Thursday, 1 November 2018


Reflection for the Homily of 31st Sunday of Ordinary Time (04-11-18) By Br. Amit D’Britto   




सामान्य काळातील एकतिसावा रविवार


दिनांक – ४/११/२०१८
पहिले वाचन - अनुवाद ६: २-६
दुसरे वाचन – इब्री ७:२३-२८
शुभवर्तमान- मार्क- १२: २८-३४



‘जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.’


प्रस्तावना

     मोशे हा एक महान नेता होता. त्याने इस्त्रायली लोकांची गुलामगिरीतून सुटका करून त्यांना वचन दिलेल्या जमिनीत आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. मोशेने दिर्घ काळापर्यंत नेतृत्व करून देवापासून दूर गेलेल्या लोकांना प्रभूच्या जवळ आणले. तसेच आजच्या पहिल्या वाचनात मोशे लोकांना आपल्या पूर्ण मनाने, जीवाने व शक्तीने प्रेम करण्यास आवाहन करत आहे.
     प्रभू येशू जो आपला मेंढपाळ बनून ह्या जगात आला; तो आपल्याला प्रीतीची - आज्ञा सर्वश्रेष्ठ आहे असे सांगून देवावर व शेजाऱ्यावर प्रेम करण्यास आमंत्रित करीत आहे. जर आपण हे आचारणात आणले तर आपण देवाच्या राज्यापासून दूर नाही आहोत. प्रभू येशू हा आपला युगानुयुग राहणारा याजक आहे. त्याने प्रकट केलेल्या देवाच्या राज्यावर व प्रीतीच्या आज्ञेवर आपण विश्वास ठेवतो का? आपण देवावर व शेजाऱ्यावर प्रेम करतो का? ह्या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना आपले ह्रदय हे प्रेमाने  भरावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन - अनुवाद ६: २-६

     परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्त्रायलमधील सर्वांना ‘दहा आज्ञा’ दिल्या. देवाने इस्त्राएलसाठी दहा आज्ञाव्यतिरिक्त आणखी शिक्षणही दिले होते. हे सर्व मोशेने त्यांना सांगितले व तो पुढे म्हणाला कि, “या आज्ञा जीवनाकडे नेणाऱ्या आहेत,  त्या भविष्य काळातील दिर्घ काळाला निरंतर लागू आहेत. तसेच प्रभू म्हणतो कि, जर तुम्ही या आज्ञाचे काटेकोरपणे पालन केले तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही बहुगुणीत व्हाल. ”
     दुसरा मुद्दा असा आहे कि, परमेश्वर हाच इस्त्राएलचा एकमेव देव आहे व त्याची सत्ता सर्व राष्ट्रावर चालते. म्हणून इस्त्राएलने त्याचीच उपासना केली पाहिजे व सर्व मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने त्यावर प्रीती केली पाहिजे.

दुसरे वाचन – इब्री ७:२३-२८

     या अध्यायामध्ये ख्रिस्ताच्या याजकपणाची अनन्यता आणि चिरंतन सार्वकालिकपणा हेच प्रमुख मुद्दे आहेत. जुन्या करारातील व्यवस्थेनुसार अनेक याजक होते, कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा येत असे. परंतु येशूचे पुनरूत्थान झाले आहे, तो स्वर्गात चढून गेला आहे. तो युगानुयुग राहणारा व जिवंत  आहे म्हणून त्याचे याजकपण निरंतरचे आहे.
     प्रभू येशू पवित्र, निर्दोष व निर्मळ आहे. तो प्रमुख याजक या नात्याने आमच्या गरजा, अपेक्षा पूर्ण करणारा आहे. प्रभू येशूने स्वतःला अर्पिल्याने, लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवस यज्ञ करण्याचे अगत्य नाही. कारण त्याचे यज्ञार्पण परिपूर्ण आहे.

 शुभवर्तमान- मार्क- १२: २८-३४

     सर्वात थोर आज्ञा – नियमशास्त्राचा हा शिक्षक येशूकडे आला  व त्याने सर्वात पहिली आज्ञा कोणती असे विचारले. येशूने त्याला दहा आज्ञाचा पूर्वार्ध व उत्तरार्ध (देवा विषयीचे कर्तव्य आणि आपल्या शेजाऱ्याविषयीचे कर्तव्य) ह्या वर लक्ष केंद्रित करून उत्तर दिले. येशूच्या लेखी देवावरील प्रीती हाच नियमशास्त्राचा केंद्रबिंदू होता आणि परिणामी आमच्या शेजाऱ्यावरील प्रीती स्वाभाविकपणे त्यातूनच उफाळून येणार. आपल्या संपूर्ण आचरणाचे केंद्रबिंदू हे प्रीती ह्या एकाच शब्दांत सामावलेले आहे. आपल्या जीवनात देवावरील प्रीती व शेजाऱ्यावरील प्रेम नसेल तर आपले जीवन विध्वंस होईल.

बोधकथा

     प्रिया आणि समरच्या लग्नाला आता जवळजवळ तीन वर्ष होत आली होती. सुरवातीला सगळं सुरळीत चालू होत पण नंतर काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले. प्रिया बँक मध्ये कामाला होती तर समर एका परदेशी कंपनीत. घरात सगळ्या सुख-सोई होत्या. नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि प्रेम. भांडणाच कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल तर कधी किचनमध्ये सुरु राहिलेला पंखा. आजकाल तर काहीही शुल्लक कारण पुरेस होतं होत.
आज सकाळीहि खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला. दोघे एकमेकांशी तावातावने खूप भांडले नी काही खाता उपाशी ऑफिसला निघून गेले.
     आज तारीख, म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेंन्शन साठी बँकमध्ये येणार. पाटील आजी आजोबा संपूर्ण बँकमध्ये कौतुकाचा विषय होता. दोघे जोडीने नेहमी येत. दोघे सत्तरीच्या घरात होते, पण एकमेकांना खूप सांभाळत होते. त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे कि आपल्या नशिबात हे सुख का नाही. नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला नी कॉउंटर वर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला वळले आणि नेहमी प्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेउन तशीच उभी होती. "अगं काय हे, एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला? आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस, आज शेवटचा भरतो आहे, पुढच्यावेळी तूच भर" "असू द्या तुम्ही आहात ना, मग मी कशाला चिंता करू?" आजीचं गोड हसून उत्तर..
     थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता. आज कॉउंटरवर प्रिया होती, प्रियाच्या हातात फॉर्म देत "बावळट आहेस" आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली. "इथेच थांब, मी मॅनेजरला भेटून येतो, जाउ नकोस कुठे, हरवशील, वेंधळी आहेस तू" म्हणत आजोबा केबिन कडे गेले. "आजी, अहो इतके बोलतात आजोबा तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला, त्यात काहीच कठीण नाही" प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली. आजी हसली " अग मला येतो भरता फॉर्म, पण मला तो येत नाही म्हणून ह्यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते" "मी एकटी सगळं करू शकते, पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदरीने करतात ते मला आवडत" "ह्या वयात आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो." "संसारात दोघांनाहि दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाउन गाडी ओढायची असते" आजी गोड हसली.
     प्रियाच्या मनात आजी आजोबांचे प्रेम घर करून होते. प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला. समरने काल लवकर आला तेव्हा दोघासाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा-जेव्हा लवकर यायचा तेव्हा-तेव्हा करत होता. आज समरशी शांतपणे बोलायचं प्रियाने ठरवलं. .
 प्रिया कॉउंटर वर ती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येतांना दिसले आज ते एकटेच होते. "बोला आजोबा काय करायच आहे" "मला सावित्रीच अकाऊंट क्लोज करायच आहे, गेल्या आठवड्यात ती हार्टअटॅक नी घरी बसल्या जागी गेली" आजोबा बोलत होते" खूप काळजी घ्याची माझी ती! आणि अगदी प्रेम करीत होती.  आजोबानी डोळ्याला रुमाल लावला, प्रियालाहि रडू आवरलं नाही.
     "संसारात दोघांनाहि दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाउन गाडी ओढायची असते" प्रियाला हे वाक्य खूप खटकले. तिने घडलेला प्रसंग समरला सांगितला. हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला, खटके उडत होते पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं.  नंतर दोघांनीही प्रेमात आपले जीवन जगण्याचा निर्धार केला.
       *आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.*

    "एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे क्षमा करा, प्रेम द्या आणि प्रेम घ्या...

मनन चिंतन

    देवावरील प्रेम आणि शेजाऱ्यांवरील प्रेम हे अविभाज्य किंवा वेगळे न करता येण्यासारखे आहेत. देवावर प्रेम करून शेजाऱ्यावर प्रेम न करणे हा केवळ ढोंगीपणा आहे. संत योहान म्हणतो की, “आम्ही प्रीति करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीति केली. जर एखादा म्हणतो, “मी देवावर प्रीति करतो,” पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण आपल्या डोळ्यांपुढे असलेल्या भावावर जर एखादा प्रीति करीत नाही, तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीति करु शकत नाही! आम्हांला ख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे: जो देवावर प्रीति करतो त्याने त्याच्या भावावर प्रीति केलीच पाहिजे” (१योहान ४:१९-२१).
     तसेच माणसांवर प्रेम करून देवावर प्रेम न करणे हे ही काही शक्य नाही. कारण त्याच्यासाठी मनुष्य सर्वकाही होण्याचा धोका असतो. आपण जीवनात देवावरील व शेजाऱ्यावरील अश्या दोन्ही प्रेम-संबंधावर लक्ष दिले पाहिजे.
देवावरील प्रेम
       ‘सर्व आज्ञांत महत्वाची पाहिली आज्ञा कोणती?’ ह्या नियमशास्त्राच्या शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाला येशूने शेमातील (यहुदी प्रार्थना) सुरवातीचे शब्द वापरून उत्तर दिले. येशूने दिलेली पहिली आज्ञा पुढील दोन गोष्टी स्पष्ट करते.
अ. आपला देव एकच आहे. सृष्टीनिर्माता व आपला पिता प्रभू हा एकच आहे. दावीद राजा आपल्या प्रार्थनेत म्हणाला, “माझ्या प्रभो परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही. तुझ्या लीला आम्ही ऐकल्या आहेत म्हणून आम्ही हे जाणतो” (२ शमुवेल ७:२२). संदेष्टा यशया म्हणतो, “परमेश्वर इस्राएलचा राजा आहे सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलला वाचवितो. परमेश्वर म्हणतो, “मीच फक्त देव आहे. दुसरे कोणीही देव नाही. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे” (यशया ४४:६).
ब. आपल्या प्रभुवर संपूर्णपणे प्रेम करा. आपला देव पूर्ण हक्काने प्रेमाची मागणी करतो. प्रभू म्हणतो, “तू आपला देव जो तुझा प्रभु आहे, त्याजवर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीति कर” (मार्क १२:३०). प्रभू येशू येथे हेच सांगू इच्छितो की आपण देवावर अविरीतपणे प्रेम केले पाहिजे. आपल्या हृदयात प्रथम जागा ही प्रभूसाठी असली पाहिजे.
शेजाऱ्यांवरील प्रेम
      दुसरी आज्ञा ही आपल्याला शेजाऱ्यांवर, जसे आपण स्वतःवर प्रेम करतो तसे प्रेम करण्यास सांगत आहे. प्रभू येशुसाठी आपला शेजारी हा कोणीही व्यक्ती जो गरजेत आहे त्यास आपण मदत केली पाहिजे. देवावर असलेले प्रेम हे शेजाऱ्यांवरही दिसून येते. मदर तेरेजा म्हणतात, “जर आपण एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली नाही किंवा भुकेल्या व्यक्तीला अन्न न देता पाठवून दिले तर हे योग्य आहे का?” याकोब आपल्या पत्रात म्हणतो, “माझ्या बंधूंनो, जर एखादा म्हणतो की, मी विश्वास धरतो पण तशी कृती करीत नाही तर त्याचा काय उपयोग? तो विश्वास त्याला तारू शकणार नाही (याकोब २:१४).

विश्वासू लोकांच्या पार्थना
प्रतिसाद – दयावंत प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१) आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ बंधू-भगिनी व सर्व भाविकांनी सदैव ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत असताना देवाचे कार्य अविरीतपणे करत रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) प्रत्येक ख्रिस्ती भाविकांनी आपले जीवन जगत असताना देवावर व आपल्या शेजाऱ्यावर संपूर्ण मनाने, जीवाने व शक्तीने प्रेम करावे म्हणून प्रार्थना करूया.

३) आजच्या ह्या जगाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात आहे. परंतु आजची पिढी अनैतिकता, आत्महत्या, भ्रष्टाचार आणि इतर वाईट मार्गावर चालून आपले जीवन नष्ट करत आहेत. अश्या तरुणांना परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे व त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या समाजात व कुटुंबात जे कोणी आजारी आहेत अश्या सर्वांना प्रभूचा आशिर्वाद मिळावा व आजार सहन करण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजासाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment