Wednesday, 25 February 2015




उपवास काळातील दुसरा रविवार

दिनांक: ०१/०३/२०१५
पहिले वाचन: उत्पत्ती २२:१-२,९-१३,१५-१८
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३१-३५
शुभवर्तमान: मार्क ९: २-१०


प्रस्तावना:

आज आपण प्रायश्चित काळातील दुसऱ्या आठवडयात पदार्पण करत आहोत. आजची उपासना आपल्याला आपला देवावरील असलेला विश्वास दृढ करावयास पाचारीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, देव अब्राहमला आपल्या एकुलत्या एक पुत्राचा बळी देवास अर्पण करण्यास आज्ञा करतो. ही त्याची परमेश्वरावर असलेल्या श्रद्धेची कसोटी होती. दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस पत्रात लिहितो कि, परमेश्वराने आपल्या स्वतःच्या एकुलत्या एका पुत्रास मानवकल्याणासाठी अर्पण केले. आणि तो त्याच्या पुत्राद्वारे आपणास सर्व काही देतो. तर शुभवर्तमानात येशूचे त्याच्या तीन शिष्यांसमक्ष झालेल्या रूपांतराचे वर्णन ऐकावयास मिळते.
जीवनाचे सर्व मार्ग ख्रिस्तामध्ये व ख्रिस्तापासून आहेत. ख्रिस्ताची सेवाकार्य करण्यासाठी आपल्याला गरज असलेली प्रेरणा, धैर्य व कृपा सदा मिळत राहावी व आपण आपल्या विश्वासात अधिक दृढ व्हावे म्हणून या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: उत्पत्ती २२:१-२,९अ,१०-१३,१५-१८

उत्पत्ती पुस्तकातील ही एक अतिशय नाट्यमय घटना आहे. ईश्वरपरीज्ञानाच्या दृष्टीनेही ही घटना महत्वाची आहे. इसाहाकाचे यज्ञार्पण करण्याच्या आज्ञेप्रमाणे अब्राहमने आपल्या मुलाला यज्ञार्पणाच्या जागी जड अंत:करणाने वर नेले. यातील कारुण्य, इसाहाकला यज्ञ पशुसारखे बांधून वेदीवर ठेवताना अब्राहमची झालेली अवस्था, त्याच्या अंत:कानाला होणाऱ्या वेदना आणि अगदी निर्वांणीच्या क्षणी स्वर्गातून हस्तक्षेप होऊन आनंदी आनंद यामुळे या वृतांताला उत्तमपणे सांगितलेली कथा म्हणून मानाचे स्थान मिळाले आहे. पण यापेक्षा महत्वाचे म्हणजे ही अब्राहमच्या विश्वासाची अखेरची सत्वपरीक्षा होती.
अब्राहमच्या दृष्टीने ही वास्तविक देवाची आज्ञा होती आणि ती पाळायची होती. भावनात्मक दृष्टीने आणि ईश्वर विज्ञानाच्या दृष्टीनेही ती अतिशय धक्कादायक आज्ञा होती, कारण आशीर्वादाची सर्व अभिवचने पूर्ण होणे इसाहाकावर अवलंबून होते. एकीकडे अपत्यप्रेम आणि दुसरीकडे देवाचे आज्ञापालन अशा कात्रीत सापडलेल्या अब्राहमला काही सुचेना. काहीही केले तरी दु:ख ठरलेले. पण टप्प्या-टप्प्याने विश्वास व आशा यांचा विजय झाला, भय आणि संशयाचे सावट दूर झाले. अखेर त्याने मुलाचा वध करण्यासाठी सुरा उगारून आपण दुसरा कोणताही विचार, भावनिक बंधन, ध्येय वैगेरे बाजूस करून देवाच्या आज्ञेलाच सर्वस्वी महत्वाची मानतो हे दाखवून दिले आणि त्याचक्षणी त्याची ही कसोटी संपली.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३१ब-३४

     देव आमच्या बरोबर आहे, आम्हाला अनुकूल आहे याचे स्मरण पौलाने पुन्हा एकदा करून दिले आहे. देवाने आपल्यासाठी त्याचा पुत्र दिला आणि त्याद्वारे या जीवनातून पार होण्यासाठी आणि अंतिम तारण प्राप्त होण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व आम्हाला उपलब्ध करून दिले. आपल्यावर यथार्थपणे आरोप ठेऊन न्यायासमयी दोषी ठरवण्याचा घाट घालणे कोणालाही शक्य नाही कारण देवानेच आपल्याला निवडले आहे, त्यानेच आपल्याला नीतिमान ठरवले आहे.

शुभवर्तमान: मार्क ९: २-१०

     पेत्र, याकोब व योहान ह्यांना येशूने आपण कसे होतो व पुढे गौरवामध्ये कसे होणार हे प्रत्यक्ष दाखवले. चकचकीत व पांढरीशुभ्र वस्त्रे हे शब्द पवित्र शास्त्रात दिव्यदूत आणि स्वर्गीय व्यक्ती ह्यांच्या संबंधात आढळतात. एलिया आणि मोशे हे दोघेही स्पष्टपणे जुन्या करारातील देवाच्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात. मोशे इस्त्रायलला नियमशास्त्र देणारा तसेच संदेष्टाही होता. एलिया मसिहाचा, ख्रिस्ताच्या अग्रदूत असणे अपेक्षित होते. एखादा मानव म्हणेल अश्याचप्रकारे पेत्रही त्या वैभव पाहून अचंबित झाला व काहीतरीच बडबडला. त्याच्या या निरर्थक भाषेमध्ये काही सखोल ईश्वर परीज्ञानाचा ठाव पाहण्याचा खटाटोप आपण करू नये. येशू कोण आहे ते त्याला पूर्वीच उमगले होते तरी अद्याप तो त्याला ‘राब्बी’, ‘गुरु’ अगर ‘शिक्षक’ असाच होता. देवाने निवासमंडपामध्ये आपले गौरव दाखवले त्यापूर्वी तो सिनाय पर्वतावर कसा उतरून आला हे बहुदा पेत्राला आठवले असे त्याच्या मंडप शब्दावरून वाटते.
     पण या शास्त्रपाठात पेत्राचे नव्हे तर देवाचे शब्द केंद्रस्थानी आहेत. पुन्हा एकदा यार्देन नदीतील बाप्तिस्माच्यावेळी झाले त्याप्रमाणे देवाने आपल्या प्रिय पुत्राची साक्ष दिली आणि सर्वांना त्याचे ऐकण्यास सांगितले. सीनाय पर्वताप्रमाणे येथेही मेघ हे देवाच्या समक्षतेचे चिन्ह आहे. अचानक मोशे आणि एलिया अदृश्य झाले, एकटा येशूच तीन शिष्यांबरोबर तेथे उरला. येशू मेलेल्यातून पुन्हा परत उठेपर्यंत जे पाहिले ते कोणालाही सांगू नका असे त्यांना निक्षुन सांगितले होते.
           
बोधकथा:

एकदा एका पतीला आपल्या पत्नीला व्यवस्तीत आवाज येतो का हे पहायचे होते. तो आपल्या पत्नीपासून काही अंतरावर उभा राहिला व म्हणाला, “प्रिये, मी काय म्हणतो ते तू ऐकतेस का?” पत्नीकडून काहीही प्रतिक्रिया आली नसल्यामुळे तो थोडा अजून पुढे जातो व परत एकदा तोच प्रश्न विचारतो परंतु पत्नी काहीही बोलत नाही. शेवटी तो त्याच्या पत्नीच्या एकदम मागे उभा राहतो व म्हणतो, “प्रिये,माझं ऐकतेस का?” यावर पत्नी म्हणते, “अरे... तीन वेळा तोच प्रश्न?? मी ऐकत आहे.”- खूपवेळा आपला देवाबारोबारचा संवाद असाच असतो. आपण पडताळत असतो की देव आपली प्रार्थना ऐकत आहे की नाही. तो आपलं ऐकत असतो परंतु देव जे काही म्हणत आहे ते आपण ऐकण्यास सज्ज असले पाहिजे. प्रायश्चित काळ हा आपणासाठी देव आपल्यास काय सांगत आहे हे ऐकण्याची वेळ आहे.

मनन चिंतन:

     येशू पेत्र, याकोब आणि योहान ह्या आपल्या तीन शिष्यांना घेऊन एका ऊंच डोंगरावर गेला आणि तेथे त्यांच्यादेखत येशूचे रुपांतर झाले. आपल्या शिष्यांना येशूने त्याचे दैवत्व पाहण्याची संधी दिली. त्यांचा हा अनुभव त्यांनी लोकांमध्ये अनुभवलेल्या अनुभवापेक्षा आगळावेगळा होता. येशू ख्रिस्ताला एलिया आणि मोशेबरोबर बघून येशूचे शिष्य हर्षभरित झाले होते. त्यांनी तेथे मेघवणी सुद्धा ऐकली; “हा माझा ‘प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका’”. ह्या रहस्यपूर्ण अनुभवाने परिपूर्ण होऊन पेत्र येशूला त्या डोंगरावर राहण्याचे सुचवितो; “गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे; तर आम्ही तीन मंडप उभारू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक” (मार्क ९:५).
     परुशी लोक येशूची निंदा-नालस्ती आणि टीका करत आहे हे पेत्राने पहिले होते म्हणून पेत्र येशू ख्रिस्ताला ह्याच डोंगरावरच राहायला हवे असे सुचवित होता. रोजच्या सवयीच्या जीवनातून आणि अशा ह्या लोकसमुदायापासून लांब राहिलेले बरे असे पेत्राला वाटत होते. लोक जे नेहमी इच्छितात तेच इथे पेत्र फक्त व्यक्त करत होता. समाजातील कठीण वास्तविकततेला तोंड देणे हे एक आव्हान आहे. रोजच्या सवयीचे परिशिष्ट जीवन हे लोकांना ताण देण्यासारखे किंवा भार लादण्यासारखे आहे. डोंगर, अरण्य आणि नदीकाठील आश्रमातील शांतमय वातावरण हे कार्यव्यग्र झालेल्या लोकांना विश्रांती घेण्यास मोहित करतात. या अर्थाने आश्रमे आणि प्रार्थनास्थळे एका दृष्टीने श्रीमंतीचे प्रतिके बनतात.
ख्रिस्ताने पळकुटा मार्ग अवलंबला नाही तर लोकांमध्ये प्रत्यक्षात जाऊन त्यांच्या जीवनाचा कायापालट केला. शिष्यांनी इतरांच्या दु:खात आणि जीवन संघर्षात सहभागी होऊन त्याच्यातच देवाला ओळखावे अशी अपेक्षा ख्रिस्त आपल्या शिष्यांकडून करतो. ह्या लोकांमध्येच ख्रिस्ताचे शिष्य देवाशी सख्य साधू शकतात.
येशूच्या तिन्ही शिष्यांनी ख्रिस्ताच्या देवत्वाचा डोंगरावरील अनुभव जरी जवळून अनुभवला असला आणि जरी त्यांना ख्रिस्ताची ओळख इतर अनुभवांमध्ये झाली असली तरी ते ख्रिस्ताचा अनुभव पुठे चालू ठेऊ शकले नाहीत. त्यामुळेच येशूचे शिष्य येशूच्या अटकेवेळी येशूबरोबर राहण्यास अपयशी ठरले. यहुदी लोक मारतील या भीतीने ते येशूला ऐकटे सोडून पळून गेले. डोंगरावरील अनुभवात त्यांनी जी वचनबद्दता आणि उत्सुकता दाखवली होती ती ते कालवरी टेकडीवर आले असता विसरून गेले.
     आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा अशा घटना घडत असतात. आपण देवाच्या सहवासात असल्याचे खूप असे अनुभव आपणास अनुभवयास मिळतात. मोजता येणार नाहीत इतक्या वेळेस देवाने आपणास आशीर्वादित केलेले आहे. पेत्र आणि इतर शिष्याप्रमाणे आपणदेखील ख्रिस्ताला विविध प्रसंगी जवळून अनुभवलेले आहे. म्हणून आपण म्हणतो, “आपण येथे आहोत हे चांगले आहे.” आपण तपाद्वारे(retreat) जीवनाचे नूतनीकरणाचे पुष्कळ निश्चय करतो परंतु जेव्हा आपण अडचणींना, समस्यांना आणि वेदनांना सामोरे जातो, तेव्हा त्यांना सामोरे जाण्यास लागणारी इच्छाशक्ती आपल्यात नसते. अशाप्रकारे अडचणीच्या वेळी शिष्यत्वाची परीक्षा घेतली जाते.
येशू आपल्या शिष्यांस देवानुभव घेण्यासाठी पुष्कळ अश्या संध्या देत असतो. हाच देवानुभव आपल्या जीवनात आत्मसात करून येशू ख्रिस्त त्यांना जगात दैनंदिन समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे व इतरांसाठी आदर्श बनण्याची अपेक्षा करतो. आपल्या प्रार्थना आणि देवावरील मनन चिंतन आपाल्याला इतरांच्या जीवनात समरस होण्यास भाग पाडले पाहिजे. प्रार्थनास्थळे ही सामाजिक-बदलीकरणाची माध्यमे बनवीत. ह्या माध्यमांद्वारे समाजातील दृष्ट रुढी नष्ट करुन सामाजिक बदल घडवून आणावा.
   
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक.

  1. हे सर्वसमर्थ पित्या पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व धर्मभागिनी ह्यांना तुझा आशीर्वाद मिळावा तसेच सर्व धार्मिक कामांमध्ये त्यांना सहाय्य लाभावे म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थना करतो.
  2. हे सर्वांच्या रक्षणकर्त्या प्रभो, जे ख्रिस्ती बांधव तुझ्या नावाखातर मरणोत्तर यातना सोसत आहेत, अश्यांना त्यांचे दु:ख सोसण्यास सहनशक्ती दे, त्याचप्रमाणे अश्या कठीण प्रसंगी आम्ही सर्व ख्रिस्ती बंधु-भगिनींनी एक निष्ठेने व प्रेम भावनेने एकत्र यावे व देवाच्या ऐक्याचे प्रतिक बनावे, म्हणून आम्ही तुला विनवितो तुजकडे प्रार्थितो.
  3.  दयाळू प्रभो आजच्या ‘प्रभूरुपांतर’ सणाच्या दिवशी आमच्या हृदयाचे व मनाचे परिवर्तन कर जेणेकरुन ह्या तुझ्या दिव्य पुत्राचे तेजस्वी रूप आमच्या हृदयावर ठसावे व तुझ्या कार्यासाठी आम्ही सदैव झटावे, म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थितो.
  4. सर्वांच्या निर्माणकर्त्या व जीवन देणाऱ्या देवा, जे भुकेले, दुष्काळग्रस्त आहेत अश्यांना तू तुझ्या दानशूर व्यक्तींद्वारे तृप्त कर, व त्यांना तुझ्या प्रेमाचा व करुणेचा अनुभव

5. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.








                                     

No comments:

Post a Comment