Thursday 31 October 2019


Reflection for the Homily of 31st SUNDAY IN ORDINARY TIME (03-11-2019) By Fr. Minin wadker.




                           सामान्य काळातील एकतिसावा रविवार




दिनांक: ०३/११/२०१९
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ११:२२-१२:२.
दुसरे वाचन: थेस्सलोनिकाकरांस दुसरे पत्र १:११-२:२.
शुभवर्तमान: लूक १९:१-१०.

प्रस्तावना:

          आज आपण सामान्य काळातील एकतिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशुला स्विकारून जीवनात आमुलाग्र बदल घडून आणण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात देव हा साऱ्या सृष्टीचा निर्माता आहे व तो त्याची चांगल्याप्रकारे निगा राखतो ह्याची आपणास कल्पना येते. दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलोनिकाकरांस प्रार्थनेचे आश्वासन देऊन सांगतो कि, ‘तुम्ही देवाच्या पाचारणाला प्रामाणिक असा व देवाची महिमा सदैव गात रहा; परमेश्वर तुम्हांवर कृपादृष्टीचा वर्षाव करील.तर संत लुकलिखित शुभवर्तमानामध्ये येशू जक्कय नावाच्या जकातदाराला त्याच्या पापांची क्षमा करतो आणि त्याचे व त्याच्या कुटुंबाचे तारण करतो.
येशूच्या आगमनाने जक्कयच्या जीवनात परिवर्तन घडून आले व त्याच्या जीवनाचे सार्थक झाले. आपणसुद्धा जक्कयप्रमाणे येशूला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊया आणि चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील राहूया. ह्यासाठी लागणारी कृपा व शक्ती ह्या पवित्र मिसाबलीदानात सहभागी होत असताना मागुया. 

सम्यक विवरण
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ११:२२-१२:२

          शलमोनाचा ज्ञानग्रंथ या पुस्तकाचा लेखक सांगतो कि, देव साऱ्या सृष्टीवर प्रेम करतो. तो निर्माता असून तो साऱ्या सृष्टीची काळजी घेतो. देव कोणत्याच गोष्टींचा तिरस्कार करीत नाही कारण तो सर्व सृष्टीची चांगल्या प्रकारे देखरेख करतो. तो सर्वशक्तिमान आहे, त्याची सृष्टीवरील दया व प्रेम अपार आहे. लेखक शेवटी सांगतो कि, ‘देव मनुष्याला त्याच्या पापांची क्षमा करितो व नवे जीवन जगण्यास प्रेरित करतो.
दुसरे वाचन: थेस्सलोनिकांकरांस दुसरे पत्र १:११-२:२
          संत पौल आपल्या पत्राद्वारे धर्म-परिवर्तन केलेल्या लोकांना सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. संत पौल त्यांस ख्रिस्ती जीवन व विश्वासामध्ये दृढ होण्यास प्रेरणा देतो, जेणेकरून देवाची महिमा प्रगट होईल. येशूची येण्याची दुसरी वेळ जवळ आलेली आहे आणि लोक आळशी जीवन जगत आहे म्हणून पौल थेस्सलोनिकाकरांस विश्वासात घेवून सांगतो कि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. तुमचे पाचारण देवाला मान्य व्हावे म्हणून तुम्ही देवाची स्तुती व महिमा गात राहा.

