Wednesday 17 August 2016

Reflection for the Homily of Twenty First Sunday in Ordinary Time (21-08-2016) By Xavier Patil





सामान्यकाळातील २१ वा रविवार

दिनांक: २१/०८/२०१६.
पहिले वाचन: यशया ६६ : १८ – २१
दुसरे वाचन: इब्री लोकास पत्र १३ : २२ – ३०
शुभावर्तमान: लुक १३ : २२ – ३०.

             

 "रुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा"





प्रस्तावना

आज देऊळमाता सामान्य काळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणाला ‘ईश्वराकडे जाण्याचा मार्ग किंवा तारण प्राप्तीचा अरुंद मार्ग’ ह्याविषयी सांगत आहे.
आजच्या पाहिल्या वाचनात परमेश्वर, यशया संदेष्टा ह्याच्याद्वारे लोकांना सांगतो कि, सर्व राष्ट्रांतील लोकांना एकत्र करून त्यांनी माझे वैभव आणि महिमा पाहावा अशी वेळ आली आहे. दुसऱ्या वाचनात शिस्तीचे महत्व आपल्या तारणप्राप्तीसाठी किती मौल्यवान व महत्वाचे आहे हे सांगण्यात आले आहे. तर शुभवर्तमानात येशु ख्रिस्त आपणाला अरुंद प्रवेशद्वाराचा उपयोग करून स्वत:च्या  तारणप्राप्तीसाठी अहोरात्र प्रयत्न करण्यास आवाहन करत आहे.
कळत-नकळत आपण देवाच्या मार्गावर न चालता इतर मार्गावर भटकत असतो म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात परमेश्वराच्या मार्गावर सदोदित चालण्यास कृपासामार्थ्य मागुया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ६६ : १८–२१

वरील परिच्छेद / उतारा हा यशया संदेष्टा ह्याने जे इजीप्तचा राजा फारो ह्याच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन यरुशलेमेत परत आले होते त्या सर्वांचे सांत्वन किंवा समाधान करण्यासाठी लिहिलेला आहे. यरुशलेमेची दुर्दशा पाहून सर्वजण खिन्न, दु:खी झाले होते. यशया संदेष्टा त्या सर्वांना यरुशलेमच्या भविष्यकाळातील वैभव, प्रतिष्ठा आणि किर्ती ह्याविषयी प्रबोधन करत आहे. सर्व राष्ट्रे आदराने यरुशलेमकडे वळतील; कारण देवाने यरुशलेममधूनच त्यांची सुवार्ता व महिमा इतर राष्ट्रांमध्ये प्रकट करण्यासाठी लोकांची निवड केली आहे. त्या लोकांमधूनच काहीजण याजक व लेवी होतील, असे प्रभूने योजिले आहे.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र  १२: ५–७; ११–१३.

लेखक ह्या पत्राद्वारे सर्व ख्रिस्ती लोकांना संकटे, आपत्ती, दुर्भाग्य व दु:खांना धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे असे सांगत आहे. कारण ह्याद्वारे परमेश्वर त्याच्या लोकांना सार्वकालिक जीवनासाठी सुसज्ज करत असतो. ही सर्व दु:खे, संकटे त्याच्या लोकांना वळण, शिस्त लावण्यासाठी देवानेच पाठविली आहेत. म्हणून संकटाला घाबरून न जाता त्याच्यावर मात करायला हवी. नाहीतर संकटे आपला देवावरील विश्वास कमी करतील व आपण तारणप्राप्तीच्या मार्गापासून वंचित राहू.

शुभवर्तमान: लुक १३: २२–३०.

आजच्या शुभवर्तमानातील ख्रिस्ताचा संदेश हा विशेषत: यहुदी लोकांस उद्देशून आहे, कारण यहुदी लोकांनी ख्रिस्ताची शिकवण ऐकली परंतु त्याप्रमाणे वागले नाहीत. म्हणून भविष्यकाळातील यहुद्यांच्या परिस्थितीतीबद्द्ल येशू त्यांना सांगत आहे.
किती लोकांचे तारण होणार? ह्या प्रश्नाचे उत्तर न देता, ख्रिस्त, ‘अनेक जनांना तारण प्राप्त होण्यास कठीण होईल कारण त्यांनी देवाच्या वचनांचे पालन केले नाही, म्हणून आता त्यांनी अरुंद दरवाज्याने देवाच्या राज्यामध्ये समावेश होण्यास प्रयत्न केला पाहिजे असे सांगत आहे. पुढे ख्रिस्त सांगतो की, “दरवाजा बंद झाला आहे” आणि जे देवाच्या राज्यास योग्य ठरले आहेत ते आधीच मध्ये शिरलेले आहेत म्हणून आता जे बाहेर उभे आहे ते त्यांच्या निष्काळजीपणामुळेच बाहेर आहेत. जणूकाही त्यांनी देवाचे आमंत्रण योग्य वेळी स्वीकारले नाही.
परमेश्वर त्यांना ओळखण्यास नाकारतो कारण त्यांनी तारणप्राप्तीसाठी अपात्रता दाखविली. त्यांनी येशूची सोबत किंवा संगत सोडून स्वार्थी जीवन जगले. पापमय जीवन जगुन त्यांनी स्वतः स्वर्गाचे द्वार त्यांच्यासाठी बंद करुन घेतले. स्वर्गाच्या राज्यात जे यहुदी नाहीत, अशा काही बाहेरील लोकांचा समावेश होईल आणि जे स्वतःला यहुदी मानत ते कदाचित स्वर्गाच्या बाहेर असतील. म्हणूनच शुभवर्तमानाचा शेवट “जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले होतील” ह्या वाक्याने करण्यात आला आहे.

मनन चिंतन:

जगातील प्रत्येक व्यक्ती, मग ती मुस्लीम, हिंदू, ख्रिस्ती किंवा इतर कोणत्याही धर्माची असो; प्रत्येकजण कळत-नकळत स्वत:च्या तारण प्राप्तीसाठी अहोरात्र झटत असतात. तारण प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या धर्मांनी वेगवेगळे मार्ग निर्माण केले आहेत, कारण ‘कोणाचे तारण होईल’? हा प्रश्न आपणा प्रत्येकाला सतावत असतो.
     आजच्या शुभवर्तमानातदेखील असाच प्रश्न, एका व्यक्तीने येशूला विचारला. तो म्हणजे ‘तारण प्राप्त होत असलेले लोक थोडे आहे की काय?’ या प्रश्नाचे उत्तर आपणाला जुन्या करारामध्ये सापडते. यशया संदेष्टा म्हणतो की, ‘फक्त थोड्यांचेच तारण होईल’ (यशया १०:१९-२२). तसेच संदेष्टा आमोस सांगतो की, ‘फक्त १० टक्के लोकांचे तारण होईल (आमोस ५:३). कदाचित अशाच प्रकारचे उत्तर त्या व्यक्तीला येशुकडून अपेक्षित होते. पण येशूने त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. कारण येशूला ‘कोणाचे तारण होईल’? ह्यापेक्षा आपण कशाप्रकारे तारण प्राप्त करु शकतो ह्या मार्गाची ओळख देणे महत्वाचे होते. येशूच्या मते जे अहोरात्र तारणासाठी कष्ट करतात जे शारिरीक किंवा ऐहिक सुखाच्या मागे न लागता ईश्वराच्या दिशेने प्रवास करून नि:स्वार्थी जीवन जगत असतात त्यांचे तारण निश्चित आहे.
     पूर्वी असे मानले जायचे कि, फक्त इस्रायल लोकच देवाने निवडलेले लोक आहेत आणि फक्त त्यांचेच तारण होणार. पण आजच्या पहिल्या वाचनात आपणाला कळते कि, ‘सर्वजण तारण प्राप्तीसाठी योग्य आहेत’. पण प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे आहे. परमेश्वराने जरी इस्रायल लोकांनाच निवडले होते तरी तो सर्वांचा देव होता आणि सर्वांसाठी त्याची द्या व प्रेम हे सारखेच आहे.
मी ख्रिस्ती आहे, माझा बाप्तिस्मा झाला आहे, किंवा मी धार्मिक व्यक्ती आहे असे म्हणून आपले तारण मुळीच होणार नाही, तर रोजच्या जीवनात स्वत: पुरते न जगता, फक्त स्वत:च्याच पोटाचा विचार न करता, परोपकार, दानधर्म, ईश्वरभक्ती केल्याने तारण प्राप्त होऊ शकते. जीवनामध्ये जो जितके पुण्य करील, जितकी सत्कर्मे करील व ज्याप्रमाणात ईश्वरभक्ती करील, त्यावर स्वर्गातील उच्च पद अवलंबून असेल.
     देव सर्व मानवांची कृत्ये आणि विचार जाणतो. म्हणून कोणाचे तारण होईल आणि कोणाचे होणार नाही ह्याची चिंता करण्यापेक्षा मी स्वत:च्या जीवनाची पडताळणी करायला हवी. मनुष्य जितका नि:स्वार्थी असेल तितका तो ईश्वराच्या जवळ जातो. स्वार्थी माणसे कधीच सुखी होऊ शकत नाहीत. जे कोणाला फसवत नाहीत, जे बदनामी करत नाहीत, जे कोणाचा विश्वासघात करत नाहीत, खोटे बोलत नाही, चोरी करत नाहीत, चिडत नाहीत, दुसऱ्यांचा तिरस्कार करत नाही आणि जे दुसऱ्यांना दु:ख देत नाहीत अशा सर्व लोकांना परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश प्राप्त होतो.
     अनेक वेळा आपले विचार शास्री आणि परुशी ह्यांच्यासारखे असतात. ते स्वत:ला सज्जन, देवाने निवडलेले किंवा इतर सामान्य लोकांपेक्षा श्रेष्ठ समजतात. पण येशु त्यांची ही चुकीची कल्पना सुधारून सांगतो कि, “देवाच्या राज्यात जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले आहेत. कारण तारणप्राप्ती हि आपोआप भेटत नाही तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. फक्त येशुबरोबर खाऊन पिऊन आपण त्याचे शिष्य होत नाही; तर त्याच्या पावलावर चालणे, त्याच्यासारखे जीवन जगून देवाच्या वचनांचे पालन केल्याने आपण येशूचे खरे अनुयायी होऊ शकतो.
देव प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देतो म्हणून नेहमी चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळवण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंतकाळचे जीवन देईल. परंतु जे स्वार्थीपणामुळे सत्यात चालणे नाकारतात व अनितीने चालतात त्यांची तो क्रोधाने भरपाई करील.
आपल्यामध्ये जे काही वाईट आहे ते प्रभूला अर्पण करूया आणि जीवनामध्ये पुन्हा एकदा चांगली कृत्ये करण्यास देवाची साथ आणि सामर्थ्य मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. हे प्रभू ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स व सर्व धर्मगुरू ह्यांना तुझ्या पवित्र हृदयी सुरक्षित ठेव. आध्यात्मिक व शारीरिक अशा सर्व आपत्तीपासून तू त्यांचे संरक्षण कर व सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने व आपुलकीने वागण्यासाठी तू त्यांना आध्यात्मिक शक्ती दे.
२. हे दयावंत परमेश्वरा, तुझा चांगुलपणा अमर्याद आहे, आज आम्ही जे लोक आजारी, दुखी कष्टी, निराशी व संकटग्रस्त आहेत अशा सर्व लोकांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा त्यांचे जीवन पुन्हा एकदा प्रभू प्रेमाने बहरावे म्हणून प्रार्थना करतो.
३. हे येशू तू कामगारांचा मित्र व सोबती आहेस म्हणून जे सर्व प्रकारच्या शारीरिक व बौद्धिक कामात गुंतलेले आहेत त्यांच्या सर्व गरजा व योजना पूर्णत्वास नेण्यास त्यांना मदत कर, व जे लोक वैफल्य, नैराश्य आणि संघर्ष ह्यांनी ग्रस्त झालेले आहेत त्यांना तुझ्या सार्वकालिक शांतीचे वरदान दे.
४. हे प्रभू स्वर्गाकडे जाणारा अरुंद मार्ग जरी कठीण असला तरी त्यावर चालण्यास आम्हां सर्वाना तुझी कृपाशक्ती आणि सामर्थ्य दे जेणेकरून आम्हाला तारणप्राप्ती  होईल.
५.आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment