Wednesday 10 August 2016

Reflection for the Homily of Twentieth Sunday in Ordinary Time (14-08-2016) By Nevil Govind.




सामान्य काळातील विसावा रविवार

दिनांक: १४/०८/२०१६.
पहिले वाचन: यिर्मया ३८:४-६, ८-१०.
दुसरे वाचन: इब्री १२:१-४.
शुभवर्तमान: लूक १२:४९-५३.


मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हांस वाटते काय?


प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील विसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपणांस ख्रिस्ताचे अनुयायी बनून त्याचा प्रेमाग्नी इतरांपर्यंत पोहचविण्यास पाचारण करीत आहेत.
पहिल्या वाचनात देवाने यिर्मयाद्वारे, सिद्किया राजाला, बाबेलच्या नबूखदनेसर राजाला शरण जाण्यास सांगितले. परंतु देवाची आज्ञा न पाळता तो यिर्मया संदेष्ट्याला त्याच्या सरदारांच्या स्वाधीन करतो. दुसऱ्या वाचनात इब्री लोकांस ह्या पत्राचा लेखक जुन्याकरारातील एबेल पासून तर ख्रिस्त येण्यापूर्वीच्या सर्व श्रद्धावीरांच्या विश्वासाचा मेघ आपल्यावर आहे आणि त्या सर्वांचा आशीर्वाद आपणावर आहे असे म्हणतो. तर शुभवर्तमानात येशू काळाची पूर्तता व न्यायाचा दिवस कसा असणार ह्याविषयी भाष्य करतो.
येशू हा आपल्या विश्वासाचा मूळ गाभा आणि आदर्श आहे. म्हणून त्याच्या विश्वासात अधिक मुळावले जाण्यासाठी आपण ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यिर्मया ३८:४-६, ८-१०.

     संदेष्टा यिर्मयाच्या काळात सिद्किया हा येरुशलेमेचा राजा होता. तो येरुशलेमेतला शेवटचा राजा होता. त्याने, त्याच्या सेवकांनी व देशाच्या लोकांनी यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जी वचने परमेश्वराने सांगितली होती ती ऐकली नाहीत म्हणून देव येरुशलेमेचा नाश करणार होता. त्यात, सिद्किया ह्या शहराचा नाश होऊ नये व त्याचा जीव वाचावा म्हणून देवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे त्याला बाबेलच्या नबूखदनेसर राजाला शरण जाण्यास सांगितले. परंतु तो देवाची आज्ञा पाळण्यास तयार नव्हता. तो देवाला घाबरत नसून आपल्या सरदारांना आणि सैन्यांना अधिक भीत असे. सरदारांच्या सांगण्यावरून तो यिर्मया संदेष्ट्याला त्यांच्या स्वाधीन करतो आणि म्हणतो, “तो तुमच्या हाती आहे आणि राजाला तुमच्या मर्जीविरुद्ध काही करता येत नाही” (यिर्मया ३८:५). सरदारांनी यिर्मयाला नेऊन विहिरीत टाकले. तेव्हा एबद-मलेख हा राजाला त्याच्या सरदारांनी केलेल्या चुकीची जाणीव करून देतो आणि संदेष्टा यिर्मयाचे प्राण वाचवितो.

दुसरे वाचन: इब्री १२:१-४.

आपण एवढ्या मोठ्या साक्षी रुपी मेघाने वेढलेले आहोत
ख्रिस्तपूर्व १६६-१६० या काळात मक्काबी बंधूंनी ग्रीक सत्तेविरुद्ध बंड पुकारले होते. त्या बंडापूर्वी आणि बंडाच्या काळात ज्या अनेक निष्ठावंत ज्यू/ यहुदी लोकांचा छळ झाला होता, त्यांचे साक्ष येथे मांडण्यात आले आहेत. इब्री लोकांस ह्या पत्राचा लेखक ह्या उताऱ्यात जुन्याकरारातील एबेल पासून तर ख्रिस्त येण्यापूर्वीच्या सर्व श्रद्धावीरांची उदाहरणे देतो. ह्या सर्व श्रद्धावीरांचा मेघ आपल्यावर आहे; त्यांच्या विश्वासाचे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि त्या सर्वांचा आशीर्वाद आपणावर आहे असा त्यांचा विश्वास होता.
 येशू विश्वासाचे खरे उदाहरण: लेखक इब्री लोकांस येशू हा आपल्या विश्वासाचा मूळ गाभा व आपला आदर्श आहे म्हणून आपण त्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे असे त्याच्या वाचकांना आवाहन करत आहे.

शुभवर्तमान: लूक १२:४९-५३.

अ)     “मी पृथ्वीवर आग” लावण्यासाठी आलो आहे:
अग्नी ही न्यायाचे चिन्ह आहे असे यहुद्यांचे मानणे होते. पवित्र शास्त्रामधील दिलेल्या खालील ओवी आपणांस ह्याविषयी स्पष्ट बोध करतात: “कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात” (योहान १५:६). तो दिवस ते उघडीस आणील; कारण तो अग्निसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा अग्नीनेच होईल” (१ करिंथ ३:१३). “कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे” (इब्री १२:२७). अग्नीचा दुसरा अर्थ ‘देवाचा आत्मा’ असा होय: “तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील” (लूक ३:१६). म्हणून ख्रिस्त जेव्हा म्हणतो की, “मी पृथ्वीवर आग” लावण्यासाठी आलो आहे” तेव्हा ते गृहीत धरतात की न्यायनिवाडा करण्याची वेळ जवळ आली आहे. अग्नीत खऱ्या धातूची ओळख लागत असते. ख्रिस्ताची शिकवण अग्नीसारखी असून तिच्यातून साधक तावून सुलाखून निघाला पाहिजे, अशी अपेक्षा इथे व्यक्त केली आहे.
ब) मी फूट पाडण्यासाठी आलो आहे: ख्रिस्त म्हणतो, “मी पृथ्वीवर शांतता स्थापण्यासाठी आलो आहे, असे तुम्हांला वाटते काय? नाही. उलट मी फूट पाडण्यासाठी आलो आहे” (लूक १२:५१). जो माझा स्विकार करतो त्याची आणि त्याच्या नातेवाईकांत फूट पडेल. “पाच जणांच्या कुटुंबातील तिघांविरुद्ध दोघे आणि दोघांविरुद्ध तिघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून अशी त्यांच्यात दुफळी निर्माण होईल” (लूक १२:५२-५३). इथे लेखकाने येशूच्या मरणानंतर होणार असलेल्या ख्रिस्ती लोकांच्या पिळवणूकीचे  आणि ख्रिस्ताचा स्वीकार करणाऱ्यांचा छळ येथे कुटुंबाच्या विभागलेल्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे.

मनन-चिंतन:

अग्नीचा/आगीचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. एका बाजूने पाहिले तर अग्नी साहाय्यक आहे पण दुसऱ्या बाजूने पहिले तर ती घातकदेखील आहे. अग्नीचा वापर आपण स्वयंपाक करण्यासाठी, शेकोटीसाठी किंवा वाळलेला कचरा जाळण्यासाठी करत असतो. तीच अग्नी जर स्वयंपाक करताना, शेकोटी पेटवताना किंवा वाळलेला कचरा जाळताना आपल्या कपड्यांना लागली तर कपडे जळून राख होतात. इतकेच नव्हे तर अग्नी अंगाला लागली कि माणसाचा कोळसा होतो व ओळखता देखील येत नाही. आज त्याच आगीचा उपयोग लोक सदुपयोग करण्याऐवजी तीचा दुरुपयोग करतात. तो म्हणजे घर पेटवण्यासाठी, बस, रिक्षा जाळण्यासाठी; मंदिर, मज्जीद आणि चर्चला आग लावण्यासाठी, नवरा/बायको आपल्या बायकोला/नवऱ्याला जाळण्यासाठी, सून सासूला आणि सासू सुनेला जाळण्यासाठी करत असतात.
आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो की, “मी पृथ्वीवर आग लावण्यासाठी आलो आहे”. ह्याचा अर्थ असा होत नाही की, ख्रिस्त ह्या पृथ्वीवर खरोखर आग लावण्यासाठी, पृथ्वी भस्म करण्यासाठी किंवा दोघांमध्ये आग लावण्याचे काम करण्यासाठी आला आहे. तर तो प्रेमाची ज्वाला किंवा प्रेमाची अग्नी घेऊन प्रत्येकाच्या जीवनात, हृदयात आणि कार्यात ती पेटती ठेवण्यासाठी आला होता. ख्रिस्ताची अग्नी प्रामाणिकपणाची, सत्याची, एकनिष्ठतेची, करुणेची, दयेची, आपुलकीची आणि सलोख्याची आहे. ती न्यायाची, शुद्धीकरणाची किंवा नूतनीकरण घडून आणण्याचीपण असू शकते. जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांच्या जीवनात ती अग्नी नूतनीकरण घडवून आणणारी व जीवनाला नवीन प्राधान्य मिळवून देणारी असते. ख्रिस्ताची अग्नी त्यांचा सर्वनाश करत नसून ती कठीण हृदयांना पाझर फोडण्याचे कार्य करत असते.     
लूक सुवार्तीक आजच्या शुभवर्तमानात येशूच्या मरणानंतर ख्रिस्ती लोकांचा होत असलेला छळ आपल्या पुढे कुटुंबाच्या उदाहरणाद्वारे सादर करीत आहे. त्याकाळी असलेली स्थिती आजही आपणास आपल्या काळात बघावयास मिळते. आज जर आपण आपल्या समाजात पाहिलं तर आपल्याला प्रत्येकाच्या कुटुंबात वादविवाद, भांडणे, बळी घेणे किंवा घराची विभागणी करणे ही परिस्थिती आढळून येते. तिघांविरुद्ध दोघे किंवा दोघांविरुद्ध तिघे, मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून अशी दुफळी पडलेली दिसून येते. ख्रिस्त ह्या जगात दुफळी पाडण्यासाठी आलेला नव्हता तर तो प्रेमाचा, करुणेचा, दयेचा, आपुलकीचा, ऐक्याचा आणि सलोख्याचा संदेश ह्या जगताला देण्यासाठी आला होता. ज्याने इतरांचे भले केले, तो कुणाचे वाईट का करणार? ज्याने इतरांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली तो दुसऱ्याचा प्राण का घेणार? ज्याने आपल्या पापांसाठी क्रुसावर दु:ख सहन केले तो दुसऱ्यांना दु:ख का देणार?
येशू आजच्या कुटुंबातील झालेली परिस्थिती पाहून आपणा प्रत्येकाला सांगत आहे की, तुम्हीं ‘पृथ्वीवर, एकमेकांत, इतरांत किंवा कुणाच्याही कुटुंबात आग लावू नका तर माझ्या प्रेमाची ज्योत आपल्यात आणि इतरांत पेटती ठेवा. स्वतःचे कुटुंब बनवा त्यात फोड करु नका. इतरांचे भले करा आणि इतरांना प्रेमाच्या अग्नीने जिंका. असिसिकर संत फ्रान्सीस म्हणतात की,
“हे प्रभो, मला तुझ्या शांतीचे साधन बनव.
जेथे द्वेष आहे, तेथे मला प्रेम पेरू दे,
जेथे दु:खावलेली मने आहेत, तेथे मला क्षमा करू दे,
जेथे संशय आहे, तेथे विश्वास निर्माण करू दे,
जेथे वैफल्य आहे, तेथे आशा निर्माण करू दे,
जेथे अंधार आहे, तेथे प्रकाश निर्माण करू दे,
जेथे दु:ख आहे, तेथे आनंद निर्माण करू दे,
हे दिव्य स्वामी, मला अशी कृपा दे की,
सांत्वनाची अपेक्षा करण्याऐवजी मीच सांत्वन करावे.
इतरांनी मला समजून घेण्याऐवजी, मीच त्यांना समजून घ्यावे.
इतरांनी माझ्यावर प्रेम करण्याऐवजी, मीच त्यांच्यावर प्रेम करावे.
कारण प्रेम करण्यातच, आम्ही प्रेम मिळवत असतो.
क्षमा करण्यातच आम्हांला क्षमा होत असते आणि मरणातच आम्ही चिरंतन जीवनात जन्मत असतो.
आज प्रत्येकाने जर वर असिसीकरच्या संत फ्रान्सीसने म्हटल्याप्रमाणे केले तर सर्व ठिकाणी आपणांस द्वेषाची अग्नी सर्वांना भस्म करीत असताना किंवा उध्वस्त करीत असल्याचे आढळणार नाही. सर्व ठिकाणी प्रेमाच्या अग्नीचा भडका पेडलेला दिसेल आणि लोक सलोख्यात राहतील. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे ख्रिस्ता, तुझा प्रेमाग्नी आमच्या हृदयात नेहमी पेटता ठेव.
१. ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, व्रतस्थ व इतर सर्व मिशनरी बंधू-भगिनींना देवाचे कार्य करण्यास कृपा व प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील व राज्यातील सरकारने चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करावी व नि:स्वार्थीपणे कार्य करण्यास त्यांना परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाच्या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यात अनेक बेघर तर काहींनी आपल्या आप्तेष्टांना गमावले आहे अशा ह्या आपल्या देशबांधवांचे परमेश्वराने सांत्वन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेले आहेत, जे व्यसनाच्या आहारी गेले आहेत, ज्यांना नोकरी नाही, अशा सर्वांना प्रभूने त्याच्या प्रकाशात आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक आजारी आहेत, दु:खी व कष्टी आहेत, ज्यांचं ह्या जगात कुणीच नाही व जे जीवनाला कंटाळले आहेत अशा सर्वांवर देवाचा कृपाशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment