Wednesday, 29 October 2014

 Reflections for Homily By: Nevil Govind


सर्व मृत भाविकांचा स्मृतिदिन

दिनांक: २/११/२०१४
पहिले वाचन: यशया २५:६-९.
दुसरे वाचन: पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र १५: ५१-५७
शुभवर्तमान: योहान १२:२३-२६

‘अनंतकाळाच्या शाश्वत जीवनाची आशा’

प्रस्तावना:
आज अखिल ख्रिस्तसभा सर्व मृत भाविकांचा स्मृतिदिन साजरा करत आहे. आजच्या दिवशी आपण सर्व मरण पावलेल्यांची तसेच आपल्या प्रिय नातेवाईकांची आठवण करतो. मृत्युमुळे माणसाच्या जीवनाचा शेवट होत नाही, तर त्यात फक्त बदल होतो; मृत्युनंतर अनंतकाळाच्या शाश्वत जीवनाला सुरुवात होते ही आपली ख्रिस्ती श्रध्दा आहे. येशू ख्रिस्ताने मरणातून पुन्हा उठून आपल्या जीवनाला नवीन दिशा दिली आहे. ह्या जगात असताना आम्हीं सर्वांशी शांतीने वागावे, ऐकमेकांना क्षमा करून देवाच्या क्षमेस पात्र व्हावे व ख्रिस्ती विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे, ह्यासाठी आपणांस परमेश्वराची कृपा-शक्ती लाभावी म्हणून आपण ह्या पवित्र मिस्सा बलिदानात विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन: यशया २५:६-९.
यशया प्रवक्ता ह्या उता-यातून स्पष्ट करतो की, ‘परमेश्वर मृत्यू कायमचा नाहीसा करणार आहे, सर्वांच्या चेह-यावरील अश्रू पुसणार आहे आणि ह्याच देवाची आपण आशा धरून राहिलो पाहिजे कारण तो आपले तारण करील.

दुसरे वाचन: पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र १५: ५१-५७
            ख्रिस्त येईल तेव्हा विश्वासणारे आपल्या शरीराने स्वर्गाला जाऊ शकणार नाहीत (ओवी.५०); ते त्या समयी बदलून जातील (ओवी.५१). हा बदल क्षणात घडून येईल (ओवी.५२अ). ख्रिस्त आपल्या मंडळीला घेऊन जाण्यास येईल तेव्हा कर्णा वाजेल व जे ख्रिस्तावर विश्वास ठेऊन मरण पावले आहेत ते उठविले जातील. त्यांना व जगातील विश्वासणा-यांना अविनाशी व गौरवी शरीर मिळेल (ओवी.५२, ५३). अशाप्रकारे ख्रिस्त मरणावरील आपला विजय प्रगट करील. त्यानंतर प्रभूच्या लोकांना मरणाचा अनुभव कधीच येणार नाही.

शुभवर्तमान: योहान १२:२३-२६
            “गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो”(ओवी.२४). येशू ख्रिस्ताने हे त्यांना दिलेले उत्तर अतिशय सखोल अर्थाचे आहे(ओवी.२४). येशूने जी सेवा केली होती त्यामुळे सर्व यहूदी लोकांना येशूविषयी समजले होते. तरी ख्रिस्त एकटाच होता. जगातील सर्वांना येशूचा लाभ व्हावा यासाठी ख्रिस्ताला मरणाची गरज होती हे येशूने त्यांना गव्हाच्या दाण्याचे उदाहरण घेऊन सांगितले. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, हे किती खरे आहे. तो दाणा कितीही उत्कृष्ट प्रकारचा असला तरी जमिनीत पडून मेल्याशिवाय त्याच्यातील जीवनव्यर्थ ठरते. जो ख्रिस्तासाठी स्वतःचे समर्पण करील तोच अनेकांना आशीर्वाद देणारी सेवा करील.

बोधकथा:
एका गावात एक विधवा स्त्री आपल्या एकुलत्या एक मुलासह राहत होती. तिचा देवावर खूप विश्वास होता. ऐके दिवशी अचानक तिचा मुलगा मरण पावला. तिला आपला एकुलत्या एका मुलाच्या विरहाने धक्का बसला. आपल्या मुलाच्या मृत्यूवर तिचा विश्वास बसे ना. तो केवळ झोपी गेलेला आहे असे तिला मनोमन वाटू लागले. शेजारी जे तिच्या सांत्वनासाठी आलेले ते तिची समजूत काढू लागले, ‘तुझा मुलगा झोपी गेलेला नसून तो मृत्यू पावला आहे’. ती विधवा कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हती. ती विधवा आपल्या मृत मुलाला घेऊन अनेक देवळात आणि साधू संतांकडे घेऊन गेली. पण सर्व ठिकाणी तिला एकच उत्तर मिळाले, ‘स्त्री तुझा मुलगा झोपी न गेलेला असून मृत पावला आहे’. अखेर ती विधवा स्त्री आपल्या मुलाला घेऊन गौतम बुद्धाकडे गेली आणि त्यांस म्हणाली, ‘स्वामी माझा एकुलता एक मुलगा झोपी गेला आहे त्यास तुम्ही उठवा’; त्यावर गौतम बुद्ध तिला म्हणाला, ‘मी तुझ्या मुलाला झोपेतून उठवू शकतो; परंतु तुला माझी एक अट पूर्ण करावी लागेल. सांगा स्वामी, तुम्ही जे सांगाल ते करावयास मी तयार आहे’, ती स्त्री उद्गारली. गौतम बुद्ध तिला म्हणाला,‘ज्या घरी कोणाचाही मृत्यू झालेला नसेल अशा घरातून मला मूठभर तांदूळ घेऊन ये’. आनंदाने ती विधवा शेजारच्या गावात गेली परंतु तिला कुणीही मूठभर तांदूळ देई ना कारण प्रत्येकाच्या घरी कुणी ना कुणीतरी मरण पावलेले होते. ती निराशेने गौतम बुद्धाकडे परतली.
            मग गौतम बुद्ध तिला म्हणाला, ‘कुणाच्या घरी आई, तर कुणाच्या घरी वडील, तर कुणाच्या घरी भाऊ किंवा बहिण नाहीतर कुणी ना कुणीतरी मरण पावलेले आहेत! मृत्यू हा अटळ आहे तो सर्वांच्याच पदरी पडणार आहे. तुझा मुलगा झोपी गेलेला नसून मृत पावला आहे व ह्या सत्य स्थितीला सामोरे जा’.
 
मनन चिंतन:
१.    मृतांसाठी प्रार्थना करणे ही एक ख्रिस्ती लोकांची प्राचीन प्रथा होती. ही प्रथा इ.स. सातव्या शतकापासून मठात सुरू होती. इ.स.९९८ साली संत ओदिलो (मठवाशी) आपल्या मठात ही प्रथा सर्व संतांच्या स्मृतिनंतर म्हणजेच २ नोव्हेंबरला साजरी करीत असे. इ.स. सोळाव्या शतकापासून ही प्रथा ख्रिस्तसभेने पाळण्यास सुरुवात केली. इ.स. १९१५ मध्ये पोप महाशय बेनेडिक्ट ह्यांनी प्रत्येक धर्मगुरूंना तीन मिस्सा साजरा करण्यास सांगितले होते एक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या हेतूंसाठी, दुसरी म्हणजे सर्व विश्वासू मृतांसाठी आणि तिसरी म्हणजे पोप महाशयांच्या हेतूसाठी; ही प्रथा आजपर्यंत चालू आहे.
२. पुनरुत्थान व जीवन मीच आहे
प्रत्येक पास्काच्या दिवशी आपण ख्रिस्ताचा विजयौत्सव साजरा करतो कारण ख्रिस्त मरणाला जिंकुनिया उठला आहे. ख्रिस्त पास्काच्या दिवशी मरणांतुनी उठला म्हणून आज सर्व ख्रिस्तसभा येशू ख्रिस्ताच्या ह्या विजयी पुनरुत्थानावर खंभीरतेने उभारलेली आहे.
आपण पुष्कळ वेळा म्हणतो, ‘हा माणूस फक्त बोलतो परंतु करत काहीही नाही!ख्रिस्त जे करणार होता तेच तो बोलला. पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही”(योहान ११:२५-२६). मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही”(योहान १४, ६). तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरांत राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते; मी तुम्हांस जागा तयार करावयास जातो; आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हींही असावे”(योहान १४:१-३), “तुझा भाऊ पुन्हा उठेल”(योहान ११:२३), ख्रिस्त स्वतः मरणातून उठला म्हणून ख्रिस्ताच्या या शब्दांवर विश्वास ठेवने लोकांना सोपे झाले.
३. भूतकाळ संत जाहीर करतो आणि भविष्यकाळ पापी मनुष्य घडवितो’!
गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो”(योहान १२:२४). नितीमानांचे आत्मे देवाच्या हाती आहेत. कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही”(शलमोनाचा ज्ञानग्रंथ ३:६-९). संतांनी आपल्या जीवनाद्वारे भूतकाळ घडविला आणि ते आज स्वर्ग राज्यात देवाच्या सानिध्यात राहतात असा आपला विश्वास आहे.
आपण ह्या जगातील रहिवाशी नसून प्रवाशी आहोत’! आपल्या प्रिय जणांचा मृत्यु आपणास एकच गोष्ट सांगुन जातो, ‘आपण ह्या जगातील रहिवाशी नसून प्रवाशी आहोत’! माणूस असो श्रीमंत वा गरीब, लहान किंवा मोठा, असो संत वा पापी सर्वांना आहे अंत! आपण मृत्यूला लांबनीवर टाकू शकतो परंतु टाळू शकत नाही. मृत्यू हा अटळ आहे आणि ह्या वास्तविकतेला आपणांस सर्वांना सामोरे जायचे आहे. आपला विश्वास आहे की, संतगण आणि पवित्र माणसे स्वर्गीय-सु:ख उपभोगत आहेत. ते आपणासाठी देवाजवळ मध्यस्थी करतात म्हणून आपण त्यांच्याकडे प्रार्थना किंवा विनंती करत असतो.
मृत्यूनंतर स्वतःहून आपण स्वर्ग-राज्य प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी भूतलावर जीवन जगत असताना प्रयत्न करावे लागतात. येशूच्या वचनांवर विश्वास ठेऊन त्याच्या शिकवणुकीनुसार एक पवित्र जीवन जगले पाहिजे. त्रास सोसून व इतरांना क्षमा करून त्यांना मदत केली पाहिजे. मृत पावलेल्या आपल्या प्रिय जणांना स्वर्गीय सु:ख-शांती प्राप्त व्हावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे ख्रिस्ता आम्हांला तुझ्यात नवजीवन दे.
  1. आपले परमगुरु, महागुरू आणि सर्व धर्मगुरूंना येशू ख्रिस्त हाच खरा मार्ग-सत्य आणि जीवन आहे ही शुभवार्ता जगजाहीर करण्यासाठी दैवी-सामर्थ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. धर्मगुरु व धर्मभगिनी ह्यांनी लोकांना मृत्यूविषयी योग्य ते मार्गदर्शन करावे; आपण सर्वांनी मृत्युच्या भयाने न भिता सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालावे व जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. आपल्या कुटुंबातील प्रियजनांच्या आत्माला प्रभूपरमेश्वराने स्वर्ग-राज्यात चिरंतर शांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. ज्या मृत व्यक्तींसाठी प्रार्थना करण्यासाठी कुणीही नाही व सर्व शुद्धी-स्थानातील आत्म्यांना परमेश्वराने त्याच्या स्वर्गीय सु:खाचा आनंद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपण हे ऐहिक जीवन जगत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवावा व आपणा सर्वांना एक दिवस चांगले मरण लाभवे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  6. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.   



1 comment:

  1. Its a awesome work.today I got a new world.Thank u dear friend.all the best.

    ReplyDelete