Thursday, 15 November 2018


Reflection for the Homily of 33rd Sunday of Ordinary Time 
(18-11-18) By Br. Godfrey Rodriques    






सामान्य काळातील तेहतीसावा रविवार

दिनांक:- १८/११/२०१८
पहिले वाचन:- दानियेल १२:१-१३
दुसरे वाचन:- इब्री १०:११-१४,१८
शुभवर्तमान:- मार्क १३:२४-३२




"लोक मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील."



प्रस्तावना

    आज आपण सामान्य काळातील तेहतीसाव्या आठवड्यात पदार्पण केलेले आहे. आजची उपासना आपणा प्रत्येकाला धार्मिकतेचे व नितीमत्वाचे जीवन जगण्यास आमंत्रण देत आहे. दानियेलच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात भविष्यकाळातील घडणाऱ्या गोष्टीविषयी भाकीत केलेले आपल्याला ऐकावयास भेटते. त्यात स्पष्टपणे नमूद केलेले आपणास ऐकावयास भेटते कि, त्या काळात ज्याची नावे जीवनाच्या ग्रंथात लिहिली आहेत ते सर्व बचावतील; मृत उठवले जातील, काहीना चिरंजीवित्व तर काहीना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल असे परमेश्वर म्हणतो. त्याचप्रमाणे इब्री लोकांस पाठवलेल्या पत्रात संत पौल म्हणतो कि, ‘जेथे पापांची क्षमा झाली, तेथे अधिक अर्पणाची गरज भासत नाही’. तर मार्कलिखित शुभवर्तमानात येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या पुनरागमनाची परिपूर्ती कशी होईल ह्या बाबतचे चिन्हे देऊन जणू स्वर्गराज्य मिळवण्यास पात्र होण्यास आमंत्रण करीत आहे. प्रभू येशूच्या पुनरागमनाने आम्हा सर्वांचे तारण होणार आहे; परंतु त्यासाठी आपण धार्मिकतेचे व नितीमत्वाचे जीवन जगायला हवे. ह्यासाठी आजच्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन:- दानियेल १२:१-१३

    आजच्या पहिल्या वाचनात भविष्यकाळातील शेवटचा क्षण हा विध्वंस व न्यायनिवाड्याचा दिवस असेल असे नमूद केले आहे. ह्या क्षणात देवाने निवडलेले अथवा देवावर विसंबून राहणाऱ्यांचे तारण होईल. मिखाएल देवदूत जो इस्त्रायेलचा आश्रयदाता होता, तो इस्त्रायेल लोकांच्या बऱ्या-वाईटपणाचे व्रत परमेश्वराला कळवील. जे कबरेत निजलेले होते, त्यांना नवजीवन प्राप्त होईल. हे वैयक्तिक दिलेले पुनरुत्थानाचे वचन नव्या कराराशी अतुलनात्मक आहे.
    ज्या देवभिरू, विश्वासू लोकांनी संकटात देवावर विश्वास ठेवला, त्यांना हे अनंतकाळाचे जीवन लाभणार आहे, असे येथे प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. परंतु हे सर्व कधी घडेल याचा उल्लेख स्पष्टपणे येथे करण्यात आलेला नाही. परंतु शेवटच्या ओवीत असे नमूद केले आहे कि, दोन देवदूत नदीच्या दुतर्फा उभे असतील आणि शुभ्र वस्त्र परिधान केलेला व्यक्ती त्यांचा न्याय करील.

दुसरे वाचन:- इब्री १०:११-१४,१८

आजच्या दुसऱ्या वाचनात प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या स्व-अर्पणात आणि पूर्वीच्या काळी धर्मगुरूनी केलेल्या प्राणार्पनात असलेली तफावत आपल्या निदर्शात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या वाचनात येशूने अर्पण केलेल्या अर्पणावर विशेष भर दिला आहे. कारण ख्रिस्ताचे अर्पण हे अनंत काळासाठी होते. त्या उलट पूर्वीच्या धर्मगुरुंनी केलेली होमार्पण, प्राणार्पण, जलार्पण हि प्रत्येक वर्षी त्यांना करावे लागत असे. त्यात अनंत काळाचा घटक नव्हता. त्यात ख्रिस्ताने केलेल्या अर्पणाची कमतरता होती. ख्रिस्ताच्या अर्पणात पुनरावृत्ती करण्याची गरज नाही त्याचे स्व-अर्पण एकदाच सर्वकाळासाठी परिपूर्ण असे केले होते. देवाचे प्रेम हे येशू ख्रिस्ताने त्याच्या स्व-अर्पणाने मनुष्याचा देवाबरोबर पापामुळे असलेला दुरावा दूर करून त्याच्यातील पापाचा अडथळा कायमस्वरूपी नष्ट केला आणि त्यांना त्याच्या पापांची क्षमा मिळवली.

शुभवर्तमान: मार्क १३:२४-३२

     आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त स्वतःच्या पुनरागमनाविषयी भाकीत करीत आहे. येशूच्या पुनरागमनावेळी युद्धे होतील, धरणीकंप होईल, शहरामध्ये तह निर्माण होईल, सर्वत्र अंधार पसरेल. ज्यू पंथीय एक दिवशी चारही बाजूने येऊन पालेस्तीन शहरात एकवटतील. येशूने वापरलेल्या भाषेत आपल्याला प्रभूच्या पुनरागमनाची शास्त्रशुद्ध तारीख व दिवस सांगितलेला नाही. येशूने जरी विध्वंसाचे चित्रमय वर्णन केले असले तरी येशूच्या पुनरागमनाचे सत्य त्यातून वगळता येणार नाही.

बोधकथा

    एक राजा आपल्या प्रजेस भेटण्यासाठी वेशभूषा बदलून एका खेडे गावात फेर-फटका मारत होता. तेव्हा त्याच्या निदर्शनास असे आले कि, आपली प्रजा खूप गरीब आहे. हे पाहून त्याला खूप कळवळा आला. त्याने एका गरीब माणसाला खूप पैसे देऊन सांगितले कि तू ह्या शेतात पेरणी करून पिक उगव आणि मला दे. शेतकऱ्याने त्या गोष्टीचा फायदा घेतला व कमी प्रतीचे बियाणे पेरून राहिलेल्या पैशाचा उपयोग मौज-मजा करण्यासाठी केला.
काही दिवसांनी राजा परत आला व त्या शेतकऱ्याला भेटून त्याने ते शेतातील सर्व पिक त्याला बक्षीस म्हणून घेण्यास सांगितले. तेव्हा त्यास आश्चर्याचा धक्का बसला. व तो विचार करू लागला कि जर हे पिक माझ्यासाठी होणार होते तर मग मी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरले असते. अशाप्रकारे तो आपला हात डोक्याला लावून अश्रू गाळत बसला. अशाचप्रकारे येशूच्या पुनरागमनाची निश्चित वेळ आपणास ठाऊक नाही. जर आपण विश्वासू आणि नीतिमान असलो तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच लाभेल.

मनन चिंतन

     अनेक महान विचारवंतांनी विचार करायला लावलेली महत्वाची बाब म्हणजे, आपण ह्या भूतलावर प्रवाशी आहोत, रहिवासी नाही. आपले अस्तित्व व वास्तव्य हे क्षणिक आहे. व ह्याच महत्वाच्या संकल्पनेचे वर्णन आजच्या सर्व वाचनात व उपासनेत केलेले आपल्याला दिसून येते. दानिएल संदेष्टाच्या पुस्तकात ह्या युगाच्या समाप्तीविषयी भाकीत केल्याचे आपण ऐकले आणि शुभवर्तमानातही येशूच्या पुनरागमनापुर्वी होणारा विध्वंस हा सत्तर वर्षांनी येरुशलेम मंदिराच्या झालेल्या नाशाबाबत काही प्रमाणात खरा ठरला.
     येशूच्या पुनरागमनाने सर्वकाही नव्याने प्रस्थापित होईल. त्याचे राज्य व विश्वास हे सर्व नव्याने उपन्न केला जाईल व तो दिवस न्यायनिवाड्याचा दिवस असेल. आजच्या दानिएलच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनाद्वारे आपल्याला असे सांगण्यात येते की, परमेश्वर जे मरण पावले आहेत त्यांस उठवील; काहींना क्षणभर तर काहींना कायमस्वरूपी अप्रतिष्ठा लाभेल.
     कधी-कधी आपणास आपल्या भविष्याची खूप भीती वाटत असते. आपण जगाच्या अंताविषयी प्रसारमाध्यमाद्वारे पाहत व ऐकत असतो. ह्या गोष्टी विज्ञानाद्वारे भाकीत केलेल्या असल्याने त्याची सत्य-परिस्थिती आपणास ठाऊक नाही. चित्रपटात सुद्धा जगाच्या अंताची भयानक कल्पना चित्रित केली जाते. परंतु अशा अंतसमयी ख्रिस्त आपल्या सोबत असणार आहे. कारण तो न्यायनिवाड्याचा दिवस आहे व आपण सर्वजण पुनरुत्थित केले जाणार आहोत. परंतु त्यासाठी आपल्या विश्वासाची व नितीमत्वाची गरज आहे. आपल्या जीवनाच्या पाऊलवाटा ह्या सदैव फुलांनी सजलेल्या असतात असे नाही तर त्यावर काही-काही दुःखाचे काटे असतात. प्रत्येक पाऊलां बरोबर आपल्याला सुख व दुःख अशा दोघांनाही भेट द्यावी लागते. परंतु ह्या प्रवासात देवाची आपल्यावर असलेली नजर टाळता कामा नये. आपल्या भविष्याची चिंता करून जीवन जगण्यापेक्षा, देवाच्या इच्छेनुसार जगून न्यायाच्या दिवसासाठी तयार असणे महत्वाचे आहे. अशाप्रकारे देवाशी नीतिमान राहून आपल्याला सार्वकालिक जीवन लाभावे म्हणून आपण तत्पर राहूया.  

https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद :- हे तारणदायी ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐकून घे.

१) संपूर्ण जगभरात पसरलेली आपली ख्रिस्तसभा व तिचे सर्व पुढारी व सदस्य ह्यांना प्रभू सुवार्ता प्रचार करण्यासाठी लागणारी कृपाशक्ती व सामर्थ्य परमेश्वराने बहाल करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) प्रभू येशू जेव्हा नव्याने आमचे तारण करावयास आगमन करील तेव्हा त्याच्यासमोर आम्ही सर्वजण एक नीतिमान व धार्मिक व्यक्ती असे उभे असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) बहुतेक धार्मिक स्थळे हे राजकारणाचे व्यासपीठ बनत चालले आहे, त्यातून धार्मिक मतभेत निर्माण केले जात आहेत. अश्या समाज विघातक विकृतींना आळा बसावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या धर्मप्रांतावर, धर्मग्रामावर व प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराचा कृपापूर्ण अशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment