Wednesday 3 December 2014

Reflections for the Homily By: Fr. Wilson D'Souza



आगमन काळातील दुसरा रविवार

दिनांक : ०७/१२/२०१४
पहिले वाचन : यशया ४०:१-५.९-११
दुसरे वाचन : २ पेत्र ३:८-१४
शुभवर्तमान : मार्क १:१-८

माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन

प्रस्तावना:
माणूस हा स्वभावत: भावनात्मक आहे. भावना ह्या सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. जो सकारात्मक जीवन जगतो तो मातीच सोनं करतो तर जो नकारात्मक जीवन जगतो तो आपल्या जीवनाची माती, राख, रांगोळी करत असतो.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा इस्रायल लोकांचे सांत्वन करतो, त्यांना पापांपासून दूर राहून पश्चातापी जीवन जगण्यासाठी आमंत्रित करतो. तर दुस-या वाचनात संत पेत्र आपल्याला सांगतो की, जर मानवाला देवाची इच्छा पूर्ण करायची असेल तर पश्चातापाद्वारे त्याने त्याची सुटका व तारण करून घ्यावे. बाप्तिस्मा करणारा योहान ह्याने येशूच्या आगमनाची तयारी कशी करावी हे आजच्या मार्कलीखीत शुभवर्तमानात सुचविले आहे.
आगमन काळाच्या दुस-या रविवारी येशू आपल्यामध्ये आगमन करत असताना पश्चातापी जीवन जगून जीवनाकडे सदा सकारात्मात दृष्टीकोणातून पाहण्याची कृपा आपल्याला मिळावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ४०:१-५.९-११

आजच्या पहिल्या वाचनात यशया प्रवक्ता इस्रायल प्रजेला एक नवा संदेश देतो. संदेष्टा आपल्या संदेशाद्वारे देवाचे अस्तित्व मानवी इतिहासात आणि कृतीत आहे हे सातत्याने सांगू इच्छितो. देवाने केलेला संवाद हा माणसाला आशादायी आहे. जीवनात सर्वकाही संपलेलं आहे, जीवन नको नको होत असताना संदेष्टा सांत्वनपर शब्दाने पहिल्या वाचनाची सुरवात करतो.
If God is God he is not good. If he is good he is not God
जीवनात अडी अडचणी येत असताना देव आहे व तो चांगला आणि महान आहे हे कटू सत्य स्वीकारणं सोप नाही. सांत्वन करा माझ्या लोकांचे सांत्वन करा असे आपला देव म्हणतो. ह्या शब्दात देवाचे सामर्थ्य दडलेलं आहे. देवच माणसाचं सांत्वन करण्यासाठी ह्या भूतलावर उतरणार आहे. आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल: देव कोणाचं सांत्वन करणार आहे? ही दैवी आज्ञा आहे हे शब्द तेव्हा इस्रायली लोकांना व आता आपण प्रत्येकजण जे हे शब्द ऐकत आहोत आणि वाचत आहोत त्यांना संबोधिले आहेत. हे जिवंत देवाचे जिवंत शब्द आहेत.
दुस-याच्या गुलामगिरीत आणि बंदिवान असलेल्या लोकांसाठी जीवनात पराजीत व निराश झालेल्यांसाठी देवाचे शब्द महत्वाचे आहेत. उपदेशक ४;१ “जगात होणारा सारा अन्याय मी पाहिला. पाहा गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत. त्यांना कोणी वाली नाही. छळणा-यांच्या हातात सत्ता आहे, म्हणून गांजलेल्यांना कोणी सहानुभूती दाखवीत नाहीत.” हा नकारात्मक दृष्टीकोन यशया संदेष्ट्याने सकारात्मक दृष्ट्या आपल्या समोर मांडला आहे.
संदेष्टा आशेचा व सांत्वनपर संदेश देताना मानवाला फसवत नसतो तर तो देवाचा संदेश देत असतो. इयोबला अनेक अडचणींना तोंड द्याव लागलं (अध्याय १-२), पण देवाने त्याला ताबडतोब सांत्वन किंवा सहानभूती दाखविली नाही फक्त ४२व्या अध्यायामध्ये देव त्याच सांत्वन करतो. पण त्याअगोदर ४२:६ मध्ये इयोब म्हणतो, “स्वतःचा वीट येतो मला! पश्चाताप होतो म्हणून धुळीत व राखेत बसतो.” इयोबने आपल्या दुष्कर्माचे प्रायश्चित केले.
v.2-५. येरुशलेमेचे कष्टाचे त्रासाचे दिवस संपले आहेत. जीवनात युद्ध, लढाई, गुलामगिरी नाही पण देवाची शांती त्यांना परत मिळणार आहे. त्यांच्या दुष्कर्माची देवाने क्षमा केली आहे व इस्रायल आणि देवामध्ये नवे नाते उदयास आले आहे. यशया संदेष्टा पापाचा पश्चाताप व देवाची क्षमा ह्यावर भर देतो. पापामुळे मनुष्य स्वतःचा, देवाचा व इतरांचा गुलाम होत असतो. पाप मुक्ती, पश्चाताप म्हणजे स्वतंत्र अनुभवने. जो कोणी पश्चाताप करतो तो देवाचं ऐकतो व संदेष्ट्याचे ऐकत असतो. जो अरण्यात ओरडून सांगत आहे, प्रभूचा रस्ता तयार करा त्याच्या वाटा नीट करा. आपला देव आपल्याबरोबर राहतो तो इतर देवाप्रमाणे नाही. यशया ४६:७ मध्ये आपण वाचतो की बाबीलोनाच्या देवाला (मारदूक) उचलून खांद्यावर घेतात आणि त्याला नेऊन देव्हारी बसवितात. तेथून त्याला हालता येत नाही की डुलता येत नाही. कुणी त्याचा धावा केला तरी तो उत्तर देत नाही किंवा संकटात त्याच्या सहाय्यास धावून जात नाही. ही नकारात्मक भूमिका बाबिलोनवासीयांच्या धर्मामध्ये वाचायला मिळते पण इस्राएलचा देव संकट समयी आपल्या मदतीला धावून येतो. आपला देव cultic नसून cosmic आहे. तो देव स्वतः मानव बनून त्यांच्यात राहणार आहे त्यासाठी द-या-खो-या भराव्या लागतील, डोंगर व टेकडी भुईसपाट होईल. उच-नीच जमीन सपाट होईल, ओबड-धोबड जमीन गुळगुळीत होईल. मानवाला देवाचे वैभव पाहायला मिळेल. खरोखर मानव किती भाग्यवान आहे कारण त्याला प्रभूचं वैभव व गौरव प्रत्यक्षात पाहायला मिळतील. वैभव किंवा गौरव हा फार महत्वाचा शब्द आपण यशायामध्ये ऐकतो. पूर्वी देवाचे वैभव फक्त पवित्र साक्रमेंतामध्ये पाहायला मिळते अशी समज होती आता मनुष्य देवाचं अस्तित्व प्रत्यक्षात पाहणार आहे. संदेष्ट्याने स्वतः देवाच वैभव पाहीले आहे. यशया ६:३ “पवित्र पवित्र सेनाधीश प्रभू पवित्र आहे त्याच्या वैभवी तेजाने अखिल पृथ्वी भरलेली आहे!” देवाच वैभव सर्वत्र आहे म्हणून आपण म्हणतो स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरलेली आहे. परमस्वर्गात जयजयकार. देवाचा महिमा व गौरव दुसऱ्या देवाला देता येत नाही म्हणून यशया ४२:८ मध्ये म्हणतो “मी तुझा देव आहे. प्रभू माझे नाम आहे. इतर कुणाला माझा महिमा मिळावा किंवा माझा सन्मान कोरीव मूर्तीला प्राप्त व्हावा असे मी घडू देणार नाही!” परत यशया ४८:११ मध्ये म्हणतो, “मी जे काही करतो ते माझ्यासाठी, केवळ माझ्या नामाप्रित्यर्थ करतो... इतरांनी माझा महिमा हिरावून घ्यावा असे मी मुळीच घडू देणार नाही!” “कारण हे माझे लोक आहेत माझा महिमा व्हावा म्हणून मी उत्पन्न केले आहे आहे.”(यशया ४३:७)
v.९-१० घोषणा कर आणि ओवी ६ मध्ये शुभसंदेश सांग असे म्हटलेले आहे. शुभसंदेश सांगणे आणि घोषणा करणे म्हणजे काय? आनंदाची वार्ता उच्च स्तळावरून किंवा पर्वतावरून सांगने. घोषणा करणे म्हणजे जोराने ओरडणे. हे सियोन व येरुशलेम कन्ये ओरड भिऊ नको मोठ्याने बोल आवाज चढव. युद्धाच्या नगरात सांगा हा पहा तुमचा देव आपल्या मध्ये आपल्या बरोबर आहे. देव आपल्या बरोबर आहे हे पापी व अविश्वासू लोकांना ऐकायला आवडत नाही आपणाला पापामुळे देवाची भीती वाटते त्यामुळे पश्चाताप करून देवाकडे वळणे म्हणजेच सकारात्मक जीवनाचा दृष्टीकोन बाळगणे. इस्राएल लोक नकारात्मक दृष्टीकोणातून जीवनाकडे बघत असताना दहाव्या ओवीत इस्रायलचा देव सामर्थ्यशाली, शक्तिशाली, सत्ताधीश व मुक्तीदाता आहे हे दर्शवितो.
v.११ मध्ये आपण पाहतो की देव मेंढपाळ आहे व तो आपल्या कळपाची निगा राखतो त्यांचा प्रतिपाळ करतो. इथे देवाची तुलना आईबरोबर केलेली आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या तान्ह्या मुलाला कडेवर घेते आणि वेळोवेळी दुध पाजते त्याप्रमाणे इस्रायलची प्रजा देवाची कोकरे व मेंढरे ह्यांना वेळोवेळी दुध पाजून त्यांना कडेवर घेऊन त्याचा सांभाळ करील. (योहान १०) देव आपल्या सर्व सामर्थ्याने इस्रायल प्रजेची काळजी वाहील अशा प्रकारचा शुभसंदेश संदेष्टा यशया इस्रायल प्रजेला व आपल्याला देतो.
देव आपल्यामध्ये नाही व देव आपल्यामध्ये आहे ह्या दोन भावनेमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. इस्रायल प्रजेमध्ये देव होता पण त्यांनी त्याचा आवाज ओळखला नाही त्याला ओळखले नाही. देवाविना जीवन म्हणजे अस्वस्थता, अंधार त्या जीवनाला काही अर्थ नाही. ते नकारात्मक जीवन असू शकते दुसऱ्या वाचनात आणि शुभवर्तमानात येशुद्वारे सकारात्मक जीवन कसे जगावे हे आपण ऐकणार आहोत.

दुसरे वाचन : २ पेत्र ३:८-१४

२ पेत्र ३:८-१४ मधून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात पेत्र आपणाला सांगतो की पश्चातापाद्वारे सर्व मानवाचे तारण व सुटका व्हावी अशी देवाची इच्छा आहे.
v.८ मध्ये पेत्र एका म्हणीचा वापर करतो ज्याद्वारे तो आपणास सांगू इच्छितो की देवासाठी काळ, समय महत्वाचा नाही तो कधीपण आपल्यामध्ये येऊ शकतो. पृथ्वीवर आपण २४ तासाचा दिवस आहे असे समजतो तर जुपीटर वर ९८ तासाचा तर वेनिसवर ६००० तासाचा आणि शेवटी चंद्रावर ६६० तासाचा दिवस मानला जातो. स्वर्गात व देवा समोर १ दिवस १ हजार वर्षासारखा आहे स्वर्गीय दिवस हे काळ समयाच्या पलीकडचा आहे.
 v.९-१४  देवाची प्रीती येशूद्वारे महान आहे. तो सहनशील असून कोणाच्याही नाशाची कल्पना करत नाही उलट आधी पश्चातापाद्वारे आपल्याला तारण व मुक्तता मिळावी असे त्याला वाटते. पश्चातापाद्वारे मनुष्य हा नव निर्मित होत असतो. ह्या नव निर्मितीची कल्पना १० व्या ओवीमध्ये वर्णिलेली आहे. येथे आपणाला नवे आकाश व नवीन पृथ्वीची कल्पना दिली आहे. जुने ते नाहीसे होईल व नवी पृथ्वी उदयास येईल. प्रभूच्या दिवशी सगळे काही नवे नवे होणार (यशया ६६:२२) मध्ये आपण वाचतो की “ज्याप्रमाणे मी निर्माण करणार असलेले नवे आकाश व नवी पृथ्वीमाझ्या समोर कायम राहतील त्याप्रमाणे तुमचा वंश व तुमचे नाव हेही कायम राहील.” प्रभूच्या दिवसाची व येण्याची तयारी करत असताना आपलं आचारण शुद्ध राखून भक्तीभावाने तो दिवस येण्याची वाट पाहावी. देवाच्या वचनाप्रमाणे व नीतीमुल्यांप्रमाणे, जीवन जगणारे नवे आकाश व पृथ्वी निर्माण करायची आहे. प्रकटीकरण २१:१ मध्ये आपण वाचतो, “नंतर मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही लयास गेली होती.” ज्याप्रमाणे प्रियजन प्रभूच्या दिवसाची तयारी करत त्याप्रमाणे ह्या घटनाची वाट पाहत असता आपण येशूच्या दृष्टीने निष्कलंक, निर्दोष राहून शांतीत असलेले त्याला आढळावे असे संत पेत्र आपल्याला सांगत आहे.

शुभवर्तमान : मार्क १:१-८

आजचे शुभवर्तमान मार्कलिखित आहे. ते देवपुत्र येशूविषयी शुभसंदेश देत आहे. येशू व शुभसंदेश एकच आहे. ह्या शुभवर्तमानाची सुरवात येशूच्या वंशावळी व जन्माविषयीची माहिती सांगत नाही तर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या संदेशानेप्रमाणे होते. ह्या शुभवर्तमानात आपल्याला योहान बाप्तीस्ता कोण होता, त्याचे कार्य काय होते हे समजते. त्याचे कार्य येशूची वाट तयार करण्याचे होते व येशू त्याच्यापेक्षा महान आहे हे सांगण्याचे होते. त्याचप्रमाणे येशूविषयी तसे संदेष्टा यशयाने लिहिलेले आहे हे आपण पहिल्या वाचनात पाहिलेले आहे.    
V 1 देवपुत्र येशूविषयीच्या गोष्टी सांगण्याचा प्रारंभ मार्क आपल्या शुभवर्तमानात करत आहे. तोच प्रयत्न आपल्याला योहान १:१-३ मध्ये जाणवतो शब्द प्रथम प्रारंभ होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, शब्द प्रथमापासूनच देवासह होता, त्याच्याकरवी सारे काही निर्माण झाले. उत्पत्तीच्या पुस्तकाची सुरवात प्रारंभी ह्या शब्दाने होते. “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केले”. हा शब्द शुभसंदेश (Evangelion) Gospel होता. त्याचा अर्थ शुभवार्ता होतो. हा शब्द येशूच्या तारणाचा संदेश देणारा म्हणून वापरला जातो (१:१, १४-१५; ८:३५; १०:२९; १३:१०; १४:९). हा येशूचा किंवा येशू विषयीचा संदेश आहे व त्याच्या येण्याची यहुदी लोक वाट पाहत होते अशी मसीहाविषयाची शुभवार्ता होती.
V 2-3 जुन्या कराराची परिपूर्ती नव्या करारात होते. यशया पहिल्या वाचनात ४०:३-५ ओळीत म्हणतो ‘ऐका! कुणी ओरडून सांगत आहे: रानावनातून प्रभूसाठी रस्ता तयार करा! आमच्या देवासाठी अरण्यातून सरळ राजमार्ग बनवा!” योहान बाप्तीस्ता हा देवाने पाठविलेला दूत होता तो रानावनात घोषणा करी व त्याचा संदेश प्रभूचा मार्ग सिद्ध करा त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा असा होता. देवाच्या वचनाची परिपूर्ती येशूमसीहामध्ये व त्याच्या आगमनाने झाली आहे. निर्गम २३:२० मध्ये आपण वाचतो “मी एका दुताला तुझ्या पुढे पाठवीत आहे बघ! मार्गाने जाताना तो तुझा सांभाळ करील.” प्रभूच्या आगमनाविषयी मलाखी संदेष्टाने भाकीत केले होते “पहा, मजपुढे मार्ग तयार करण्यासाठी मी माझा जासूद पाठवितो...त्याच्या आगमनाच्या दिवशी कोणाचा निभाव लागेल?” (३:१-२). तोच संदेष्टा योहान बाप्तीस्ताची तुलना एलीयाबरोबर करतो. तो म्हणतो, “प्रभूचा हा महाभयानक दिवस येण्यापूर्वी मी प्रवक्ता एलिया याला तुझ्याकडे पाठविणार आहे” (मलाखी ४:५). 
V 4-5 देवाने त्याच्या पुत्राच्या येण्याच्या तयारीसाठी रानावनातून त्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी संदेष्टा किंवा बाप्तिस्मा करणारा प्रवक्ता योहान बाप्तीस्ता याला पाठविले. त्याने पश्चातापाचा संदेश लोकांना दिला. तो स्वत:हा स्नानसंस्कार यार्देन नदीत देत असल्यामुळे बाप्तिस्मा करणारा हे योग्य नाव आहे. यहुदी अनेक वेळी पवित्र पाण्यात स्वता:ला बुडवून शुद्धीकरण करुन घेत असत (हिंदू लोक स्वता:ला गंगेच्या पाण्याने शुद्ध करतात). पण योहानाचा बाप्तिस्मा एकदाच व दुस-याकडून होत असे आणि त्याद्वारे पापक्षमा व पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा लागत असे. अनेक यहुदिया प्रांतीयांनी योहानाकडून बाप्तिस्मा स्वीकारला आणि आपली पापे पदरी घेऊन पश्चाताप केला.
V 6 मध्ये योहानाच्या वस्त्रे परिधान करण्याचे व खाण्यापिण्याचे प्रकाराविषयी वर्णन केले आहे. तो ऋषीमुनीसारखा त्यागाचे जीवन जगत असे. ह्या वस्त्राची व खाण्यापिण्याची तुलना आपल्याला संदेष्ट्याच्या जीवनात सापडते. एलिया संदेष्टाने केसाचा झगा घातलेला होता, त्याच्या कंबरेला चामड्याचा पट्टा होता (२ राजे १:५, जख-या १३:४). 
V 7-8 योहान स्वत:हाला लहान करतो व येशूच्या येण्याविषयी सांगतो. येशू खरोखर त्याच्यापेक्षा महान होता हे त्याला सांगायचे होते. हा पाण्याने बाप्तिस्मा देत असे येशू तर पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणारा होता. प्रेषित १:४-५ आणि ११:१६ पुढे पवित्र आत्म्याच्या बाप्तीस्माची परिपूर्ती प्रेषित २ आणि १० मध्ये होते.

बोधकथा:

एकदा एक गर्भश्रीमंत मनुष्य सुदृढ आणि वैभवात सुखी समाधानी जीवन जगत असताना अचानकपणे त्याला अंधुत्व भासायला लागले. त्याच्या दोन्ही डोळ्यांतून प्रकाश बघण्याची क्षमता कमी झाली. अशा वेळी या माणसाने अनेक वैद्यांकडे जाऊन उपचार केला परंतु त्याची परिस्थिती काही सुधारली नाही. त्याने अनेक साधू-संतांकडे जाऊन मंत्र-तंत्र बोलावून घेतले तरी दृष्टी काही सुधारली नाही.
असाच निराशी जीवन जगत असताना त्याला कोणी सांगितले की अरण्यात एक मनुष्य केसरी कपडे परिधान करून कंदमुळे खाऊन अत्यंत पावित्र्याचं जीवन जगणारा एक मठवासी आहे. तो आपली दृष्टी आपल्याला मिळवून देईल परंतु त्याच्याकडे जाणारा मार्ग खडतर, काट्या-कुटयांचा आणि द-या-डोंगराचा आहे. जर आपण त्याच्याकडे गेलात तर तो आपल्याला काही मंत्र देईल.
गर्भश्रीमंत मनुष्य त्या माणसाकडे निघून गेला आणि आपली पूर्ण हकीकत त्याला सुनावली. त्या मठवास्याने त्यांना एक मंत्र दिला आणि हा मंत्र म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर दुसरे कोणत्याही रंगाची वस्तू न दिसता संपूर्ण परिसर फक्त हिरवा असावा. त्या गर्भश्रीमंत माणसाने आपल्या घरातील आजू-बाजुतील आणि परिसरातील सर्व वस्तू हिरव्या असाव्यात असा आदेश आपल्या नोकरांना दिला. आणि नोकरांनी हा आदेश तंतोतंत पाळला. सात दिवसानंतर हा मठवासी भगवे कपडे परिधान करून ह्या माणसाच्या भेटीस येण्यास निघाला. आणि काय आश्चर्य! त्याला सर्वत्र सर्व गोष्टी आणि माणसे देखील हिरवे कपडे परिधान केलेली दिसली. काही एक शब्द न म्हणता तो त्या माणसाकडे येत असताना एका नोकराने पाहिले की ह्या भगव्या कपड्यामुळे आपल्या मालकाच्या दृष्टीला हानी पोहचू शकते म्हणून धावत जाऊन हिरव्या रंगाच्या दोन बादल्या त्यानी त्या मठवास्याच्या अंगावर टाकल्या. काही एक शब्द न बोलता मठवासी त्या गर्भश्रीमंत माणसाकडे गेला आणि म्हणाला: हे सर्व काही करण्याची गरज नव्हती, एवढे पैशेही खर्च करण्याची गरज नव्हती. आपण केवळ एक हिरवा चष्मा परिधान केला असता तर सर्व हिरवे दिसले असते. माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सतत महत्वाचा असतो.
 
मनन चिंतन:

यशया संदेष्ट्याद्वारे बंदिवानात असलेल्या इस्रायल प्रजेला देव एक नवीन संदेश देऊन त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन बदलून त्यांना सकारात्मक जीवन म्हणजेच नवीन जीवन जगण्यासाठी बोलावत आहे. ते नवीन जीवन येशूद्वारे मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी जीवनातील खाच-खळगे आणि वाकडे–तिकडे मार्ग दूर सारून नवीन पश्चातापमय जीवन जगायला सांगितलेले आहे. येरुशलेम कन्येला व सियोन कन्येला धीराचे शब्द ऐकायला मिळतात त्यासाठी परमेश्वराची वाणी ऐकणे त्याचे मार्ग सिद्ध करणे म्हणजेच जीवनात बदल घडवून आणणे. नकारात्मक जीवन जगणारा मनुष्य खोऱ्यात पडत असतो पण सकारात्मक जीवन जगणा-यासाठी डोंगर- टेकडीसखल होते. उच-नीच जागा सपाट होते. सकारात्मक दृष्टीकोणातून जगणारा मनुष्य परमेश्वराचे वैभव पाहतो. आणि दुसऱ्यांना उच्च स्वराने सुवार्ता सांगतो. सकारात्मक दृष्टीकोणातून जगणारा मनुष्य देवाचे सांत्वनपर शब्द इतरांपर्यंत पोहचवतो.
आजच्या ह्या आगमनकाळातील दुस-या रविवारी, प्रभू येण्यासाठी विलंब लावणार नाही कोणाचा नाश होऊ नये तर परमेश्वराच्या वचनावर आणि पश्चातापावर विश्वास ठेवून पावित्र्याचं व सुभक्तीचं वर्तणूक करण्यास सांगत आहे. योहान बाप्तीस्ता हा त्यागमय जीवन जगून प्रभूच्या येण्याची तयारी जीवनातील पापांची खाच-खळगी भरून पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेऊन पवित्र जीवन जगण्यासाठी आमंत्रण देत आहे. जीवनात येणाऱ्या अडचणीला तोंड देऊन दु:खाची दरी एैल तीरावरून पैल तीरावर पार करण्यासाठी जो सकारात्मक दृष्टीकोन मानवाकडे असावा तोच दृष्टीकोन त्याच ख्रिस्ताकडून आजच्या मिस्साबलीमध्ये मागूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, आमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल.

  1. आज देऊळ मातेमध्ये अनेक बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांना देणगी रुपात तू आम्हास दिलेले आहे. ह्या देऊळ मातेकडे एक पवित्र आई म्हणून पाहण्याचं आणि तिच्या हातून घडणाऱ्या चुका समजून घेण्यासाठी आम्हाला नवा दृष्टीकोन मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आज अनेक युवक- युवती माध्यमांद्वारे जीवनाकडे नकारात्मक दृष्टीकोणातून पाहत आहेत परंतु ह्याच माध्यमांद्वारे त्यांना देऊळ मातेच्या आणि ख्रिस्ताच्या अधिक जवळ येण्यासाठी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. ह्या आगमनकाळात आम्ही येशूच्या येण्याची तयारी करत असताना पश्चातापी जीवन जगून पापाला दूर सारण्यासाठी लागणारे सामर्थ्य आपल्याला मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. नकारात्मक जीवन जगत असणाऱ्यांना ख्रिस्ताच्या कृपेद्वारे परत एकदा सकारात्मक जीवन जगण्याची उमेदी आणि आशा निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

     

No comments:

Post a Comment