Reflections for Homily By:Alfred Rodrigues
आगमन काळातील तिसरा रविवार
दिनांक: १४/१२/२०१४
पहिले वाचन: यशया ६१:१-२, १०-११
दुसरे वाचन: १ थेस्सलोनीकाकरांस पत्र ५: १६-२४
शुभवर्तमान:
योहान १: ६-८, १९-२८
“तो प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला”
प्रस्तावना:
प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत.
तारणारा येण्याची तयारी करीत असताना, आजची उपासना आपणास आनंद व हर्ष करण्यास सांगत
आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या शेकडो वर्षापूर्वी दिलेला संदेश
प्रत्यक्षपणे आजच्या शुभवर्तमानात योहान बाप्तिस्ता देत आहे. तारणा-या
देवपुत्राच्या आगमनाचा संदेश योहान बाप्तिस्ता देत असताना त्याने पश्चातापाचा व
शुद्धीकरणाचा बाप्तिस्मा लोकांना दिला. तारणारा ख्रिस्त येणार आहे आणि ‘त्याच्या
पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही’, अशी योहानाने आपली स्वतःची ओळख करून दिली.
आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे हे सत्य अंत:करणापासून
स्वीकारून त्याची साक्ष जगाला देण्यासाठी योग्य ती कृपा व सामर्थ्य आपल्याला
मिळावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ६१:१-२, १०-११
यशया संदेष्टा आनंदाने सांगतो की, “मी परमेश्वराच्याठायी
अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो. तो पुढे म्हणतो की,
जसा नवरा शेलापागोटे बांधून स्वतःला याजकासारखा मंडित करितो व नवरी जशी अलंकारांनी
स्वतःला भूषित करिते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत. मला
धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे”.
दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस
पत्र ५: १६-२४
थेस्सलोनीकांची ख्रिस्तसभा तारणारा येण्याच्या उशीर झाल्याने खचून गेली होती
म्हणून संत पौल त्यांना आधार देऊन सांगतो की, ख्रिस्तसभा नेहमी आनंदी असली पाहिजे.
ती प्रार्थना करणारी आणि धन्यवाद देणारी असली पाहिजे. जेव्हा ख्रिस्तसभा ह्या सर्व
वचनाप्रमाणे वागेल तेव्हा तिचे तेज अंधारातसुद्धा दिसून येईल. म्हणूनच पौल पुढे
म्हणतो, तुम्हास पाचारण करणारा विश्वासनीय आहे व तो हे करीलच.
शुभवर्तमान: योहान: १: ६-८, १९-२८
तारण (मसीहा) ह्या शब्दासाठी उद्धार, मुक्तता, सुटका, बचाव इत्यादी मराठी
पर्याय सुचवता येण्यासारखे आहेत. संपूर्ण इस्रायल मसिहाची (तारणा-याची) वाट पाहत
होते. हा मसीहा येऊन रोमी सरकारच्या सत्तेतून आपली सुटका करील अशी त्यांची आशा
होती. जुन्या करारात असा एकजण येणार आहे असे लिहून ठेवले आहे. योहान बाप्तीस्ता मोठ्या
सामर्थ्याने संदेश देत होता तेव्हा तो मसीहा (ख्रिस्त) असावा असे वाटून धर्मपुढा-यांनी
याजक व लेवी ह्यांना विचारपूस करण्यास पाठविले. या प्रसंगी योहानाने ख्रिस्ताविषयी
साक्ष दिली. ख्रिस्ताचा साधा गुलाम होण्याची लायकी माझ्यात नाही असे योहानाने
त्यांना म्हटले.
तू कोण आहेस? हा
प्रश्न याजक व लेवीकडून योहानाला विचारला जातो आणि त्यासाठी योहानाला पर्याय
सुद्धा दिले गेले होते.
1. तू ख्रिस्त आहेस काय?
प्रथम आपण ख्रिस्त ह्या नावाचा अर्थ समजून घेऊया. ख्रिस्त हा शब्द
मुळचा ग्रीक भाषेतील ज्याचा अर्थ होतो- ‘अभिषिक्त’. आणि मसीहा जो
हिब्रू भाषेतील शब्द आहे त्याचा अर्थही ‘अभिषिक्त’ असा होतो.
पूर्वीच्या काळी राजे, धर्मगुरू आणि संदेष्टे
तेलाने अभिषिक्त केले जात कारण त्यांच्याजवळ असलेले सामर्थ्य हे देवाकडून आले
असल्याचे मानले जाई आणि त्यांच्यात संदेष्टा हा संदेश देणारा म्हणून मानला जाई.
परंतु याजक व लेवीनुसार योहान हा ख्रिस्त असेल तर त्याची आणखी एक संदेष्टा म्हणून
भर पडेल. त्यांना फक्त मसीहाविषयी माहिती पाहिजे होती परंतु योहानाने ख्रिस्त
असल्याचे नाकारले. योहानाने त्यांना म्हटले, ‘मी ख्रिस्त नाही’ (योहान १:२०)
2. तू एलिया आहेस काय?
एलिया हा इस्रायलातील एक मोठा संदेष्टा होता.
अवर्षण व दुष्काळाविषयीचा भयानक संदेश त्याने त्याकाळचा राजा आहाब ह्याला कळविला
होता (१ राजे १७:१). तो वावटळीतून वर स्वर्गात घेतला गेला. हाच एलिया येशूच्या
रुपांतराच्या वेळी डोंगरावर प्रकट झाला होता. एलिया हा पुन्हा येईल असा यहुद्यांचा
विश्वास होता परंतु योहानाने आपण एलिया असल्याचे सुद्धा नाकारले.
3. तू संदेष्टा आहेस काय?
त्यावेळी इस्रायलमध्ये भरपूर असे संदेष्टे होऊन
गेले. परंतु त्यांच्या मनामध्ये संदेष्टा हा मोशेने सांगितल्याप्रमाणे येणार होता,
म्हणून ते योहानाला तू संदेष्टा आहेस का म्हणून विचारतात परंतु योहान आपण संदेष्टा
असल्याचे नाकारतो.
याजक व लेवीला योहानाकडून साजेशे उत्तर मिळत
नाही परंतु त्यांना योहानाकडून उत्तर हवे असते म्हणून ते योहानाला म्हणतात, तुझे
स्वतःविषयी काय म्हणणे आहे? हयावर योहान म्हणतो, यशया संदेष्टाने
सांगितल्याप्रमाणे, ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणा-याची वाणी’ मी
आहे. परंतु ते पुढे योहानाला प्रश्न करतात की, जर तू ख्रिस्त नाही, एलिया नाही,
संदेष्टा सुद्धा नाहीस तर तू बाप्तिस्मा का करतोस? त्यावर योहान नम्रपणे म्हणतो, ‘मी
पाण्याने बाप्तिस्मा करतो, ज्याला तुम्ही ओळखीत नाही असा एक तुम्हांमध्ये उभा आहे.
तो माझ्यामागून येणारा आहे, त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही.’
बोधकथा:
एकदा एक वडील आपल्या तिन्ही मुलांना प्रत्येकी पाचशे रुपये देऊन सांगतो, ‘ह्या
पैशांनी तुम्ही अशी वस्तू विकत आणा ज्याने आपल्या घरातील ही खोली पूर्णपणे व्यापून
टाकली जाईल’. वडिलांनी केलेल्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकजण ती खोली पूर्णपणे कशी
भरायची ह्या विचारात मग्न झाले.
पहिला मुलगा ती खोली भरण्यासाठी चारा विकत आणतो परंतु त्या चाऱ्याने ती खोली
पूर्ण न भरता काही भाग रिकामा राहतो. तद्नंतर दुसरा मुलगा कापूस विकत आणतो व त्या
कापसाने खोली भरण्याचा प्रयत्न करतो परंतु ती खोली त्या कापसाने पूर्णपणे व्यापली
जात नाही. शेवटी तिसरा मुलगा जातो आणि बाजारातून एक छोटासा दिवा विकत घेऊन येतो व
आपल्या खोलीत प्रकाशित करतो व त्या दिव्याच्या प्रकाशाने संपूर्ण खोली उजळून
निघते.
मनन चिंतन:
आजच्या शूभवर्तमानात ज्या योहान बाप्तीस्ताविषयी आपण ऐकतो तो वरील कथेतील दिवा
बनून आपल्या समोर येत आहे. येशू ख्रिस्ताने आपली सेवा सुरु करण्यापूर्वी काही
महिने अगोदर योहानाला प्रकाशाची साक्ष देण्यासाठी पाठविले. योहान दिवा होता तर खरा
प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे व हा प्रकाश सर्व विश्वाला प्रकाशित करून अंधरावर
मात करतो.
अंधाराची भीती सर्वांना वाटत असते. त्यामुळे अंधारात फिरण्याचे धाडस एखादाच
मनुष्य करीत असतो. परंतु एक लहान दिवा अंधाराचा ठाव घेतो आणि अंधारावर विजय
मिळवितो. अंधाराला नाहीसे करण्याचे परमेश्वरी सामर्थ्य एका लहानशा दिव्यात असते.
असंख्य काजवे चमकल्याने काळोखही त्यांना शरण जातो, आपण तर माणसे आहोत. अंधारावर साम्राज्य
गाजविण्याचे ईश्वरी सामर्थ्य योहानाप्रमाणे प्रत्येकात आहे परंतु या सामर्थ्याची
जाणीव प्रत्येकास असतेच असे नाही. त्यासाठी ईश्वरतेजात म्हणजेच शाश्वत प्रकाशात
स्वता:च्या सद्विचाराने परमेश्वर तेजाचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा. ईश्वरी
तेजात जीवन जगणाऱ्यांना अंधकार कधीच ग्रासत नसतो.
विश्वातील अन्यायाचा, अत्याचाराचा, अनीतीचा, अविचाराचा अंधकार नाहीसा करून
त्या अंधारावर अधिराज्य गाजवून मानवी जीवन सर्वार्थाने उजळ करणे ही परमेश्वराची
अनंत काळापासूनची इच्छा आहे. आपली अंधारलेली मने पुन्हा प्रकाशमान करण्यासाठी
प्रकाशाच्या राजपुत्राला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने या जगात पाठविले.
सर्वांना व्यापून टाकणाऱ्या काळोखात उंच आभाळात एक तारा दिव्य तेजाने लखलखत
आहे. अंधारात राहणाऱ्याचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी येत आहे त्याच्या सहवासात
अंधाराला स्थान नाही, अधर्माला जागा नाही. जे अधर्म करतात, अभक्तीला चालना देतात,
जे अविचारी आहेत, ते तेजाची लेकरे नसून अंधाराचे गुलाम आहेत. परमेश्वराने आपले जीवन
दिव्य तेजाने प्रकाशित केले आहे. प्रभू येशू म्हणतो ‘दिवा लावून तळघरात किंवा
मापाखाली कोणी ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यास उजेड दिसावा म्हणून दिवठनीवर ठेवतो’.
तुझा शरीराचा दिवा तुझा डोळा होय. तुझा डोळा निर्दोष असेल तर तुझे सर्व शरीरही
प्रकाशमय असते. सदोष असला तर, तुझे शरीरही अंधकारमय असते. तुझे सर्व शरीर प्रकाशमय
असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल तर दिवा आपल्या उज्वल ज्योतीने तुला
प्रकाशमय करतो. याचाच अर्थ असा की, परमेश्वराचे तेज व्यक्तीठायी वसत असल्यास ती
व्यक्ती अंधारात चालत नसते, तर त्याचे आयुष्य तेजात तळपून निघत असते. ती व्यक्ती स्वत:
प्रकाशमय झाल्याने आपल्या सत्कृत्याने इतरांना ईश्वरी तेजाचा अनुभव देत असते.
इतरांचा अंध:कार नाहींसा करत असते. ख्रिस्त तेजात न्याहुन निघाल्याने इतरांच्या
विझलेल्या वाती पेटवत असते. व हेच जीवनाचे ध्येय बनते.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना
ऐक.
- आपल्या ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांनी प्रभूच्या मार्गाची घोषणा करून प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी लोकांना मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
- जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रभुचा स्पर्श होऊन त्यांनी अंधाराचा मार्ग सोडून प्रकाशाचा मार्ग निवडण्यास त्यांस प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी ह्या ख्रिस्ती जीवनावर मनन-चिंतन करून आगमनकाळात सर्व वाईटांपासून व मोहांपासून दूर रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
- जे आजारी व दु:खी कष्टी आहेत त्यांना त्यांच्या जीवनात ख्रिस्त सापडून त्यांना आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
- थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment