Reflections for homily By: Wikie Bavighar
सामान्य काळातील तीसावा रविवार
सामान्य काळातील तीसावा रविवार
दिनांक: २६/१०/२०१४
पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पत्र १:५-१०
शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०
“स्वतःवर प्रेम
करतोस तसेच शेजाऱ्यावरही कर.”
प्रस्तावना:
आजच्या उपासनेचा विषय “प्रीती” आहे. जेथे प्रीती असते तेथे विश्वास असतो. कारण
देव प्रीती आहे आणि त्याची प्रीती अवर्णनीय आहे. म्हणून प्रभू येशूने देवप्रिती
आणि परस्पर प्रीतीची आज्ञा आपल्याला दिलेली आहे.
आजच्या पहिल्या वाचनामध्ये देव इस्राएली प्रजेला आठवण करून देतो की, त्यांनी
जारकर्माच्या पापांसून व अशुद्ध कर्मांपासून तसेच मुर्तीपुजेच्या सर्व प्रकारांपासून
दूर रहावे. तसेच दुस-या वाचनात संत पौल म्हणतो की, ‘देवाच्या प्रीतीतील बंधूंनो,
आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण
निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली आहे’.
शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे की, “तू आपला देव परमेश्वर ह्यावर
संपूर्ण अंत:करणाने व पूर्ण मनाने प्रीती कर आणि आपल्या शेजा-यांवर स्वतःसारखी
प्रीती कर”. ह्या दोन आज्ञावर आपले ख्रिस्ती जीवन अवलंबून आहे. तर ह्या मिस्साबलीत
सहभागी होत असताना आपण देवाच्या प्रीतीची आज्ञा श्रद्धेने आचरणात आणण्यासाठी विशेष
प्रार्थना करू या.
पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६
ह्या वाचनाद्वारे दोन गोष्टी साधल्या आहेत. १) समाजातील दीन
दुबळ्या घटकांविषयी (परके, विधवा, अनाथ, गरजू आणि गरीब) सहानभुतीची, कळकळीची
वृत्ती वाढावी. २) न्यायव्यवस्था सर्वस्वी नि:पक्षपाती असावी.
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पत्र
१:५-१०
आपल्या बहुतेक पत्रांच्या प्रारंभीच पौलाने आपल्या
वाचकांच्या जीवनात देव जे करीत आहे त्यासाठी त्याची उपकारस्तुती केली आहे.
प्रार्थनेसंबंधीच्या या उल्लेखातून आपल्या मित्रांविषयी त्याची स्वतःची प्रीती व
आस्था स्पष्टपणे दिसून येते आणि यांतूनच त्यांना आपल्या जीवनात धीर व उत्तेजन
मिळते.
सम्यक विवरण:
शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०
- देव प्रीती आहे: हा पवित्र शास्त्राचा मुख्य विषय आहे. मनुष्य पापी असला तरी परमेश्वराची त्याच्यावर प्रीती आहे. ही गोष्ट देखील निर्विवाद आहे. परमेश्वर अखिल मानवजातीवर प्रीती करतो. आपण मानव आहोत, या एकाच कारणामुळे तो आपणावर प्रीती करतो. देवाची प्रीती प्राप्त करून घेण्यास हे एवढेच एक कारण पुरे आहे. जगातील तुमचा सर्व आधार तुटला तरी देवाची प्रीती तुम्हाला सोडणार नाही, ती तुम्हाला खरा आधार देईल. मानवी प्रीतीची पराकाष्ठा होऊन ती संपुष्टात आली तरी देवाची प्रीती तुम्हाला अंतर देणार नाही. पवित्र शास्त्रात ह्या संबंधी पुढील अभिवचने आढळतात:
· “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक
पुत्र दिला” (योहान ३:१६).
· “देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी
असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला” (रोमन ५:८).
· “मी सार्वकालिक प्रेमावृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो”
(यिर्मया ३:१३).
· “माझ्या आई-बापांनी मला सोडिले आहे तरी परमेश्वर मला जवळ
घेईल” (स्तोत्र २७:१०).
· उधळ्या पुत्राच्या दाखल्यात देवाच्या प्रीतीचे सुरेख चित्रण
केले आहे (लूक १५:11-३२). उधळा पुत्र मार्गभ्रष्ट होऊन जरी पापाच्या खोल गर्तीत
पडला होता तरी त्याच्या बापाची त्याच्यावरची प्रीती कमी झाली नव्हती.
2. देव मानवाच्या ठायी राहतो: “देवाच्या आज्ञा कठीण नाहीत.
देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय” (१योहान ५:३). देवाची आज्ञा
आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने
आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा
माणूस त्याच्याठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, ह्यावरून आपल्याला कळून
येते की, तो आपल्याठायी राहतो (१योहन३:२१-२४).
३) देवाशी आज्ञाधारक: देवाचे नियम, आज्ञा पाळणे म्हणजे देवावर प्रीती करणे.
ह्याचीच येशू ख्रिस्त आपल्याकडून अपेक्षा करत आहे. येशू ख्रिस्त सर्व लोकांवर
प्रीती करतो असे नवीन करारात पुन:पुन्हा आढळते. जे त्रासलेले व गांजलेले आहेत
त्यांच्यासाठी ख्रिस्त जगत होता. तो हरवलेले शोधावयास व तारावयास आला होता. हे
सत्य देवाला दाखवून द्यायचे होते. ख्रिस्त देव आहे हे ओळखून त्याच्या शिष्यांनी
त्याला नमन केले, ते देवाचा धन्यवाद करत राहिले. (लूक २४:५२-५३).
४) विश्वासाशी
आज्ञाधारक: ख्रिस्ताद्वारे
विश्वासामध्ये आम्हाला कृपा व प्रेषितपद मिळाले. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व
प्रेषितपदही मिळाली. अशासाठी की तू आपल्या शेजा-यावर स्वत:सारखी प्रीती कर. ख्रिस्ताने
मरेपर्यंत आज्ञाधारक राहून आपल्याला कित्ता घालवून दिला आहे. परंतु जो पुत्राचे
ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही. पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो,
“पुत्रावर श्रद्धा ठेवणा-याला अनंत जीवन मिळाले आहे! पण पुत्राचं नाव न ऐकणा-याला
ते जीवन मिळणार नाही. उलट त्याच्यावर देवाचा कोप भडकेल!!” (योहान ३:३६).
मत्तय २२:३४-४०
या अध्यायात येशू ख्रिस्ताला परुश्यांनी विचारलेला दुसरा प्रश्न महत्वाचा होता परंतु
त्या प्रश्नाला तसेच महत्वपूर्ण उत्तर मिळाले: “नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे
ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण
करावयास आलो आहे” (५:१७). तसेच दहा आज्ञांचा पूर्वार्ध व उत्तरार्ध (देवाविषयीचे
कर्तव्य आणि आपल्या शेजा-याविषयीचे कर्तव्य) यावर लक्ष केंद्रित केल्याने येथे
आपणाला संपूर्ण आचरणाचा आधार मिळतो आणि हे कर्तव्य “प्रीती” या एकाच शब्दात
सामावले आहे.
बोधकथा
एकदा एक व्यापारी दुस-या गावी व्यापारासाठी
निघाला. वाटेत दाट जंगल लागले तेथे त्याला पायाने लुळा असलेला एक धष्टपुष्ट कोल्हा
दिसला. व्यापारी विचारात पडला, पाय लुळे असून हा कोल्हा एवढा धष्टपुष्ट कसा?
एवढ्यात बाजूने तोंडात शिकार घेऊन एका सिंहाला येताना पाहून व्यापारी घाबरून
झाडावर चढून बसला. सिंहाने आपली शिकार तेथेच खाल्ली व त्यातील थोडा भाग
कोल्हयापाशीच सोडून तो पुन्हा जंगलात निघून गेला. कोल्हा खुरडत-खुरडत पुढे आला व
सिंहाच्या शिकारीतला उरलेला भाग खाऊ लागला. व्यापारी मनातल्या मनात म्हणाला, ‘देव
प्रत्येकाची काहीना-काही सोय करतच असतो कारण तो प्रेमळ आहे. मग आपणच असे गावो-गावी
कशाला भटकायचे? ज्याप्रमाणे देवाने कोल्हयाला जागेवरच अन्न पुरविले त्याचप्रमाणे
देव मलाही जागेवरच अन्न पुरवील!’ म्हणून तो माघारी फिरून देव आपली घरीच सोय करेल
या आशेने घरातच पडून राहिला. तीन चार दिवसात तो भुकेने अति व्याकूळ झाला व देवाचा
धावा करू लागला. तेव्हा त्याला देव-वाणी ऐकू आली, सिंह स्वतःचे अन्न स्वतः तर
मिळवतोच परंतु त्यातला काही भाग परोपकारासाठी ठेवतो, तर मग तू सिंह होण्याचे का
ठरवले नाहीस? व्यापा-याला आपली चूक लक्षात आली. त्याने पुन्हा नवीन जोमाने
व्यापाराला सुरवात केली नंतर समाज कल्याणाचीही खूप कामे केली आणि देवावरची प्रीती
त्याने इतरांबरोबर वाटून घेतली.
मनन चिंतन:
प्रेम किंवा प्रीती हा शब्द आपण ब-याच वेळा वापरतो. पण त्याचे स्पष्टीकरण
निरनिराळे असू शकते. एखादी गोष्ट दुस-या गोष्टीपेक्षा जास्त आवडते किंवा तिचे मोल
मोठे असते तेव्हा आपण म्हणतो, ‘I love this’. एखाद्या व्यक्तीविषयी आपुलकीची भावना असते तेव्हा आपण म्हणतो, ‘मी त्या
व्यक्तीवर प्रेम करतो’. खरे पाहता आपल्याला जे अधिक आवडते, आनंद देते किंवा आपण
ज्याच्याविषयी आकर्षित होतो, ते प्रेम असतेच असे नाही. संत मत्तय आपल्याला प्रभू
येशू ख्रिस्तासारखे प्रेम करावयास आवाहन करत आहे.
स्वत:चे समर्पण, म्हणजेच अगदी अंत:करणापासून दुस-यासाठी आपण आपले सर्वस्व
देणे. परस्पर प्रीती करणे हे कठीण आहे. आपण प्रत्येकजण आपले सर्वस्व इतरांना
देण्यासाठी पुढाकार घेत नाही. आपले आनंदी व सुखी जीवन स्वतःपुरतेच जगणे आपण पसंत
करतो. मात्र प्रभू येशूला त्यागमय जीवनातील प्रेम अपेक्षित आहे. आपण प्रभू येशूच्या
प्रीतीत मुळावणे गरजेचे आहे. गरजवंत व ज्याचे कुणी नाही अशांसाठी आपण आपल्या
अंत:करणाचे दरवाजे उघडायला हवेत. प्रभू येशू सर्वदा आपल्यावर प्रेमपूर्वक
कृपादानाचा वर्षाव करीत असतो. आपल्या प्रिय भक्तगणांसाठी आणि त्याला शरण येणा-या
प्रत्येक श्रद्धावंतांसाठी प्रभू येशू अदभूत चमत्कार करण्यास तयार आहे. आपण त्याच
प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याची प्रीती-आज्ञा आचरणात आणून, श्रद्धेने जीवन
जगण्यास सदा तत्पर असलो पाहिजे. संत योहानाचा देखील संदेश हाच आहे कि, “शब्दांनी
किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी”. म्हणूनच ह्या पवित्र
मिस्सा बालीदानामध्ये प्रार्थना करुया की, ‘हे प्रभू येशू तुजवरील श्रद्धा दृढ
करण्यास व तुझ्यावर आणि शेजा-यांवर प्रीती करण्यास मला प्रेरणा व शक्ती दे आणि
इतरांसाठी मी तुझ्या प्रीतीचे माध्यम बनण्यास मला सामर्थ्य व कृपा दे, आमेन’.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे
प्रभो, तुझ्यावरील आमच्या प्रीतीत वाढ कर.
- जे परमेश्वराच्या मळ्यात काम करत आहेत, ह्या सर्वांनी प्रभूच्या मार्गाची घोषणा करून प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी लोकांना मदत करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून तसेच भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांस शेजा-यांवर प्रीती करण्यास व आपले प्रेम इतरांना देण्यास प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून, आपण प्रार्थना करूया.
- जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत अशा सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व देवावरील त्यांचा विश्वास अधिक बळकट व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपण आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
Nice 2 c u brother.Well done.keep it up.Thank u for good meal for Soul.God bless u.
ReplyDelete