Reflections for the homily by: Allwyn Gonsalves.
उपवास काळातील पहिला रविवार
दिनांक: २२/०२/२०१५.
पहिले वाचन: उत्पत्ती ९:८-१५.
दुसरे वाचन: पेत्राचे पहिले पत्र ३:१८-२२.
शुभवर्तमान: मार्क १:१२-१५.
''देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास
ठेवा''
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो,
आज पवित्र देऊळमाता उपवास काळातील पहिला रविवार
साजरा करीत आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण ‘पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास
ठेवा’ ही येशूची घोषणा ऐकणार
आहोत. येशू आपणाला पश्चात्ताप करायला सांगतो
कारण आपण सर्वजण पापी आहोत पण आपण पापात मरणार नाही. कारण येशूने आपल्याला तारण
मिळवून दिले आहे, परंतु ते तारण मिळविण्यासाठी आपण पश्चात्ताप केला पाहिजे.
प्रत्येक पाऊलावर मोह येतात, येशू ख्रिस्ताच्या
जीवनातसुद्धा मोह आले परंतु त्याने मोहांवर विजय मिळविला. आपल्या जीवनात येणा-या
मोहांना सामोरे जाण्यास ख्रिस्त आपणाला देखील शक्ती आणि सामर्थ्य द्यायला तयार आहे.
ह्या उपवास काळात आपण येशूच्या अधिकाधिक जवळ जाण्यास प्रयत्न करावे व
त्यास लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात आपण प्रार्थना
करूया.
सम्यक
विवरण:
पहिले
वाचन: उत्पत्ती; ९:८-१५
देवाने जलप्रलायातून नोहा व त्याच्या कुटुंबाचे संरक्षण केल्यामुळे नोहाने देवाचे आभार मानत उपकार स्तुती केली. देवाने त्या उपकार स्तुतीचा स्विकार केला व आश्वासन दिले: ह्यापुढे कधीही मी सर्व सृष्टीचा व प्राणीमात्रांचा समूळ नाश करणार नाही. ह्या कराराचे
चिन्ह म्हणून
आकाशात मेघ दिसतील, व त्यात धनुष्य दिसेल.
करार हा दोन व्यक्तीमध्ये केला जातो. बायबलमध्ये अश्या
प्रकारच्या सात करारांचा उल्लेख केलेला आपणास आढळतो. ह्या सात करारांपैकी चार करार
देवाने इस्राएली लोकांबरोबर केले: अब्राहामाबरोबर केलेला करार(उत्पत्ती३:१६-१९), पेलेस्टीनीयांबरोबर केलेला करार (अनुवाद ३०:१-१०), मोशेबरोबर
केलेला करार (अनुवाद ११) आणि दाविदाबरोबर केलेला करार(२ शमुवेल ७:८-१६). इतर तीन करार अखिल
मानवजातीबरोबर केलेले आहेत: आदमाबरोबर केलेला करार(उत्त्पती३:१६-१९), आजच्या
वाचनातील नोहाबरोबर केलेला करार(उत्त्पती ९:८-१५), व यिर्मयामधील नवा करार
(यिर्मया ३१:३१-३४).
दुसरे
वाचन: पेत्राचे पहिले पत्र; ३:१८-२२
नोहाच्या वेळी असलेल्या अनीतिमान, आज्ञाभंग
करणाऱ्या लोकांचा देवाने जालाप्रलयाद्वारे पाडाव केला.ह्या जालाप्रलायावेळी देवाने
नोह व त्याच्या कुटुंबियांचे संरक्षण केले. ह्यांचे पाण्यापासून संरक्षण होणे हे
आपल्याला ख्रिस्ती बाप्तीस्म्याद्वारे होणाऱ्या तारानासंबंधी आठवण करून देते.
ह्या उताऱ्यात पेत्र बाप्तीस्म्याबद्दलच्या तीन
विशेष बाबींचा उल्लेख करतो: १. बाप्तिस्मा म्हणजे केवळ देहाचा मळ धुवून टाकणे
नव्हे,तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असे आहे. २. आपला बाप्तिस्मा हा आपल्या सद सद
विवेकबुद्धीला केलेली प्रतिज्ञा आहे. ३. आपल्या बाप्तीस्माचा पाया हे येशूचे
पुनरुत्थान होय. येशूच्या पुनरुत्थानातील कृपेद्वारे आपण परिपूर्ण होत असतो.
शुभवर्तमान: मार्क; १:१२-१५
आजच्या
शुभवर्तमानात येशूने चाळीस दिवस अरण्यात घालविल्याचे आपण ऐकतो. बायबलमध्ये चाळीस
ह्या संख्येला एक विशेष महत्व आहे. व चाळीस ह्या संख्येचा उल्लेख १४६ वेळा
केल्याचा आपल्याला आढळतो. सदोम व गमोरा ही शहरे उध्वस्त केली जाऊ नये म्हणून
आब्रहम देवाला म्हणाला की, ‘तेथे कदाचित चाळीसच नीतिमान आढळले तर?’(उत्पती १८:२९).
नोहाच्या काळात चाळीस दिवस व चाळीस रात्र पावसाने पृथ्वीवर झोड उठविली.(उत्पती
७:१२) मोशे चाळीस वर्ष इजिप्त देशात राहिला तसेच इजिप्त देशातून निर्गमन करत असता,
चाळीस वर्ष अरण्यात घालवावे लागले. तसेच मोशे चाळीस दिवस व रात्र सीनाय पर्वतावर
होता.(निर्गम २४:१८).योना प्रवक्त्याने चाळीस दिवस निनवे शहरात लोकांनी आपल्या
पापांचा पश्चाताप करावा म्हणून प्रबोधन करीत राहिला.(योना ३:४). एलिजा प्रवक्ता
होरेब पर्वतावर ४० दिवस अन्न व पाणी न घेता राहिला.आजच्या शुभवर्तमानात
ऐकल्याप्रमाणे येशू चाळीस दिवस अरण्यात राहिला.(मार्क १:१३). तसेच येशूचे
पुनरुत्थानानंतर चाळीस दिवसाने येशूने आपल्या शिष्यांना दर्शन दिले.
चाळीस दिवसाचा
उल्लेख बहुतेकदा त्या प्रवक्ता अथवा व्यक्तीची परीक्षा घेण्यासाठी किंवा त्याला
विशेष कार्यासाठी निवडण्याअगोदर त्याची तयारी करण्यासाठी वापरलेला आहे. एकांतात
राहत असताना त्यांची देवाबारोबरची जवळीकता वाढत असल्याचे आपण पाहतो. तसेच हा अनुभव
त्यांच्यात पूर्णपणे बदल घडवून आणून त्यांना
देवाचे खरे भक्त बनवतो. येशूसुद्धा आपल्या कार्याला सुरुवात करण्याआगोदर
अरण्यात चाळीस दिवस उपास व प्रार्थनेत घालवतो. ह्या चाळीस दिवसात त्याला
सैतानाच्या मोहाला सामोरे जावे लागते. येशूविषयी सैतान पूर्णपणे जाणून होता, व
त्याला कल्पना होती की , जर येशूने आपले कार्य चालू ठेवले तर त्याच्या अस्तित्वाला
धोका निर्माण होईल. तो येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो. परंतु येशू त्या
मोहावर विजय मिळवून आपल्या कार्याला यशस्वीरीत्या सुरुवात करीत असल्याचे आपण
पाहतो.
बोध कथा: |
पेरी थॉमसने आपल्या स्वत:च्या
जीवनाविषयी एक पुस्तक लिहीले आहे, त्यात तो त्यांच्या जीवनाचे परिवर्तन कसे झाले
ह्याविषयी सांगतो. थॉमस हा एक चोर, व्यसनी मनुष्य होता व दुसऱ्याचा खुण करण्यास
कसलाच विचार करत नव्हता. पण आता तो एक चांगला ख्रिस्ती व्यक्ती बनला आहे. कारण तो
सांगतो की, एक दिवस तुरूंगात आपल्या खोलीत झोपला असताना त्याने विचार केला की, मी
माझ्या जीवनाची काय अवस्था करून ठेवली आहे. त्यावेळी त्याला देवाकडे प्रार्थना
करावी असे वाटले. परंतु तो काही करू शकला नाही, कारण त्याच्या खोलीत दुसरा एक
मुलगा राहत होता. थोड्या वेळानंतर जेव्हा तो मुलगा झोपी गेला, तेव्हा थॉमसने
आपल्या जागेवर जाऊ गुडघे टेकले व हात जोडून प्रार्थना केली. त्या प्रार्थनेत
त्याने त्याच्या हृद्यातील सर्व आचार-विचार, त्याची स्वप्ने, त्याची आवडी-निवडी,
त्याच्या आशा-निराशा, हे सर्व सांगत असताना त्याला रडू कोसळले. ही सर्व प्रार्थना
संपतेवेळी त्या मुलाने हळू आवाजात आमेन असे म्हटले. त्यानंतर तो मुलगा व थॉमस ह्यांनी खूप गप्पा केल्या व काही वेळाने थॉमसने, त्याला
रात्रीच्या शुभेच्छा देऊन आपल्या जागेवर झोपण्यास गेला, त्यावेळी त्याच्या मनात
विचार आले कि देव सदोदीत आपल्या बरोबर असतो, परंतु आपण मात्र देवाबरोबर नसतो. ही
छोटी गोष्ट आपल्याला आजच्या शुभवर्तमानाची आठवण करून देते, जेव्हा येशू ख्रिस्त
सांगतो की पश्चात्ताप करा व देवाच्या सुवार्तेवर विश्वास ठेवा.
मनन-चिंतन:
१.
उपवासकाळ हा प्रभू येशूच्या दुःखसहनावर मनन चिंतन करण्याचा काळ आहे. ह्या दिवसात आपण आपल्या पापांबद्दल, दुष्कृत्ये केल्याबद्दल प्रायश्चित करत असतो व आपण पाप मुक्त बनतो. जो शुध्द असतो तो देवाच्या सान्निध्यात वस्ती करत असतो. उपवासकाळात आपली गतपापांबद्दल
पापशुध्दी व्हावी इतकेच नव्हे, तर
मानवी अंतरात्म्यातील ख्रिस्त जीवनाला पुष्टीही मिळत असते. प्रभू येशूने चाळीस दिवस उपवास
केला. ख्रिस्तसभेने प्रभू येशू ख्रिस्ताच्या यातना, दु:ख सहन, मरण व पुनरुत्थानाचे रहस्य साजरे
करण्याच्या तयारीला म्हणजेच उपवास काळाला सुरुवात केली आहे. या चाळीस दिवसांच्या
उपवासकाळात आपण नव्याने जन्म घेऊन प्रभू ख्रिस्तात पुनरुत्थित होण्याची तयारी
करतो. तसेच ह्या काळात आपण अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि मृत्यूकडून जीवनाकडे वाटचाल करण्याचा
प्रयत्न करत असतो. उपवासकाळात आपण प्रयत्नपूर्वक ईश्वराच्या सानिध्यात राहत असतो, म्हणून उपवासकाळ हा जणू आपल्या
आध्यात्मिक जीवनातील वसंत ऋतूच. ह्या काळात आपल्या जीवनाला नवीन आचार विचारांची
पालवी फुटू देण्याचा हा संकल्पकाळ. चिंतन करुन आपल्या स्वर्गीय पित्याशी संवाद
साधून आपले अंतःकरण मोकळे करण्याचा हा सुवर्णकाळ आहे.
उपवासकाळात आपण पापाबद्दल पश्चाताप
करावा हे आजच्या पवित्र शुभवर्तमानात संत मार्क आपल्याला सांगतो. आपण पश्चातापी अंतःकरणाने प्रायश्चित
संस्कार घेतो, कारण मनपरिवर्तन करण्याची पूर्वतयारी
म्हणजे पश्चाताप होय. ह्या काळात आपण ऐहिक आनंदाचा त्याग करतो आणि आपल्याजवळ जे
काही जास्त आहे व ज्याचा आपण उपयोग करत नाही, ते
गरजवंतांना वाटून आपले देवावरील व इतरांवरील प्रेम आणि चांगुलपणा असल्याची आपण
दर्शवितो.
उपवास हा तपश्चर्येचा फार महत्त्वाचा भाग मानला जातो. कारण
एखाद्या कार्यासाठी दृढनिश्चय, परिश्रम, मनन आणि त्रास सहन करण्याची पूर्वतयारी
करणे यालाच खरी तपश्चर्या असे म्हणतात. म्हणून उपवासकाळामध्ये पश्चात्तापाची, मनन-चिंतनाची तसेच स्वतंत्र विचारांची आवश्यकता
असते. चिंतनाने स्वतंत्र विचार निर्माण होतात. नवनवीन कल्पना सुचतात. आपल्या
विचारात स्पष्टता येते. उपवासकाळात दानधर्म करावा, श्रध्देने दान द्यावे. उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला कळू देऊ नये हेच खरे
श्रेष्ठ दान होय.
उपवासकाळ ही ख्रिस्त सभेला मिळालेली फार मोठी देणगी आहे. ह्या काळात
आपण देवाजवळ व माणसांजवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. पोप फ्रान्सिस यांनी
व्रतस्थांबरोबर एक सुसंवाद साधला होता त्यावेळी ते म्हणाले, ''आपण सर्वच पापी आहोत. पापी लोकांचा
स्वीकार होऊ शकतो, परंतु भ्रष्टाचारी लोकांचा स्वीकार होऊ शकत नाही.'' ''Sinners are accepted, but not
the corrupt.''
२.
पाप म्हणजे नक्की काय आहे? प्रत्येक
पाप, शिक्षा घेऊन
जन्माला येते. मग ते कोणतेही पाप असो, लहान
असो किंवा मोठे. पाप जिथे आहे तिथे शिक्षा असते. परमेश्वर पापी मनुष्याला त्याच्या पापांकरिता योग्य ती शिक्षा करतो परंतु त्याच्यावरील प्रीती मात्र कमी
होत नाही.
म्हणूनच परमेश्वराने मानवांच्या पापांची
शिक्षा त्याच्या प्रिय पुत्रालास सहन करावयास लावले. त्याचप्रमाणे पापी माणसाला पश्चात्ताप केल्यावर
परमेश्वराकडून क्षमा मिळते,
परमेश्वराची दया मिळते, हे देखील दाखवून दिले आहे.
‘पाप’ म्हणजे माणसाने आपल्या स्वतंत्र
इच्छेनुसार केलेले कृत्य. देवाची आज्ञा मोडून अगर देवाने
निर्मितीव्दारे सृष्टीमध्ये घातलेल्या नियमांचा भंग केल्याने पाप होते. उपवासकाळात
उपासनेचा काळ असतो. उपासना म्हणजे देवावर चिंतन, मनन किंवा ध्यान करणे. ह्या काळात प्रभू येशू ख्रिस्त पापी माणसाला
तारणाचे वचन देतो. हीच उपवासकाळातील खरी तपश्चर्या होय. कारण स्वर्गात प्रवेश
करण्यासाठी पश्चाताप हाच त्याचा खरा मार्ग आहे.
मनुष्य ही देवाची सर्वोत्कृष्ट
निर्मिती असली तरी देवाने मानवाला शरीर, मन
आणि आत्मा अशा तीन गोष्टी दिलेल्या आहेत. शरीराव्दारे माणूस जगाशी संपर्क साधतो.
आपल्या मनाव्दारे तो स्वतःशी सुखसंवाद साधत असतो आणि आपल्या आत्म्याद्वारे तो देवाशी जवळीक साधत असतो. माणसाच्या
जीवनात घडणा-या प्रत्येक घटकेचा परिणाम या तिंन्ही पैलूंवर होत असते. ''पाप सोडून प्रभूकडे परत या, त्याच्या सान्निध्यात प्रार्थना करा
म्हणजे तुमचे अपराध कमी होतील (बेनसिरा १७:२५).'' म्हणून उपवासकाळात आपण आपल्या पापांचे मूळ कारण शोधले पाहिजे. आपण आपल्या
पापांची आठवण केली पाहिजे. आपल्या हातून घडलेल्या पापांबद्दल मनात दुःख व्यक्त
केले पाहिजे आणि ह्यापुढे पाप न करण्याचा निश्चय केला पाहिजे. जो शक्तिशाली असून क्षमा करतो आणि गरीब
असून विशेषतः उपवासकाळात दानधर्म करतो अशीच माणसे देवाला प्रिय असतात. देव त्यांना
पुण्यवान ठरवतो. सत्कार्य आणि दानधर्म यांना उपवासकाळात फार महत्त्व आहे.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे
प्रभो, आम्हांला तुझी कृपा दे.
१.
हे प्रभू परमेश्वरा सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू
व धर्मभगिनी यांनी त्यांच्या आचार-विचारातून श्रध्दावंतांपुढे चांगला आदर्श ठेवावा व भाविकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जिवापाड मेहनत
घ्यावी, म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
२.
आपल्या देशाचा कारभार पाहण्यासाठी जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुध्दीला जागून
सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून जनतेचे प्रश्न सोडवावेत व सर्व जनतेच्या प्रगतीसाठी झटावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. दहशतवाद, आतंकवाद व वर्चस्ववाद या जीवघेण्या प्रवृत्तींमुळे जगातील ज्या ज्या राष्ट्रांत तणावाचा व संघर्षाचा भडका उडालेला आहे, तेथे शांतीचे साम्राज्य प्रस्थापित व्हावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. विविध कारणांमुळे
जे बेरोजगार आहेत अशा गरजवंतांना चांगला रोजगार
मिळावा व त्यांच्या रोजच्या गरजांची पूर्तता व्हावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment