सामान्य काळातील बत्तीसावा
रविवार
दिनांक : ११/११/२०१८
पहिले वाचन – १ राजे : १७:१०-१६
दुसरे वाचन – इब्री लोकांस पत्र : ९:२४-२८
शुभवर्तमान – मार्क : १२:३८-४४
प्रस्तावना :-
आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील बत्तीसावा रविवार साजरा करीत
आहे. आजची उपासना आपल्याला परमेश्वरासाठी त्यागाने केलेल्या दानाचे महत्व पटवून
देत आहे.
पहिल्या वाचनात एका विधवेने आपल्या जवळ काहीही नसताना एलिया
संदेष्ट्याला खावयास अन्न दिल्याचे आपण ऐकतो. तर आजच्या दुसऱ्या वाचनात पत्रकार
इब्री लोकांस उद्देशून सांगतो आहे कि, ख्रिस्त एकदाच युगाच्या समाप्तीस स्वाबलीदान
करून आपली पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे. तसेच मार्कलिखित शुभवर्तमानात
विधवेने आपल्या कमाईतून केलेल्या दानाचा विशेष उल्लेख केल्याचे समजते.
‘दिल्यानेच आपल्याला प्राप्त होत असते.’ असे अस्सिसिकार संत
फ्रान्सिस म्हणतात. इतरांची गरज जाणून घेऊन व स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपण
इतरांना मदत करावी म्हणून आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात भाग घेत असताना
देवाकडे त्यासाठी लागणारी विशेष कृपा मागुया.
सम्यक विवरण :
पहिले वाचन – १राजे :
१७:१०-१६
एलिया संदेष्टा हा तान्हेला व भुकेला होता. म्हणून तो परमेश्वराच्या
वाचनाला मन देऊन सिदोन शहरातील सारफथ नावाच्या नगरात जातो. तिथे एक विधवा त्यांना
जाळण्यासाठी लाकडे गोळा करताना आढळते. त्या विधवेजवळ एलीयाला देण्यासाठी काहीही
नव्हते, परंतु ती परमेश्वराच्या आज्ञे प्रमाणे वागते.
एलिया त्या विधवेला प्रथम पिण्यासाठी पाणी विचारतो. जरी एलिया त्या
विधवेला अनोळखी होता, तरीही ती विधवा त्याही मागणी पूर्ण करते. परंतु जेव्हा एलिया
तिला भाकरीची मागणी करतो, तेव्हा मात्र ती विधवा आपली दयनीय परिस्थिती एलीयासमोर
मांडते. ती आपल्या शेवटच्या भोजनासाठी काड्या गोळा करीत होती. तरीही एलीयाने
तिच्याजवळ हट्ट केला नी त्या विधवेने देवाच्या आज्ञेनुसार व एलीयाच्या
सांगण्याप्रमाणे केले. त्या विधवेने एलीयावर विश्वास दाखवला आणि एलीयाचे
तिच्याठायी असलेले भाकीत खरे ठरले ते म्हणजे- तिचे पीठाचे मडके कधीही रिकामी झाले
नाही व तेलाचे भांडे कधीही रिक्त झाले नाही.
दुसरे वाचन – इब्री लोकांस
पत्र : ९:२४-२८
इब्री लोकांस पत्रात पत्रकार सांगत आहे कि, ख्रिस्त आपली पापे
नाहीसे करण्यासाठी ह्या जगात आला. ज्याप्रमाणे प्रमुख याजक प्रतिवर्षी इतर
प्राण्यांचे रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जात असत. अगदी त्याचप्रमाणे ख्रिस्ताने
स्वताचे रक्त सांडून तो करार कायमचा पूर्णत्वास नेला. म्हणूनच ख्रिस्ताने केलेल्या
त्यागामुळे पुन्हा, पुन्हा प्रणार्जज करण्याची गरजच पडणार नाही. स्व-अर्पणाने
ख्रिस्ताने पुष्कळची पापे स्वतःवर घेतली आणि मनुष्याला पापा पासून मुक्त केले.
मार्क – १२:३८-४४
शास्त्री लोकांना नियमशास्त्र शिकवीत. ख्रिस्त शुभवर्तमानात सांगतो
कि, यांच्या पासून जपून राहा. समाज्यात त्यांना नेहमी मान-सन्मान मिळावा अशी
त्यांची सततची धडपड चालू असते. त्यांना पगार मिळत नसे तर ते लोकांच्या दानावर जगत.
विधवांवर व गरिबांवर अत्याचार करून त्यांच्याकडून जबरदस्तीने घेत. लांब प्रार्थना
करून आपण किती धार्मिक आहोत हे इतरांना लक्षात येईल असे त्यांना वाटे.
मंदिराच्या अंगणात मोठी दान पात्रे ठेवली जात होती. त्यात
स्व-संतोषचे दान टाकीत. वल्हांनडन सणासाठी आलेले यात्री त्या पात्रात कसे पैसे
टाकीत होते ते येशू ख्रिस्त दुरून पाहत होता. तेव्हाच एक विधवा तेथे आली.
तिच्याजवळ तांब्याची फक्त दोन नाणी होती. हि तिची एकूण मिळकत होती. तिने ती दोन
नाणी पात्रात टाकली. तिने आपले होते नव्हते ते सर्व देवाला दिले. त्यावरून तिने
सर्वात जास्त टाकले असे ख्रिस्ताने शिष्यांना सांगितले.
मनन- चिंतन :
आजच्या पहिल्या वाचनात व
शुभवर्तमानात विधवेचा उल्लेख केला गेला आहे. आपण बघतो कि, त्या एलिया संदेष्ट्याला
देण्यासाठी विधवेकडे काहीही नव्हते, परंतु ती परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागते. तिला
कदाचित वाटले असेल कि, एलिया हा आपल्याला परका आहे. म्हणून मी त्याला अन्न का
द्यावे? किंवा मी जर एलीयाला अन्न दिले तर माझ्या मुलाला मी काय देईन?
शुभवर्तमानातील विधवा आपल्याकडील असले-नसले सर्व काही दान करते. त्या विधवेजवळ
फक्त दोन नाणी होती व त्या वर तिची उपजीविका होती. तरीही तिने मागचा-पुढचा विचार न
करता दोनी नाणी भांडारात टाकली. खिस्त नेहमी गरीब व नम्र लोकांवर प्रेम करतो.
म्हणुनच ख्रिस्त आपल्याल डोंगरावरील प्रवचनात असे म्हणतो, “अहो दिन तुम्ही धन्य
कारण देवाचे राज्य प्रेमाचे आहे”. (लुक ५:२०) येथे ख्रिस्त गरीब व दिन लोकांना
धन्य म्हणतो, कारण गरीब व नम्र लोक ख्रिस्ताचा संदेश स्वीकारून त्याचे जतन करतात.
खिस्त स्वःता गरिबीत जीवन जगाला म्हणून तो
विधवांनी केलेल्या दानाची प्रशंसा व स्तुती करतो.
आजच्या शुभवर्तमानात
आपल्याला दोन प्रकारचे लोक आढळतात. १. शास्त्री ज्यांच्या जवळ संपत्ती होती व २.
विधवा स्त्री जिच्या जवळ संपत्ती नव्हती. शास्त्री कडे संपत्ती असूनही ते विधवांना
लुबाडण्याचा प्रयत्न करीत. आपल्या समाजात सुद्धा अशाच प्रकारचे उदाहरण दिसून येते.
गरिबांची फसवणूक करून त्यांना लुबाडण्यात येते व त्यांची धनदौलत, जमीन बळकटून घेतली
जाते. शुभवर्तमानात आपल्याला असे दिसते कि, धनवान लोक हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी व
इतरांना दाखवण्यासाठी दान-धर्म करीत होते. आपल्यालाही असा देखावा करण्यासाठी
दान-धर्म करण्याचा मोह होत असतो. आपल्याला आपल्या समाजकार्याची जाहिरात होणे
गरजेचे वाटते. आपल्याकडे पैसा व धन असणे गरजेचे आहे परंतु त्याचा लोभ नसावा.
ज्याप्रमाणे विधवा स्त्रीने सर्व काही अर्पण केले त्याप्रमाणे आपणही निःस्वार्थी
बनावे. आपणही आपल्या जीवनात पैशाचा व संपत्तीचा गुलाम न बनता त्याचा परमेश्वराच्या
कार्यासाठी व गरिबांच्या विकासासाठी उपयोग करण्यास शिकले पाहिजे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना.
प्रतिसाद : हे प्रभो
गरजावंताना मदत करण्यास आम्हाला कृपा दे.
१) आपल्या ख्रिस्तसभेची
धुरा सांभाळणारे परमगुरु, महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व व्रतस्थ ह्यांनी आपल्या कार्याद्वारे सतत गरिबांची सेवा करावी व
प्रभूचा संदेश सर्वत्र प्रकट करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) आपल्या ख्रिस्ती
समुदायाने गोर- गरिबांची मदत करून समाजासाठी एक आदर्श बनावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३) आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या
मार्गावर चालण्यास बाधा आणणारे सर्व मोह व हाव सोडून ख्रिस्ताला अंगीकारावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४) जगातील सर्व विधवा
स्त्रियांना त्यांच्या पतीच्या निधनाने जे दुःख सहन करावे लागते त्या दुःखाचे
खिस्ताद्वारे सांत्वन व्हावे व त्याच्या मुलांची ख्रिस्ताच्या प्रेमात वाढ व्हावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) आज जगात सर्वत्र दहशतवाद
वाढत आहे. अशा सर्व दहशतवाद्याना देवाचा स्पर्श व्हावा व त्यांनी आपल्या सैतानी
वृत्तीचा त्याग करून देवस्वरूप नवीन जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) थोडा वेळ शांत राहून
आपल्या व्यक्तीक हेतू साठी प्रार्थना करूया.
७) आता आपण थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.
No comments:
Post a Comment