Monday, 22 December 2014

Reflections for Homily By: Fr.Saujanya Dalmet













नाताळचा सण
(मध्यरात्रीची मिस्सा)


दिनांक: २५/१२/२०१४
पहिले वाचन: यशया ९: १-६
दुसरे वाचन: तीताला पत्र २: ११-१४
शुभवर्तमान: लूक २: १-१४

“देवाची देणगी माणसाच्या हातात”
(आणि देव मनुष्य झाला)
प्रस्तावना:
 “बाळ जन्मला आम्हांसाठी ख्रिस्त जन्मला, बाळ जन्मला आम्हांसाठी तारणारा जन्मला”
     प्रिय बंधू भगिनींनो आजाचा हा क्षण आनंदाचा व उल्हास करण्याचा आहे कारण आज आपण प्रभू येशूचा जन्मदिन साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्याला प्रभू येशूच्या जन्माविषयी सांगत आहेत. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया जगाचा तारणाऱ्याच्या आगमनाची घोषणा करितो. आजच्या दुस-या वाचनात संत पौल आपल्याला परमेश्वराच्या कृपेविषयी सांगताना चांगलं जीवन जगण्यासाठी पाचारण करितो आणि आजच्या शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या धरतीवरील आगमनविषयी ऐकतो.
            माझ्या प्रिय मित्रांनो स्वतः परमेश्वर मानवाला भेटण्यासाठी या भू-तलावर आला व आपल्याच सारखा मनुष्य झाला त्या परमेश्वराने दिलेल्या प्रेमाची भेट आपण चांगलं जीवन जगून करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ९: १-६

     आजचे पहिले वाचन हे यशया या पुस्तकातून घेतलेले आहे. या वाचनात संदेष्टा यशया आपल्याला परमेश्वराच्या सत्तेविषयी व शांतीच्या राजाविषयी भविष्यवाणी करीत आहे.
अंधारात चालणा-या लोकांवर प्रकाश आला आहे.
अंधार म्हणजे इस्त्राएल लोकांच्या जीवनात आलेली संकटे, तहान, भूक त्यांची लढाईत हार त्यामुळे यशया इस्त्राएल लोकांना धीर देतो, त्यांना खंबीर राहण्यास सांगतो. त्यांना जगाचा प्रकाश जो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या आगमनाविषयी सांगतो ज्याला समर्थ देव, सनातन पिता व शांतीचा अधिपती म्हणतील.

दुसरे वाचन: तीताला पत्र २:११-१४

     या पत्रात संत पौल आपल्याला तीन महत्वाच्या बाबी सांगतो.
१. ज्या माणसांना देवाची कृपा मिळालेली आहे त्यांनी अभक्तीला व ऐहिक वासनांना सोडून दिले पाहिजे व नीतीने व सुभक्तीने वागले पाहिजे.
२. देवाची कृपा माणसाला चांगले जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करीत असते, पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण करीत असते.
३. आपण नेमकं कोणत्या गोष्टीचा त्याग करावा व कोणत्या नाही हे समजण्यासाठी आपण आपलं लक्ष प्रभू येशूवर केंद्रित केले पाहिजे.

शुभवर्तमान : लूक २:१-१४
     आजचे शुभवर्तमान आपल्याला मानवासाठी दिलेल्या सर्वात अमूल्य भेटीविषयी (प्रभू येशू ख्रिस्त) सांगत आहे.
  1.  योसेफ हा मरिया हिला बरोबर घेऊन बेथलेहेम गावी नांवानिशी लिहून देण्यासाठी जातो. नाझरेथ व बेथलेहेम या मधील अंतर हे ८० की.मी आहे. दूरवरून येणाऱ्या लोकांनी स्वतःसाठी जेवण व खाद्यपदार्थ आणले होते. बेथलेहेम हे शहर गर्दीने तुडुंब भरलेले होते. त्यामुळे गाईच्या गोठ्यात जेथे जनावरांना खाद्य दिले जाते अशी जागा त्यांना मिळाली. प्रभूयेशुला या भूतलावर असताना दोनच धिकाणी जागा मिळाली: गोठ्यात आणि क्रुसावर. (crib/ cross)
  2.  तारणाऱ्याच्या जन्माची पहिली सुवार्ता मेंढपाळांना समजते. मेंढपाळ हे कोण होते?समाजात कमी समजले जाणारे लोक ज्यांना समाजात जास्त मान सन्मान नव्हता. ते साधे-सामान्य लोक होते. हे जे मेंढपाळ होते हे मंदिरात होमार्पणासाठी कोकरू अर्पण करीत असत. त्यांच्या कडून अर्पणासाठी कोकरू विकत घेतले जात असत. त्याच मेंढपाळांना जगात येणाऱ्या खऱ्या कोकराची ओळख किंवा शुभवार्ता देण्यात आली.

बोधकथा

एकदा एक जंगलात एक मिठाची बाहुली राहत होती तिने समुद्र कसा दिसतो हे पहिले नव्हते. समुद्र कसा असतो, समुद्राच्या पाण्याची चव कशी असते हे सर्व पाहण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. ती समुद्राच्या शोधात निघाली. अनेक दिवस आणि रात्र तिने ते जंगल पार करण्यात घालवले आणि एके दिवशी रात्रीच्या शांतसमयी ती समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. समुद्र बघताच तिला खूप आनंद झाला. ‘हे प्रिय सागरा तू किती सुंदर आहेस. मला तुझ्याबरोबर खेळायचं आहे असे म्हणत ती बाहुली समुद्रात चालत गेली आणि थोड्याच वेळात ती पाण्यात विरघळून गेली व समुद्राशी एकसमान झाली.
      स्वत: परमेश्वराला सुद्धा मनुष्याच्या प्रेमाची व संगतीची ओढ वाटू लागली. माणसे काय करतात? त्यांचे जीवन कसे आहे? त्यांच्या जीवनातील सुख-दु:ख, वेदना, आनंद ह्या सर्वांचा आस्वाद घेण्याची ईच्छा परमेश्वरामध्ये झाली आणि मानवजातीच्या प्रेमाची चव घेण्यासाठी तो स्वत: मानव होऊन भूतलावर आला आणि त्या मिठाच्या बाहुलीप्रमाणे मानवाशी एकरूप झाला.

मनन चिंतन:-

१.माझ्या प्रिय मित्रांनो देवाने मानवाला दिलेली सर्वात अमूल्य देणगी म्हणजे “प्रभू येशू ख्रिस्त”. जो स्वतः मानव झाला व आम्हामध्ये येऊन राहिला.
     जुन्या करारामध्ये आपण जर पहिले तर आपल्याला समजेल की परमेश्वर नेहमी संदेष्ट्याद्वारे बोलत होता परंतु आता त्याला वाटले आपण स्वतः माणसाबरोबर बोलावे त्यामुळेच तो मानव झाला. मनुष्य पापी आहे हे ठाऊक असूनही तो स्वतः मनुष्य झाला आणि स्वतःला त्याने रिक्त केले. संत पौल म्हणतात, “देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतीरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.”(फिलीपिकरांस पत्र २:६-७)
     कवि रवींद्रनाथ टागोर म्हणतात, “नाताळचा सण आपल्याला एकाचं गोष्टीची आठवण करून देते: देवाने माणसाला कधीच एकट सोडलं नाही परंतु त्याने शेवटपर्यंत प्रेम केले.” त्याच्या प्रेमाला कोणत्याच प्रकारचं बंधन नव्हतं. त्याचे प्रेम मानवाच्या प्रेमापेक्षा अधिक वेगळं आहे. हीच ती दोन हजार वर्षापूर्वीची नावाजलेली प्रेम कथा. या प्रेम कथेचं वर्णन संत योहानाने सुंदर अश्या शब्दात केलेलं आहे. “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.” (योहान ३:१६)

२.    स्वतः मानव झाल्यामुळे त्याला सर्व काही ठाऊक आहे. स्वतः दुःख सहन केल्यामुळे तो आमचे दुःख जाणतो. त्याची अपार द्या मानवाच्या मापांनी मोजताच येणार नाही. प्रत्येक स्त्रीची वेदना, दुःख, कष्ट त्याला ठाऊक आहेत कारण तो एका स्त्रीच्या पोटी जन्माला होता. एका स्त्रीचं दुःख काय असते ह्याचं त्याला भान आहे. प्रत्येक वडिलांचे क्लेश त्याला समजतात कारण तो स्वतः संत योसेफाच्या सानिध्यात वाढला होता. जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळावर त्याची कडक नजर आहे. त्याला होणाऱ्या वेदना कदाचित आईवडील समजू शकणार नाही परंतु स्वतः परमेश्वराला ठाऊक आहेत कारण तो स्वतः बालक झाला होता आणि आज आपण त्याचा जन्मदिवस साजरा करीत आहोत.
     विश्वासणारे जनहो, प्रभू येशूला आपले कष्ट व दुःख समजतात. स्वतःला त्याच्यावर सोपवून द्या म्हणजे तो आपल्या प्रीतीच्या बाहूंनी तुम्हाला जवळ घेईल आणि प्रत्येक दुःखातून आणि अडचणीतून निभावून नेईल.
     दोन हजार वर्षपूर्वी प्रभू येशू स्वतः मानव होऊन ह्या भूमीवर आला. अजून सुद्धा ह्या जगाला शांतीदुताची अत्यंत गरज आहे. ज्याने जगरुपी तळ्यात स्वःताची वलय निर्माण केली त्याच वलयांची जगाला अजून ओढ लागलेली आहे. हे प्रभू येशू तुझा हा जन्म दिवस साजरा करीत असताना आमच्या सर्वांची मने तु शांतीने व प्रेमाने भर व सर्वांच्या हृदयात तुझ्या शांतीचे व आनंदाचे वलय निर्माण कर.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐकून घे.
१. बाळ येशूचा शांतीचा व प्रीतीचा संदेश पोप महाशय, बिशप्स, सर्व धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांना पूर्ण तन्मयतेने जगजाहीर कण्यास लागणारी कृपा व आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
आज आपल्या मध्ये येशु ख्रिस्त बालकरूप धारण करूनत्याची शांती व प्रेम देण्यास आला आहेआपण देखील बंधूप्रेमाने राहून सर्वत्र शांतीचेप्रेमाचेआनंदाचे व ऎक्याचे राज्य पसरावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.
  जे लोक देवापासून दुरावले आहेत व जे लोक अजून देखील देवाची वाट पाहत आहेत ह्यांना देवाचे त्याच्याकडे येण्याचा मार्ग दाखवावा व त्यांना एक धार्मिक,देवभिरू जीवन जगण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ह्या आनंदमयी वातावरणात नांदत असताना आम्ही आमचाच नव्हे तर दुसऱ्यांचा देखील विचार करून जे दुःखी, निराश व हताश आहेत अश्या लोकांना आपल्या परीने मदत करून त्यांना ह्या आनंदाच्या दिवशी सुखाचा अनुभव देता यावा म्हणूनआपण प्रार्थना करूया.

आताथोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभू चरणी ठेऊ या.





No comments:

Post a Comment