Friday, 12 August 2016


The Diocese of Pune Celebrates the Feast of St. Maximilian Kolbe as the Prison Ministry Sunday (14 August 2016).




१४ ऑगस्ट (Prison Ministry Sunday in Pune)



संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे

रक्तसाक्षी (१८९४-१९४१)

संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांचा जन्म पोलंड देशात ८ जानेवारी १८९४ रोजी झाला. आपल्या तारुण्यावस्थेतच ते ‘फ्रायर्स मायनर कन्व्हेंच्युअल्स’ (फ्रान्सीसकन) नावाच्या व्रतस्थ धार्मिक संस्थेत दाखल झाले आणि इ.स. १९१८ मध्ये रोम शहरात त्यांना धर्मगुरूपदाची दीक्षा देण्यात आली.
संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांचे धन्य कुमारी देवमाता मरिया हिच्यावर विशेष प्रेम होते. त्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या धर्मग्रामात ‘निष्कलंक मरीयेची फौज’ (आर्मी ऑफ इम्मॅक्यूलेट मेरी) नावाची संघटना सुरु केली. लवकरच या संघटनेचा प्रसार संपूर्ण पोलंड देशात आणि इतर देशांमध्ये झाला.
संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे पुढे जपान देशात मिशनरी म्हणून गेले, तेथे त्यांनी धन्य कुमारी निष्कलंक मरिया हिच्या आश्रयाखाली आणि मार्गदर्शनाने ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार करण्यास सुरुवात केली. तेथून परतल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीमध्ये ते ‘युद्धाचे कैदी’ म्हणून सश्रम कारावासासाठी शिक्षा भोगत होते. ते एक धर्मगुरू होते हे फक्त निवडक साथीदार कैद्यांना ठाऊक होते. दर रविवारी ते गुपचूप भूमिगत मिस्सा करायचे. त्यासाठी खायला मिळणारे पाव ते वापरायचे. ख्रिस्तप्रसादाचे लहान तुकडे काड्यांच्या पेटीमध्ये किंवा सिगारेटच्या रिकाम्या पाकिटात घालून ते आजारी कैद्यांपर्यंत पोहचवत असे. त्यांना जो सश्रम कारावास झाला होता, त्यात सर्व कैद्यांना अन्न कमी, मेहनत जास्त असं भारी काम करावं लागत असे. प्यायला पुरेसं पाणी न मिळाल्यामुळे व चाबकांचे फटके खाऊन रक्तबंबाळ झालेले कैदी तहान भागविण्यासाठी स्वतःचे मूत्र पुनः पुन्हा प्यायचे आणि अगदीच निकामी झाल्यावर त्यांना विषाचे इंजेक्शन देऊन ठार मारले जायचे.

कैद्यांना ठार मारण्यासाठी कोणतेही क्षुल्लक कारण पुरेसे होते. एकदा एका छावणीतून (कॉन्सेट्रेशन कॉम्प) दहा कैदी पळून गेले म्हणून संध्याकाळी जेलर छावणीत येऊन म्हणाला, ‘जे पळाले त्यांची शिक्षा आता पुढील कैद्यांना’ भोगावी लागेल. त्याने दहा जणांना उभे केले आणि बजावले की उद्या सकाळी तुम्हां दहा जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात येईल. जेलर हुकुम देऊन गेल्यावर त्या जणातील एका कैद्याला संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांनी ओक्साबोक्सी रडताना पाहिले आणि विचारले तू का रडतोस? त्यावर तो म्हणाला, ‘मी माझ्या पत्नीला व चार मुलांना म्हटलं होत, लढाई लवकर संपण्याकरीता रात्रंदिवस प्रार्थना करीत राहा म्हणजे मग नंतर मी तुम्हांला भेटायला येईन. परंतु आता उद्या सकाळी ते मला गोळ्या घालून ठार मारणार आहेत! संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे जेलरकडे जाऊन म्हणाले, ‘सर त्यामधील एकाने पत्नीला व मुलांना परत भेटण्याचं वचन दिल आहे. तो आता ओक्साबोक्सी रडतोय. मी एकटाच आहे. मला बायकोपोरं नाहीत. त्याच्याऐवजी मला मारा पण त्याला जीवनदान दया. जेलर म्हणाला, ‘ठीक आहे’. शेवटी संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांना १४ ऑगस्ट १९४१मध्ये विषाचे इंजेक्शन देऊन ठार मारण्यात आले आणि त्या कैद्याला अभय मिळालं. त्यानंतर रक्तसाक्षी फा. कोल्बे ह्यांना ३३ वर्षांनंतर १० ऑक्टोबर १९८२ मध्ये संत पोप दुसरे जॉन पॉल ह्यांनी संतपदाचा बहुमान दिला.  

No comments:

Post a Comment