Reflections for Homily By: Ashley D'Monte
नाताळचा सण
(सकाळची मिस्सा)
दिनांक: २५/१२/२०१४
पहिले वाचन: यशया ६२:११-१२
दुसरे वाचन: तीतास पत्र ३:४-७
शुभवर्तमान: लुक २:१५-२०
प्रस्तावना
आज संपूर्ण पृथ्वी आनंद व हर्ष करीत आहे कारण तिला तिचा तारणारा लाभलेला आहे. संदेष्ट्याने केलेल्या भविष्यवाणीची पुर्तता आज झाली आहे. देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्रास मानवजातीच्या प्रीतीपोटी या भुतलावर पाठवून प्रितीचा कळस गाठला आहे.
पहिल्या वाचनात यशया संदेष्टा, तारणारा येणार असल्यामुळे हर्ष व आनंद करण्यास सांगत आहे. हा आनंद साजरा करीत असताना संत पौल तिताला लिहिलेल्या पत्रात सांगतो की, आपणही एकेकाळी आज्ञाभंग करणारे, बहकलेले होतो परंतु आपल्या
नीतीने नव्हे तर त्याच्या आपल्यावरील दयेखातर त्याने आपल्याला तारिले आहे. हिच परमेश्वरी दया व उदारता आपणास गाईच्या गोठ्यात जन्मलेल्या
ख्रिस्ताद्वारे दिसत आहे.
ज्याप्रमाणे ख्रिस्त ह्या भुतलावर दीन- दुबळ्यांच्या तारणासाठी
अवतरला त्याचप्रमाणे
आपणही दीन व गरजवंताच्या
हितासाठी झटावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ६२:११-१२
पहिल्या वाचनात यशया संदेष्टा दोन गोष्टीसाठी आनंद व हर्ष करण्यास सांगत आहे.
प्रथमताः आपल्यामध्ये तारणारा येणार आहे. तो एकटा नसून त्याच्याबरोबर त्याने उद्धारलेले लोक सुद्धा घेऊन तो येत आहे. त्या सर्वांना तो नविन रुप देत आहे आणि हेच लोकं प्रभुचे उद्धारलेले पवित्र लोक म्हणुन त्यांना गणण्यात येईल.
दुसरे म्हणजे परमेश्वराने आपली अपार प्रिती दर्शविली आहे. हि प्रीती वधु-वरांतील प्रेमासारखी आहे. “तरुण जसा कुमारीशी विवाह करितो तशी तुझी मुले तुजशी विवाह
करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.”(यशया ६२.५) यशया संदेष्ट्याने
जो उपदेश इस्रायेली लोकांना दिला तो आजही आपणास उपयुक्त ठरत आहे. कारण आपला तारणारा आज जन्मला आहे आणि त्यामुळे आपण
सर्वजण पापांच्या मोहजाळातून मुक्त होणार आहोत.
दुसरे वाचन: तीतास पत्र ३:४-७
दुस-या वाचनात संत पौल ख्रिस्त येण्यापुर्वी आपली स्थिती काय होती याची प्रचिती देतो. आपण देवाच्या प्रेमाविषयी अज्ञानी होतो. आपल्या पापामुळे आपण भटकलो होतो. देवाच्या आज्ञेविरुद्ध, ईच्छेविरुद्ध जाऊन आपण आज्ञाभंग केला. पापाच्या जाळ्यात अडकल्याने आपण पापाचे गुलाम बनलो होतो. तिरस्कारामुळे आपण शेजा-यांचा हेवा केला. हे दृष्य ख्रिस्त येण्याने पुर्णपणे बदलले आहे. प्रायश्चित संस्काराद्वारे आपल्याला पुन्हा एकदा देवाची मुले बनण्याचा अधिकार मिळालेला आहे. पवित्र आत्म्याद्वारे आपण पवित्र झालो आहोत. हे पावित्र्य सदैव राखणे हाच नाताळचा हेतु व संदेश आहे.
शुभवर्तमान: लुक २:१५-२०
लुकलिखीत शुभवर्तमानात आपण पाहतो कि, ख्रिस्तजन्माचा पहिला संदेश हा गरिब धनगरांना मिळतो. दुत ह्या धनगरांना ख्रिस्तजन्माची कहाणी सांगतो व त्यांना तारणाची आशा दाखवतो. हा संदेश प्रथम धनगरांनाच का? कारण त्यांना समाजात
स्थान नव्हते. समाजाने त्यांना तुच्छ लेखलेलं होतं, त्यांचे जीवन अगदी कठीण व
कष्टमय होतं. मंदिरात बळी देण्यास लागणारे कोकरु हे मंदिर अधिका-यांच्या कळपातून पुरविले जाई. धनगर ह्या कळपाची राखण करीत असत. धनगर जे मंदिरासाठी लागणा-या कोकरांची काळजी घेत त्यांनाच प्रथम जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरु पाहण्याचे भाग्य लाभले. धनगरांना दुताचा संदेश मिळाला तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला व ते बेथलेहेमास गेले. त्यांनी देवाने केलेल्या कृत्याबद्द्ल गुणगान गायिले व ह्या सर्व गोष्टी इतरांना कळवल्या.
बोधकथा:
(काल्पनिक कथा)
येशु आपल्या दु:सहन व पुनरुत्थानानंतर वैभवाने स्वर्गात चढला. तेव्हा एका दुताने त्याला विचारले, ‘प्रभुजी आपण पृथ्वीवर खुप दु:ख सहन केलेत ना?’ ‘होय’ येशुने उत्तर दिले. दुताने विचारले, ‘तुम्ही लोकांसाठी जे केलेत त्याची जाणीव त्यांना आहे का?’ प्रभुने म्हटले, ‘फक्त थोड्यांनाच ह्याची जाणीव आहे.’ दुताने म्हटले, ‘मग तुम्ही असे काही केले आहे
का ज्याद्वारे तुमच्या कार्याची प्रचिती सर्वांना येईल?’ येशुने उत्तर दिले, ‘मी माझे शिष्य पेत्र, योहान ,याकोब यांस व त्यांच्या साथीदारांस माझ्याविषयी इतरांना कबुली देण्यास आज्ञीत केले आहे. ते थोड्यांना सांगतील व ते थोडे इतरांना व ते पुढे अजुन काही जणांस अशाप्रकारे पृथ्वीच्या काना-कोप-यात ही सुवार्ता सांगितली जाईल.’ शंकित होऊन देवदुताने पुन्हा विचारले, ‘होय, पण जर पेत्र आणि त्याचे साथिदार हे विसरले तर? इतरांना सांगण्यास जर त्यांनी निष्काळजीपणा केला तर? आपण दुसरे काही योजिले आहे का?’ ख्रिस्ताने उत्तर दिले, ‘नाही, मी दुसरे काही योजिले नाही. माझा त्यांच्यावर विश्वास आहे.’
ख्रिस्ताचा आपणावर विश्वास आहे. आपणांस ख्रिस्ती विश्वास हा प्रेषितांद्वारेच प्राप्त झाला व आपण तो इतरांपर्यंत पोहचवला पाहिजे. ख्रिस्ताचे मानवजातीवरील प्रेम हे इतरांपर्यंत पोहचविण्याचे काम आता आपणा सर्वांचे आहे.
मनन चिंतन:
आज नाताळचा सण साजरा करीत असताना आपण परमेश्वराचे मानवजातीवरील प्रेम हे ख्रिस्ताच्या येण्याने कसे परिपुर्ण झाले यावर विचार विनिमय करत आहोत. परमेश्वराचे प्रेम व दया ही विशेषकरुन गोर-गरिबांसाठी बहाल केलेली आहे हे ठळकपणे दिसून येते. ख्रिस्त ह्या भुतलावर येण्याचा मुख्य हेतू हाच की, पाप्यांचे, गोर- गरिबांचे तारण व्हावे. त्यामुळेच यशया संदेष्ट्याचे भाकित प्रभु येशू आपले कार्य चालू करण्यापुर्वी घोषीत करतो. “प्रभु
परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे;भग्न हृदयी
जनांस पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांस मुक्तता व बंदिवानांस बंधमोचन विदित करावा.”(यशया ६१.१)
ख्रिस्तामध्ये आपणास परमेश्वराचे प्रेम व करुणा याची प्रचिती येते. प्रभुच्या येण्याने तारण शक्य झाले आहे. “ मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी
म्हणून आलो आहे.”
(योहान 10:10) संत अगुस्तीन म्हणतात, “देव मनुष्य झाला जेणेकरुन मनुष्य दैवी होऊ शकेल.” जेव्हा आपल्या कुटुंबात एखादे बाळ जन्मास येते तेव्हा सर्वांना कुतूहल हेच असते की बाळ कोणासारखे दिसते! या गाईच्या गोठ्यात जन्मलेल्या बाळाकडे पाहताच एक गोष्ट ठामपणे दिसुन येते ती म्हणजे देवाचे प्रेम, त्याचा चांगुलपणा. आपल्या एकुलत्या एका पुत्रास त्याने जगाच्या कल्याणासाठी सर्मपित केले. ख्रिस्ताने आपणास गरिबांशी एकरूप कसे व्हायचे हे त्याच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे. ख्रिस्ताने त्या गरिब धनगरांची हाक ऐकली व त्यांच्या मदतीस तो धावून आला जेणेकरून त्यांचे तारण व्हावे. पोप फ्रान्सिस म्हणतात, ‘चर्च हे गरिबांचे आणि गरिबांसाठी आहे’. आज अनेक असे गरीब, गरजू लोक दु:खात, आजारात गुरफटलेले आहेत. अशा लोकांचा आवाज ऐकण्यास व ज्याप्रमाणे धनगर ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यत पोहचवण्यास पुढे सरसावले त्याचप्रमाणे आपणही ख्रिस्ताच्या येण्याची सुवार्ता व त्याचा शांतिचा व प्रेमाचा संदेश इतरांपर्यंत
पोहचविण्यास ख्रिस्तसभा आपणास पाचारीत आहे.
विश्वासु लोकांच्या प्रार्थना :
प्रतिसाद : हे बाळयेशू माझ्या हृदयात ये.
1. आपले परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी, धर्मगुरु यानी ख्रिस्ताप्रमाणे आपल्या शब्दाने व कृतीने परमेश्वराची दया दाखवून अनेकाना परमेश्वराकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
2. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपण पापी असुनही आपणावर प्रेम केले तसेच आपणही आपल्या शेजाऱ्यांकडे सदा प्रेमळ व क्षमाशील दृष्टीने पहावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
3. जे दीन व गरजवंत आहेत अशा लोकांत आपण ख्रिस्त पाहून
त्यांचसाठी मदतीचा
हात पुढे करण्यास आपल्याला परमेश्वरी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
4. जे लोक दु:खी, कष्टी व भाराक्रांत आहेत अशांनी आपला विश्वास ढळू न देता परमेश्वराच्या प्रेमात त्यांची वाढ
व्हावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
No comments:
Post a Comment