Tuesday, 14 October 2014

Reflections for the homily by: Valerian Patil.













सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार







दिनांक: १९/१०/२०१४
पहिले वाचन: यशया ४५:१, ४-६
दुसरे वाचन: १ थेसलोनिकाकरांस १:१-५ब
शुभवर्तमान: मत्तय २२: १५-२१

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार व त्याचबरोबर मिशन रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया आपल्याला सांगतो की, आपला देव एकच आहे व त्याची ओळख पृथ्वीच्या कानाकोप-यातील लोकांना झाली पाहिजे. तर दुस-या वाचनात संत पौल थेसलोनिकाकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हणतो, ‘बंधुजनहो, तुम्ही देवाला प्रिय आहात आणि त्याने तुमची निवड केली आहे, त्याची तुम्हांला जाणीव व्हावी’. तसेच शुभवर्तमानात येशू, ‘जे कैसराचे आहे ते कैसराला द्या व जे देवाचे आहे ते देवाला द्या’ असे सांगून कर देणाचा प्रश्न सोडवतो.
आज आपण मिशन रविवार साजरा करीत असताना जे मिशनकार्य करत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात योग्य अशी मदत मिळावी व सर्व वाईटापासून त्यांचे संरक्षण व्हावे व आपणसुद्धा आपल्यापरीने ह्या मिशनकार्यात सहभाग घ्यावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ४५:१, ४-६

देव हा सर्वसामर्थ्य आहे त्याचे जगव्यापी प्रकटीकरण त्याच्या सत्याच्या समर्थनाच्या पार्श्वभुमीवर आधारित आहे. अभिषिक्त ही संज्ञा ‘मसिहा’ या अभिधानाचा आधार आहे पण जुन्या करारात ही संज्ञा विशेषकरून देवाचा अभिषिक्त राजाच्या  संबंधात वापरली आहे (उदा.१ शमु.२४:६ मध्ये शौल). सायरसला एक सवौच्च कार्यासाठी नेमले व सज्ज केले आहे आणि त्याचे सर्व विजय या कार्याची प्रारंभिक प्रस्तावना आहे यावर ह्या संज्ञेने भर दिला आहे.

दुसरे वाचन: १ थेस्सलोनीकाकरांस १:१-५ब

आपल्या बहुतेक पत्रांच्या प्रारंभीच पौलाने आपल्या वाचकांच्या जीवनात देव जे करीत आहे त्यासाठी त्याची उपकार स्तुती केली आहे. प्रार्थनेसबंधीच्या या उल्लेखातून आपल्या मित्राविषयी त्याची स्वतःची प्रीती व आस्था स्पष्टपणे दिसून येते आणि यातूनच त्यांना आपल्या ख्रिस्ती जीवनात धीर व उत्तेजन मिळते. वाचकांनी आपला मुळचा विश्वास तेवढयाच उत्साहाने व चिकाटीने दृढ ठेवला आहे. परिणामी ते इतर लोकांना ख्रिस्ताचे साक्षीदार झाले आहेत हाच मुद्दा येथे आहे. सुवार्तेद्वारे देवाने त्यांना पाचारण केले एवढेच नव्हे तर त्यांनीही विश्वासाने त्याला यथार्थ प्रतिसाद दिला हे मुलभूत ख्रिस्ती गुण सर्वांच्या अंगी असावेत. कारण आपण देवाचे प्रिय आहोत.

शुभवर्तमान: मत्तय २२: १५-२१

येशूच्या विरोधात परुशी नेहमीच होते. त्याला बोलण्यात पकडावे, त्याच्या तोंडाची उलट-सुलट विधाने त्याच्यावरच उलटवावी हा त्यांचा उद्देश होता. ......    रोमन सरकारला द्यावा लागणा-या कराविषयी होता. देशप्रेमी यहुदयांना या कराची वचनबद्धता होती, हे राजकीय अधिनतेचे चिन्ह असे त्यांना वाटे. सुमारे पंचवीस वर्षापूर्वी गालीलातील एक लोकप्रिय पुढारी यहुदा याने या कराच्या विरोधात मोठी बंडाळी माजवली होती. ‘जीलोत’ गटाला प्रेरणा देणारा हा यहुदा होता. तसा हा फसवा, कावेबाज प्रश्न होता. कर दिला पाहिजे असे म्हटले तर तो देशद्रोही ठरतो आणि त्याला विरोध करणे राजकीय दृष्टीने धोक्याचे होते.
येशूने त्याच्याकडे एक नाणे पाहायला मागितले आणि त्यातून त्याने त्यांचा दाभिकपणा उघड केला. कोणताही देशप्रेमी यहुदी माणूस हे नाणे बरोबर घेऊन फिरला नसता. या नाण्यावर बादशहाचा मुखवटा होता आणि त्यावर त्याची ‘देवाचा पुत्र’ ही पदवी कोरली होती. ही एक प्रकारे मूर्तीपूजा होती. ते कैसराचे चलन वापरतात तर त्यांनी त्याचा कर भरणे वाजवीच आहे या प्रकारे येशूने स्वतःला त्या ‘जीलोत’ गटापासून निश्चयाने दूर ठेवले आणि विधर्मी सरकारशी निष्ठा ठेवणे ही गोष्ट देवावरच्या निष्ठेशी विसंगत नाही हे यातून स्पष्ट केले.

बोधकथा:

एकदा एक तरूण चित्रकार, एक बाई तिच्या लहानशा बाळाबरोबर भयंकर अशा वादळ वा-यात सापडलेली आहे अशा प्रकारचे चित्र रंगवत होता. त्याने चित्र इतक्या उत्कृष्टरित्या रेखाटलेले होते की, त्या चित्रातून जिवंत भावना व्यक्त होत होत्या. हे चित्र पाहून तो चित्रकार स्वत:चे भान विसरून गेला. ते ह्दयस्पर्शी चित्र पाहून त्या तरूण चित्रकाराने आपल्या हातातील रंगकामाचा ब्रश बाजूला ठेवला आणि स्वत:शीच म्हणाला,खरतर मी अशा परिस्थितीत असलेल्या लोकांना माझ्या मदतीचा हात पुढे केला पाहिजे, त्यांचे मी फक्त चित्र रंगवून त्यांना काय लाभ? ह्या प्रश्नावर भारावून गेलेल्या ह्या चित्रकाराने आपल्या कलेचा त्याग केला व गरीब लोकांची सेवा करू लागला आणि हाच तरूण चित्रकार आफ्रिकेतील युगांडा येथील लोकप्रिय मिशनरी बिशप बनला.

मनन चिंतन:

1) येशू ख्रिस्ताला कसेही करून नजरेआड करण्याचा यहुदी धर्मपुढा-यांनी निश्चय केला होता. कोणत्याही मार्गाचा उपयोग करण्याची त्यांची तयारी होती. ते रोमी लोकांना आपले कट्टर शत्रू मानत. मात्र, येशू ख्रिस्ताला ठार करण्यासाठी ते त्यांच्याशी तडजोड करण्यास तयार होते. येशू ख्रिस्ताला बोलण्यात पकडण्याचा डाव त्यांनी रचला. येशूला रोमी सरकारविरुद्ध बोलण्यास लावून आपणास आरोप ठेवण्यास चांगलेच कारण मिळेल असे त्यांना वाटले.
त्यांनी आपले शिष्टमंडळ पाठविले. त्या शिष्टमंडळाने येशूची तोंडस्तुती करून आरंभ केला. नंतर त्यांनी एक प्रश्न विचारून आपला डाव टाकला. “कैसराला कर देणे योग्य आहे किंवा नाही” व त्याने “होय” म्हटले असले तर येशू इस्राएल राष्ट्राचा शत्रू आहे असं प्रचार त्यांनी केला असता. “नाही” म्हटले असते तर रोमी सरकारविरुद्ध अप्रचार करणारा आरोप ठेवता आला असता. येशूने त्यांचे ढोंग व दुष्टपणा ओळखले. सरकारला कर मागण्याचा हक्क आहे व त्याच वेळी देवाचे ऐकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे त्याने दाखवून दिले.

2) मिशन कार्य ही येशूने दिलेली आज्ञा आहे. दिलेली आज्ञा तोडता येत नाही तर ती पाळली जाते. आपले ख्रिस्ती मिशन म्हणजे केवळ paying, praying and obeying नव्हे तर देवाने दिलेले कार्य करणे देखील आहे. मिशन कार्य करणे म्हणजे फक्त दूरवर जाणेच नव्हे. परमेश्वराने आपणाला आठवड्यातून सात दिवस दिलेले आहेत, ह्यापैकी जे देवाचे आहे म्हणजेच चर्चला येऊन त्याची भक्ती करणे, त्याची पुजा करणे व उरलेल्या दिवसात आपण जेथे काम करत आहोत, जेथे आपण राहत आहोत, जेथे कुठे आपण जात आहोत त्या-त्या सर्व ठिकाणी आपल्या शब्दातून आणि आचरणातून परमेश्वर इतरांना देणे हे देखील मिशनच आहे. यशया संदेष्टा देखील आजच्या वाचनात अप्रत्यक्षरित्या मिशनविषयी म्हणत आहे. तुझी ओळख नसतानादेखील मी तुझी चांगल्या कार्यासाठी नेमणूक केली आहे, तुला पदवी बहाल केली आहे जेणेकरून खरा परमेश्वर कोण आहे ह्याची ओळख लोकांना तुझ्याद्वारे होईल. संत पौल देखील आपण प्रत्येकजण देवाचे प्रिय आहोत असे सांगत आहे कारण त्याने त्याच्या शुभसंदेशासाठी आपली निवड केली आहे. तो शुभसंदेश केवळ शाब्दिक नसून प्रभावी व पवित्र आत्म्याने प्रेरित झालेला होता व पूर्ण प्रत्ययकारी होता. मग आपण कुठे आहोत? आपण प्रभूच्या मिशन कार्यात सहभागी होऊन जे देवाचे आहे ते देवाला आणि जे कैसराचे आहे ते कैसरला देत आहोत का?    

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक.
  1. आपले पोप, कार्डीनल्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना त्यांच्या मिशन कार्यात प्रभूचा आशीर्वाद लाभवा व सर्व संकटापासून त्यांचे संरक्षण व्हावे  म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. जे कोणी जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी कार्य करत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात अधिकाअधिक मदत व्हावी व त्यांच्या कार्याद्वारे ह्या जगात शांतीमय वातावरण निर्माण व्हावे  म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. येणा-या नवीन सरकारने आपल्या राज्याच्या उन्नतीसाठी निस्वार्थीपणे झटत राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. आपल्या धर्मग्रामातील सर्व आजारी लोकांना देवाने आरोग्यदायी स्पर्श करावा व त्यांना परत एकदा चांगले आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5.  आता आपण शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करुया.   

1 comment:

  1. Well done Valerian....Oh my God....you are blessed by the Lord....May the Holy Spirit anoint to be the herald of good news. My prayers are with you all. Your blog page is getting better and better. all the best to the Deacons too...

    ReplyDelete