Reflection for the
Homily of 1st Sunday of Advent
(02-12-18) By Br. Rahul Rodrigues
आगमन काळातील
पहिला रविवार
दिनांक :-
२/१२/२०१८
पहिले वाचन
:- यिर्मया : ३३:१४-१६
दुसरे वाचन
:- १ थेस्सलोनिकरांस : ३:१२-४:२
शुभवर्तमान
:- लुक : २१: २५-२८,३४-३६
तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे
प्रस्तावना
आजपासून ख्रिस्तसभा आगमन काळाला सुरवात करीत आहे. आगमन काळ म्हणजे
ख्रिस्त येण्या पूर्वीचा काळ. ह्या काळात देऊळमाता आपल्याला प्रभू येशूला नव्याने स्विकारण्यासाठी आपल्या अंत:करणाची तयारी करण्यास बोलावीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता यिर्मया सांगतो कि, परमेश्वर
इस्त्राईल लोकांना, दाविदाचा पुत्र ‘मसीहा’ ह्याचा जन्माचे अभिवचन देत आहे. तर
दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलोनिकरांस चांगले व पवित्र जीवन जगण्यास आवाहन करीत
आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला सदैव जागृत राहण्यास सांगत आहे.
काही दिवसातच येशू जन्मास येणार आहे व आपल्याला
सर्व प्रकारच्या बंधनातून आणि पापातून मुक्त करणार, त्यासाठी आपण सदैव जागृत असावे
म्हणून आजच्या या पवित्र मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन
:- यिर्मया : ३३:१४-१६
आजचे पहिले वाचन एक आशेचा किरण दाखवत आहे. व या वाचनात प्रवक्ता
यिर्मया इस्त्राएलच्या लोकांसाठी एक आशेचा किरण घेऊन येत आहे. परमेश्वराने
इस्त्राईल लोकांना त्याच्या तारणाऱ्याबद्दल बऱ्याच वेळीस सांगितले होते, व ते
पूर्णत्वास येण्याची वेळ जवळ आलेली आहे असे आपल्याला दिसून येते. दाविदाच्या
घराण्यात असा एक नवा राजा उदयास येईल, जो अगदी दावीद राजापेक्षा महान असेल. (देव
आमची धार्मिकता हे त्याचे नाव मूळ हिब्रूमध्ये ‘सिद्धाकीया’ नावाशी जुळणार आहे.)
हा राजा सत्याने, न्यायाने जीवन जगेल व त्याला दाविदाचा वंशज असे संबोधिले जाईल.
दुसरे वाचन
:- १ थेस्सलोनिकरांस : ३:१२-४:२
थेस्सलोनीकर प्रीतीने भरलेले होते. हे पौलाने ऐकले होते. ती प्रीती
प्रचंड प्रमाणात वाढावी व सर्वांपर्यंत पोहोचावी अशी प्रार्थना पौल करतो. विश्वासू
लोकांच्या जीवनात ख्रिस्ताची प्रीती असावी अशी पौलाची प्रार्थना होती.
पुढे पौल त्यांना म्हणतो, तुम्ही पापविरहित असे नाही तर स्वःताला
शुद्ध व स्वच्छ राखत जावे म्हणजे पाप घडले तर लगेच कबुल करून देवापासून शुद्धता
मिळवावी व प्रभूला स्विकारण्यासाठी सदैव तयार राहावे.
शुभवर्तमान:-
लूक २१:२५-२८, ३४-३६
या वाचनात प्रभू येशूने या
जगावर देवाचा क्रोध होईल त्या समयी काय काय घडेल ते सांगितले आहे. या घटनांचे
सविस्तर वर्णन प्रगटीकरण ६-१८ यां अध्यायांत आढळते. त्याकाळी जगावर अनिष्टे
कोसळतील आणि मग ख्रिस्त आपल्या वैभवाने येईल. तो येरुशलेमेत आपले राज्य स्थापील व
सर्व जगावर राज्य करील. तेव्हा इस्राएल लोक येशू हाच मसीहा आहे हे ओळखतील.
पुढे प्रभू येशू आपल्या
शिष्यांना सदैव जागृत राहून प्रार्थना करावयास सांगत आहे. कारण ख्रिस्ताचे येणे हे
अकस्मात होईल.
बोधकथा:-
एका छोट्याश्या गावात युदोक्सिया
नावाची तरुणी राहत होती. गावातले सर्व लोक तिच्या सौंदर्याची स्तुती करत होते.
ज्याप्रमाणे तिची स्तुती करत होते, त्याप्रमाणे तिच्या पापमय जीवनाबद्दल तिला दोष
देत असत. सौंदर्यासाठी नावाजलेल्या ह्या तरुणीचे समजातील प्रतिमा पापी जीवनामुळे मलीन
झाली होती.
एके दिवशी हि तरुणी आपल्या
घरात विश्रांती घेत होती. इतक्यात तिने आवाज आपल्या घरात एका मठाचा आवाज ऐकला. युदोक्सिया
आवाज ऐकून थोडी घाबरून गेली व आपले कान त्या आवाजाकडे लावून स्पष्ट ऐकण्याचा
प्रयत्न करू लागली. तेव्हा तिला कळून आले की, मठवासी नरकाच्या अग्नी विषयी वाचत
होता. नरकात होणाऱ्या शिक्षेविषयी जेव्हा तिला कळले, तेव्हा ती खूप घाबरली. तिला
काही झोप लागली नाही. ती स्वतःला प्रश्न विचारू लागली, की मी एक पापी स्त्री आहे व
पाप केल्यामुळे मला नरकाच्या अग्नीत शिक्षा भोगावी लागणार. पण ही तरुणी, ह्या
विचारात न राहता दुसऱ्या दिवशी लवकर उठून धर्मगुरूकडे पापनिवेदनासाठी जाऊन आपण
केलेल्या सर्व पापांची कबुली देते. खऱ्या अंतःकराणातून प्रायश्चित करून घेते ब
त्या दिवसापासून चांगले व नवीन जीवन जगण्याचा प्रयत्न करते.
एकेकाळी युदोक्सियाने
तिच्या पापामुळे तिचे नाव खराब केले होते. पण आज ती पवित्र व चांगले कृत्य करून
जीवन जगण्यास सुरवात केली. तिच्या या जीवनामुळे ती दुसऱ्यांसाठी आदर्श बनली व ती
युदोक्सिया दुसरी तिसरी कुणी नसून ती आज आपल्या कॅथोलिक ख्रिस्तसभेत संत युदोक्सिया
नावाने ओळखली जाते.
मनन चिंतन
आजपासून सुरवात
होणाऱ्या आगमन काळात येशूला आपल्या हृदयात स्विकारण्यासाठी आपण आपली तयारी केली
पाहिजे.
जुन्या करारात आपण पाहतो की प्रवक्त्यांनी भाकीत केल्या
प्रमाणे इस्त्रायली लोकांनी त्यांचा तारणाऱ्याला स्विकारण्यासाठी तयारी केली होती.
आजच्या शुभवर्तमानात येशू घडून येणाऱ्या भयानक अश्या गोष्टीविषयी म्हणत आहे. परंतु
जेव्हा अश्या गोष्टी घडून येतील तेव्हा जे खरे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांना
भिण्याची कसलीच गरज नाही व जे वाम मार्गावर आहेत त्यांना जवळ आणणे हे आपले कर्तव्य
आहे. पुढील तीन मुद्द्याप्रमाणे आपण ख्रिस्ताला स्विकारण्यासाठी तयारी करायला हवी.
१. आपण ख्रिस्तासमोर ताठ मानेने उभे रहायला पाहिजे.
जेव्हा भयानक गोष्टी घडून येतील तेव्हा जे ख्रिस्तावर
विश्वास ठेवतात त्यांना भिण्याची काहीच गरज नाही परंतु जे ख्रिस्तापासून दूर आहेत
त्यांना ख्रिस्ताजवळ येण्याची गरज आहे. खुद्द येशू म्हणतो की, तुमच्या डोक्याचा एका केसाचाही नाश होणार
नाही (लूक २१:१८). जगाच्या अंतापर्यंत आपण ख्रिस्तावर अवलंबून जगण्याची गरज आहे.
कारण ख्रिस्त हाच आपला एकमेव तारणारा आहे. तोच आपले तारण करील. त्यामुळे जेव्हा
ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा आपण ताठ मानेने आनंददायक अपेक्षेने त्याचा समोर उभे
राहणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे स्तोत्रकार म्हणतो की, “ते वाकून
खाली पडतील परंतु आम्ही तर ताठ उभे राहू” (स्तोत्रसंहिता २०:८) येशूच्या पुन्हा
येण्याचा काळ हा आपल्यासाठी विजयाचे एक प्रतिक आहे.
२. आपण प्रामाणिकपणे जगलो पाहिजे.
ख्रिस्ताला स्विकारण्यासाठी तयारी करण्यासाठी योग्य उपाय
म्हणजे प्रामाणिक जीवन होय. प्रामाणिकपणे जीवन म्हणजेच आपली सर्व कामे
व्यवस्थितरीत्या करणे. देव आपल्या कडून मोठ्या कामाची अपेक्षा न करता
प्रामाणिकपणाची अपेक्षा करत असतो. येशू ख्रिस्त जर एखाद्या गोष्टीचा निषेध करत
असेल तर ते म्हणजे आपल्या कठोर मनाचा. जेव्हा आपण आपले मन कठोर करतो तेव्हा आपण देवाचे
ऐकत नाही. आपण फारो प्रमाणे कठोर होता कामा नये. जेव्हा फारोने त्याचे मन कठोर
केले तेव्हा त्यांनी इस्त्रायली लोकांना जाण्यास नकार दिला. परंतु आपण आपले मन
कठोर न करता पवित्र आत्म्याच्या सुचनेसाठी आपले अंतःकरणे उघडिले पाहिजे तेव्हाच
आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागू.
३. आपण सतत प्रार्थना करायला हवी.
प्रार्थना हा ख्रिस्ती लोकांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग
आहे. आपण ख्रिस्ताला व संतांना अनुसरून प्रार्थना करणे गरजेचे आहे. येशूने आपल्या
जीवनात सतत प्रार्थना करून तो आपल्या पित्याशी एकरूप राहिला. त्याने आपल्या शिष्यांना
‘आमच्या बापा’ ही महान
अशी प्रार्थना शिकवली. आपणही येशुप्रमाणे नेहमी प्रार्थना करणे गरजेचे आहे.
प्रार्थनेमुळे आपण देवाच्या अधिक जवळ जातो व आपले जीवन तेजोमय बनते. शुभवर्तमानात
नमूद केल्याप्रमाणे जेव्हा अश्या भयानक गोष्टी घडून येतील तेव्हा जर आपण प्रार्थनेत
येशूच्या सानिध्यात असलो तर आपल्याला भिण्याची काहीच गरज नाही.
येशू जन्माचा काळ जवळ येत आहे व त्याला स्विकारण्यासाठी आपण
एक चांगले, प्रामाणिक जीवन
जगून प्रार्थनेच्या सहाय्याने येशूला स्विकारण्यासाठी आपली तयारी करूया.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद:-
हे प्रभो, तुझ्या ह्या पापी लोकांची प्रार्थना ऐक.
१) आगमन काळात
आपल्या मनाची व अंतःकरणाची तयारी करून घेणारे आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स,
धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व प्रापंचिक ह्या सर्वांना परमेश्वराची कृपा, आशीर्वाद मिळून
ख्रिस्ताला स्विकारण्यासाठी आपली अंतःकरणे तयार करावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२) आगमनकाळ
म्हणजे ख्रिस्ताच्या येण्याचा काळ. या आगमनकाळात आपण प्रत्येकाने आपल्या हृदयाची
झडती घेऊन आपल्यामध्ये असलेले वाईटगुण टाकून ख्रिस्ताला आपल्या हृदयात जागा द्यावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) समाजातील
अशांती, हेवा, राग व भांडण यामुळे कुटुंब दुभावत आहेत. त्यामुळे मुलांवर वाईट
परिणाम होत आहे. अश्या कुटुंबावर देवाचे, प्रेम व शांती सतत राहावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४) काही तरुण-तरुणी
तसेच ख्रिस्ती लोक देवापासून व देऊळमातेपासून दूर गेले आहेत. अशा व्यक्तींना
ख्रिस्ताचे मार्गदर्शन मिळून परमेश्वराचा स्पर्श लाभावा व देवापासून दूर गेलेल्या
व्यक्तीनी पुन्हा देवाजवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक गरजासाठी देवाकडे प्रार्थना
करूया.
करूया.
No comments:
Post a Comment