सामान्य काळातील तिसावा रविवार
दिनांक: २९/१०/२०१७
पहिले वाचन: निर्गम
२२:२०-२६
दुसरे वाचन: १
थेस्सलनीकाकरांस १:५-१०
शुभवर्तमान: मत्तय
२२:३४-४०
“देवावर व एकमेकावर प्रीती-प्रेम करणे.”
प्रस्तावना
सामान्य काळातील तिसाव्या रविवारच्या
उपासनेचा मुख्य मुद्दा आहे “देवावर व एकमेकावर प्रीती-प्रेम करणे.” वि. स. खांडेकर
म्हणतात, “प्रेम योगावर करावे, प्रेम भोगांवर करावे व त्याहुनी अधिक प्रेम
त्यागावर करावे.” त्यागावर केलेले प्रेम, प्रीती महत्वाची असते जी येशूने आपल्यावर
केली. त्याचं आपल्यावरील प्रेम एवढं त्यागमय होते की त्यांनी आपल्या प्रेमाखातर
क्रुसाचे त्यागमय मरण स्वीकारले.
आजच्या मिस्सात सहभागी होत असताना आपण
आपल्यालाच प्रश्न विचारू या की माझं देवावरील व एकमेकावरील प्रेम कोणत्या स्वरूपाच
आहे? माझ्या प्रेमात मी, माझं स्वार्थीवृत्तीचा कलह लागलेला आहे का? येशू सारखी
देवावर व इतरांवर प्रीती करण्यासाठी शक्ती व ताकद प्रेमाचा उगम व सागर ह्याच्या
कडून मागूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: निर्गम
२२:२०-२६
आजचे पहिले वाचन निर्गम ह्या पुस्तकातून
घेतलेले आहे. मिसर देशातून परत आलेल्या इस्रायली प्रजेला देव संदेश देत आहे.
त्यांनी देवाचाच मान राखावा व त्याच्याशिवाय इतर दैवतांना बली अर्पण व प्रार्थना
भेटू नये म्हणजे ते एकाच देवावर विश्वास ठेऊन त्याच्यावर फक्त प्रेम करतात असं
म्हणता येईल.
विधवेचा, परक्याचा व पोरक्यावर खरी खुरी
प्रीती करणे म्हणजे देवावर प्रीती करणे असं होईल व जर त्यांनी गाऱ्हाणे केली तर
त्याची प्रार्थना देव ऐकेल कारण तो त्याचा देव आहे.
दुसरे वाचन: १
थेस्सलनीकाकरांस १:५-१०
आजचे दुसरे वाचन संत पौलाचे थेस्सलनीकाकरांस ह्या
पत्रातून घेतले आहे. हे पौलाचे पहिले पत्र मानले जाते. ह्या पत्रात पौल ख्रिस्ती
बांधवाची वागणूक कशी प्रशांसनीय आहे ह्याचे विवेचन करतो. विशेष करून त्याचे आभार
मानतो कारण त्यांनी संकटकाळी आनंदाने देवाचे वचन स्वीकारले व प्रभूचे अनुकरण केले.
देवावर व इतरांवर प्रीती करणे म्हणजेच आपल्या जीवनाद्वारे इतरांना आदर्श घालून
देणे.
शुभवर्तमान: मत्तय
२२:३४-४०
शुभवर्तमानात मत्तय सर्वात मोठी आज्ञा कोणती
ह्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. शास्त्र्यांनी खरोखर देवावरील व एकमेकावरील प्रीती
अशी असावी हे जाणण्यासाठी हा प्रश्न केला होता का? शास्त्र्यांचा प्रश्न कशासाठी
असावा. परंतु थोडक्या शब्दांत येशूने केवळ त्यांना नाही तर अखिल मानव जातीला
देवाच्या व इतरांवरील प्रेमाविषयी महान अशी शिकवण दिली.
बोधकथा
गुरु व
शिष्य ह्यांच्यात संवाद चालला होता. संवादाचा विषय होता “देवाचे प्रेम सर्वाहून
महान की इतरांवरील.” गुरु म्हणाले देवाने सर्व काही निर्माण केले म्हणून त्याचे
जगावरील प्रेम महान आहे; तर शिष्य म्हणाला देवच प्रीती आहे म्हणून तो महान. पुढे
गुरु म्हणाला देवाने मानवाच्या प्रेमाखातर मानवाला निर्माण केले म्हणून त्याचे
प्रेम महान. शिष्य म्हणाला पण मनुष्य जर इतरांवर प्रीती करत नसेल तर तो ढोंगी. देव
अदृश्य तर मनुष्य दृश्य. दृश्य मानवावर मानव प्रेम करत नसेल तर अदृश्य देवावर तो
कसा करील.
असे गुरु-शिष्यांचे सवांद पुढे चालूच राहिला.
त्यांना कळत होते की देवाच प्रेम महान असलंच पाहिजे. अनेक तर्क विर्तक निघत असताना
त्याच वाटेवरून एक वयोवृध्द मनुष्य जात होता. त्यांनी त्याला “देवाचे प्रेम महान की
इंतराचे”. त्यावर स्मित हास्य करून मनुष्य म्हणाला, तुम्हा गुरु-शिष्यांना प्रेमा
विषयी काय कळते. आपण तर मठवासी आहात, प्रेमाविषयी खूप वाचता, बोलता पण प्रत्यक्षात
अनुभवाचे उणे आहात. ते बोलायचं नसत, वाचायचं नसत तर अनुभवायच असत आणि घ्यायच असंत.
पुढे त्याने त्यांना सागितले की ४० वर्षा
अगोदर मी देवाला देवळात जावून एकमेंकाला वचन दिले होते, “सुखात व दुःखात मी
तुझ्यावर प्रेम करील”. ते वचन मी माझ्या पत्नीला दिले नव्हते तर देवालाच.
माझ्या जीवनातील सुखात आणि दुःखात मी देवावर
प्रेम करतो. तेव्हा गुरु व शिष्य त्यांना म्हणाले: हे कसे? त्यावर ती व्यक्ती
म्हणाली, माझ्या लग्नानंतर आमच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून आम्हाला मुले झाली.
आनंदी व प्रीतीच जीवन जगत असताना माझ्या पत्नीच्या किडणी बंद झाल्या. तिला बर
करण्यासाठी मी देवळो-देवळी जावून पैसे
गोळा केले, प्रार्थना केली, सकाळी उठून दररोज तिला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये
गेलो. पण माझी पत्नी मरण पावली. तिच्या प्रेमाखातीर जे काही शक्य होते ते केले,
विविध प्रकारचा त्याग केला. होय शारिरीक रुपात ती मेली पण अजून ती माझ्या बरोबर आहे,
अवती भवती आहे. कारण प्रीती अमर आहे, प्रीती देव आहे, ती केल्याने, दिल्याने
अनुभवल्याने वाढत जाते. त्याला तुम्ही सुशिक्षीत माणसं अनेक उपमा वापरता मात्र
आम्ही साधी तिला आपलं करून घेतो.
मनन चिंतन
आजच्या
जगात प्रेम, प्रीती हे एक नाटक बनून राहिले आहे. ती बाजारात विकली जात आहे. तरुण
तरुणीला माझ महत्व कळल नाही आहे. ते काही क्षणापुरता माझा वापर करतात, माझ्या
नावाने अनेक सोंगे घेतात, आवाका आणतात. वादळ वाऱ्यात मी त्याच्या अगदी जवळ असते हे
ते विसरून जातात. काच पडून फुटताना, ठिकऱ्या उडताना मीच जवळ असते, पायात काचा रुतताना
रक्त भळभळ वाहताना मीच जवळ असते, भळभळणारे घाव बांधायला, डोळ्यातले अश्रू पुसायला
मीच जवळ असते.
माझ्या विषयी खूप बोलतात, लिहितात, वाचतात पण
प्रत्येक्ष माझा अनुभव घेत नाहीत व देत नाहीत. माझ्यावर प्रेम करणारी थोडीच आहेत. जेव्हा
ती उपऱ्यावर जुलूम करतात, त्याना छळतात तेव्हा मी तिथे नसते. आज रोहिण्या ह्या
ठिकाणी उपऱ्यावर जुलुम होत नसून माझाच छळ होत आहे. माणसाच्या हदयात मी वसती बध्द
असून देखील मला उपऱ्यावर टाकत आहे. माझा विधवेमध्ये व पोरक्यामध्ये छळ होत आहे.
त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे पती व बाप मरण पावले आहेत. ती माझ्याकडे गाऱ्हाणे
करीत आहेत. मी प्रीती आहे त्यामुळे मी त्याचे गाऱ्हाणे ऐकतो. जेव्हा त्यांना त्रास
होतो तेव्हा माझा राग भडकतो. जेव्हा माझे बालके उघडे नांगडे असतात व त्यांना
पांघरून घातले जात नाही तेव्हा माझी सहनशीलता भंग पावते. मी खरोखर कगांलाची,
विधवेची, पोरक्याची व उपऱ्याची आहे.
मला तुमचा अभिमान वाटतो. जेव्हा माझी प्रीती
पवित्र्य आत्म्याद्वारे आपल्या मध्ये ओत पोत वसती करत असते तेव्हा तुम्ही देवाची
वचने संकट काळी आनंदाने स्वीकारता. संकटकाळी मी तुमच्या व इतरांबरोबर असते. आपण
प्रभूचे अनुकरण करतो म्हणजे माझे अनुकरण करता कारण प्रभू प्रीती आहे. देवाने एवढी
आपल्यावर प्रीती केली की त्याने मला आपल्यासाठी पाठविले. तुम्ही माझा आदर्श दुसऱ्यांना
झाला आहात कारण मी तुम्हांमध्ये आहे
तुम्ही मला प्रकट करत आहात.
माझ नाव दुसर तिसर कोणी नसून प्रेम आहे. तू
माझ्यावर खऱ्या अंतःकरणातून, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रेम, प्रीती कर. मला
अनेक नावाने संबोधले जाते पण माझे नाव केवळ दोन शब्द आहे त्याला तुम्ही प्रेम व
प्रीती म्हणता. तुम्ही ती आज्ञा म्हणून समजता पण ते माझा नाव आहे माझ सर्वस्व आहे.
जेव्हा तुम्ही माझी
प्रेम प्रीती इतरांना दाखविता तेव्हा आपले सबंध जवळचे, घनिष्ट असतात. कारण मी उपरी,
विधवेत, परक्यात आणि पोरक्यात जास्त वावरत असते. दुखी कपटी भाराक्रांत जनाकडे आपण
धाव घेता तेव्हा तुम्ही माझ्याकडे धाव घेता कारण मी त्याच्यामध्ये असते. ते माझे
आहेत आणि त्याचं माझ्यावर आणि माझं त्याच्यावर अतूट असं नात आहे. आम्ही एकमेकांशी
एकनिष्ठ आहोत आम्हाला विभागू नका देवाचं व इतरांच असं करू नका. देवाठायी असलेली मी
दुसऱ्याठायी देखील वावरत असते. मला अनुभवा, जाणून घ्या कारण मी प्रीती-प्रेम आहे.
विश्वासु लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्यावरील आमच्या प्रीतीत वाढ
कर.
१. जे परमेश्वराच्या मळ्यात काम करत आहेत, त्या
सर्वांनी प्रभूच्या मार्गाची घोषणा करून प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी लोकांना
मदत करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या सर्व राजकीय
नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून तसेच भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग
सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आजच्या उपासनेमध्ये
सहभागी झालेल्या सर्व भाविकांस शेजा-यांवर प्रीती करण्यास व आपले प्रेम इतरांना
देण्यास प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून, आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक देवापासून दूर
गेलेले आहेत अशा सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व देवावरील त्यांचा
विश्वास अधिक बळकट व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या कौटुंबिक व
सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.