Friday, 26 December 2014

Reflections for Homily By: Fr. Godfrey Dinis







पवित्र कुटुंबाचा सण


दिनांक: २८/१२/२०१४.
पहिले वाचन: बेन सिरा ३ :२-६,१२-१४
दुसरे वाचन: कलस्सेकरांस पत्र ३:१२-२१
शुभवर्तमान: लूक २:२२-५०

             “खर प्रेम त्यागात आणि खरा त्याग प्रेमात असतो.”
प्रस्तावना:

     आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. कुटुंब हे मानवी जीवनाचं उगमस्थान आहे. पवित्र त्रैक्य हे येशूच्या स्वर्गीय कुटुंबाचे प्रतिक आहे आणि योसेफ व मरिया हे त्याच्या पृथ्वीवरील कुटुंबाचं प्रतिक आहे. कुटुंबाशिवाय मनुष्याची जडणघडण होऊ शकत नाही म्हणून कुटुंबाची सर्वांना गरज असते. जर देवपुत्राला मानवी कुटुंबाची गरज भासली तर आपल्याला त्या कुटुंबाची किती गरज आहे? त्यागाशिवाय कुटुंबाची उभारणी करता येत नाही. पवित्र कुटुंब त्यागमय जीवन जगल्यामुळे आदर्श कुटुंब म्हणून मानलं जात आहे.
     आजच्या उपासनेमध्ये ढासळती कुटुंब व्यवस्था उभारण्यासाठी आणि त्यागमय जीवन जगण्यासाठी लागणारे सामर्थ्य, धैर्य, शक्ती आणि कृपा पवित्र कुटुंबाद्वारे मागुया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: बेन सिरा ३ :२-६,१२-१४
     आजचे पहिले वाचन प्रवाशी मुलांचे आणि आई-वडिलांमध्ये असणारे सबंध कसे असावेत ह्या विषयी सांगत आहे. मुलांना जर उत्तम जीवन जगायचं असेल तर त्याने आपल्या आई-वडिलांचा योग्य मान-सन्मान करायला शिकायला पाहिजे कारण आई-वडिलांसाठी केलेले प्रत्येक चांगले कृत्य हे मुलाच्या पापांचे भार कमी करेल.

दुसरे वाचन : कलस्सेकरांस पत्र ३:१२-२१

संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये ख्रिस्ती जीवनाची मुल्ये काय आहेत आणि ती जोपासल्याने प्रत्येक व्यक्ती एक आनंदी आणि सुखी कौटुंबिक जीवन कसे जगू शकतो  ह्याविषयी मार्गदर्शन करीत आहे. ह्या ख्रिस्ती मूल्याचं बीज प्रत्येक व्यक्तींच्या हृदयाच्या गाभाऱ्यात पेरायला हवं असं संत पौल म्हणतात.

शुभवर्तमान: लूक २:११-५०

     आजच्या शुभवर्तमानात येशूची सुंता कशी झाली व त्याला महत्वपूर्ण नाव कसे दिले (लूक १:३१) हे आपण येथे पाहतो. ही घटना योहानाच्या वृतांताला समांतर आहे. योहानाची सुंता झाली तेव्हा त्याच्या भवितव्याविषयी भाकीत केले होते. येशूला मंदिरात नेले तेव्हा त्याच्या बाबतीतही अशी भाकित करण्यात आले होते. येथे तीन लक्षणीय गोष्टींचा उल्लेख आहे तो आपण पाहूया.
(१)   शुध्दीकरण: यहुदी नियमशास्त्रानुसार पुरुष मुलाच्या जन्मानंतर माता सात दिवस ‘अशुद्ध’ मानली जाई आणि तिला आणखी तेहतीस दिवस घरीच राहावे लागे. त्यानंतर शुद्धीकरणाचे अर्पण समर्पित करणे आवश्यक असे (लेवीय १२:१-८) हे अर्पण फक्त येरुशलेममध्येच करायचे असल्याने त्यासाठी तिकडे जाणे अगत्याचे होते. लूकने ‘त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस’ असा उल्लेख केला असला तरी मुलाला नव्हे तर फक्त मरीयेनेच शुद्ध होणे आवश्यक होते. मातेचे शुद्धीकरण आणि तिच्या मुलाला ‘सोडवून घेणे’ या दोन्ही वेगळ्या बाबींचा उल्लेख लूकने एकत्रच केला आहे.
(२)   सोडवून घेणे: नियमशास्त्रानुसार प्रथम जन्मलेल्या मुलाला ‘भरपाई देऊन’ सोडवून घेणे आवश्यक होते. प्रथम जन्मलेले सर्वच जीव देवाला समर्पित आहेत असे मानले जाई. यात प्रथम जन्मलेले पशूंचे होमार्पण करीत आणि पाच शेकेल द्रव्य भरून मुलांना सोडवून घेत. हा विधी ते बाळ एक महिन्याचे झाल्यावर करीत असत (निर्गम १३:१३; गणना १८:१५,१६) यासाठी मुलाला मंदिरात नेलेच पाहिजे असा नियम नव्हता.
(३)   देवाची सेवा: मरीयेने आपल्या मुलाला खास करून देवाच्या सेवेसाठी अर्पण केले म्हणून येशू त्यावेळी तेथे होता. हन्नानेही पूर्वी याच प्रकारे शमुवेलाला निवास मंडपात समर्पित केले होते (१ शमू १:११,२१-२८) याप्रकारे नियमशास्त्रानुसार आवश्यक अश्या सर्व बाबी पूर्ण झाल्या, (गलती ४:४) या वृत्तांतात पुढे मुलाला पाहिल्यावर शिमोन व हन्ना ह्यांनी काय केले ते सांगितले आहे.
शिमोन: हा एक भक्तिमान, सात्विक इस्त्राएली माणूस होता. देव आपल्या लोकांचे सांत्वन (म्हणजे सुटका किंवा मुक्तता; यशया ४०:१; ६१:२) करण्याच्या प्रतीक्षेत तो होता. मसीहा-ख्रिस्त येण्यापूर्वी तो मरणार नाही असे देवाने अभिवचन त्याला दिले होते. तो क्षण आता जवळ आला आहे ही जाणीव दिव्य प्रेरणेने त्याला झाल्याने तो मंदिरात गेला, त्याने मुलाला उचलून कवटाळले आणि देवाचे आभार मानून आपण मरण्यास तयार असल्याचे म्हटले. तसेच त्याने भाकीत केले की येशू फक्त यहुद्यांसाठीच नव्हे तर सर्व लोकांच्या तारणासाठी आला आहे.
हन्ना: तिच्या आगमनाने शिमोनाच्या या शब्दांना दुजोरा मिळाला. देव येशूच्याद्वारे यहुदी लोकांची सुटका करील असे भाकीत तिने केले. ह्याच घटनेपासून देवाच्या लोकांचे तारण होण्यास आरंभ होतो.

बोधकथा
६ ऑक्टोबर २०१४ रोजी झालेल्या बातमीनुसार केरळ ह्या राज्यांतील तिरूअंतपूरम या शहरात घडलेली ही एक सत्य घटना. सेमेनरीत शिकत असलेले २४ वर्षीय कँप्यूचिन ब्रदर गीजीन डेविडसन आपली सायकल चालवत जवळच्या चर्चमध्ये आपल्या कार्यासाठी जात होते. सायकलवरून पुढे जात असताना मागून येणाऱ्या भरधाव गाडीने त्याला उडवून दिले. डोक्याला झालेल्या गंभीर इजेमुळे त्यांचा हॉस्पीटलमध्ये मृत्यु झाला परंतु त्याचं आयुष्य तेथेच संपल नाही. ब्रदर गीजीनच्या आईवडिलांनी लगेच त्याच्या शरीराचे अवयव दान केले आणि त्यामुळे सहा जणांना नवजीवन प्राप्त झाले.

मनन चिंतन

“खर प्रेम त्यागात आणि खरा त्याग प्रेमात असतो.”
आज आपण योसेफ, मरिया आणि येशू ह्यांच्या कुटुंबाचा म्हणजेच पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. पवित्र कुटुंब हे एक त्यागमय जीवन जगले तेव्हाच पवित्र ख्रिस्तसभा आज आपल्यापुढे त्यांचा आदर्श ठेवत आहे.
     प्रत्येक मनुष्याची जडण-घडण ही कुटुंबात होत असते, म्हणूनच कुटुंब ही संस्काराची आदर्शशाळा म्हणून ओळखली जाते. ख्रिस्ती श्रद्धेची जोपासना कुटुंबातच होते. देवाची ओळख आणि चांगली शिकवणूक आपल्याला कुटुंबातच लाभते. कुटुंब म्हटलं म्हणजे स्वप्न, इच्छा-आकांक्षा आल्याच, मग त्या कुटुंबाच्या असोत किंवा कुटुंबात राहणाऱ्या सभासदाच्या असोत. ह्याप्रमाणे योसेफ, मरिया आणि येशू ह्यांच्यासुधा काही इच्छा, स्वप्न असावीत. योसेफाला वाटलं असेल की एका चांगल्या तरुणीबरोबर लग्न करावं आणि आपलं स्वःताच कुटुंब उभारावं. तसेच मरीयेला सुद्धा वाटलं असेल की एका चांगल्या तरुणाबरोबर लग्न करून मुलाबाळांचा सांभाळ करावा. तसेच येशुख्रिस्त हा देव पुत्र असूनही त्याने त्याच्या स्वप्नाचा त्याग करून एक मानवी देह आपल्या तारणाकरिता धारण केला.
     प्रत्येक माणसाचे स्वप्ने असतात परंतु अनेकवेळा कुटुंबाच्या बरेपणासाठी, भलेपणासाठी, कुटुंब उभारण्यासाठी स्वःताच्या स्वप्नाचा त्याग करावा लागतो. पवित्र कुटुंबातील प्रत्येक सभासदांनी आपल्या स्वप्नांचा त्याग करून देवाच्या स्वप्नाला प्राधान्य दिले आणि म्हणूनच आपण नाताळ गीतांमध्ये म्हणतो, “स्वप्न देवाचे आज साकारले”. प्रत्येक कुटुंबाला देवाचे स्वप्न स्वीकारण्यासाठी, साकारण्यासाठी आणि ते स्वप्न जगण्यासाठी आज पवित्र कुटुंब आमंत्रित करीत आहे.
कँप्यूचिन ब्रदर गीजीन डेविडसन ह्याने स्वःताचे आयुष्य, स्वःताची स्वप्ने त्याग करून देवाच्या स्वप्नाला प्राधान्य दिले. त्याने त्याचे जीवन देवकार्यासाठी समर्पित केले होते. तसेच त्याला देवाला अर्पण करून त्यांच्या कुटुंबाने सुद्धा त्याग केला होता आणि त्या खऱ्या त्यागाचा अनुभव ब्रदर गीजीन ह्याने स्वःताच्या कुटुंबात घेतलेला होता. पवित्र कुटुंबाने अनुभवलेली त्यागाची झळ ब्रदर गीजीनच्या कुटुंबाने अनुभवलेली होती आणि म्हणूनच ब्रदरांच्या मृतुनंतर क्षणाचा विलंब न लावता त्याच्या आईवडिलांनी त्याच्या शरीराचे अवयव इतरांच्या कामी यावेत म्हणून दान केले आणि अनेकांना नवजीवन दिले. त्यागातून महात्याग काय आहे हे आपल्याला ह्या कुटुंबाद्वारे दिसत आहे. आज खरोखरच स्वर्गलोकात ब्रदर गीजीनच्या भोवती दुतगन “स्वप्न देवाचे आज हे साकारले” हे गीत गात असतील.
त्याचप्रमाणे आपण आजच्या शुभवर्तमानात पाहतो योसेफ आणि मरिया, येशूला मंदिरात देवाच्या सेवेसाठी समर्पित करतात. त्यांना देवाच्या योजना ठाऊक होत्या आणि म्हणूनच त्यांनी स्वःताच्या योजनेचा त्याग करून देवाच्या योजनेला प्राधान्य दिले: स्वःताच्या बाळाला (येशूख्रिस्ताला) जगाच्या तारणासाठी समर्पित केले आणि त्याद्वारे अनेकांना नवजीवन प्राप्त झाले आणि होत आहे.
आज इतरांसाठी विशेषकरून कुटुंबातील सभासदांसाठी त्याग करण्याची वृत्ती आधुनिक जगामध्ये आपल्याला आढळत नाही आणि त्यामुळे आजच्या कुटुंबात वेगवेगळ्या समस्या उभ्या आहेत उदा: घटस्पोट, एकच मातृ-पितृपद(single parenthood), लग्न संस्कार न स्वीकारता एकत्र राहणे इत्यादी. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पोप फ्रान्सिस ह्यांनी नुकताच बिशपांची सभा भरवली होती आणि या सभेमागचा उद्देश हाच आहे की, जर कुटुंबव्यवस्था योग्यपणे उभारली नाही तर जगापुढे यापेक्षाही भल्यामोठ्या कौटुंबिक समस्या या जगात उभ्या राहणार आहेत.
     आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत असताना त्याचा आदर्श घेऊन आपल्या प्रत्येक कुटुंबाचा त्याला केंद्रबिंदू बनवूया. संकटाना सामोरे जात असताना पवित्र कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कुटुंबात धार्मिक वातावरण निर्माण होण्यास आदर्श कुटुंबाचे गुण आचरणात आणूया. तसेच प्रत्येक कुटुंबाने पवित्र कुटुंबाचा आदर्श घेऊन एक आपुलकीचं, सलोख्याच, त्यागाचं व प्रेमाचं जीवन जगावं म्हणून आपण विधात्याकडे विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: पवित्र कुटुंब आम्हासाठी मध्यस्थी करा.
  1. आपले परमगुरुस्वामी, कार्डीनल्स, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांच्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा, त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा व त्याच्या कार्याद्वारे लोकांना एक पवित्र कुटुंब उभारण्यात मदत व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आपल्या प्रत्येकांच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सतत नांदावे व आपण त्यागमय जीवन जगून आपले कुटुंब सदासर्वदा सुखी रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. जी कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, अशांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन लाभून त्यांना समजूतदारपणाचे, शांतीचे व प्रेमाचे वरदान लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
  4. आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्या प्रेमाचे, मायेचे व करुणेचे छत्र लाभून त्यांना आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.  

1 comment: