Thursday, 29 November 2018


Reflection for the Homily of 1st Sunday of Advent 
(02-12-18) By Br. Rahul Rodrigues






आगमन काळातील पहिला रविवार

दिनांक :- २/१२/२०१८
पहिले वाचन :- यिर्मया : ३३:१४-१६
दुसरे वाचन :- १ थेस्सलोनिकरांस : ३:१२-४:२
शुभवर्तमान :- लुक : २१: २५-२८,३४-३६



तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे

प्रस्तावना

    आजपासून ख्रिस्तसभा आगमन काळाला सुरवात करीत आहे. आगमन काळ म्हणजे ख्रिस्त येण्या पूर्वीचा काळ. ह्या काळात देऊळमाता आपल्याला प्रभू येशूला नव्याने स्विकारण्यासाठी  आपल्या अंत:करणाची तयारी करण्यास बोलावीत आहे.
    आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता यिर्मया सांगतो कि, परमेश्वर इस्त्राईल लोकांना, दाविदाचा पुत्र ‘मसीहा’ ह्याचा जन्माचे अभिवचन देत आहे. तर दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलोनिकरांस चांगले व पवित्र जीवन जगण्यास आवाहन करीत आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला सदैव जागृत राहण्यास सांगत आहे.
 काही दिवसातच येशू जन्मास येणार आहे व आपल्याला सर्व प्रकारच्या बंधनातून आणि पापातून मुक्त करणार, त्यासाठी आपण सदैव जागृत असावे म्हणून आजच्या या पवित्र मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन :- यिर्मया : ३३:१४-१६

    आजचे पहिले वाचन एक आशेचा किरण दाखवत आहे. व या वाचनात प्रवक्ता यिर्मया इस्त्राएलच्या लोकांसाठी एक आशेचा किरण घेऊन येत आहे. परमेश्वराने इस्त्राईल लोकांना त्याच्या तारणाऱ्याबद्दल बऱ्याच वेळीस सांगितले होते, व ते पूर्णत्वास येण्याची वेळ जवळ आलेली आहे असे आपल्याला दिसून येते. दाविदाच्या घराण्यात असा एक नवा राजा उदयास येईल, जो अगदी दावीद राजापेक्षा महान असेल. (देव आमची धार्मिकता हे त्याचे नाव मूळ हिब्रूमध्ये ‘सिद्धाकीया’ नावाशी जुळणार आहे.) हा राजा सत्याने, न्यायाने जीवन जगेल व त्याला दाविदाचा वंशज असे संबोधिले जाईल.

दुसरे वाचन :- १ थेस्सलोनिकरांस : ३:१२-४:२

    थेस्सलोनीकर प्रीतीने भरलेले होते. हे पौलाने ऐकले होते. ती प्रीती प्रचंड प्रमाणात वाढावी व सर्वांपर्यंत पोहोचावी अशी प्रार्थना पौल करतो. विश्वासू लोकांच्या जीवनात ख्रिस्ताची प्रीती असावी अशी पौलाची प्रार्थना होती.
    पुढे पौल त्यांना म्हणतो, तुम्ही पापविरहित असे नाही तर स्वःताला शुद्ध व स्वच्छ राखत जावे म्हणजे पाप घडले तर लगेच कबुल करून देवापासून शुद्धता मिळवावी व प्रभूला स्विकारण्यासाठी सदैव तयार राहावे.

शुभवर्तमान:- लूक २१:२५-२८, ३४-३६  

या वाचनात प्रभू येशूने या जगावर देवाचा क्रोध होईल त्या समयी काय काय घडेल ते सांगितले आहे. या घटनांचे सविस्तर वर्णन प्रगटीकरण ६-१८ यां अध्यायांत आढळते. त्याकाळी जगावर अनिष्टे कोसळतील आणि मग ख्रिस्त आपल्या वैभवाने येईल. तो येरुशलेमेत आपले राज्य स्थापील व सर्व जगावर राज्य करील. तेव्हा इस्राएल लोक येशू हाच मसीहा आहे हे ओळखतील.
पुढे प्रभू येशू आपल्या शिष्यांना सदैव जागृत राहून प्रार्थना करावयास सांगत आहे. कारण ख्रिस्ताचे येणे हे अकस्मात होईल.

बोधकथा:-

एका छोट्याश्या गावात युदोक्सिया नावाची तरुणी राहत होती. गावातले सर्व लोक तिच्या सौंदर्याची स्तुती करत होते. ज्याप्रमाणे तिची स्तुती करत होते, त्याप्रमाणे तिच्या पापमय जीवनाबद्दल तिला दोष देत असत. सौंदर्यासाठी नावाजलेल्या ह्या तरुणीचे समजातील प्रतिमा पापी जीवनामुळे मलीन झाली होती.
एके दिवशी हि तरुणी आपल्या घरात विश्रांती घेत होती. इतक्यात तिने आवाज आपल्या घरात एका मठाचा आवाज ऐकला. युदोक्सिया आवाज ऐकून थोडी घाबरून गेली व आपले कान त्या आवाजाकडे लावून स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिला कळून आले की, मठवासी नरकाच्या अग्नी विषयी वाचत होता. नरकात होणाऱ्या शिक्षेविषयी जेव्हा तिला कळले, तेव्हा ती खूप घाबरली. तिला काही झोप लागली नाही. ती स्वतःला प्रश्न विचारू लागली, की मी एक पापी स्त्री आहे व पाप केल्यामुळे मला नरकाच्या अग्नीत शिक्षा भोगावी लागणार. पण ही तरुणी, ह्या विचारात न राहता दुसऱ्या दिवशी लवकर उठून धर्मगुरूकडे पापनिवेदनासाठी जाऊन आपण केलेल्या सर्व पापांची कबुली देते. खऱ्या अंतःकराणातून प्रायश्चित करून घेते ब त्या दिवसापासून चांगले व नवीन जीवन जगण्याचा प्रयत्न करते.
एकेकाळी युदोक्सियाने तिच्या पापामुळे तिचे नाव खराब केले होते. पण आज ती पवित्र व चांगले कृत्य करून जीवन जगण्यास सुरवात केली. तिच्या या जीवनामुळे ती दुसऱ्यांसाठी आदर्श बनली व ती युदोक्सिया दुसरी तिसरी कुणी नसून ती आज आपल्या कॅथोलिक ख्रिस्तसभेत संत युदोक्सिया नावाने ओळखली जाते.

मनन चिंतन

आजपासून सुरवात होणाऱ्या आगमन काळात येशूला आपल्या हृदयात स्विकारण्यासाठी आपण आपली तयारी केली पाहिजे.
जुन्या करारात आपण पाहतो की प्रवक्त्यांनी भाकीत केल्या प्रमाणे इस्त्रायली लोकांनी त्यांचा तारणाऱ्याला स्विकारण्यासाठी तयारी केली होती. आजच्या शुभवर्तमानात येशू घडून येणाऱ्या भयानक अश्या गोष्टीविषयी म्हणत आहे. परंतु जेव्हा अश्या गोष्टी घडून येतील तेव्हा जे खरे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांना भिण्याची कसलीच गरज नाही व जे वाम मार्गावर आहेत त्यांना जवळ आणणे हे आपले कर्तव्य आहे. पुढील तीन मुद्द्याप्रमाणे आपण ख्रिस्ताला स्विकारण्यासाठी तयारी करायला हवी.
१. आपण ख्रिस्तासमोर ताठ मानेने उभे रहायला पाहिजे.
जेव्हा भयानक गोष्टी घडून येतील तेव्हा जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना भिण्याची काहीच गरज नाही परंतु जे ख्रिस्तापासून दूर आहेत त्यांना ख्रिस्ताजवळ येण्याची गरज आहे. खुद्द येशू म्हणतो की, तुमच्या डोक्याचा एका केसाचाही नाश होणार नाही (लूक २१:१८). जगाच्या अंतापर्यंत आपण ख्रिस्तावर अवलंबून जगण्याची गरज आहे. कारण ख्रिस्त हाच आपला एकमेव तारणारा आहे. तोच आपले तारण करील. त्यामुळे जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा आपण ताठ मानेने आनंददायक अपेक्षेने त्याचा समोर उभे राहणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे स्तोत्रकार म्हणतो की, “ते वाकून खाली पडतील परंतु आम्ही तर ताठ उभे राहू” (स्तोत्रसंहिता २०:८) येशूच्या पुन्हा येण्याचा काळ हा आपल्यासाठी विजयाचे एक प्रतिक आहे.
२. आपण प्रामाणिकपणे जगलो पाहिजे.
ख्रिस्ताला स्विकारण्यासाठी तयारी करण्यासाठी योग्य उपाय म्हणजे प्रामाणिक जीवन होय. प्रामाणिकपणे जीवन म्हणजेच आपली सर्व कामे व्यवस्थितरीत्या करणे. देव आपल्या कडून मोठ्या कामाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणाची अपेक्षा करत असतो. येशू ख्रिस्त जर एखाद्या गोष्टीचा निषेध करत असेल तर ते म्हणजे आपल्या कठोर मनाचा. जेव्हा आपण आपले मन कठोर करतो तेव्हा आपण देवाचे ऐकत नाही. आपण फारो प्रमाणे कठोर होता कामा नये. जेव्हा फारोने त्याचे मन कठोर केले तेव्हा त्यांनी इस्त्रायली लोकांना जाण्यास नकार दिला. परंतु आपण आपले मन कठोर न करता पवित्र आत्म्याच्या सुचनेसाठी आपले अंतःकरणे उघडिले पाहिजे तेव्हाच आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागू.
३. आपण सतत प्रार्थना करायला हवी.
प्रार्थना हा ख्रिस्ती लोकांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. आपण ख्रिस्ताला व संतांना अनुसरून प्रार्थना करणे गरजेचे आहे. येशूने आपल्या जीवनात सतत प्रार्थना करून तो आपल्या पित्याशी एकरूप राहिला. त्याने आपल्या शिष्यांना आमच्या बापाही महान अशी प्रार्थना शिकवली. आपणही येशुप्रमाणे नेहमी प्रार्थना करणे गरजेचे आहे. प्रार्थनेमुळे आपण देवाच्या अधिक जवळ जातो व आपले जीवन तेजोमय बनते. शुभवर्तमानात नमूद केल्याप्रमाणे जेव्हा अश्या भयानक गोष्टी घडून येतील तेव्हा जर आपण प्रार्थनेत येशूच्या सानिध्यात असलो तर आपल्याला भिण्याची काहीच गरज नाही.
येशू जन्माचा काळ जवळ येत आहे व त्याला स्विकारण्यासाठी आपण एक चांगले, प्रामाणिक जीवन जगून प्रार्थनेच्या सहाय्याने येशूला स्विकारण्यासाठी आपली तयारी करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद:- हे प्रभो, तुझ्या ह्या पापी लोकांची प्रार्थना ऐक.

१) आगमन काळात आपल्या मनाची व अंतःकरणाची तयारी करून घेणारे आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व प्रापंचिक ह्या सर्वांना परमेश्वराची कृपा, आशीर्वाद मिळून ख्रिस्ताला स्विकारण्यासाठी आपली अंतःकरणे तयार करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 
२) आगमनकाळ म्हणजे ख्रिस्ताच्या येण्याचा काळ. या आगमनकाळात आपण प्रत्येकाने आपल्या हृदयाची झडती घेऊन आपल्यामध्ये असलेले वाईटगुण टाकून ख्रिस्ताला आपल्या हृदयात जागा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 
३) समाजातील अशांती, हेवा, राग व भांडण यामुळे कुटुंब दुभावत आहेत. त्यामुळे मुलांवर वाईट परिणाम होत आहे. अश्या कुटुंबावर देवाचे, प्रेम व शांती सतत राहावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) काही तरुण-तरुणी तसेच ख्रिस्ती लोक देवापासून व देऊळमातेपासून दूर गेले आहेत. अशा व्यक्तींना ख्रिस्ताचे मार्गदर्शन मिळून परमेश्वराचा स्पर्श लाभावा व देवापासून दूर गेलेल्या व्यक्तीनी पुन्हा देवाजवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 
  ५) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक गरजासाठी देवाकडे प्रार्थना 
  करूया.
   
  


Thursday, 22 November 2018


Reflections for the homily of Solemnity of Christ the King 
(25-11-2018) by: Br. Lipton Patil.





ख्रिस्त-राजाचा सण

दिनांक : २५/११/२०१८
पहिले वाचन : दानिएल :- ७:१३-१४
दुसरे वाचन : प्रकटीकरण :- १:५-८
शुभवर्तमान : योहान :- १८:३३-३७




ख्रिस्त राजाचे राज्य अविनाशी आहे.

प्रस्तावना :
घरा, घरा जा...आणि ख्रिस्त राजाची सुवार्ता पसरवा.
    आज संपूर्ण देऊळ माता ख्रिस्त-राजाचा सण साजरा करीत आहे. तसेच आजचा सामान्य काळातील ३४ वा रविवार असून सामान्य काळातील हा शेवटचा रविवार आहे. आजच्या तिन्ही वाचनातून आपल्या निदर्शनास येते कि, ख्रिस्त हा एक अनंत काळाचा राजा आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. पहिल्या वाचनात संदेष्टा दानिएल ख्रिस्ताच्या विजयोत्सवाची घोषणा सहा हजार वर्षापूर्वीच करून घेतो. दुसरे वाचन प्रकटीकरणाच्या पुस्तकातून घेतलेले आहे. या वाचनात ख्रिस्ताला राजाचा राजा व प्रभूचा प्रभू म्हटले आहे. तर योहानकृत शुभवर्तमानात येशू युगान-युग राज्य करणारा राजा आहे असे सांगितले आहे. येशूला प्रभू ख्रिस्त, देवपुत्र, तारणकर्ता, रक्षणकर्ता अशा अनेक आध्यात्मिक नावाने संबोधले आहे. येशू ख्रिस्त हा फक्त विश्वाचा व पृथ्वीचा राजा नसून तर तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचा, शरीराचा, समाजाचा, गावाचा, शेजोळाचा व कुटुंबाचा राजा आहे. ख्रिस्ताचे राज्य हे अनंतकाळाचे राज्य आहे. आज आपण ख्रिस्त राजाचा सन्मान करण्यासाठी आलो असताना त्याची कृपा आशिर्वाद आपणाला मिळावा व ख्रिस्ताला व आपला राजा मानून त्याच्याकडे नतमस्तक व्हावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण सहभागी होऊन आपणासाठी व इतरांसाठी प्रार्थना करूया.

साम्यक विवरण
पहिले वाचन : दानिएल : ७:१३-१४
     संदेष्टा दानिएल येशूच्या जन्माअगोदर येशू राजा आहे याची सुवार्ता जाहीर करतो. दानिएल संदेष्टा ख्रिस्त राजाला मानव पुत्राप्रमाणे मेघावरून गौरवाने येताना पाहतो. तसेच रात्रीच्या दृष्टांतात ख्रिस्त राजाच्या भूलोकावरील जीवनानंतरचे वैभवशाली जीवन पाहतो. ख्रिस्त राजा हा मानवासारखा आहे. परंतु ख्रिस्ताने कधी पाप केले नाही. ख्रिस्त राजा हा अनंतकाळचा राजा आहे.  म्हणुनच संदेष्टा दानिएल म्हणतो कि, सर्व लोक सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्यांची सेवा करावी. कारण ख्रिस्त राजाला प्रभुत्व वैभव व राज्य दिले आहे.

दुसरे वाचन : प्रकटीकरण :- १:५-८
     प्रकटीकरणाच्या पुस्तकात येशूला राजाचा राजा, प्रभूचा प्रभू व पृथ्वीवरील राजाचा अधिपती अशा नावाने संबोधले गेले आहे. तसेच ख्रिस्ताने आपल्या प्रजेसाठी रक्ताची आहुती दिली व सर्वांना पाप बंधनातून मुक्त करून घेतले. व आपल्या ख्रिस्ती वैभवी राज्यात प्रवेश दिला. शेवटी योहान म्हणतो कि, ख्रिस्त हा अल्फाओमेगा आहे म्हणजेच ख्रिस्त हा सुरुवात व शेवट आहे.

शुभवर्तमान : योहान :- १८:३३-३७
     पिलाताला आपण स्वतः रोमन अधिकारी असल्याने जर दुसऱ्या कुणी स्वतःला राजा म्हणत असेल हे नक्कीच आवडणार नाही. म्हणूनच पिलात येशूला विचारतो कि, तू राजा आहेस का? पिलाताला येशूला राजा म्हणायचं नव्हते पण लोकांच्या आग्रहामुळे पिलाताने येशूला राजा आहेस का, असा प्रश्न विचारला. म्हणून यावर येशू विचारतो कि, आपण स्वताःहून हे म्हणता कि दुसऱ्याच्या सांगण्यावरून. पुढे येशू म्हणतो मी राजा आहे पण माझे राज्य ह्या जगाचे नाही. यहुदी रोमन अधिकाराखाली होते व पिलात सम्राटाच्या अधिकाराखाली होते. परंतु ख्रिस्ताचा अधिकार मात्र त्याच्या परमपित्याकडून होता. त्याचे राज्य हे आध्यात्मिक स्वरूपाचे होते. ते त्याच्या अनुयायाच्या अंतकरणात होते.  जर ख्रिस्ताचे राज्य भौतिक असते तर त्याच्या अनुयायांनी येशूची  सुटका केली असती. परंतु येशू आपले कार्य स्पष्टपणे सांगतो कि, सत्याला साक्ष देण्यास त्याचे  आध्यात्मिक  राज्य सत्याचे होते. त्याने लोकांची मने विश्वासाने जिंकली. रोमन अधिकाऱ्याचे शस्त्र तलवार होते. परंतु ख्रिस्ताचे शस्त्र मात्र देवाविषयीचे सत्य होते. त्यामुळेच येशु म्हणतो, जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.

बोधकथा-
     एक राजा होता. एके दिवशी तो आपल्या राज्यात फेर फटका घेत होता. तेव्हा पुढे तो एका गावात प्रवेश करतो. त्या गावात काही लहान मुले तलावात पोह्त होती. तेव्हा समोरच पोहता-पोहता त्यातमधील एक मुलगा बुडावयास लागतो. तेव्हा काही मुले जवळच उभा असलेल्या राजाकडे धावत आली व राजाला त्या बुडत्या मुलाला वाचवण्यास विनंती केली. तेव्हा राजा आपल्या जीव धोक्यात येईल हे लक्षात ठेवून त्या मुलांच्या विनंतीला नकार देतो. त्याला आपले जीवन अतिप्रिय होते. तो जरी प्रजेचा असला तरी तो आपल्या प्रजेसाठी प्राण द्यायला  घाबरला. परंतु जेव्हा आपण ख्रिस्त राजाकडे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की त्याने स्वतःच्या जीवाची परवा केली नाही व धरतीवर येऊन आपले जीवन प्रजेसाठी समर्पित केले.

मनन चिंतन :-
     ख्रिस्त राजाचा सण साजरा करण्यासाठी आलेल्या माझ्या श्रद्धावंतानो जर आपण इतिहासाची, समाजशास्त्राची व जुन्या करार ह्या पुस्तकांची पाने उघडली तर आपल्याला खूप थोर राजांची व त्यांनी केलेल्या कार्याची व कारकिर्दीची सविस्तर माहिती कळून येते. जुन्या करारातील काही राजांनी लोकांचा छळ केला. राजकीय राजांनी स्वःताच्या हितासाठी कार्य केले. प्रजेला लुटून त्याच्याकडून पैसा, जमीन, संपत्ती व दौलत हडप करून घेतली. आपल्या प्रजेला गुलाम करून त्यांच्याकडून नको असलेले काम व सेवा करून घेतली. त्यांना तुच्छ लेखून काहीच दिले नाही. आपल्या प्रजेची कधी पर्वा न करता त्यांच्या गरजा पुरवल्या नाहीत. स्वतः सुखी व आनंदी जीवन जगून दुसऱ्यांची उपेक्षा केली.
त्यामुळे अश्या राजांचा आपण सण साजरा करीत नाही; परंतु आज आपण अशा राजाचा सण साजरा करीत आहोत कि,  जो प्रितीच्या आणि सत्याच्या मार्गावर चालला. व तो राजा म्हणजेच आपला ख्रिस्त प्रभू येशू. ज्याने आपल्या प्रजेसाठी अमाप दुख, कष्ट, यातना सहन केल्या. सोनेरी मुकुट परिधान न करता काट्याचा मुकुट घातला. लोकांना बरे केले. अन्यायाविरुद्ध भांडला, सत्याशी एकजूट राहिला. रत्नजडीत, चकचकीत वस्त्रे परिधान न घालता खांद्यावर वजनी लाकडाचा क्रूस वाहिला. ख्रिस्त राजाकडे पैसा, संपत्ती व श्रीमंती ह्या गोष्टी नव्हत्या तर सौम्यता, प्रेम, दयाळूपणा, क्षमा व सेवा ही मुल्ये होती. आपण बायबल मध्ये ऐकतो कि, राजा जन्माला येईल. हाच राजा बंगल्यात किंवा महालात न जन्मता गाईच्या गोठ्यात जन्मला. ह्याच ख्रिस्त राजाची प्रजेने थट्टा मस्करी केली. राजाला चाबकाने मारले व अंगावर थुंकले. व शेवटी क्रुसावर ठार मारले परंतु ख्रिस्त राजाने कधी सूड घेतला नाही त्यांच्या मनात राग, हेवा, मस्तर  ह्यासारखा विचारांना पुरती दिली नाही. ख्रिस्त हा जगाचा राजा आहे. व हेच आजची उपासना सांगत आहे. संदेष्टा दनिएल सुद्धा म्हणतो की, ख्रिस्त राजा हा हाडामांसाचा व आपल्यासारखाच व्यक्ती आहे. पण त्याने कधी पाप केले नाही. चांगले जीवन जगून दुसऱ्यांना चांगले जीवन जगण्यास प्रवृत केले. प्रकटीकरणाच्या पुस्तकात सुद्धा हे आपल्याला ऐकायला मिळते की, ख्रिस्त राजाचे वैभवाबद्दल सांगितले आहे. ख्रिस्त राजाने आपल्या प्रजेसाठी स्वताःच्या रक्ताची आहुती दिली व सर्वाना पापबंधनातून मुक्त केले. हाच ख्रिस्त राजा चिरंतन राज्य करणारा राजा आहे.

विश्वासू लोकांच्या प्राथना
प्रतिसाद: हे दयाळू ख्रिस्त राजा तुझ्या प्रजेची प्रार्थना ऐक.

१. प्रभूची सुवार्ता पसरविणारे आपले पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू- धर्मभगिनी व प्रापंचिक ह्या सर्वाना ख्रिस्त राजाचा आशीर्वास मिळून ख्रिस्त राजाची सुवार्ता पसरविण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या राजकीय नेत्यांनी ख्रिस्त राजाचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करून, योजलेले प्रकल्प पूर्ण करावेत व लोकांची उनत्ती करावी म्हणून राजकिय नेत्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
३) ख्रिस्त राजा आपल्या कुटुंबाचा राजा आहे. ख्रिस्त राजाची शिकवणूक आपल्या कुटुंबात यावी व नेहमी त्याला शरण जाऊन त्याने आपल्या कुटुंबात राहून प्रत्येकाचा सांभाळ करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आजारी लोकांवर ख्रिस्त राजाचा आशीर्वाद यावा व आजाराने ग्रासलेल्या लोकांची आजारातून सुटका व्हावी व ख्रिस्त राजाच्या प्रेमाचा व सत्याचा खरा अनुभव त्यांना यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक, सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.



Thursday, 15 November 2018


Reflection for the Homily of 33rd Sunday of Ordinary Time 
(18-11-18) By Br. Godfrey Rodriques    






सामान्य काळातील तेहतीसावा रविवार

दिनांक:- १८/११/२०१८
पहिले वाचन:- दानियेल १२:१-१३
दुसरे वाचन:- इब्री १०:११-१४,१८
शुभवर्तमान:- मार्क १३:२४-३२




"लोक मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील."



प्रस्तावना

    आज आपण सामान्य काळातील तेहतीसाव्या आठवड्यात पदार्पण केलेले आहे. आजची उपासना आपणा प्रत्येकाला धार्मिकतेचे व नितीमत्वाचे जीवन जगण्यास आमंत्रण देत आहे. दानियेलच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात भविष्यकाळातील घडणाऱ्या गोष्टीविषयी भाकीत केलेले आपल्याला ऐकावयास भेटते. त्यात स्पष्टपणे नमूद केलेले आपणास ऐकावयास भेटते कि, त्या काळात ज्याची नावे जीवनाच्या ग्रंथात लिहिली आहेत ते सर्व बचावतील; मृत उठवले जातील, काहीना चिरंजीवित्व तर काहीना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल असे परमेश्वर म्हणतो. त्याचप्रमाणे इब्री लोकांस पाठवलेल्या पत्रात संत पौल म्हणतो कि, ‘जेथे पापांची क्षमा झाली, तेथे अधिक अर्पणाची गरज भासत नाही’. तर मार्कलिखित शुभवर्तमानात येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या पुनरागमनाची परिपूर्ती कशी होईल ह्या बाबतचे चिन्हे देऊन जणू स्वर्गराज्य मिळवण्यास पात्र होण्यास आमंत्रण करीत आहे. प्रभू येशूच्या पुनरागमनाने आम्हा सर्वांचे तारण होणार आहे; परंतु त्यासाठी आपण धार्मिकतेचे व नितीमत्वाचे जीवन जगायला हवे. ह्यासाठी आजच्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन:- दानियेल १२:१-१३

    आजच्या पहिल्या वाचनात भविष्यकाळातील शेवटचा क्षण हा विध्वंस व न्यायनिवाड्याचा दिवस असेल असे नमूद केले आहे. ह्या क्षणात देवाने निवडलेले अथवा देवावर विसंबून राहणाऱ्यांचे तारण होईल. मिखाएल देवदूत जो इस्त्रायेलचा आश्रयदाता होता, तो इस्त्रायेल लोकांच्या बऱ्या-वाईटपणाचे व्रत परमेश्वराला कळवील. जे कबरेत निजलेले होते, त्यांना नवजीवन प्राप्त होईल. हे वैयक्तिक दिलेले पुनरुत्थानाचे वचन नव्या कराराशी अतुलनात्मक आहे.
    ज्या देवभिरू, विश्वासू लोकांनी संकटात देवावर विश्वास ठेवला, त्यांना हे अनंतकाळाचे जीवन लाभणार आहे, असे येथे प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. परंतु हे सर्व कधी घडेल याचा उल्लेख स्पष्टपणे येथे करण्यात आलेला नाही. परंतु शेवटच्या ओवीत असे नमूद केले आहे कि, दोन देवदूत नदीच्या दुतर्फा उभे असतील आणि शुभ्र वस्त्र परिधान केलेला व्यक्ती त्यांचा न्याय करील.

दुसरे वाचन:- इब्री १०:११-१४,१८

आजच्या दुसऱ्या वाचनात प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या स्व-अर्पणात आणि पूर्वीच्या काळी धर्मगुरूनी केलेल्या प्राणार्पनात असलेली तफावत आपल्या निदर्शात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या वाचनात येशूने अर्पण केलेल्या अर्पणावर विशेष भर दिला आहे. कारण ख्रिस्ताचे अर्पण हे अनंत काळासाठी होते. त्या उलट पूर्वीच्या धर्मगुरुंनी केलेली होमार्पण, प्राणार्पण, जलार्पण हि प्रत्येक वर्षी त्यांना करावे लागत असे. त्यात अनंत काळाचा घटक नव्हता. त्यात ख्रिस्ताने केलेल्या अर्पणाची कमतरता होती. ख्रिस्ताच्या अर्पणात पुनरावृत्ती करण्याची गरज नाही त्याचे स्व-अर्पण एकदाच सर्वकाळासाठी परिपूर्ण असे केले होते. देवाचे प्रेम हे येशू ख्रिस्ताने त्याच्या स्व-अर्पणाने मनुष्याचा देवाबरोबर पापामुळे असलेला दुरावा दूर करून त्याच्यातील पापाचा अडथळा कायमस्वरूपी नष्ट केला आणि त्यांना त्याच्या पापांची क्षमा मिळवली.

शुभवर्तमान: मार्क १३:२४-३२

     आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त स्वतःच्या पुनरागमनाविषयी भाकीत करीत आहे. येशूच्या पुनरागमनावेळी युद्धे होतील, धरणीकंप होईल, शहरामध्ये तह निर्माण होईल, सर्वत्र अंधार पसरेल. ज्यू पंथीय एक दिवशी चारही बाजूने येऊन पालेस्तीन शहरात एकवटतील. येशूने वापरलेल्या भाषेत आपल्याला प्रभूच्या पुनरागमनाची शास्त्रशुद्ध तारीख व दिवस सांगितलेला नाही. येशूने जरी विध्वंसाचे चित्रमय वर्णन केले असले तरी येशूच्या पुनरागमनाचे सत्य त्यातून वगळता येणार नाही.

बोधकथा

    एक राजा आपल्या प्रजेस भेटण्यासाठी वेशभूषा बदलून एका खेडे गावात फेर-फटका मारत होता. तेव्हा त्याच्या निदर्शनास असे आले कि, आपली प्रजा खूप गरीब आहे. हे पाहून त्याला खूप कळवळा आला. त्याने एका गरीब माणसाला खूप पैसे देऊन सांगितले कि तू ह्या शेतात पेरणी करून पिक उगव आणि मला दे. शेतकऱ्याने त्या गोष्टीचा फायदा घेतला व कमी प्रतीचे बियाणे पेरून राहिलेल्या पैशाचा उपयोग मौज-मजा करण्यासाठी केला.
काही दिवसांनी राजा परत आला व त्या शेतकऱ्याला भेटून त्याने ते शेतातील सर्व पिक त्याला बक्षीस म्हणून घेण्यास सांगितले. तेव्हा त्यास आश्चर्याचा धक्का बसला. व तो विचार करू लागला कि जर हे पिक माझ्यासाठी होणार होते तर मग मी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरले असते. अशाप्रकारे तो आपला हात डोक्याला लावून अश्रू गाळत बसला. अशाचप्रकारे येशूच्या पुनरागमनाची निश्चित वेळ आपणास ठाऊक नाही. जर आपण विश्वासू आणि नीतिमान असलो तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच लाभेल.

मनन चिंतन

     अनेक महान विचारवंतांनी विचार करायला लावलेली महत्वाची बाब म्हणजे, आपण ह्या भूतलावर प्रवाशी आहोत, रहिवासी नाही. आपले अस्तित्व व वास्तव्य हे क्षणिक आहे. व ह्याच महत्वाच्या संकल्पनेचे वर्णन आजच्या सर्व वाचनात व उपासनेत केलेले आपल्याला दिसून येते. दानिएल संदेष्टाच्या पुस्तकात ह्या युगाच्या समाप्तीविषयी भाकीत केल्याचे आपण ऐकले आणि शुभवर्तमानातही येशूच्या पुनरागमनापुर्वी होणारा विध्वंस हा सत्तर वर्षांनी येरुशलेम मंदिराच्या झालेल्या नाशाबाबत काही प्रमाणात खरा ठरला.
     येशूच्या पुनरागमनाने सर्वकाही नव्याने प्रस्थापित होईल. त्याचे राज्य व विश्वास हे सर्व नव्याने उपन्न केला जाईल व तो दिवस न्यायनिवाड्याचा दिवस असेल. आजच्या दानिएलच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनाद्वारे आपल्याला असे सांगण्यात येते की, परमेश्वर जे मरण पावले आहेत त्यांस उठवील; काहींना क्षणभर तर काहींना कायमस्वरूपी अप्रतिष्ठा लाभेल.
     कधी-कधी आपणास आपल्या भविष्याची खूप भीती वाटत असते. आपण जगाच्या अंताविषयी प्रसारमाध्यमाद्वारे पाहत व ऐकत असतो. ह्या गोष्टी विज्ञानाद्वारे भाकीत केलेल्या असल्याने त्याची सत्य-परिस्थिती आपणास ठाऊक नाही. चित्रपटात सुद्धा जगाच्या अंताची भयानक कल्पना चित्रित केली जाते. परंतु अशा अंतसमयी ख्रिस्त आपल्या सोबत असणार आहे. कारण तो न्यायनिवाड्याचा दिवस आहे व आपण सर्वजण पुनरुत्थित केले जाणार आहोत. परंतु त्यासाठी आपल्या विश्वासाची व नितीमत्वाची गरज आहे. आपल्या जीवनाच्या पाऊलवाटा ह्या सदैव फुलांनी सजलेल्या असतात असे नाही तर त्यावर काही-काही दुःखाचे काटे असतात. प्रत्येक पाऊलां बरोबर आपल्याला सुख व दुःख अशा दोघांनाही भेट द्यावी लागते. परंतु ह्या प्रवासात देवाची आपल्यावर असलेली नजर टाळता कामा नये. आपल्या भविष्याची चिंता करून जीवन जगण्यापेक्षा, देवाच्या इच्छेनुसार जगून न्यायाच्या दिवसासाठी तयार असणे महत्वाचे आहे. अशाप्रकारे देवाशी नीतिमान राहून आपल्याला सार्वकालिक जीवन लाभावे म्हणून आपण तत्पर राहूया.  

https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद :- हे तारणदायी ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐकून घे.

१) संपूर्ण जगभरात पसरलेली आपली ख्रिस्तसभा व तिचे सर्व पुढारी व सदस्य ह्यांना प्रभू सुवार्ता प्रचार करण्यासाठी लागणारी कृपाशक्ती व सामर्थ्य परमेश्वराने बहाल करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) प्रभू येशू जेव्हा नव्याने आमचे तारण करावयास आगमन करील तेव्हा त्याच्यासमोर आम्ही सर्वजण एक नीतिमान व धार्मिक व्यक्ती असे उभे असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) बहुतेक धार्मिक स्थळे हे राजकारणाचे व्यासपीठ बनत चालले आहे, त्यातून धार्मिक मतभेत निर्माण केले जात आहेत. अश्या समाज विघातक विकृतींना आळा बसावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या धर्मप्रांतावर, धर्मग्रामावर व प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराचा कृपापूर्ण अशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.