Wednesday, 3 August 2016


wikieee.jpg   

Reflection for the Homily of Nineteenth Sunday in Ordinary Time (07-08-2016) By Wickie Bavighar.




सामान्यकाळातील एकोणिसावा रविवार

दिनांक: ०७/०८/२०१६.
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ- १८: ६–९.
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ११ : १-२, ८-१९.
शुभवर्तमान: लूक १२ : ३२-४८.
                 
ज्याला पुष्कळ दिले आहे त्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल


प्रस्तावना

आज आपण सामान्यकाळातील एकोणिसावा रविवार आणि संत जॉन मेरी व्हियानी यांचा सण साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणा सर्वांना धन्याच्या आनंदात सहभागी होण्यास आमंत्रित करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, परमेश्वर आपले शत्रूपासून तारण करतो जेणेकरून आपण त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकू. दुसऱ्या वाचनात इब्री लोकांस पत्र यात आपल्याला विश्वासाच्या दोन बाजू आहेत असे समजते; त्या म्हणजे, ‘आशा’ आणि ‘भरवसा’. हि गोष्ट प्रत्येक श्रद्धावंतांसाठी अतिशय आनंददायक व आशादायक आहे, असे सांगण्यात येते.
तर आज प्रभू शुभवर्तमानात म्हणतो, ‘ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल.
     आज आपण धर्मगुरूंचा दिवस साजरा करीत असताना, ह्या पवित्र मिस्साबलीदानात आपल्या ख्रिस्ती जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व धर्मगुरुंसाठी आणि विशेष करून आपले प्रेमळ प्रमुख धर्मगुरू फा......... आणि त्यांचे सहाय्यक धर्मगुरू फा........ ह्यांना देवाने त्याचा प्रेमाचा, मायेचा आणि क्षमेचा संदेश जगजाहीर करण्यासाठी व देवाच्या वैभवात सहभागी होण्यासाठी कृपाशक्ती तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य प्रदान करावे म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

शुभवर्तमान:

१. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल(३२-३४) ह्या अध्यायात प्रभूचे लोक ख्रिस्ताबरोबर वारस आहेत. त्यांची जगातली ‘लहान कळप’ ही स्थिती त्यांच्या भविष्यातील स्थितीचे दर्शक नाही. तुमच्याजवळ गरजेपेक्षा जे काही अधिक आहे ते प्रभूच्या सेवेसाठी दया. असे करणे म्हणजे स्वर्गात धन साठवणे आहे. ते तुमचे सर्वकाळचे धन असणार. मग तुमची मने स्वर्गाकडेच लागलेली राहतील. धन साठविणाऱ्याला क्लेश भोगावे लागतील (याकोब ५:१).
२. ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहणारे व्हा (३५-४८):
     ह्या विभागातील बोध प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. ख्रिस्त अकस्मात येणार आहे (१करिंथ १५:५१,५२). जो वाट पाहतो त्याचे सारे लक्ष जो येणार आहे त्याच्याकडे लागलेले असते. तो तयारीत राहतो, कारण आपल्याला वाटत नाही त्याच घटकेस ख्रिस्त येईल. जो वाट पाहत असतो तो विश्वासू व विचारशील कारभारी असतो. प्रभूने दिलेलं कार्य तो तत्परतेने व विश्वासुपणे करीत राहतो. अशा दासाला पाहून प्रभूला किती आनंद वाटेल. जो वाट पाहत नाही तो क्रूर असतो व तो इतरांवर दादागिरी करतो. तो अविश्वासू असतो. तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. प्रभूने आपणाला कृपादाने दिली आहेत व त्याची सेवा करण्याची संधी दिली आहे. ती ओळखून जबाबदारीने विश्वासू राहुया.

बोधकथा:

जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा. लुक १२:१३.
एक इब्राहीम नावाचा राजा होता. एक दिवस तो आपल्या सिंहासनावर बसला असताना एक फकीर त्याच्या दरबाराच्या दाराशी आला तेव्हा पहारेकऱ्यांनी आत जाण्यास मनाई केली. तो त्यांना म्हणाला, ‘मला आत जाऊ दया, मी ह्या धर्मशाळेत आज रात्री विसावा घेण्यासाठी आलो आहे’, तेव्हा पहारेकरी फकिराला म्हणाला, ‘हा राजाचा महाल आहे, त्याला तुम्ही धर्मशाळा म्हणता’? ही बातमी राजाने ऐकताच त्याने फकिराला आत बोलावून घेतले आणि विचारले, ‘काय भानगड आहे’? ‘हा माझा महाल आहे’. तेव्हा फकिराने हसत विचारले, ‘यापूर्वी सुद्धा मी येथे आलो होतो तेव्हा मी याच सिंहासनावर दुसऱ्या कोणाला बसलेले पहिले होते’. बादशहा म्हणाला, ‘ते माझे वडील होते’. तो फकीर म्हणाला, ‘मी त्याआधी देखील आलो होतो, राजा म्हणाला, ‘ते माझे आजोबा होते’. फकीर मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, ‘मी जेव्हा पुन्हा येईल तेव्हा तुला खात्री आहे का? [तुम्हीही सिद्ध असा कारण तुम्हांस वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पूत्र येईल. लुक:१२:४०]. की तूच या सिंहासनावर बसलेला असशील? तेव्हा तुझा मुलगा मला सिंहासनावर बसलेला दिसेल. तो मग मला म्हणेल, माझ्या आधी माझे वडील या सिंहासनावर बसत होते. म्हनुनच मी या तुझ्या मोठ्या महालाला धर्मशाळा म्हणतो. मी येथे तीन वेळा आलो. येथे वेगवेगळे लोक बसलेले आढळले, मग मी ह्यास महाल का म्हणू? ही धर्मशाळा नाही तर काय आहे’? ह्या फकिराच्या बोलण्याने इब्राहीम राजाच्या मस्तकात जणू एक वीज कडाडली व सर्व विकून त्याने दानधर्म केला. इब्राहीम राजा सुद्धा एका फकिराचे जीवन जगू लागला व देवाच्या आनंदात सहभागी झाला. “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल” (लुक १२:४८).

मनन चिंतन:



येशू ख्रिस्त म्हणतो, जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा. कारण ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल.
     आपले जीवन हे परमेश्वराकडून आपल्याला मिळालेले दान आहे. परमेश्वराने आपल्याला त्याच्या गौरवासाठी आणि इतरांच्या सेवेसाठी निर्माण केलेलं आहे. आपल्याला अनेक वरदाने, कलागुण, बुद्धिमत्ता वैगेरे देऊन देवाने आपणास संपन्न केले आहे. आपल्या बुद्धीचा, कलागुणांचा योग्य तो वापर करून आपण आपले जीवन घडविणे रास्तच आहे. देव आपल्या जीवनाद्वारे इतरांच्या जीवनात सुख समाधान असावे म्हणून योजना तयार करीत असतो. आपल्या जीवनाद्वारे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हीच ईश्वराची इच्छा आहे.
           जी व्यक्ती आपल्याला मिळालेल्या दानांचा वापर इतरांच्या भल्यासाठी करते, त्या व्यक्तीला परमेश्वर भरपूर कृपादाने देऊन वैभवसंपन्न करीत असतो. आपण ज्या मापाने द्याल त्याच मापाने आपल्याला परमेश्वराकडून त्याची परतफेड मिळत असते. प्रभू येशू आज म्हणतो, ‘ज्याला आहे त्याला पुष्कळ दिले जाईल’ म्हणजेच जो आपल्या कलागुणांचा विकास करून त्याचा सदुपयोग करील त्याला जास्त कृपादाने प्राप्त होतील. आपण ज्यांना सहाय्य करतो व ज्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो, त्यांच्या प्रार्थनेद्वारे आपल्याला देवाकडून प्रतिफळ मिळत असते. आपले जीवन हे आपले नाहीच ते परमेश्वराने त्याची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी दिलेले जणू उसने ‘दान’ आहे म्हणूनच दु:खी कष्टी, असहाय्य व संकटग्रस्त अशा सर्वांच्या मदतीला धावून जाणे आपले परमकर्तव्य आहे.
     आजच्या शुभवर्तमानातील धनी व दासाचा दाखला देऊन प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आपल्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करून देत आहे. आपण आजच्या शुभवर्तमानावर चिंतन करीत असता आपल्याला परमेश्वराने कोणकोणत्या देणग्या दिलेल्या आहेत हे तपासून पाहूया. त्या देणग्यांच्या आधारे स्वत:चे कुटुंब व समाज या संबंधाने आपण आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतो का? परमेश्वराने प्रत्येकाला जीवनाचे वरदान देऊन ते समृद्धपणे जगता यावे म्हणून अनेक देणग्या बहाल केलेल्या आहेत. त्या देणग्यांचा योग्य तो वापर करून आपण आपले स्वत:चे तसेच इतरांचे जीवन सुखकर समृद्ध बनवायला हवे. परमेश्वर आपल्याला दिलेल्या ह्या जबाबदारीबद्दल जाब विचारणार आहे व त्याप्रमाणे आपणास योग्य ते बक्षीस देऊन त्याच्या आनंदात सहभागी करणार आहे.
     हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमची कर्तव्ये व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यास व सर्वकाळच्या आनंदात सहभागी होण्यास आम्हाला पात्र बनव.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. आपल्या ख्रिस्ती धर्माची धुरा वाहणारे पोप, बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांनी प्रभूच्या आनंदात सहभागी होऊन, त्याच्या सेवेची घोषणा करून लोकांना मार्ग तयार करण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.  जी कुटुंबे वेगळी झाली आहेत, जेथे प्रेम, शांती व ऐक्य नाही अशा कुटुंबात परमेश्वराच्या मदतीने पुन्हा प्रेम, शांती व ऐक्य प्रस्थापित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. डॉक्टरांनी त्याच्या सेवाकार्याचे दान आत्मसात करून निस्वार्थीपणे व विश्वासाने आजारी लोकांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी दिलेल्या दानांचा योग्य वापर स्वत:साठी न करता इतरांसाठी करावा व परमेश्वराचा आनंद इतरांना द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजा प्रभूचरणी मांडूया.




 


No comments:

Post a Comment