त्याने स्वतःची तयारी केली नव्हती, तो आध्यात्मिक व शारीरिक दृष्ट्या पात्र नव्हता, शुद्ध नव्हता आणि म्हणून येशू म्हणतो, पुष्कळांना आमंत्रित केले आहे परंतु पात्र थोडे निवडलेले आहे. त्या निवडलेल्या लोकांमध्ये आपली गणना होऊ शकते का? त्या निवडलेल्या लोकांत बसण्यास मी पात्र आहे का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: प्रभो तुझ्या आमंत्रणाला होकार देण्यास आम्हाला सहाय्य कर.
  1. आमचे परमगुरु, महागुरू, धर्मगुरु व धर्मभगिनी यांनी देवाच्या आमंत्रणाला होकार देऊन इतरांना त्या पथावर चालण्यास सहाय्य करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2.  देवाच्या आमंत्रणाला नकार देऊन जीवनाच्या मार्गाऐवजी पापांचा, अंधाराचा मार्ग चालणा-या बंधू-भगिनींना ख-या सत्याची जाणीव व्हावी व सुयोग्य मार्गावर ते चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. कौटुंबिक जीवनावर होणा-या या सिनडमध्ये भाग घेणा-या लोकांवर देवाचा विपूल वरदस्त यावा व कौटुंबिक जीवन चांगल्याप्रकारे समजण्यास व जगण्यास योग्य ते निर्णय त्यांना घेता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. आपल्या महाराष्ट्रात होणा-या निवडणुकीतून चांगले सरकार जे लोकांसाठी व समाज्याच्या हितासाठी कार्य करेल असं सरकार मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.    



No comments:

Post a Comment