शुभवर्तमान: लूक १९:१-१०

          लुकलिखीत शुभवर्तमानामध्ये येशूच्या आगमनाने जक्कयचे झालेले हृदयपरिवर्तन व तारण ह्याविषयी ऐकावयास मिळते. रोमन साम्राज्यामध्ये जकातदार बळजबरीने आणि वाजवीपेक्षा अधिक कर वसूल करीत असे. ह्यामुळे सामान्य व्यक्तीला भरपूर त्रास सहन करावा लागे. लेखक सांगतो कि जक्कय मुख्य जकातदार होता. तो इतर कर वसूलदारांपेक्षा जास्त कर वसूल करीत असे.
जक्कय श्रीमंत होता; संपत्तीमुळे तो देवापासून दुरावला होता. जेव्हा येशू जेरीकोला जात होता, तेव्हा जक्कय येशूला पाहण्यासाठी व्याकूळ झाला होता. जक्कय उंचीने कमी असल्यामुळे तो झाडावर चढला आणि येशूला पाहू लागला. जक्क्यचे वर्णन खालील मुद्यावरून स्पष्ट होते.
१. जक्कयची सामाजिक स्थिती
          जक्कय यहुदी होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. अशी मोठी सामाजिक स्थिती असूनही त्याला समाजामध्ये पापी म्हणून संबोधले जात होते. मुख्य जकातदार व श्रीमंत असूनही इतर यहुदी त्याला तुच्छ मानत होते. त्याला समाजामध्ये आदर नव्हता. त्याच्याकडे पुरेसा पैसा होता परंतु त्याचे पाप व भोग यापासून तारण झाले नव्हते. धन व श्रीमंती असूनही तो पैशाच्या व्यवहारामध्ये नीतिमान नव्हता.
२. जक्कय मार्गाच्या शोधात
          जक्कयची मनःस्थिती अत्यंत निराशेने भरलेली होती. त्याला येशूला पहावयाचे होते. परंतु लोकांच्या गर्दीमुळे त्याला येशूला पाहता आले नाही. जक्कयने येशूला पाहण्याचा ठाम निःश्चय केला. म्हणून तो येशूला पाहण्यासाठी झाडावर चढला.
३. जक्कयचे तारण
          येशू जक्कयला म्हणाला, ‘जक्कय त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने येशूचे आगत-स्वागत केले. जक्कयने क्षणाचाही विलंब न करता, येशूला आपल्या घरात आणले आणि स्वत:च्या जीवनाचे तारण करून घेतले. लोकांनी केलेली कुरकुर कानी न घेता, जक्कयने निर्धारपणे स्वत:च्या जीवनाला एक नवी दिशा दिली. जक्कय येशूला म्हणाला, ‘मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.हे पाहून येशू जक्क्यला सांगतो की, ‘आज तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे तारण झालेले आहे.
बोधकथा: “Amazing Grace” (आश्चर्यकारक कृपा)
  
          जॉन न्यूटन हा  गुलामांचा व्यापारी होता. १७४८ मध्ये अफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून घेऊन जात असता उत्तर अटलांटिक महासागरात वादळ निर्माण झाले. जहाजात अचानक पाणी शिरू लागले; त्या जहाजातील लोकांनी पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली; परंतु सर्वकाही निष्फळ ठरत होते. हे सर्वकाही चालले पाहूनन्यूटन त्याचा जीव मुठीत आणून ओरडला, “हे परमेश्वरा द्या करा”. आणि काय चमत्कार महासागरातील वादळ काही वेळानंतर शांत झाले आणि त्याच्या सहकाऱ्यांना जहाजात शिरलेले पाणी काढण्यात यश आले. अशाप्रकारे दोन आठवड्यानंतर त्यांचे जहाज सागरकिनारी लागले.ह्या सर्व कृत्याचा आढावा घेत असता, त्याच्या लक्षात आले कि, तो चमत्कारिकरित्या बचावला होता आणि ह्याचा कर्ता-करवीता दुसरा-तिसरा कोणी नसून खुद्द परमेश्वरच आहे. हि जाणीव झाल्यावर त्याने बायबल वाचन सुरु केले. त्याच्यात परिवर्तन झाले परंतु त्याने त्याक्षणी गुलामांचा व्यापार करणे सोडले नाही, तर आणखी सात वर्षे त्याने तो कारभार चालूठेवला. ह्या वर्षांत त्याने गुलामांना माणुसकीच्या नात्याने वागणूक दिली.  नंतर जॉर्ज व्हाईटफिल्ड आणि जॉन वेस्ली ह्यांच्या संपर्कात राहून त्याने ख्रिस्ती धर्माचा सखोल अभ्यास केला आणि १७६४ साली त्याने अँग्लीकन धर्मगुरू पदाची दिक्षा घेतली. १७७२ मध्ये त्याने जगभर प्रसिद्ध आणि नावाजलेलं भक्तीगीत लिहिलं, “Amazing Grace”(आश्चर्यकारक कृपा).
       ज्याप्रमाणे जक्कयचे ह्र्दयपरिवर्तन झाल्यावर त्याने ख्रिस्ताला स्वीकारले अगदी त्याचप्रकारे जॉन न्यूटन ह्याच्या जीवनातही घडले. 

मनन चिंतन

            देव पापी मनुष्याच्या शोधात येतो व त्याचे तो तारण करतो. बायबलमध्ये जुन्याकरारापासून ते नव्याकरारापर्यंत देवाने वेगवेगळे संदेष्ट्ये मानवाच्या शोधात पाठवले. सर्वात शेवटी देवाने स्वत:च्या पुत्राला भूतलावर मनुष्याच्या तारणासाठी व पापमुक्तीसाठी पाठविले. ह्याला कारण एकच ते म्हणजे देवाचे अपार प्रेम’.
            संत आगुस्तीन म्हणतात, ‘ज्या देवाने तुझ्या परवानगी शिवाय तुझी निर्मिती केलेली आहे, तो देव, तुझ्या सहकार्याशिवाय तुला वाचवू शकणार नाही.याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्याला  स्वत:च्या तारणासाठी देवाच्या सानिध्याची नितांत गरज असते. त्याने स्वत:ला विसरून देवाला अंगिकारले पाहिजे. कारण देव प्रेमाळू आहे. तो आपल्याला कधीच सोडणार नाही. म्हणूनच शलमोनाच्या ज्ञानग्रंथात देवाला अखंड सृष्टीची काळजी आहेअसे सांगितले आहे.
             संत पौल सांगतात की आपण देवाची स्तुती गायला पाहिजे. कारण आपले पाचारण हे देवाचे दान आहे. आपल्या पाचारणास देवाची गरज आहे.  प्रत्येक संताला भूतकाळ असतो, तर प्रत्येक पापी मनुष्याला भविष्यकाळ असतोअसे म्हणतात. जक्कयचे जीवन पाप व भोगाने व्यापून गेलेले होते. फक्त पैसा त्याच्या नजरेस येत होता. इतर लोकांच्या नजरेसमोर तो पापी होता. त्याला बहुतेक वेळा अपमानास तोंड द्यावे लागे. अशा परिस्थितीला कंटाळून त्याला तारण प्राप्ती करून घ्यायची होती. येशू बद्दल त्याने ऐकले होते म्हणून त्याला पाहण्यासाठी तो झाडावर चढला आणि प्रत्यक्षात येशूने जक्कयच्या घरी जाऊन त्याचे तारण केले.
               आपल्या ख्रिस्ती जीवनात बहुतेकवेळा आपण सुद्धा धन-दौलत, मान-सन्मान, फसवा-फसवी ह्यांच्या आहारी गेलेलो आहोत. जक्कयप्रमाणे आपल्या जीवनाचे तारण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण येशूला स्विकारले पाहिजे. फक्त येशूच आपले तारण करू शकतो. म्हणून ह्या  मिस्साबलीत येशूने आपल्या ह्या ह्दयरुपी घरात यावे आणि आपले तारण करावे अशी प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद:  हे प्रभू येशू, आमचे तारण कर.   
           
१. आपले पोप फ्रान्सिसमहागुरुस्वामीधर्मगुरू व सर्व व्रतस्थांनी सर्व लोकांना प्रभूजवळ येण्यास प्रोत्साहीत करावे व त्यांच्या दैनंदिन आचरणातून ख्रिस्ती राहणीमानाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक जीवघेण्या आजाराने ग्रासलेले आहेतत्यांना प्रभूच्या प्रेमाचा व आरोग्याचा स्पर्श व्हावा. हे आजार त्यांना सहन करण्यास शक्ती व सामर्थ्य लाभावे व परत एकदा त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी भारत देशाची सेवा करीत असताना त्यांनी अहंकार, धन-दौलत, मान-सन्मान ह्यांच्या आहारी न जाता, प्रामाणिकपणे देशाच्या उन्नतीसाठी व भरभराटीसाठी सदैव झटावे म्हणून प्रार्थना करूया. 
४. आज ख्रिस्ती लोकांना खूनबलात्कारछळवणूक व पिळवणूक असे बरेच अत्याचार सहन करावे लागत आहेत तसेच ख्रिस्ती समाजाविरुद्ध बॉम्बस्फोट व दंगली घडवून आणल्या जात आहेत. परमेश्वर कृपेने ते सर्व थांबावे व सर्वत्र प्रेम व शांती निर्माण व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. जे संपत्ती, धनदौलत ह्यांच्या मोहामुळे देवापासून दुरावलेले आहेत, देवाची जागा त्यांच्या ह्या द्रव्याने घेतली आहे अशांना परमेश्वराची महती कळावी व त्यांनी परमेश्वराकडे साधर्म परतावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून  आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment