Wednesday, 11 February 2015



Reflections By: Chris Bandya






सामान्य काळातील सहावा रविवार



पहिले वाचन: लेवीय  १३: १-२, ४५-४६
दुसरे वाचन: १ करिंथ  १०:३१ – ११:१.
शुभवर्तमान: मार्क  १: ४० – ४५.



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला आपला विश्वास अधिक दृढ करण्यास बोलावीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात महारोग्याला दिलेल्या वागणुकीविषयी आपण ऐकतो. तर दुसऱ्या वाचनात ‘जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.’ ह्या शब्दाद्वारे संत पौल करिंथकरांस ख्रिस्ताचे अनुयायी होण्यास पाचारण करतो. शुभवर्तमानात आपण ख्रिस्ताच्या कार्याबाबत वाचतो. येशूने कसलीही पर्वा न करता कुष्ठरोग्याला स्पर्श करून रोगमुक्त केले तर कुष्ठरोग्यानीसुद्धा आपली ख्रिस्तावर असणारी श्रद्धा व्यक्त केली.
     आज ह्या ख्रिस्तयागात सहभागी होत असताना, आपण सुद्धा प्रभू परमेश्वरावर असलेली आपली श्रद्धा व्यक्त करूया व आपल्याला आध्यात्मिक कृष्टरोगापासून मुक्त करण्यास विनंती करूया.

सम्यक विवरण:                                      
पहिले वाचन : लेवीय १३:१-२, ४५-४६.

महारोगसंबधी नियम परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांस सांगितले : सूज, खवंद, अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगांचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक पुत्रापैकी एकाकडे न्यावे(लेवीय १३:१२). जुन्या करारातील कुष्ठ रोग अती भयानक रोग म्हणून प्रसिद्ध होता. ज्या लोकांना कातडीचे रोग होत, त्यांना छावणीच्या बाहेर वस्ती करावी लागत असे तसेच फाटके कपडे परिधान करावी लागत असे. त्याच बरोबर त्यांना तोंड झाकून ठेवावे लागत असे. हे सर्व याजकाने त्या व्यक्तीस अशुद्ध ठरवल्यावर इब्री लोकांच्या परंपरेप्रमाणे केले जात असे.
     हा कातडीचा रोग किंवा कृष्टरोग पसरू नये, म्हणून रोगग्रस्त व्यक्तीला एकांतात राहावे लागत असे. हे सर्व नियम सर्व लोकांना, पशु, प्राणी, तसेच परमेश्वराच्या याजाकांसाठी सुद्धा होते. परमेश्वर, अहरोनला सांगतो, पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग निघाले, तर त्याने आपल्या देवाप्रित्यर्थ अन्न अर्पिण्यासाठी जवळ येऊ नये(लेवीय २१:१७-२३). जुन्या करारात ह्याचा अर्थ असा की आपल्या संपूर्ण शरीराने आपण आपली पवित्रता परमेश्वरावर दाखवतो. हाच दृष्टांत संत पौलाच्या शब्दांसाठी पाया ठरला, ‘तुमचे शरीर हे पवित्र आत्म्याचे घर आहे म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करायला हवा’.(१ करिंथ १०:३१-११:१)

दुसरे वाचन: १ करिंथ १०:३१-११:१.

संत पौल ख्रिस्त-जीवनाविषयी नियम करिंथकरांस समजावून सांगत आहे. म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. हेल्लेणी यहुदी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळविणारे होऊ नका....(१०:३१-३३). आपण आपल्या कार्याद्वारे प्रभूचा गौरव तसेच आपल्या शेजाऱ्यांचा गौरव केला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या कार्याने दुसऱ्यांना त्रास होता कामा नये म्हणजेच संत पौलाने ११:१ मध्ये म्हटल्याप्रमाणे “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्ही माझं अनुकरण करा.” फक्त प्रबोधन केले नाही तर त्याच्या राहणीमानाद्वारे तसेच त्याच्या दैनंदिन जीवनाद्वारे पौलाने येशूचे अनुकरण खऱ्या अर्थाने केले व सर्वांसमोर उदाहरण ठेवले.

शुभवर्तमान : मार्क: १: ४०-४५.

            जेंव्हा आपण जुन्या करारात लेवीय ह्या पुस्तकात कुष्ठरोगाविषयी वाचतो, तेंव्हा आपणांस कळते कि ‘कुष्ठरोग’ पापांचे चिन्ह म्हणून गणले जात होते. पापाप्रमाणे कुष्ठरोग कातडीतून खोल गेल्यावर(लेवीय:१३:३) तो पसरतो (लेवीय: १३: ५-८) तो त्या मनुष्याचा नाश करतो व त्याला एकटे रहावे लागते (लेवीय: १३:४४-४६). आणि मग त्याची कातडी अशुध्द होते.
      येशूला त्या माणसाचा कळवळा आला ( जसे: मार्क: ६:३४; ८:२; ९:२२) आणि येशूने त्याला रोगमुक्त केले. स्वत:च्या शब्दाने आणि स्पर्शाने येशूने त्याला बरे केले. जणुकाही जीवनातील आपल्याला मिळालेला पहिलाच प्रेमळ स्पर्श त्या रोग्याला जाणवला व तो रोगमुक्त झाला. येशूने त्याला कोणालाही न सांगावे म्हणून आज्ञा केली. त्याने फक्त याजकाकडे जाऊन पुढील तपासणी करावी.(लेवीय: १४) जेणेकरून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे आणि त्याला परत समाजात स्वीकारावे; परंतु त्या माणसाने आज्ञाभंग केला व ह्या गोष्टीची व झालेल्या चमत्काराची घटना सर्वांना सांगितली. येशू आपल्याला आज्ञा करतो की तुम्ही घोषणा करा, परंतु आपण त्याचे उल्लंघन करीत असतो.

मार्क : १: ४०.
    बायबलमध्ये कुष्ठरोग हा फक्त एकच प्रकारचा रोग नसून अनेक कातडीला झालेले रोग सुद्धा कुष्ठरोग म्हणून ओळखले जात होते. कुष्ठरोग बरा होण्याबाबत आपण बायबल मध्ये कधीच ऐकत नाही परंतु कुष्ठरोग साफ करण्याबाबत ऐकतो, कारण कुष्ठरोग हे पापांचे चिन्ह आहे आणि ते साफ करणे गरजेचे आहे. हा अध्याय आपणास सांगतो की, ख्रिस्त पापांची माफी करतो. पुढे ह्याच अध्यायात आपण पाहतो की, तो रोगी नियमांचे पालन न करता ख्रिस्ताजवळ येतो व ‘आपली इच्छा असली तर मला बरे करा’ असे सांगतो. संत मार्क त्या माणसाने केलेल्या प्रयत्नांची व त्याच्या धाडसीपणाचा उल्लेख ह्या ओवीत करतो.

मार्क: १:४१-४२.
त्याला त्याचा कळवला आला: ही बाब येशूने त्या कुष्ठरोग्याला स्पर्श करून व त्याचा कुष्ठरोग बरा करून व्यक्त केली. असे अगोदर कोणी केले नव्हते व ह्या गोष्टींमुळे लेवीय पुस्तकात सांगितल्याप्रमाणे येशु त्याच्या दृष्टीत अशुद्ध होतो. यहुदी अधिकाऱ्यांना येशूने केलेली कृती त्यांच्या समाजात मान्य नव्हती कारण ती यहुद्यांच्या परंपरेविरुद्ध होती.

मार्क: १: ४३
त्याने त्याला ताकीद दिले: येशूने त्या माणसाला ताकीद दिले की, कोणाला काही सांगू नको. कारण ख्रिस्त रोग्यांना बरे करण्यापेक्षा ह्या जगाच्या तारणासाठी आला होता. आणि जर त्या माणसाने हा चमत्कार लोकांच्या पुढे आणला तर त्याचे तारणाचे कार्य करण्यास त्याला अवघड जाईल.

मार्क: १:४४.
जाऊन याजकाला दाखव ज्या प्रमाणे लेवीय:१४ मध्ये याजक तपासणी करून व्यक्ती शुद्ध किंवा अशुद्ध आहे, म्हणून ठरवत असे व ह्या सर्व नियमांचे पालन म्हणून ख्रिस्ताने सुद्धा त्या माणसाला बरे केल्यानंतर जाऊन स्वतः याजकाला दाखव असे सांगितले. येशूने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे यहुदी अधिकाऱ्यांना सुद्धा त्याच्या विरुद्ध काही बोलता आले नाही.

मार्क: १: ४५.
    येशूच्या आज्ञेचा भंग करून त्या माणसाने आनंदाच्या भरात लोकांना केलेल्या चमत्काराबद्दल माहिती दिली. त्यांच्या ह्या माहितीमुळे ख्रिस्ताला परमेश्वराच्या शब्दाचा प्रसार करायला अडथळा आला कारण सर्व लोक त्याच्याकडे चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी धावत आले होते. ख्रिस्ताचा मुख्य हेतू पित्याच्या प्रेमाचा प्रसार करणे व सर्व लोकांना पित्याचा शुभसंदेश देणे व तारणकार्य करण्याचे होते.

बोधकथा:

    पावसाळी दिवस होते आणि रस्त्यावर दोन मित्र चालत होते. एका बरोबर त्याचा पाच वर्षाचा मुलगा सुद्धा होता. चालत असताना लहान मुलाचे लक्ष रस्त्यावरील खड्डयाकडे जाते व पाण्यात खेळायची आवड असल्यामुळे आपल्या वडिलांचा हात सोडून तो मुलगा त्या खड्ड्याकडे धावला आणि त्या खड्डयाजवळ पोहचणार तेवढ्यात त्याचा पाय अडकून तो त्या खड्ड्यात पडला. त्याच्या वडिलांना आपल्या मुलाचा राग आला कारण त्याने न विचारता पाण्याकडे गेला. आता त्या घाणेरड्या पाण्यामुळे त्याचे कपडे व अंग चिखलाने माखले होते. हे दृश्य पाहून बाजूने जाणारे सर्व लोक त्या लहान बालकावर हसत होते परंतु वडिलांनी कुठलाही विचार न करता जाऊन  त्या चिखलात माखलेल्या आपल्या मुलाला वेंगेत घेतले.
     आजच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा येशु ख्रिस्त यहुदी लोकांच्या मनातल्या विचारांचे भय न बाळगता त्या कुष्ठरोग्याला बरे करतो.

 मनन चिंतन:

    आजच्या शुभवर्तमानात रोग्यांना बरे करणे व देवावरील विश्वास प्रगट करणे ह्या दोन (मिनिस्ट्री) कार्याबद्दल आपण ऐकतो. ख्रिस्त, सुवार्तेचा प्रसार करून दैनंदिन जीवनात त्याच्या पित्याचे कार्य चालू ठेवतो. सर्वात महत्वाचे म्हणजे कुष्ठरोग्याची धाडसी वृत्ती ही एक विचार करण्यासारखी बाब आहे; कारण  शास्राप्रमाणे जो मनुष्य अशुद्ध आहे, त्याने दुसऱ्या लोकांसमोर येऊ नये, त्याने त्याची वस्ती गावाबाहेर करावी असे होते. ह्या अवस्थेत असताना देखील तो कुष्ठरोगी कोणालाही घाबरला नाही, त्याने यहुदी अधिकाऱ्याला न जुमानता किंवा यहुद्यांची पर्वा न करता, स्वत: पुढे येऊन ख्रिस्ताला विंनती केली. त्याच क्षणी स्वत:चा देवावर विश्वास सुद्धा त्याने प्रगट केला. “आपली इच्छा असली तर मला सुद्धा करावयास आपण समर्थ आहात”. (मार्क: १:४०)
    ख्रिस्त त्याच्या विनंतीचा मान ठेऊन त्या कुष्ठरोग्याला रोगमुक्त करतो. तो रोगी मनुष्य रोगामुळे निराश झाला नाही किंवा खचला गेला नाही. ख्रिस्ताजवळ येऊन आपल्या कृतीद्वारे देवावर व ख्रिस्तावर असलेला दृढ विश्वास त्याने सर्वांसमोर व्यक्त केला. त्याच्या या विनंतीचे उत्तर म्हणून ख्रिस्त त्यास बरे करतो. जो कोणी त्याच्या संबंधात येतो किंवा ज्यांना त्याचा स्पर्श होतो ते धर्मदृष्ट्या कलंकित ठरवले जात होते; म्हणून समाज त्यांच्यापासून दूर राहायचा व त्यांना एकाकी जीवन गावाच्या बाहेर जगावे लागत असे. येशूने धैर्य दाखवून त्या कुष्ठरोग्याला बरे केले. अर्थात यहुदी धर्मनियमांप्रमाणे तोही अशुद्ध गणला जातो. पित्याचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी त्याने माघार घेतली नाही. तर परमेश्वराच्या कार्याचा प्रसार जोमाने केला.
    आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडथळे येतात. आपण सुद्धा मदतीचा हात पुढे करतो व मदत केलेल्या व्यक्तीच्या वाईट वागणुकीमुळे आपल्यालासुद्धा समाजातून बाहेर काढले जाते. कधी कधी कोणीही आपल्या बरोबर बोलायला तयार नसतात. देवाच्या कार्यात किंवा चांगल्या कार्यात नेहमी अडथळे येत असतात परंतु आपण खचून न जाता ख्रिस्ताचे कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे.
    जेंव्हा आपली स्वत:ची मुले मातीत खेळून येतात तेव्हा आई त्यांना घराबाहेर फेकत नाही तर मायेने स्पर्श करून आपल्या वेंगेत घेते. आपल्या प्रेमाचा व मायेचा अनुभव शुभवर्तमानातील मनुष्याला सुद्धा झाला. आपणा सर्वांस प्रभूचे पाचारण जगात रोगमुक्त करायला, देवावरील विश्वास प्रगट करायला या पृथ्वीवर पाठवले आहे. येशूने अनेक रोग्यांना बरे केले. त्याने त्याच्या शिष्यांना हे कार्य पुढे चालू ठेवण्यास आवाहन दिले. आज हे कार्य आपल्या सर्वासमोर आहे. तसेच ज्याप्रमाणे त्या रोगमुक्त माणसाने देवाचा व परमपित्याचा गौरव केला त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात, प्रत्येक क्षणी प्रत्येक घटकेस प्रभूचा गौरव व चांगल्या आरोग्याबद्दल आभार मानले पाहिजे. जगात अनेक लोक अजून रोगाने ग्रासलेले आहेत. म्हणूनच मिळालेल्या चांगल्या आरोग्याबद्द्ल आपण सर्वांनी प्रभूचा गौरव करायला पाहिजे. कुष्ठरोगी मोठ्या आवाजात देवाचा गौरव गात गेला त्याप्रमाणे आपण सुद्धा प्रभूकार्याचा प्रसार म्हणून प्रभूशब्द सर्वत्र पसरविण्यास मदत केली पाहिजे.
     आजच्या युगात कुष्ठरोग काही भयानक राहिला नाही कारण यंत्राद्वारे आता सर्व रोगांवर त्वरित उपचार केला जाऊ शकतो. अनेक लोक मानसिक कुष्ठरोगाने ग्रासलेले आहेत व हा रोग शारिरीक रोगाहून अधिक किती तरी पटीने जीवघेणा आहे. आपल्याला दररोजच्या जीवनातील वाटेवर आपण अनेक व्यक्तींना भेटतो, अनेकांबद्दल आपल्या मनात आदर व सन्मान असतो; तर काही गैरसमजुतीमुळे दुसऱ्यांबद्दल मनात वाईट विचार असतात. हा रोग शारिरीक नसून मानसिक असतो. जेंव्हा आपण आपल्या शत्रुंना माफ करतो व त्याच्या विषयी आदर ठेवतो तेंव्हा तो रोग आपल्या मनातून नष्ट होत असतो; व ह्यासाठी आपल्याला लागणारी कृपा चांगल्या कामातून मिळते. दरदिवशी केलेल्या शास्र वाचनातून आपल्याला ह्या रोगातून मुक्त होण्याचे मार्ग सापडतात.
    १२ व्या शतकात असिसिकर संत फ्रान्सीस ह्यांना त्याच्या परिवर्तनाअगोदर एक श्रीमंत पित्याचा एकुलता एक पुत्र असल्यामुळे त्याला त्याच्या बालपणी सर्वकाही सहज मिळाले. त्याला कधीच गरीब लोकांबद्दल विचार किंवा त्याच्याबरोबर त्यांनी कधीच संवाद सुद्धा केला नव्हता. जेव्हा त्याचे मनपरिवर्तन होऊ लागले तेव्हा एके दिवशी घोड्यावरून स्वार होऊन तो एका कुष्ठरोग्यासमोर आला, त्याला कुष्ठरोगी त्याच्या घोड्यासमोर उभा राहिलेला दिसला आणि ज्याप्रमाणे ख्रिस्ताने कुष्ठरोग्याला स्पर्श करून बरे केले व समाजात त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली त्याचप्रमाणे  संत फ्रान्सीसने देखील आपल्या घोड्यावरून खाली उतरून त्या कुष्ठरोग्याचे चुंबन घेतले व त्या कुष्ठरोग्यासाठी त्याने आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. ह्याच संताचा आदर्श घेऊन आपल्या पोप महाशयांनी ‘फ्रान्सीस’ हे नाव स्विकारून त्याच १२ व्या शतकातील फ्रान्सीससारखे गरीबीचे जीवन जगून संपूर्ण मानवजातीपुढे एक महान उदाहरण ठेवले आहे. आज ख्रिस्तसभेला अनेक असिसिकर संत फ्रान्सीससारख्या व्यक्तींची गरज आहे. देऊळमाता आज आपल्या सर्वांना ख्रिस्तासारखे तसेच संत फ्रान्सीससारखे होण्यास निमंत्रण देत आहे. असे अनेक संत किंवा महान व्यक्ती होऊन गेले आहेत, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रोग्यांसाठी समर्पित केले आहे व अजून करत आहेत. आज आपण सुद्धा त्यांच्या कार्यात त्यांना मदत करण्यास पुढाकार घेतला पाहिजे व आपल्या प्रार्थनेत त्यांना सदैव ठेवले पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

 प्रतिसाद: हे प्रभो आमची मने शुद्ध कर.

१.           आपले पोप महाशय फ्रान्सिस, महागुरुस्वामी, धर्मगुरू व सर्व व्रतस्थांनी सर्व लोकांना प्रभूजवळ येण्यास प्रोत्साहीत करावे व त्यांच्या दैनंदिन आचरणातून ख्रिस्ती राहणीमानाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.           जे लोक जीवघेण्या आजाराने ग्रासलेले आहेत, त्यांना प्रभूच्या प्रेमाचा व आरोग्याचा स्पर्श व्हावा. हे आजार त्यांना सहन करण्यास शक्ती व सामर्थ्य लाभावे व परत एकदा त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.           जे लोक वृद्धावस्थेत तसेच जे आपले जीवन वृद्धाश्रमात घालवत आहेत, त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमाची व त्यांच्या कुटुंबाची सतत साथ मिळावी, त्यांच्या एकटेपणाच्या जीवनात सदैव आनंद, शांती मिळावी व जीवन नव्या जोमाने जगण्यास त्यांना धैर्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.           हे शांतीदात्या आज तुजकडे आम्ही आमचे बांधव, जे दिल्लीत झालेल्या चर्च हल्यात जखमी व ज्यांना मारहाण झाली आहे त्यांना तुझ्या प्रेमळ हातात सोपवतो. त्यांच्या बरोबर तू राहा त्याचप्रमाणे जे कोणी ह्या हल्ल्यास जबाबदार आहेत त्यांना तू स्पर्श करून त्यांचे मनपरिवर्तन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.           थोडा वेळ शांत राहून  आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामजिक, हेतूंसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment