Thursday, 5 December 2019


Reflection for the Homily of Second Sunday of Advent (8-12-2019) By Br. Robby Fernandes





आगमन काळातील दुसरा रविवार



दिनांक : ८/१२/२०१९
पहिले वाचन : यशया ११:१-१०
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र: १५:४-९
शुभवर्तमान : मत्तय: ३:१-१२



विषय: "पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे."

प्रस्तावना:

          आज देऊळमाता आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास पश्चाताप करण्यास आवाहन देत आहे. या पश्चातापाद्वारे आपण स्वतःचे अंत:करण शुद्ध व निर्मळ करतो. अशाप्रकारे आपण प्रभूच्या येण्याची व त्याला स्वीकारण्यासाठी या आगमन काळामध्ये स्वतःची पश्चातापाद्वारे तयारी करतो.
          आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगत आहे की परमेश्वर स्वतः दीन व दुबळ्यांचा न्याय करील, व दुर्जनांचा संहार करील. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगत आहे की, जसा देवाच्या गौरवा करिता ख्रिस्ताने तुमचा-आमचा स्विकार केला, त्याप्रमाणे आपण सुद्धा एकमेकांचा स्वीकार करावा.  शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणारा योहान सांगत आहे की, "पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रभूच्या आगमनासाठी वाट तयार करा."  या आगमन काळामध्ये आपण सुद्धा आपल्या मनाची व अंत:करणाची पश्चातापाद्वारे तयारी करूया, व ह्या मिसाबलिदानामध्ये आपल्याला लागणारी कृपा व शक्ती मागूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन : यशया ११:१-१०

          पहिले वाचन हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले आहे. आजच्या वाचनामध्ये यशया संदेष्टा परमेश्वराचे गुणगान गातो  तो म्हणतो: परमेश्वर स्वतः दुर्बळांचा न्याय करील; दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील. तसेच दुर्जनांचा संहार करील. लांडगा कोकराजवळ राहील. वासरू व तरुण सिंह एकत्र राहतील. तान्हेबाळ नागाच्या बिळा जवळ खेळेल. कारण सागर जसा जल पूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. यामुळे सर्व राष्ट्रीय परमेश्वराच्या जवळ शरणास येतील.

दुसरे वाचन : रोमकरांस पत्र: १५:४-९

          दुसरे वाचन हे संत पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले आहे. संत पौल सांगतो; "आपण एक मताने व एक मुखाने आपल्या परमेश्वराचे गुणगान व गौरव करावे." जसा देवाच्या गौरवा करिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्विकार केला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा एकमेकांचा स्वीकार करावा. कारण ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी सेवक बनला जेणेकरून त्याचे परराष्ट्रीयांमध्ये स्तवन  गाईले जाईल.

शुभवर्तमान : मत्तय: ३:१-१२

        आजच्या शुभवर्तमानामध्ये मत्तय आपल्याला एक ताकीद देत आहे की, "पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे." तसेच अरण्यामध्ये अशी वाणी झाली की, "परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा व त्याच्या वाटा नीट करा."
         मत्तयलिखित शुभवर्तमानामध्ये मत्तय आपल्याला बाप्तिस्मा करणारा योहान याचा दाखला देत आहे. बाप्तिस्मा करणारा योहान ह्याला परमेश्वराने त्याचा मार्ग नीट करण्यास व त्याचा संदेश संपूर्ण जगाला देण्यास पाठविले होते. जेणेकरून लोक पापवृत्ती सोडून परमेश्वराच्या स्वागतासाठी तयार राहतील. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो; "मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा; परंतु माझ्या मागुन जो येत आहे, तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. त्यामुळे पश्चाताप करा व पाप वृत्तीपासून दूर रहा.

मनन चिंतन :

          माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आज देऊळ माता आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहे. ह्या आगमन काळामध्ये देऊळ माता आपणासमोर अनेक प्रकारची व्यक्तिमत्त्व मांडत आहे. जेणेकरून आपण त्यांच्या जीवनाद्वारे, उदाहरणाद्वारे प्रेरित होऊ. ती व्यक्तिमत्वे म्हणजे; पवित्र मरिया, योसेफ, आणि बाप्तिस्मा करणारा योहान. येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या तयारी करीता, बाप्तिस्मा करणारा योहान हा आपल्यासमोर एक आदर्श असे व्यक्तिमत्त्व परमेश्वर आहे; किंबहुना आपण तारणाऱ्याचा  मार्ग तयार करण्यासाठी योहाना कडून प्रेरणा व उत्तेजन मिळवू शकतो. येशू ख्रिस्ताच्या अगोदर बाप्तिस्मा करणारा योहान पश्चातापा विषयी सर्व प्रथम बोलला. असे असूनही योहानाने स्वतःचा  दर्जा कधीच उंचाविला नाही  उलट त्याने म्हटले, "मी पाण्यानें तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा; परंतु माझ्या मागून  जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे." (मत्तय ३:११) अशा प्रकारे योहानाने स्वतःला दुय्यम स्थान देऊन, परमेश्वराच्या पुत्राला प्रथम स्थान दिले. दोघानाही पश्चातापा विषयी लोकांना प्रबोधन केले. दोघे परमेश्वराच्या योजने प्रमाणे चालले, आणि परमेश्वराचा एक हेतू व उद्देश म्हणजे "तारणाचा" उद्देश त्यांनी  पूर्ण केला. 
          पश्चाताप म्हणजे  मेटानोईआ (Metanoia) म्हणजेच जीवनाचे कायापालट करून नव्या दिशेने जाणे. म्हणूनच  आज देऊळ माता आपल्याला पश्चातापाचा धडा गिरवण्याचे आमंत्रण देत आहे. जीवनाचा अर्थ पश्चातापाद्वारे समजविण्याचा प्रयत्न करीत आहे. आजची तिन्ही वाचने आपल्याला परमेश्वराजवळ येण्याचे आवहान करत आहे. यशया संदेष्टा आपल्याला एक नव्या प्रकारच्या जीवनाचा उलघडा करून देत आहे. जेथे लांडगा कोकराजवळ राहील, वासरू व सिंह एकत्र राहतील, तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, अशा प्रकारचे दृश्य परमेश्वर आपल्याला दाखवत आहे. नव्या जगाची ओळख करून देत आहे. तसेच संत पौल म्हणतो की, “आपण एक मुखाने व मनाने परमेश्वराचे गुणगान करावे; कारण परमेश्वराचा पुत्र आपणा सर्वांसाठी सेवक बनला.” आजचे शुभवर्तमान स्वतःच्या हृदयाची, मनाची तयारी करण्यास योहानाच्या संदेशाद्वारे आपणाला सांगत आहे की, ‘पश्चाताप करा कारण देवाचे राज्य जवळ आले आहे.’ योहानाने फक्त उपदेश दिला नाही तर स्वतःचे उदाहरण आपणासमोर मांडले आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पहिली स्वतःची तयारी केली व नंतर लोकांना पश्चातापाचा अनुभव घेण्यास आमंत्रण केले.
       योहानाने परमेश्वराच्या संदेशाची सुरुवात अरंण्यामधून केली. अरंण्य हे सुद्धा इस्रायली लोकांचे जन्मस्थान आहे. म्हणून होशेय संदेष्ट्याद्वारे परमेश्वर म्हणतो की, “मी परमेश्वर तिला शिकवीन, मी तिला वाळवंटात नेईन, व मी तिच्याशी प्रेमाने बोलेन.” (होशेय २:१४-१५) परमेश्वराने इस्रायली प्रजेला चाळीस वर्ष वाळवंटातून प्रवास करायला लावला, जेणेकरून सर्व इस्रायली प्रजा पश्चाताप करेल, व परमेश्वराच्या वचन बद्ध वतनामध्ये प्रवेश करेल. त्याच प्रमाणे परमेश्वर पश्चातापाद्वारे आपल्या सर्वांची शुद्धता करण्यासाठी व परमेश्वराच्या राज्यांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी, इस्रायल प्रजेप्रमाणे आपल्या अंत:करणाचे, मनाचे, तनाचे शुद्धीकरण करण्यासाठी बोलावीत आहे. जॉन होवर योडर म्हणतात, “पश्चाताप करणे म्हणजे फक्त वाईट वाटने नव्हे, तर वेगळ्याप्रकारे विचार करणे होय.”
          वसंत ऋतु मध्ये झाडांमध्ये खूप बदल घडून येतो. ज्याप्रमाणे झाडे स्वतःची पाने गाळतात व नव्या पालवीसाठी तयारी करतात; त्याचप्रमाणे आज परमेश्वर आपणा सर्वांची तयारी करण्यास सांगत आहे. ज्याप्रमाणे झाडांची पाने गळून पडतात त्याचप्रमाणे आपल्या वाईट वृत्ती-प्रवृत्ती आपण काढून टाकल्या पाहिजेत. नव्या पालवी प्रमाणे आपण नव्या संबंधांना, जीवनाला, नात्यांना अनुमती द्यायला पाहिजे. पश्चातापाच्या डोळ्यांनी आपण पाहायला शिकले पाहिजे, जेणेकरून आपण परमेश्वराच्या येण्याला हर्षाने आपल्या हृदयामध्ये जागा करू. म्हणूनच परमेश्वराने बाप्तिस्मा योहानाला परमेश्वराचा मार्ग तयार करण्यासाठी पुढे पाठविले. पण त्यांने स्वतःच्या जीवनाद्वारे लोकांच्या हृदयात व मनात बदल घडवून आणला. बाप्तिस्माद्वारे पापांचा पश्चाताप करण्यास त्याने लोकांना आवाहन केले. या आगमन काळामध्ये परमेश्वराच्या पुत्राचा स्विकार करण्यासाठी स्वतःच्या जीवनाची, घरांची, व हृदयाची तयारी करण्यासाठी देऊळ माता आपणा सर्वांना बोलावत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :

प्रतिसाद : ‘हे प्रभू आमची प्रार्थना स्विकार’

१. आपले परमगुरु फ्रान्सिस,  धर्मगुरू आणि सर्व व्रतस्थ बंधू-भगिनी ह्यांच्याद्वारे प्रभूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावी म्हणून प्रभु कडे प्रार्थना करूया.
२. आपल्या जीवनातील स्वार्थीपणा, गर्व अहंकार या सैतानी वृत्तींमुळे आपण परमेश्वरापासून दुरावलो जातो . ख्रिस्ताच्या दयेची, प्रेमाची जाणीव सर्वाना व्हावी व ख्रिस्ता जवळ सर्वांनी वळावे म्हणून प्रभुचरणी प्रार्थना करूया.
३. या आगमन काळात आपण प्रभूच्या स्वागतासाठी स्वतःच्या हृदयाची व मनाची तयारी करावी व स्वतःच्या जीवनात योग्य अशी जागा तयार करावी म्हणून प्रभु चरणी प्रार्थना करूया.
४. जे कोणी आजारी व हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांच्या जीवनामध्ये प्रभूचा अनुभव यावा म्हणून प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक. सामाजिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रभु कडे प्रार्थना करूया.


2 comments:

  1. I think you all need to give some moral stories in the sermon. Thanks

    ReplyDelete
  2. Brothers your homilies are a great help to us who are just getting used to the language. I appreciate the hard work you put in to make the homilies good and appealing.
    Thanks and God bless you.
    Fr Ronnie, St Louis, Dahisar, Mumbai.

    ReplyDelete