Thursday, 25 August 2016

Reflection for the Homily of Twenty Second Sunday in Ordinary Time (28-08-2016) By Alfred Rodrigues




सामान्यकाळातील बाविसावा रविवार

दिनांक: २८/०८/२०१६.
पहिले वाचन: बेनसिरा ३ : १९–२१, ३०–३१.
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र १२ : १८–१९, २२–२८.
शुभवर्तमान: लूक १४ : १,७–१४.




“जो स्वत:ला उंचावितो तो नमवला जाईल व जो नमवतो त्यास उंचावले जाईल”




प्रस्तावना

आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्यास नम्र बनण्यास आमंत्रित करीत आहे.
बेनसिराच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात येत आहे कि, परमेश्वर कितीही सामर्थ्यवान व महान असला तरीही तो नम्र लोकांचा पूज्यभाव स्वीकारतो व आपली रहस्ये विनयशील जनांस प्रकट करतो. दुसऱ्या वाचनात संत पौल इब्री लोकांस ऐहिक सिओन व स्वर्गींय सिओन ह्यामधील फरक स्पष्ट करून देत आहे. तर लुककृत शुभवर्तमानात ख्रिस्त नम्रता व आदरातिथ्याचा दाखला देऊन म्हणतो कि, ‘जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल’.
ह्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना आपण ख्रिस्ताकडे नम्रतेचे कृपादान मागूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: बेनसिरा ३: १९–२१, ३०–३१.

बेनसिरा ह्यांची बोधवचने हा ग्रंथ ‘एक्लेझीयास्तस’ या नावाने देखील ओळखला जातो. ह्यामध्ये परमेश्वर आपला प्रेमळ पिता ह्या नात्याने तो त्याच्या मुलांना नम्रपणे वागण्याचा सल्ला देत आहे. कारण तो आपला निर्माणकर्ता परमेश्वर आहे आणि म्हणून आपली जी काही प्रतिष्ठा, मानसन्मान व आदर आहे हे आपलं नसून परमेश्वराकडून मिळालेले दान आहे. म्हणूनच परमेश्वर सांगतो कि प्रतिष्ठीत व नामांकित पुष्कळ आहेत, परंतु तो आपली रहस्ये विनयशील जनांस प्रगट करितो.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र १२: १८–१९, २२–२८

इब्री लोकांस लिहिलेल्या पत्राचा लेखक हा यहुदी धर्मातून ख्रिस्ती झाला होता. जो ह्या वाचनात आपल्यासमोर दोन दृश्य ठेवत आहे. १) परमेश्वराने इस्राएल लोकांबरोबर सिओन पर्वतावर केलेला करार म्हणजेच ‘ऐहिक सिओन’ किंवा जुना करार. २) स्वर्गीय जेरुशलेम म्हणजेच नवीन करार किंवा ‘स्वर्गीय सिओन’.
परमेश्वराने इस्राएल लोकांबरोबर केलेल्या जुन्या करारात इस्राएल लोकांत भय दडलेले होते. परंतु नवीन करारात परमेश्वराविषयी प्रेम समाविष्ट होते.

शुभवर्तमान: लूक १४ : १,७–१४.

शास्त्री व परुशांना भर बाजारात नमस्कार घेणे आवडत असे तसेच त्यांना प्रतिष्ठेने व मानाने दिलेल्या नमस्काराने ते भारावून जात. त्यांना सभागृहात मानाची आसने पटकावण्यासाठी आवडत असे. तसेच मेजवानीच्या प्रसंगी मुख्य बैठ्कांवर आरूढ होणे त्यांना आवडत असे. म्हणूनच ख्रिस्त आजच्या दाखल्यात सांगत आहे कि, कोणी तुम्हाला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिल्यास मुख्य आसनावर बसू नका तर अगदी खालच्या जागेवर जाऊन बसा.
या अध्यायातील सर्व प्रसंग भोजनाशी निगडीत आहेत. त्याकाळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचे भोजनावळ हे एक व्यासपीठ होते. भोजनाच्या निमित्ताने येशूने आध्यात्मीक आणि सामाजिक जीवनासबंधी महत्वाचे भाष्य केले. येशूला उपेक्षितांबद्दल विशेष प्रेम होते. समाजात श्रीमंत आणि कंगाल याच्यांत भेदभाव केला जातो, हि गोष्ट त्याला आवडली नाही. त्याने नेहमी सामाजिक समतेचा आग्रह धरला म्हणूनच हा दाखला सांगत असताना ख्रिस्त आपणास बोध देतो कि, ‘जो कोणी आपणाला उंच करितो तो नमविला जाईल’. ख्रिस्त स्वतः देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, त्याने स्वतःला रिक्त केले. म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. (फ़िलिप्पैकरांस पत्र २: ६-८ ) ख्रिस्त आपणासाठी नम्रतेचा एक उत्तम आदर्श आहे. तो सांगतो कि, मी मनाचा सौम्य व लीन आहे. (मत्तय ११: २९ ) उपेक्षित, पिडीत, कंगाल, आंधळे – पांगळे ह्यांना त्या वेळी सामाजिक जीवनात स्थान नव्हते. त्यांची जागा तळागाळात होती. परंतु ते येशूचे, लाडके होते. अनेकदा गरजूंना मानासिकदृष्ट्या पांगळे करण्यासाठी देणग्या दिल्या जातात, अन्नछत्रे उघडली जातात. दुर्बलांवर अधिकार गाजवण्याचे हे एक साधन बनते. परंतु, येशुने, त्यालाही विरोध केला. ‘गोरगरीबांना जेवणावळी दया. असे येशूने सांगितले नाही, तर त्यांना आपल्याबरोबर एकाच मेजावर भोजन करण्यासाठी आमंत्रित करा’ असा आग्रह त्याने धरला.

सत्य घटना

पोप बेनेडिक्ट सोळावे ह्यांनी ज्यावेळी पोपपदाचा त्याग केला त्यावेळी सर्वांना नविन पोप कोण होईल ह्याचे वेध लागले होते. नवीन पोपेच्या निवडणुकीसाठी व्हॅॅटिकनमध्ये सर्व कार्डीनल्स जमले होते. तसेच बाहेर मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव जमला होता. परंपरेनुसार नव्या पोपची निवड झाली. परंतु त्यानंतर काही वेगळाच प्रकार अनुभवयास आला. कारण, नियमानुसार नवनिर्वाचित पोप लोकांना दर्शन देण्यासाठी ४५ मिनिटाच्या आत वस्त्र परिधान करून बाहेर आले होते. परंतु पोप फ्रान्सिसने अधिक वेळ घेतला त्याचे कारण असे कि, त्यांना जे वस्त्र आणले होते ते त्यांना उच्च व महाग प्रतीचे वाटले, म्हणून त्यांनी एकदम हलक्या प्रतीचे मागवले, त्यामुळे पोपनी लोकांच्या दर्शनाला येण्यासाठी वेळ घेतला परंतु ह्या उदाहरणाद्वारे पोपमहाशयांनी नम्रपणे सेवा करण्याचा निर्धार केला.

मनन चिंतन:

     आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो ख्रिस्त एका शब्बाथ दिवशी परुश्यांतील कोणाएका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला होता. परंतु तो परुशी आहे किंवा तो आपला मित्र किंवा शत्रू आहे, म्हणून त्यास भोजनास जाण्यास नकार दिला नाही तर त्याने दिलेले आमंत्रण स्वीकारले. आपणही आपल्याला कोणत्याही कार्यक्रमाला बोलाविले असता आपण त्यांचा मान राखून उच्च-निच्च, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता आपण त्या आमंत्रणाचा नम्रतेने स्वीकार करावा व त्यांच्या आनंदात सहभागी व्हावे.   
शुभवर्तमानात उल्लेख केल्याप्रमाणे, मेजवानीच्या वेळी कदाचित येशूच्या निदर्शनास आले असेल की, कशाप्रकारे परुश्यांनी आमंत्रित केलेले पाहुणे मंडळी मुख्य आसने पटकावत होती. कदाचित थोड्या वेळाने काही त्यांच्यापेक्षा प्रतिष्ठित लोक आले असतील म्हणून घरधन्याने त्यांचा मान-सन्मान राखण्यासाठी मुख्य आसनांवर बसलेल्या लोकांना आपली आसने त्या प्रतिष्ठित लोकांना द्यावयाची विनंती केली असावी. ख्रिस्ताने त्यावेळी त्यांचा झालेला अवमान व गेलेली अब्रू पाहिली असेल. म्हणून ख्रिस्त आपणास ही वेळ न येऊ देण्यासाठी सल्ला देत आहे, तो म्हणजे नम्रतेचा.
     आजच्या ह्या युगात बहुतेक जण समाजात नावलौकिकता, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धडपडत आहेत. अनेक वेळेस आपल्या कानावर ‘मी मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे, मी अमेरिकेत एका नामांकित संस्थेत शिक्षण घेत आहे, मी लंडनला डॉक्टरचे शिक्षण घेत आहे. मी परीक्षेत प्रथम आलो, मी राजकीय नेत्याचा मुलगा आहे’ असे अनेक ‘मी-पणाचे’ व्यक्तव्य ऐकण्यास मिळतात, व समाजात काहीही न करता नाव व प्रतिष्ठा कमावण्याची एक प्रकारची सवय जडलेली असते. त्यांच्याविरुद्ध कोणी बोलल्यास त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटते व त्यांना राग येतो.  
     दुसऱ्या उताऱ्यात ख्रिस्त आपले लक्ष निमंत्रित केलेल्या लोकांवरून घरधन्यावर वळवतो. ख्रिस्त सांगतो की, ‘तुम्ही भोजनास निमंत्रण द्याल तेंव्हा ते आपल्या मित्रपरिवाराला किंवा नातेवाईकाला न देता गरीब दुबळ्यांना दया. कारण त्यांच्याजवळ तुम्हाला परत देण्यास काहीच नाही’. परंतु हे ख्रिस्ताचे वचन आपल्यापैकी कित्येकांना मान्य होणार नाही. कारण आपण नेहमी आपली प्रतिष्ठा व मान-सन्मान मिळवण्यासाठी आपल्या स्वकीयांना आपलेसे करतो. आपण त्यांना बिलगून राहतो. त्यांच्याकडून मिळालेली भेट त्यांना परत मिळावी म्हणून आशा बाळगतो.
आज आपण ख्रिस्ताने दिलेल्या वचनावर मनन चिंतन करूया व त्यानुसार आचरण करण्याचा, नम्रतेचा धडा जोपासण्याचा प्रयत्न करूया.  
 
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.


१. अखिल ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप सर्व कार्डीनल्स बिशप, धर्मगुरू, आणि सर्व व्रतस्थ ह्यांनी आपल्या कार्याद्वारे व जीवनाद्वारे नम्रतेची शिकवण साऱ्या जगाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ताने दिलेले नम्रतेचे उदाहरण आपण अंगीकारावे आणि ते आपल्या जीवनाद्वारे इतरांसमोर ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या समाजात असलेल्या गोर-गरिबांना आपल्याकडून योग्य ती मदत व्हावी व त्यांना समाजात आपल्या बरोबरीनं चालण्यासाठी मान प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या देशातील अन्याय व अत्याचाराचे वातावरण दूर व्हावे व सर्वांनी आपापल्यात असलेला भेदभाव विसरून आपल्या कुटुंबात, समाजात व देशात शांतीचे वातावरण प्रस्थापित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आज जगात सर्वत्र दहशतवाद फोफावत आहे; दहशतवाद्यांना देवाचा प्रेमळ स्पर्श व्हावा व त्यांनी त्याद्वारे आपल्या सैतानी वृत्तीचा त्याग करून शांतीचा मार्ग अवलंबवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment