Sunday, 15 February 2015

Reflections for Homily By:Leon D'Britto










राखेचा बुधवार

दिनांक :१८/०२/२०१५
पहिले वाचन: योएल २:१२-१८
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:२०-६:२
शुभवर्तमान: मत्तय ६:१-६,१६-१८

“आपली वस्त्रे नव्हे तर आपली ह्र्दय फाडा”

प्रस्तावना:

आज राखेच्या बुधवार, तसेच आज आपण प्रायश्चित काळात आगमन करीत आहोत. आजची उपासना आपल्याला आपल्या पापांबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास आमंत्रित करीत आहे.
योएलच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपणास आपली वस्त्रे नव्हे तर आपली हृद्य फाडून पश्चाताप करण्यास आवाहान केले गेले आहे; तर करिंथकरांस लिहिलेल्या दुसऱ्या वाचनात आपल्याला देवाबरोबर समेट घडवून आणून मिळालेल्या कृपेचा योग्य वापर करण्यास सांगितले आहे. पश्चातापाचे तीन पैलू आहेत: दानधर्म, उपवास व प्रार्थना. आजच्या शुभवर्तमानात योग्य पश्चातापासाठी लागणारा दानधर्म, उपवास व प्रार्थना कशी करावी ह्याचे वर्णन केले आहे.
ह्या प्रायश्चित काळात आपल्या पापांबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास लागणारी कृपा व शक्ती ह्या मिस्साबालीदानाद्वारे मागुया.

सम्यक विवरण

राखेचा बुधवार हा प्रायश्चित काळातील (उपवास काळातील) पहिला दिवस. हा दिवस पुनरुत्थानाच्या (इस्टर) ४६ दिवसा अगोदर येतो. मत्तय, मार्क, व लुकलिखित शुभवर्तमानाद्वारे येशूने ४० दिवस वाळवंटात उपवास केला व सैतानाच्या मोहाचा सामना केला. उपवास काळाचा उगम इथेच आहे, या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आपण ४० दिवसाचा उपवास काळ पाळतो व येशूच्या पुनरुत्थानाची तयारी करत असतो.
काँस्टनटाईन राजाने ख्रिस्ती धर्मप्रसाराला परवानगी दिल्यानंतर रोम शहरात पश्चाताप्यांना जाहीररीत्या पश्चाताप देण्याची प्रथा सुरु झाली. जुन्या करारात अश्या प्रकारच्या पश्चातापाची प्रथा प्रचलित असल्याचे आपल्याला विविध वचनांनंद्वारे आढळते. “म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चाताप करीत आहे.” (ईयोब ४२:६). “हे वर्तमान मर्दखायच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोणताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठे आक्रदान केले...बहुतेक लोक गोणताट नेसून राखेत पडून राहिले.” (एस्तर ४:१-३). “माझ्या लोकांच्या कन्ये, कमरेला गोनताट गुंडाळ, राखेत लोळ...”(यिर्मया ६:२६). “तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकीला व डोक्यावर हात ठेऊन वाटेने ती रडत ओरडत चालली.”(२ शमुवेल १३:१९). “ते तुझ्या स्थितीमुळे लांब हेल काढून मोठ्या दुखाने रडत आहेत; ते आपल्या डोक्यात धूळ घालीत आहेत आणि धुळीत लोळत आहेत.”(यहेज्केल २७:३०). “हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना,विनवण्या, उपास,गोनताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली.”(दनिएल ९:३).
कपाळाला राख फासणे हे आपल्याला अंतकरणातून करायच्या असलेल्या पश्चातापाचे बाह्य चिन्ह आहे. ह्या बायबल वचनांचा आधार घेऊन अश्या लोकांसाठी उपवासकाळाच्या पहिल्या दिवशी राख फासणे, गोनताट नेसणे व पवित्र गुरुवारी समेट होईपर्यंत श्रधावंतांच्या दूर राहणे ह्या गोष्टी जाहीरपणे कराव्या लागत. आठव्या ते दहाव्या शतकादरम्यान ही प्रथा बंद पडली आणि केवळ कपाळाला राख लावायची प्रथा सुरु झाली. ह्या दिवशी राखेला आशीर्वाद देऊन (ही राख गत वर्षाच्या झावळ्याच्या रविवारी आशीर्वादित केलेल्या झावळ्यांच्या पात्यापासून बनवली जाते.) ती प्रत्येकाच्या कपाळावर फसली जाते व ही राख कपाळाला लावताना, “मानवा, तू पापी आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील.”(उत्पती ३:१९), किंवा “पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” (मार्क १:१५) हे शब्द उच्चारले जातात. खरे पाहता राख म्हणजे नाश, विध्वंस आणि नश्वरता! परंतु इस्टरच्या अग्नीमुळे ह्याच राखेला शुद्धीकरण, पश्चाताप व परिवर्तन ह्या सकारात्मक दृष्टीकोनाचं प्रतिक मानले गेलेले आहे.

बोधकथा

एकदा एक राजा आपल्या राजाधानीतील रस्त्यावरून फेरफटका मरत होता. रस्त्यावरून चालत असताना एक भिकारी त्याच्यासमोर आला व भिक्षा मागू लागला. राजाने त्या भिकाऱ्याला भिक्षा दिली नाही परंतु त्याला आपल्या राजवाड्यात येण्याचे आमंत्रण दिले. सांगितल्याप्रमाणे ठरविलेल्या दिवशी भिकारी राजवाड्यात राज्याला भेटण्यासाठी गेला. राजवाड्याची भव्यता पाहून भिकाऱ्याला आपल्या परिस्थितीची जाणीव झाली: ‘मी एक भिकारी, फाटलेले कपडे आणि ह्या भव्य दिव्या राजवाड्यात!!! परंतु राज्याने त्याला राजवाड्यात बोलावून घेतले व त्याचा चांगला पाहुणचार केला. व पाहुनचारानंतर त्याला नवीन कपडे आणि काही भेटवस्तू दिल्या.काही दिवसानंतर परत एकदा भिकाऱ्याने आपले जुने फाटलेले कपडे परिधान करून भिक्षा मागण्यास सुरवात केली.
त्या भिकाऱ्याने राजाने दिलेले नवीन कपडे काढून परत जुने कपडे का घातले? कारण त्याला माहित होते की हे नवीन कपडे परिधान करणे म्हणजे एक नवीन जीवन जगण्यास सुरवात करणे. व त्यासाठी त्याला भिक्षा मागण्याचे सोडून द्यावे लागले असते. परंतु भिक्षा मागण्याचे सोडून देण्यास तो तयार नव्हता. त्याला हे नवीन जीवन आवडले नाही असे नाही तर त्याला माहित होते की नवीन जीवनाला सुरवात करताना आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागेल व हा त्रास सहन करण्यास तो तयार नव्हता.

मनन चिंतन

  1.       राखेद्वारे आपल्याला आपल्या पापांची व अपराधांची आठवण करून दिली जाते व पश्चाताप करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास आवाहन दिले जाते. आपल्या कपाळावर काढलेला राखेचा क्रूस आपल्याला येशूने क्रुसावर प्राण समर्पून केलेल्या त्यागाची आठवण करून देते. तसेच आपली पापे व दुष्कर्मे माफ केली जातील असा दिलासा दिला जातो. राखेच्या बुधवारी कपाळावर राख लावण्याची प्रथा आपण काटेकोरपणे पाळतो. जेव्हा आपण कपाळाला राख लावतो तेव्हा अंतकरणातून आपल्याला आपल्या पापांची जाणीव होऊन पूर्ण अंत:करणाने पश्चाताप करण्याची गरज भासली पाहिजे. तशी भावना राख लावताना आपल्या अंतकरणात नसेल तर कपाळवर लावलेल्या राखेला काही अर्थ उरणार नाही. ती राख फक्त एक स्टाईल अथवा मिरवण्यासाठी केलेली शो-बाजी असेल. ह्याबाबत यशयाच्या पुस्तकातील अध्याय ५८:५-७ मध्ये आपण वाचतो, “मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जीवास पिडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोखे लवविने आणि आपल्या अंगाखाली गोणताट व राख पसरविणे याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय?दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दो-या सोडाव्या, जाचलेल्यांस मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचरांस व नीराश्रीतांस आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यांस त्यास वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?”.

    कपाळाला लावलेल्या राखेचा संपूर्ण मतितार्थ समजून घेतल्यानंतर व आपल्या पापांचा पश्चाताप करीत असताना एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे, व ती म्हणजे: जरी राखेच्या बुधवारी आपण उपवास काळाला सुरवात करीत असलो तरी हा दिवस उदास रहाण्याचा नाही ह्या दिवसाने आपल्या मानात एक नवं चैतन्य निर्माण केले पाहिजे कारण राखेचा बुधवार आपल्याला जीवनात ख्रिस्ताची नितांत गरज आहे हे दाखवून देतो तसेच ह्या दिवसापासून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताचे स्वागत करण्यास तयारी करत असतो.
2.  प्रत्येक जण मृत्युपासून पळण्याचा प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे आपले आयुष्य लांबाविण्याचा प्रयत्न करीत आहे. एक दिवस आपल्याला मृत्यूला सामोरे जावे लागणार हा विचार आपल्याला नकोसा वाटतो. आपल्या वयाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असताना आपल्या शरीरात होणारे बदल स्वीकारण्यास कठीण जाते व त्यावर मात करण्यासाठी आपण खूप कष्ट घेत असतो उदा: केसाला रंग लावणे, वेगवेगळ्या क्रीमचा वापर करणे, चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे असे वेगवेगळ्या प्रकारे तरुण दिसण्यासाठी खूप असे प्रयत्न चालू असतात. मृत्यूला दूर सारण्याच्या या अथक प्रयत्नानंतर राखेचा बुधवार परत एकदा आपण माती आहोत व एक दिवस त्या मातीतच मिळणार असल्याची आठवण करून देतो.
मृत्यूविषयी विचार करणे हे थोडे असामान्यच आहे परंतु आपला ख्रिस्ती विश्वास हा मानवी मृत्युनंतर अनंतकाळ जीवनाची हमी देतो. आपले जीवन देवाच्या हातात पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आश्वासन आपली ख्रिस्ती श्रद्धा आपल्याला देते. मृत्यूने आपल्याला भयभीत होता कामा नये कारण स्वतः प्रभूने मृत्यूवर विजय मिळविला आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : तुझ्याबरोबर समेट घडवून आणण्यास आम्हाला मदत कर.
  1. सर्व धर्मअधिकाऱ्यांनी प्रभूच्या पावलांवर पाऊल टाकून आपल्या जीवनाद्वारे पश्चातापाचे,समेटाचे व ऐक्याचे धडे सर्व लोकांस द्यावे म्हणून आपण प्राथना करूया.
  2. या प्रायश्चितकाळाद्वारे प्रभूने आपल्याला आपल्या पापांचा धिक्कार करून प्रभूकडे येण्याची एक अनमोल संधी दिली आहे. ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन देवाबरोबर समेट घडवून आणण्यास आपण सदा प्रयत्नशील असावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. धर्माच्या नावाखाली हिंसेचा वापर करून जे समाजात असंतोष माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांना आपल्या दुष्कृत्याची जाणीव होऊन परत एकदा समाजात शांतीचा दूत बनण्यास प्रेरणा द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. या प्रायश्चित काळात प्रार्थना, उपवास व दानधर्माच्या मदतीने आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण द्यावे प्रभूची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे आपल्याला पसरविता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी मांडूया.



No comments:

Post a Comment