Reflections for the homily of First Sunday of Advent (03-12-2017) By: Br Cedrick Dapki.
आगमन काळातील पहिला रविवार
दिनांक: ०३-१२-१७
पहिले वाचन: यशया ६३:१६ब-१७, ६४:२ब-७
दुसरे वाचन: १ करिंथ १:३-९
शुभवर्तमान: मार्क १३:३३-३७
“जागृत रहा कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही”
प्रस्तावना:
आज पासून ख्रिस्तसभा आगमन काळाला सुरुवात करीत आहे. आगमन काळ म्हणजे प्रभू ख्रिस्त येण्याचा काळ. म्हणून आजची उपासना आपणास जागृत राहून प्रभू येशूच्या आगमनाची आतुरतेने व पूर्ण तयारीने वाट पाहण्यास आमंत्रित करीत आहे.
यशयाच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की इस्रायल लोक हे बाबिलोनच्या बंदिवासातून मुक्त होऊन देवाची स्तुती गातात व आपल्या अपराधांची कबुली देऊन आपले तारण व्हावे म्हणून देवाला विनवणी करतात. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस उद्देशून म्हणतो की प्रभूच्या कृपेमुळे तुम्हांमध्ये भरभराट झाली आहे आणि हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. मार्कलिखित शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त हा आपणास सावध राहण्यास सांगत आहे, कारण तो कोणत्या घटकेस येणार हे कुणास ठाऊक नाही.
आजच्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण आपल्या पापांची आठवण करूया आणि ह्या आगमन काळात आपण सदैव जागृत राहून आपल्याला प्रभूच्या आगमनासाठी योग्य ती तयारी करता यावी म्हणून प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ६३:१६ब-१७, ६४:२ब-७
यशया संदेष्टा आपणास सांगत आहे की प्रभू देव हा आपला स्वर्गीय पिता आहे. कारण जेव्हा इस्राएल लोक हे बाबिलोनच्या बंदिवासात होते तेव्हा त्यांची सुटका करणारा हा प्रभू होता आणि हाच प्रभू आपल्या लोकांना वाचवण्यासाठी व त्यांचे जीवन चांगले बनवण्यासाठी इस्राएलात परत येणार होता.
यशया संदेष्टा धरणी कंप, आवाज, वारा, वादळ आणि अग्नी अशा नैसर्गिक बाबींचा उल्लेख करून प्रभूच्या येण्याचे संकेत देतो. इस्राएली लोक सुद्धा अशा ह्या उल्लेखाने आनंदीत आहेत कारण धरणी कंप हा देवाची उपस्थिती दर्शवितो (निर्गम १९:१८). ह्याचा अर्थ असा की जेव्हा इस्राएल लोक देवाचा धावा करतील किंवा विलाप करतील तेव्हा प्रभू हा धरणी कंपाच्या रुपात त्यांच्या समोर प्रकट होईल. हे खरे आहे कारण यशया हा अध्याय ६४ मध्ये सांगतो की जो कोण प्रामाणिकपणाचे जीवन जगतो, देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो व त्याचा धावा करतो त्यांच्याबरोबर देव नेहमी असतो.
दुसरे वाचन: १ करिंथ पत्र १:३-९
संत पौल करिंथकरास सांगतो की प्रभूद्वारे तुम्हांस खूप काही चांगली दाने भेटली आहेत. ह्या दानांचा चांगला वापर करा कारण ही दाने तुम्हांला प्रभूच्या प्रेमामुळे भेटली आहेत. ही दाने तुम्हांस प्रभू येशू ख्रिस्त परत येई पर्यत आधार व शक्ती देणार कारण प्रभूचा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहे.
शुभवर्तमान : मार्क १३:३३-३७
शुभवर्तमानात प्रभू येशू आपणास सावध राहण्यास व सदैव तयारीत राहण्यास सांगत आहे. जागृत राहणे किंवा सावध राहणे हा ख्रिस्ताचा एक महत्वाचा मुद्दा होता. कोणतीही गोष्ट ही सावध राहून किवा जागृत राहून करणे महत्वाचे आहे. येशू ख्रिस्त नेहमी आपणास जागृत राहण्यास का सांगत आहे? कुणासाठी जागृत राहावे? व कशासाठी जागृत राहावे? ह्या सर्वांचे उत्तर फक्त येशू आहे. कारण येशू ख्रिस्त स्व:ताच्या येण्याची वाट पाह्ण्यासाठी आपणा सर्वांना जागृत राहण्यास सांगत आहे.
सावध व जागृत कसे राहावे हे स्पष्ट करण्यासाठी प्रभू एका व्यक्तीचा दाखला देतो, ज्यामध्ये तो त्यांचे घर कामगाराच्या हातात सोपवून त्याच्या प्रवासाला निघतो. परंतु तो कधी परत येईल हे कुणास ठाऊक नाही म्हणून त्याच्या कामगारांनी नेहमी सावध राहणे महत्वाचे होते.
येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वर्गीय पित्याकडे जाण्या अगोदर शिष्यास व आपणा सर्वांना एक कामगीरी सोपवली. तो परत येणार व नक्कीच येणार हे त्याने स्वत:हा सांगितले. परंतु, तो कधी येणार हे आपणास त्याने कधीच सांगितले नाही (मत्तय १६ :२७) का ? कारण आपण त्याचे स्वागत करण्यासाठी नेहमी जागृत व तत्पर असलो पाहिजे.
मनन चिंतन :
आगमन म्हणजे एखादी व्यक्ती येणे किंवा एखादी गोष्ट येणे होय. अशा व्यक्तीची व गोष्टीची आपण आतुरतने वाट पाहत असतो. कारण त्यांचे आगमन आपल्याला आनंद, सुख व शांती देते.
ख्रिस्तसभा आज पासून आगमन काळाला सुरुवात करत आहे. आगमन काळ म्हणजे प्रभू येशू येण्याचा काळ. ह्या काळाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. आणि ह्या काळात आपण येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत आहोत. ह्या दिवसा पासूनच आपण नाताळ सणाची तयारी करीत असतो. खरेदी कुठली करावी, पदार्थ कोणते बनवावे, गाईचा गोठा कसा करायचा, चांदनी कशी बनवायची ह्या सर्वांकडे आपले जास्त लक्ष असते. परंतु, ह्या सर्व तयारी मध्ये आपले महत्वाचे कार्य किंवा महत्वाची तयारी राहून जाते आणि ती म्हणजे आपली अंत:करणाची तयारी.
येशूच्या आगमनाची वाट पाहणे म्हणजे आपली आध्यात्मिक तयारी करणे व अंतःकरण शुद्ध ठेवणे होय. आपल्या आत्म्याने ख्रिस्ताला स्वीकारावे म्हणून आपण जागृत राहिले पाहिजे. ह्या आगमन काळात आपला आत्मा किंवा हृद्य तयार केले पाहिजे कारण येशू कधी येईल आणि आपला आत्मा घेऊन जाईल हे आपणास ठाऊक नाही. हाच आजच्या पहिल्या रविवारचा उद्देश आहे की सर्वांनी स्वत:हाच्या आत्म्याची तयारी करा आणि जेव्हा आपण आपल्या आत्म्याची चांगली तयारी करू तेव्हाच येशू ख्रिस्ताची उत्तम अशी भेट ह्या नाताळच्या दिवशी होईल.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
आपला प्रतिसाद: हे प्रभू, तुझे स्वागत करण्यास आमचे अंतःकरण शुद्ध ठेव.
१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप, बिशप्स, सर्व धर्मगुरू, व धर्म बंधू-भगिनी ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषविण्याची जबाबदारी सोपवली आहे. ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. प्रभू येशूच्या आगमनासाठी आम्ही सदैव तत्पर असावे, पापापासून मुक्त राहून ख्रिस्ताच्या आगमनाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यास पात्र ठरावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
३. जे लोक देऊळमाते पासून दुरावलेले आहेत व पापांच्या अंधारात खितपत पडलेले आहेत, अशा लोकांना प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास त्याची शक्ती व सामर्थ्य मिळावे आणि त्यांना आपल्या अपराधांची जाणीव व्हावी, म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. ह्या आगमन काळाची सुरुवात करत असताना आपण सर्वांनी ख्रिस्ताचे रूप गरीब, अपंग, लुळे, व बहिरे ह्या सर्वांमध्ये पाहावे व त्यांना त्यांच्या दु:खात व संकटात मदत करावी, ह्यासाठी लागणारी कृपा परमेश्वर चरणी मागुया.
५. चैनबाजी, अहंकार किंवा आनंद म्हणजे शाश्वत जीवन नाही, ह्याची जाणीव आम्हांला व्हावी व अशा मोहापासून आम्ही दूर रहावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
६. आपला प्रभू सर्व जगाचा दया-सागर आहे, तो आपल्या विनंत्या ऐकतो म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी ठेऊ या.