Reflections for the homily by: Amol Gonsalves.
सामान्य काळातील पाचवा
रविवार
दिनांक: ०८/०२/२०१५
पहिले वाचन: ईयोब ७: १-४, ६-७
दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र ०९: १६-१९, २२-२३
शुभवर्तमान: मार्क १: २९-३९
पवित्र बालकांचा रविवार
प्रस्तावना:
आजची पवित्र उपासना आपल्याला सहानबुद्धी, परोपकारी,
सुवार्तेचा प्रसार माझे आद्य कर्तव्य व मानवी जीवनातील दु:खाकडे माझा सकारात्मक
दृष्टीकोन ह्या महत्त्वपूर्ण पैलुंवर मनन-चिंतन करण्यास निमंत्रित करत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण मानवी जीवन हे कष्टाळू आणि सुख-दुःखांच्या
मिश्रनांनी सजवलेले एक रहस्य आहे ह्याविषयी ऐकतो. आजच्या दुसऱ्या वाचनाद्वारे संत
पौल आपणास ख्रिस्ती सुवार्तेचा प्रचार करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे ह्याची
जाणीव करून देतो, तर मार्कलिखित शुभवर्तमानात, आपण येशू ख्रिस्ताने पेत्राची सासू व इतर रोगी
ह्यांना कसे बरे केले ह्याविषयीचा वृत्तांत ऐकतो.
ख्रिस्तसभा आज “पवित्र बालकांचा रविवार” साजरा करीत आहे.
ह्यास्तव; आज आपण सर्व बालकांसाठी विशेष प्रार्थना करुया जेणेकरून ख्रिस्ताच्या
प्रेमाचा व मायेचा सहवास सदोदित त्यांच्या जीवनात राहावा व बालपणाचा गोडवा त्यांनी
आपल्या कुटुंबाद्वारे अनुभवावा म्हणून आपण ह्या मिस्सा बलिदानात विशेष प्रार्थना
करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: ईयोब ७: १-४, ६-७
“दु:ख भोगाची समस्या” हा ईयोबाचा मुख्य विषय आहे. मानवी दुःखांचा
उगम कोठे आहे व कोठे नाही? दुःख भोगण्याची नेमकी समस्या काय आहे? त्यांचे कारण
काय? हे सर्व प्रश्न ईयोबाच्या पुस्तकात हाताळलेले आहेत. तसे पहिले तर, दुःखांचे
हे रहस्य अखेरपर्यंत ईयोबाच्या उघडकीस आलेले नाही. दु:ख भोगासंबधी आणखी एक समस्या म्हणजे, ‘निर्दोष
लोकांना दुःख का भोगावे लागते?’ प्रामाणिक व सत्याने जगल्यावरही दुःखांचे डोंगर का
कोसळतात? ह्याविषयांचे अनेक प्रश्न ह्या पुस्तकात नमूद केलेले आहेत.
ईयोबाच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या वाचनात, ‘ईयोब
परमेश्वराशी वाद घालतो’ ह्याविषयीचा वृत्तांत वाचतो. इयोबच्या पुस्तकातील अध्याय
६:१ ते ७:२१ हा भाग ईयोबाच्या दुसऱ्या भाषणाविषयी बोलत आहे. आजचे वाचन हे ह्या
दुसऱ्या भाषणातील तिसरा भाग आहे (७:१-२१).
संकटांमुळे आणि दुःखांमुळे देवापासून दुरावलेला ईयोब इथे
अचानक देवाकडे वळतो व तो देवाकडे स्वतःसाठी काही न मागता, सरळहस्ते देवाशी वाद
घालून म्हणतो, “तू माझे नाव सोडून दे, म्हणजे आयुष्याचे उरलेले दिवस तरी मला वेदना
भोगाव्या लागणार नाहीत”(ईयोब ७:१-२१). ह्याच उताऱ्यातील, अध्याय ७:१-१० मध्ये
‘निराशा’ सर्वसामान्यपणे मानवी अस्तित्त्वाचा एक अंश असल्याचे नमूद करते. ‘कष्ट’ व
‘खडतर परिश्रम’ ह्या मानवी जीवनाचा वाटा आहे. ईयोबाच्या उदासी मनातून क्रोधाच्या
ठिंणग्या बाहेर पडत नाहीत; तर जीवनात काबाडकष्ट करुनही सारे विफल होते ह्यावर तो
विलाप करतो. केवळ एक श्वास, हेच जीवनाला मिळालेले एक वरदान आहे. त्याच्या
जगण्या-मरण्यात, फक्त एका श्वासाचे अंतर दडले आहे.
जरी हे जीवन क्षणभंगुर असले, तरी त्याला ह्या जीवनात किती यातना
सहन कराव्या लागतात हे येथे दिसून येते. दिवसभर उन्हा-तान्हात काबाडकष्ट करणारा
दास संध्याकाळी जसा विश्रांतीची आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे ईयोबदेखील आपल्या
मरणाची वाट पाहत होता.
ईयोबासारखी परिस्थिती असणारे अनेक लोक आज आपल्या नजरेस
पडतात. अथांग क्लेश, दुःखे व संकटे ह्यांना सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी, ईयोब हा एक
धीराचे व सहनशीलतेचे प्रतिक मानले जाईल. ह्यास्तव, न्यायी व नीतिमान देव काळाच्या
पूर्ततेस जगाचा न्यायनिवाडा करील व न्यायी व नीतिमान जणांस तो अनंत काळाचे जीवन,
संपत्ती व आरोग्य बहाल करील ह्यावर विश्वास ठेवणे हीच खरी धार्मिक वृत्ती मानली
जाईल.
दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र ०९: १६-१९, २२-२३
करिंथकरास पहिले पत्र हा नव्याकरारातील सर्वात दीर्घ पाळकीय
लेख मानला जातो. या पत्रातून ख्रिस्ती मंडळीने आपल्या समोर असलेल्या
गुंतागुंतीच्या पाळकीय प्रश्नांविषयी पौलाकडे मार्गदर्शन मागितले आहे, ह्याविषयीची
जाण होते. पाळकीय सेवेत येणाऱ्या कठीण समस्या कशा हाताळाव्यात त्याचे बहुमोलाचे
सूचक मार्गदर्शन येथे दिले आहे. उदा: विविध मूर्तींना अर्पिलेले अन्न, आध्यात्मिक
कृपादाने, येरुशलेम येथील यहुदी ख्रिस्ती लोकांसाठी वर्गणी गोळा करणे, आपुल्लोसाने
माघार घ्यावी ह्याविषयी विनंती, तसेच बहुविधजगामध्ये सुवार्तेसंबधीची कर्तव्ये(१करिंथ: ७:१-२५, ८:१; १२:१; १६:१,१२; ८:१-१३;
९:१-१४; १९:१५,२३) अश्या मुद्यावर विचार विनमय केला गेला आहे.
रूपरेषेनुसार ह्या पत्राची सात विभागात विभागणी करता येईल.
पहिला विभाग: मंडळीमधील सेवाकार्याकडे पाहण्याची ख्रिस्ती विचारदृष्टी.
दुसरा विभाग: महत्त्वाचे नैतिक प्रश्न.
तिसरा विभाग: वैवाहिक समस्या ह्या मुद्द्यावर जोर देते.
चौथा विभाग: बहुविध जगामध्ये सुवार्तेसंबंधीची आपली कर्तव्ये.
पाचवा विभाग: मंडळीतील शिस्तबध्द जीवन.
सहावा विभाग: ख्रिस्ती व्यक्तीच्या देहाचे पुनरुस्थान.
सातवा विभाग: इतर बाबी ह्याविषयी संबंध दर्शवित आहे.
आजचे दुसरे वाचन चौथ्या भागामध्ये मोडते. पौलाने विनामुल्य
केलेला सुवार्तेचा प्रचार ह्यागोष्टीची येथे आपणांस प्रचीती येते. आपण विनामूल्य
सुवार्ता सांगतो. त्यासाठी कोणत्याही वेतनांची अपेक्षा आपण धरत नाही व हा रास्त
अभिमान व्यर्थ होण्यापेक्षा आपण मरण पत्करावे असे पौल म्हणतो. ह्याच गोष्टी नीट
पटवून देण्यासाठी त्याने जबाबदारीचा उल्लेख येथे केला आहे. (२ करिंथ १५:४) जर हि
कामगिरी आपण पार पाडली नाही, तर आपली मोठी दुर्दशा होईल असेही तो सांगतो. स्वच्छेने
आपण सुवार्ता सांगण्याबद्दल पौलला कोणतेच प्रतिफळ मिळणार नव्हते. सुवार्ता
विनामूल्य सांगितली, म्हणून मिळणारे समाधान हेच त्याचे वेतन होते. या कृतीतूनच
त्याच्या संदेशाचे स्वरूप येथे स्पष्टपणे दिसुन येत होते. तो आपला हक्क बजावीत
नव्हता तर आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडत होता.
संस्कृतीच्या पलीकडे जाऊन सुवर्ताकार्य करणारा पौल उत्कृष्ट अतुल्य सुवार्तिक
म्हणून गणला गेला आहे. विविध प्रकारच्या
लोकांना सुवार्ता सांगताना त्या त्या विशिष्ट परिस्थितीची जुळवून घेण्याची त्यांची
संवेदनशील वृत्ती स्पष्टपणे येथे दिसून येते.
पौलाने आपले संपूर्ण आयुष्य सुवार्तेच्या प्रचारासाठी खर्ची
केले होते. सुवार्तेचा आशीर्वाद सर्वांना मिळावा ह्यांच हेतूने तो आपले कार्य करीत
असे. पौलाने आपल्याला घालून दिलेला हा कित्ता ख्रिस्ती विश्वासासाठी व स्वर्गीय
सुवार्तेच्या प्रचारासाठी एकाकी, महत्त्वाचा असा ठेवा आहे.
शुभवर्तमान: मार्क १: २९-३९
मार्कलिखीत शुभवर्तमानातून घेतलेल्या आजच्या शुभवर्तमानात
आपण, ख्रिस्ताने शिमोनाच्या (पेत्राच्या) सासूला बरे केल्याचे व गालीली प्रांतात शुभवर्तमानाच्या
प्रचारासाठी सुरु केलेल्या कार्याचा वृत्तांत वाचतो. आजच्या शुभवर्तमानातील
वृत्तांत दोन विभागात विभागला गेला आहे. ह्याच वृत्तांताचा उल्लेख मत्तयच्या
शुभवर्तमानात अध्याय ८:१४-१७; ४:२३-२५ व लूकच्या शुभवर्तमानात अध्याय ४:३८-४१;
४:४२-४४ ह्यामध्ये देखील केला गेला आहे. येशूचे चमत्कार त्याच्या प्रेषितीय कार्याचे
प्रतिक होते. ख्रिस्ताच्या चमत्काराद्वारे देवाच्या सामर्थ्याचे प्रकटीकरण झाले
आहे. येशुच्या दैवी स्वभावाचं त्यात दर्शन होते.
आपल्या स्वर्गीय पित्याचे कार्य पुढे नेण्यासाठी ख्रिस्ताने
अनेकांना पाचारण दिले. ह्या कार्याची सुरुवात ख्रिस्ताने शिमोन पेत्र, त्यांचा भाऊ
आंद्रेय, जब्दीचे मुलगे याकोब व योहान ह्या मासेकारांना निवडून केली. ‘या व मला
अनुसरा’ ह्या आज्ञेने, ख्रिस्ताने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले.
कफर्णहुमात आपल्या कार्याचा प्रारंभ करण्यासाठी गेले असताना, येशु ख्रिस्ताने
आपल्या दैवी सामर्थ्याने अनेकांना रोगमुक्त केले. जे रोगी त्याकाळी उपलब्ध
असलेल्या औषधाने बरे झाले नव्हते, त्यांना येशूने आपल्या दैवी वाणीने बरे केले.
तसेच, मानसिक आजाराने व अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या अनेकांना येशूने बरे केले
होते. उदा: भूत लागलेल्यास बरे केले (मार्क १:२३-२६); गदरेकरांच्या प्रदेशातील
भूतग्रस्त (मत्तय ८:२८-३४). इथे आपणांस कळून येते कि, अशुद्ध आत्म्यांवरही देवाचा
ताबा आहे. आपण अशुद्ध आत्म्यांना भिण्याचं कारण नाही. इतरांना भूतमुक्त करून
त्यांना देवाच्या श्रद्धेचे अमृत पाजण्याचे कार्य ख्रिस्ताने पुढे गालीली प्रांतात
देखील केले व त्यांची प्रसिद्धी सर्वत्र पसरली.
ख्रिस्ताची पेत्राच्या घरी भेट:
येशू कफर्णहुमात आपलं कार्य संपवून विश्रांतीसाठी शिमोन
पेत्राच्या घरी गेला असावा. येशूला तिथे स्वतःच घर नव्हतं. कफर्णहुमात तो नेहमी
पेत्राच्या घरी उतरत असे. येशूचा व घरातील सर्वांचा चांगलासा परिचय असावा.
येशूच्या भेटीमुळे पेत्राची बायको व सासू फारच प्रभावित झाल्या असाव्यात. येशु
नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी गेला असावा. परंतु, ह्यावेळी त्याला काहीतरी आगळेवेगळे
दिसून आले. पेत्राची सासू आजारी होती. तिला ताप आला होता. ह्या तापामुळे नक्कीच
अशक्तपणा तिला आला असल्याचे येशूने जाणले. तिला धीर देत येशूने आपल्या दैवी
शक्तीने तिला आजारमुक्त केले. ह्यास्तव देव माणसाची शारिरीक काळजी वाहतो हे
ख्रिस्ताला प्रत्यक्ष दाखवायचं होत.
चमत्काराचा हेतू :
पेत्राची सासू तशी वयस्कर होती. तिला ताप आला आहे, हे
येशूने चौकशी केल्यामुळे त्याला कळल असावं. मत्तयनुसार येशूला कुणीही विनंती केली
नाही, तर येशूने ती आजारी असल्याचे पाहिले (मत्तय ८:१५). (लूक ४:३८ नुसार त्यांनी
विनंती केली होती). कुणीही विनंती न करता येशूने हा चमत्कार का केला असावा हा
प्रश्न उभा राहतो. तसे पहिले तर शुभवर्तमानात पेत्राच्या सासूच्या विश्वासाबद्दलची
तशी काही नोंद नाही. ह्या चमत्कारामुळे जनसमुदायाला तसं काही कळणार नव्हतं व
त्यांचा विश्वास वाढणार होता असंही नाही. हे लोक आपल्या जवळचे स्नेही आहेत. अधिक
परिचित असे लोक आहेत म्हणून येशूला ह्या चमत्काराची गरज भासली असेल का? पेत्र हा
येशूचा प्रेषित आहे म्हणून त्याने वशिला लावला का? येशु त्यांच्या घरी अनेकवेळा
जेवला असेल म्हणून कृतज्ञ वृत्तीने तर त्याने असे केले असेल. असे अनेक प्रश्न उभे
राहतात.
ह्या चमत्काराची वस्तुस्थिती
पेत्राची सासू एकटी पेत्राच्या घरी होती. तिथे चमत्कार करून
येशूची प्रसिद्धी जास्त पसरणार नव्हती. लोक त्याचे तिथे कौतुक करणार नव्हते.
त्याचे हे कार्य इतरांपर्यत पोहोचण्याची खात्री नव्हती. तरी येशू देवाचा गौरव
करण्यासाठी व माणसांच तारण करण्यासाठी आपली शक्ती वापरतो. त्याद्वारे आपलं प्रेम
व्यक्त करतो व शारिरीक रोगावरही त्याचा अधिकार असल्याचं चिन्ह दाखवतो. तो
सामुदायिक ठिकाणी व खाजगी ठिकाणीही चमत्कार करतो. आपला पाहण्याचा दृष्टीकोन हा
येशूच्या दृष्टीकोनापेक्षा वेगळा आहे.
एखादे काम आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी करतो, परंतु तेच काम इतरांसाठी
आपण करीत नाही. एखादे काम आपण जिथे प्रसिद्धी मिळेल तिथे करतो, परंतु तेच काम अन्य
ठिकाणी करण्याची प्रेरणा आपणास होत नाही. एखादे काम आपणास करण्याची इच्छा नसतानाही
केवळ उपकारबुद्धीने आपणास करावे लागते. आपल्यावर ज्यांचे उपकार असतील
त्यांच्यासाठी कृतज्ञता दाखवावी लागते. कधी कुणाकडून कर्ज घेतले असेल, कुणाच्या
घरी जेवण अथवा चहापाणी घेतला असल्यास, कुणाच्या गाडीतून फिरलो असल्यास अथवा
कुणाकडून इतर मार्गाने काही काम करून घेतलं असल्यास त्यांच्यासाठीही आपण काहीतरी
काम करतो. तेच काम इतरांसाठी करण्याची प्रेरणा होणे अशक्य आहे.
बोधकथा:
रात्रीचे तीन वाजले होते. सगळीकडे
वातावरण शांतच होते. सर्व निवांत झोपले होते. अचानक राहुलच्या दारावरची बेल वाजली.
तुंम्हा आंम्हाला काहीतरी भयंकर वाटेल, परंतु राहुलला आपल्या व्यवसायामुळे भर
रात्रीच्या पाहुण्यांची सवय होती. त्यांनी उठून दरवाजा उघडला. दोन साधारणत: परिचित
माणसे दारात उभी असल्याचे त्याने पाहिले.
‘तुमची झोपमोड केल्याबद्दल
क्षमस्व! एक महत्वाचे व तातडीचे काम होते. येऊ का आत?’ त्याच्यापैकी एकाने विचारले,
‘या! ना आत’ राहुलने उत्तर दिले. ‘डॉक्टर! आमच्या भावाची बायको, बॉम्बे हॉस्पिटलला
दाखल करायची आहे. परिस्थिती खूपच गंभीर आहे. तुमची मदत हवी’. ‘हरकत नाही तुम्ही
घेऊन जा; मी लगेच तेथे पोहचतो’. डॉक्टरांनी ताबडतोब तयारी करून ते बॉम्बे
हॉस्पिटलच्या मार्गावर निघाले.
सर्व वार्ड भरलेले होते. पाय
ठेवायला देखील जागा नव्हती. परंतु राहुलचे सर्व डॉक्टर्स व अधिकारी ओळखीचे होते,
म्हणून त्यांच्या विनंतीमुळे अधिकाऱ्याने एक जागा तयार केली. ताबडतोब उपचार सुरु
झाले. पेशंट बरे होईपर्यंत राहुलने अनेक तास त्यांच्या सेवेला तेथे झोकून दिले.
साधा चहासुद्धा संबंधितांकडून न घेता झोप, भूक, थकवा विसरून राहुल सतत कार्य करू
लागला. शेकडो गरजवंताना ते मदतीचे हात देत होते. तो दिवस होता, ११/७/२००७ चा,
जेंव्हा संपूर्ण मुंबई लागोपाठ सात बॉम्बस्फोटामुळे हादरून गेली होती. ह्यावेळी संकटकाळी
गरजवंताना मदत करणे हाच त्यांचा स्वभाव बनला.
(येशू ख्रिस्त अनेक प्रसंगी थकलेला, भागलेला असताना देखील त्याने अनेक आजारी,
रोगी आणि पिडीत ह्यांना तत्क्षणी त्यांच्या सहाय्यास धावून गेला.)
मनन चिंतन:
ख्रिस्ताला आपल्या लोकांची मने घडवायची होती. त्यांची
विचारसरणी शस्राने नव्हे तर प्रेमाने बदलायची होती. तो मानवी जीवनाचा उध्दार
करण्यासाठी आला होता. त्याला मानवी जीवन उध्वस्त करायचं नव्हतं. येशू दयाळू व
प्रेमाळू आहे. त्यांच्या समोर एकच नियम होता आणि तो नियम म्हणजे प्रेम. प्रेम
करणारा येशु हा नक्कीच दयेचा सागर आहे. त्याच्या ह्या अथांग दयासागरात सर्वांचा
उगम व अंत होत असतो.
ख्रिस्तसभेने दिलेल्या आजच्या पहिल्या, दुसऱ्या व
शुभवर्तमानातील वृत्तांताद्वारे आपण अनेक अशा महत्त्वपूर्ण पैलूवर मनन-चिंतन करु
शकतो. जसे ख्रिस्ताचे अविश्रांत कार्य, सेवा व परोपकारीपणा, पित्याच्या गौरवासाठी
व मानवी उद्धारासाठी केलेला चमत्कार, मानवी दुःखाकडे सकारात्मक दृष्टीकोन
विनामूल्य सुवार्तेचा प्रसार अशा महत्त्वपूर्ण पैलूवर प्रकाशझोत घालण्याचा प्रयत्न
केला आहे.
(१) ख्रिस्ताचे अविश्रांत कार्य
येशू थकलेला होता. त्याला विश्रांतीची गरज होती. दिवसभर
कार्य करून संध्याकाळी तो विश्रांतीसाठी व प्रार्थनेसाठी एकांतात जात असे. तरीही
अनेक रोगी त्यांच्याकडे बरे होण्यास येत असत. थकून, भागून गेलेला ख्रिस्त येशू कुणालाही
परत पाठवत नसे. त्यांने सर्वांचं स्वागत केलं. भेदभाव न करता सर्वांची इच्छा तो
पूर्ण करत असे. येशूला त्यांचा कधीही वैताग आला नाही किंवा त्यांच्यावर तो कधी
रागावला नाही.
(२) विनामूल्य सुवार्तेचा
प्रसार:
संत पौलाने करिंथकरांस
लिहिलेल्या पत्राद्वारे आपल्याला आपल्यावर लादून दिलेल्या जबाबदारीविषयी कर्तव्य
पटवून देतो. स्वर्गीय राज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी देवाने अनेक अश्या लोकांना
निवडले त्याने आपली सुवार्ता निवडलेल्या लोकांमार्फत, संदेष्ट्यामार्फत व शेवटी
आपल्या एकुलत्या एका पुत्राद्वारे पसरविली आपल्या स्वर्गीय पित्याचे हे कार्य पुढे
नेण्यासाठी पुत्राने प्रेषितांची निवड केली व त्यांच्यामार्फत ही जबाबदारी आज
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीवर लादली गेली
आहे. आपल्याला देखील ह्यात सहभाग घेण्यास ख्रिस्तसभा वेळोवेळी निमंत्रण देत असते. संत
पौलाचे उदाहरण आपल्या नजरेसमोर ठेऊन आपण देखील ह्या देवाच्या कार्यास हातभार
लावावा म्हणून देवाकडून सामर्थ्य मागुया.
(३) पित्याच्या गौरवासाठी आणि मानवी उद्धारासाठी केलेला चमत्कार:
शुभवर्तमान दिलेल्या वृत्तांतातील सर्व उद्देश बाजूला ठेऊन
येशूने केवळ आपल्या पित्याच्या गौरावासाठी व मानवी तारणासाठी हा चमत्कार केला. आजच्या
ह्या जगात ईश्वरी भक्ती व शेजार प्रीतीच्या शुद्ध हेतूने काम करणारी माणसे थोडीच
आहे. काहीना संपूर्णरित्या तर काहींना थोड्या प्रमाणात ते जमते. उदा. मदर तेरेसा
सारख्या थोर व्यक्तींना ते पूर्णपणे जमले. जात, प्रांत, धर्म, पाहून सेवेची खरी
आस्ता मानवात कदापी अस्तित्वात येऊ शकत नाही. आपल्या
कार्याद्वारे येशूने आपली स्वर्गीय पित्याचे प्रेम व्यक्त केले. आपली दैवी शक्ती
त्याने माणसाच्या तारणासाठी वापरली. परंतु मानवजात आज ह्याला लाभलेल्या शक्तीचा
वापर कधी विधायक तर कधी विघातक कार्यासाठी करतो. देव आपल्याला शक्ती देतो,
अश्यासाठी की; त्याद्वारे आपण समाज उभारावा, मानवी जीवनाचा उद्धार करावा. समाजात
देवाचे कार्य पुढे चालवावे, एकमेकांचे तारण करावे व देवाचा गौरव करावा ह्यास्तव विध्वंसक
कार्यासाठी वापरलेली किंवा उभारलेली शक्ती एक शाप व धोकादायक ठरेल.
(४) परोपकारी व सेवा:
पेत्राची सासू बरी होताच ती सेवा करू लागली. सेवा
करण्याइतकी ती बरी झाली होती. इतरांची सेवा
करण्यासाठी मला आरोग्य मिळाले, ह्याचे ते चिन्ह होते. तिला शारीरिक
स्वास्थ्य मिळाले.
आपल्याला मिळालेल्या शक्तीचा उपयोग लोकसेवेसाठी व्हावा, असे
ती येथे दर्शवून देते. देवाच्या देणग्या आपणालाही मिळतात त्याचा आपण कसा उपयोग
करावा ह्याचा हा एक अप्रत्यक्ष दाखलाचा आहे. सेवा करून तिने येशूचे आभार मानले
आपली परोपकाराची भावना दर्शविली व येशूचा गौरव केला.
ह्यास्तव आपल्यातील परोपकाराची भावना आपण आपल्या कार्यातून
प्रभावित करावी म्हणून आपल्याला आज ख्रिस्त सभा बोलावीत आहे. गरजवंत अडी-अडचणीत
सापडलेले लोक जेंव्हा माझ्याकडे धावत येतात, तेंव्हा मी स्वत: च्या गरजेला की,
माझ्याकडे आलेल्या लोकांना प्राधान्य देतो? ह्याविषयी चिंतन करणे अगत्याचे आहे.
स्व-खर्चाने रात्री अपरात्री झोप, भूक पैसा, प्रियजन
ह्यांना क्षणभर विसरून निस्वार्थ काम करणारे कार्यकर्ते ख्रिस्ताला अधिक प्रिय
असतात. पेत्राची सासू बरी होताच ती सेवा करू लागली. ख्रिस्ताप्रमाणे ती सेवाभावी
बनली. आपल्या जीवनातील सर्व कामातून थोडा वेळ काढून गावात ताप आलेल्या, संकटात
असलेल्या, अडचणीत जीवन जगात असलेल्या, गरजवंत व्यक्तीला भेट देणे अगत्याचे आहे.
त्या व्यक्तीची मला थोडी सेवा करता येईल ह्यांची संधी साधने आवश्यक आहे व तिथेच
उत्स्फूर्तपणे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रसार आपल्या सेवेमार्फत प्रेमामार्फात व
प्रार्थनेमार्फत करण्याचा प्रयत्न करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो द्या कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
(१) अखिल ख्रिस्तसभेच्या श्रद्धेचे
व प्रेमाचे सरदार पोप फ्रान्सीस, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनींना,
देवाच्या मळ्यात कार्य करण्यासाठी व त्यांच्या प्रेमात वाढ होण्यासाठी भरपूर मनोबल
व उदंड अशी शक्ती ख्रिस्ताकडून मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
(२) आज ख्रिस्तसभा ‘पवित्र बालकांचा
रविवार’ साजरा करीत आहे. गोजिरवाणे बाळ हे देवाने दिलेली एक अनमोल अशी देणगी आहे.
त्यांचे संगोपन व पालन-पोषण करणे हे प्रत्येक आई-वडिलांची आद्य कर्तव्य आहे.
ह्यास्तव त्यांना प्रभूच्या प्रेमात व सहवासात वाढता यावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना
करूया.
(३) सर्व अनाथ व आई-वडीलांच्या
प्रेमाला मुकलेल्या बालकांना सेवाभावी व्यक्तींमार्फत प्रभूच्या अखंड प्रेमाचा अनुभव
सदोदित त्यांच्या जीवनात येत रहावा व आशेचा नवा किरण त्यांच्या जीवनमार्गावर दिसावा,
म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
(४) यंदाचे वर्षे हे व्रतस्थ जीवनासाठी
समर्पित केले आहे. ख्रिस्ताचा आशीर्वाद सदोदित त्यांच्यावर असावा व पवित्र आत्म्याच्या
कृपासामार्थ्याने त्यांनी देव-प्रीती व शेजार-प्रीती या दोहो तत्वांची सांगड
घालण्याचा प्रयत्न करावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment