Thursday, 22 November 2018


Reflections for the homily of Solemnity of Christ the King 
(25-11-2018) by: Br. Lipton Patil.





ख्रिस्त-राजाचा सण

दिनांक : २५/११/२०१८
पहिले वाचन : दानिएल :- ७:१३-१४
दुसरे वाचन : प्रकटीकरण :- १:५-८
शुभवर्तमान : योहान :- १८:३३-३७




ख्रिस्त राजाचे राज्य अविनाशी आहे.

प्रस्तावना :
घरा, घरा जा...आणि ख्रिस्त राजाची सुवार्ता पसरवा.
    आज संपूर्ण देऊळ माता ख्रिस्त-राजाचा सण साजरा करीत आहे. तसेच आजचा सामान्य काळातील ३४ वा रविवार असून सामान्य काळातील हा शेवटचा रविवार आहे. आजच्या तिन्ही वाचनातून आपल्या निदर्शनास येते कि, ख्रिस्त हा एक अनंत काळाचा राजा आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. पहिल्या वाचनात संदेष्टा दानिएल ख्रिस्ताच्या विजयोत्सवाची घोषणा सहा हजार वर्षापूर्वीच करून घेतो. दुसरे वाचन प्रकटीकरणाच्या पुस्तकातून घेतलेले आहे. या वाचनात ख्रिस्ताला राजाचा राजा व प्रभूचा प्रभू म्हटले आहे. तर योहानकृत शुभवर्तमानात येशू युगान-युग राज्य करणारा राजा आहे असे सांगितले आहे. येशूला प्रभू ख्रिस्त, देवपुत्र, तारणकर्ता, रक्षणकर्ता अशा अनेक आध्यात्मिक नावाने संबोधले आहे. येशू ख्रिस्त हा फक्त विश्वाचा व पृथ्वीचा राजा नसून तर तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचा, शरीराचा, समाजाचा, गावाचा, शेजोळाचा व कुटुंबाचा राजा आहे. ख्रिस्ताचे राज्य हे अनंतकाळाचे राज्य आहे. आज आपण ख्रिस्त राजाचा सन्मान करण्यासाठी आलो असताना त्याची कृपा आशिर्वाद आपणाला मिळावा व ख्रिस्ताला व आपला राजा मानून त्याच्याकडे नतमस्तक व्हावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण सहभागी होऊन आपणासाठी व इतरांसाठी प्रार्थना करूया.

साम्यक विवरण
पहिले वाचन : दानिएल : ७:१३-१४
     संदेष्टा दानिएल येशूच्या जन्माअगोदर येशू राजा आहे याची सुवार्ता जाहीर करतो. दानिएल संदेष्टा ख्रिस्त राजाला मानव पुत्राप्रमाणे मेघावरून गौरवाने येताना पाहतो. तसेच रात्रीच्या दृष्टांतात ख्रिस्त राजाच्या भूलोकावरील जीवनानंतरचे वैभवशाली जीवन पाहतो. ख्रिस्त राजा हा मानवासारखा आहे. परंतु ख्रिस्ताने कधी पाप केले नाही. ख्रिस्त राजा हा अनंतकाळचा राजा आहे.  म्हणुनच संदेष्टा दानिएल म्हणतो कि, सर्व लोक सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्यांची सेवा करावी. कारण ख्रिस्त राजाला प्रभुत्व वैभव व राज्य दिले आहे.

दुसरे वाचन : प्रकटीकरण :- १:५-८
     प्रकटीकरणाच्या पुस्तकात येशूला राजाचा राजा, प्रभूचा प्रभू व पृथ्वीवरील राजाचा अधिपती अशा नावाने संबोधले गेले आहे. तसेच ख्रिस्ताने आपल्या प्रजेसाठी रक्ताची आहुती दिली व सर्वांना पाप बंधनातून मुक्त करून घेतले. व आपल्या ख्रिस्ती वैभवी राज्यात प्रवेश दिला. शेवटी योहान म्हणतो कि, ख्रिस्त हा अल्फाओमेगा आहे म्हणजेच ख्रिस्त हा सुरुवात व शेवट आहे.

शुभवर्तमान : योहान :- १८:३३-३७
     पिलाताला आपण स्वतः रोमन अधिकारी असल्याने जर दुसऱ्या कुणी स्वतःला राजा म्हणत असेल हे नक्कीच आवडणार नाही. म्हणूनच पिलात येशूला विचारतो कि, तू राजा आहेस का? पिलाताला येशूला राजा म्हणायचं नव्हते पण लोकांच्या आग्रहामुळे पिलाताने येशूला राजा आहेस का, असा प्रश्न विचारला. म्हणून यावर येशू विचारतो कि, आपण स्वताःहून हे म्हणता कि दुसऱ्याच्या सांगण्यावरून. पुढे येशू म्हणतो मी राजा आहे पण माझे राज्य ह्या जगाचे नाही. यहुदी रोमन अधिकाराखाली होते व पिलात सम्राटाच्या अधिकाराखाली होते. परंतु ख्रिस्ताचा अधिकार मात्र त्याच्या परमपित्याकडून होता. त्याचे राज्य हे आध्यात्मिक स्वरूपाचे होते. ते त्याच्या अनुयायाच्या अंतकरणात होते.  जर ख्रिस्ताचे राज्य भौतिक असते तर त्याच्या अनुयायांनी येशूची  सुटका केली असती. परंतु येशू आपले कार्य स्पष्टपणे सांगतो कि, सत्याला साक्ष देण्यास त्याचे  आध्यात्मिक  राज्य सत्याचे होते. त्याने लोकांची मने विश्वासाने जिंकली. रोमन अधिकाऱ्याचे शस्त्र तलवार होते. परंतु ख्रिस्ताचे शस्त्र मात्र देवाविषयीचे सत्य होते. त्यामुळेच येशु म्हणतो, जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.

बोधकथा-
     एक राजा होता. एके दिवशी तो आपल्या राज्यात फेर फटका घेत होता. तेव्हा पुढे तो एका गावात प्रवेश करतो. त्या गावात काही लहान मुले तलावात पोह्त होती. तेव्हा समोरच पोहता-पोहता त्यातमधील एक मुलगा बुडावयास लागतो. तेव्हा काही मुले जवळच उभा असलेल्या राजाकडे धावत आली व राजाला त्या बुडत्या मुलाला वाचवण्यास विनंती केली. तेव्हा राजा आपल्या जीव धोक्यात येईल हे लक्षात ठेवून त्या मुलांच्या विनंतीला नकार देतो. त्याला आपले जीवन अतिप्रिय होते. तो जरी प्रजेचा असला तरी तो आपल्या प्रजेसाठी प्राण द्यायला  घाबरला. परंतु जेव्हा आपण ख्रिस्त राजाकडे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की त्याने स्वतःच्या जीवाची परवा केली नाही व धरतीवर येऊन आपले जीवन प्रजेसाठी समर्पित केले.

मनन चिंतन :-
     ख्रिस्त राजाचा सण साजरा करण्यासाठी आलेल्या माझ्या श्रद्धावंतानो जर आपण इतिहासाची, समाजशास्त्राची व जुन्या करार ह्या पुस्तकांची पाने उघडली तर आपल्याला खूप थोर राजांची व त्यांनी केलेल्या कार्याची व कारकिर्दीची सविस्तर माहिती कळून येते. जुन्या करारातील काही राजांनी लोकांचा छळ केला. राजकीय राजांनी स्वःताच्या हितासाठी कार्य केले. प्रजेला लुटून त्याच्याकडून पैसा, जमीन, संपत्ती व दौलत हडप करून घेतली. आपल्या प्रजेला गुलाम करून त्यांच्याकडून नको असलेले काम व सेवा करून घेतली. त्यांना तुच्छ लेखून काहीच दिले नाही. आपल्या प्रजेची कधी पर्वा न करता त्यांच्या गरजा पुरवल्या नाहीत. स्वतः सुखी व आनंदी जीवन जगून दुसऱ्यांची उपेक्षा केली.
त्यामुळे अश्या राजांचा आपण सण साजरा करीत नाही; परंतु आज आपण अशा राजाचा सण साजरा करीत आहोत कि,  जो प्रितीच्या आणि सत्याच्या मार्गावर चालला. व तो राजा म्हणजेच आपला ख्रिस्त प्रभू येशू. ज्याने आपल्या प्रजेसाठी अमाप दुख, कष्ट, यातना सहन केल्या. सोनेरी मुकुट परिधान न करता काट्याचा मुकुट घातला. लोकांना बरे केले. अन्यायाविरुद्ध भांडला, सत्याशी एकजूट राहिला. रत्नजडीत, चकचकीत वस्त्रे परिधान न घालता खांद्यावर वजनी लाकडाचा क्रूस वाहिला. ख्रिस्त राजाकडे पैसा, संपत्ती व श्रीमंती ह्या गोष्टी नव्हत्या तर सौम्यता, प्रेम, दयाळूपणा, क्षमा व सेवा ही मुल्ये होती. आपण बायबल मध्ये ऐकतो कि, राजा जन्माला येईल. हाच राजा बंगल्यात किंवा महालात न जन्मता गाईच्या गोठ्यात जन्मला. ह्याच ख्रिस्त राजाची प्रजेने थट्टा मस्करी केली. राजाला चाबकाने मारले व अंगावर थुंकले. व शेवटी क्रुसावर ठार मारले परंतु ख्रिस्त राजाने कधी सूड घेतला नाही त्यांच्या मनात राग, हेवा, मस्तर  ह्यासारखा विचारांना पुरती दिली नाही. ख्रिस्त हा जगाचा राजा आहे. व हेच आजची उपासना सांगत आहे. संदेष्टा दनिएल सुद्धा म्हणतो की, ख्रिस्त राजा हा हाडामांसाचा व आपल्यासारखाच व्यक्ती आहे. पण त्याने कधी पाप केले नाही. चांगले जीवन जगून दुसऱ्यांना चांगले जीवन जगण्यास प्रवृत केले. प्रकटीकरणाच्या पुस्तकात सुद्धा हे आपल्याला ऐकायला मिळते की, ख्रिस्त राजाचे वैभवाबद्दल सांगितले आहे. ख्रिस्त राजाने आपल्या प्रजेसाठी स्वताःच्या रक्ताची आहुती दिली व सर्वाना पापबंधनातून मुक्त केले. हाच ख्रिस्त राजा चिरंतन राज्य करणारा राजा आहे.

विश्वासू लोकांच्या प्राथना
प्रतिसाद: हे दयाळू ख्रिस्त राजा तुझ्या प्रजेची प्रार्थना ऐक.

१. प्रभूची सुवार्ता पसरविणारे आपले पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू- धर्मभगिनी व प्रापंचिक ह्या सर्वाना ख्रिस्त राजाचा आशीर्वास मिळून ख्रिस्त राजाची सुवार्ता पसरविण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या राजकीय नेत्यांनी ख्रिस्त राजाचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करून, योजलेले प्रकल्प पूर्ण करावेत व लोकांची उनत्ती करावी म्हणून राजकिय नेत्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
३) ख्रिस्त राजा आपल्या कुटुंबाचा राजा आहे. ख्रिस्त राजाची शिकवणूक आपल्या कुटुंबात यावी व नेहमी त्याला शरण जाऊन त्याने आपल्या कुटुंबात राहून प्रत्येकाचा सांभाळ करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आजारी लोकांवर ख्रिस्त राजाचा आशीर्वाद यावा व आजाराने ग्रासलेल्या लोकांची आजारातून सुटका व्हावी व ख्रिस्त राजाच्या प्रेमाचा व सत्याचा खरा अनुभव त्यांना यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक, सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment