Wednesday, 29 April 2020

Reflections for the Homily of Fourth Sunday of Easter (03-05-2020) By Fr. Wilson D’Souza and Dn. Isidore Patil.



पुनरुत्थान काळातील चौथा रविवार


 दिनांक: ०३/०५/२०२०
 पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,३६-४२.
 दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५.
 शुभवर्तमान: योहान १०:१-१०.



विषय: “येशू आमच्या जीवनात स्वर्गीय दार.”
 प्रस्थावना:
आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. हा रविवार उत्तम मेंढपाळाचा रविवार म्हणून साजरा केला जातो. आजची उपासना आपल्याला आपल्या उत्तम मेंढपाळाप्रमाणे म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जीवनावर मनन चिंतन करण्यास व त्याच्याप्रमाणे होण्यास आमंत्रण करत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो; पेत्र आपल्याला पश्चाताप करण्याचे आवाहन करत आहे. पश्चाताप केल्याने आपण प्रभू येशू जो जीवन देणारा दरवाजा आहे, त्याच्या जवळ जाऊ शकतो. आज पेत्र दुसऱ्या वाचनात येशू ख्रिस्तने केलेल्या त्यागाविषयी सांगत आहे. त्याच्या पावलांवर पाऊल टाकून मेंढराप्रमाणे वागण्यास तो सांगत आहे. प्रभू येशू हा आपला उत्तम मेंढपाळ आहे आणि ह्या मेंढपाळाला आपण अनुसरावे कारण ह्या मेंढपाळाला तारण प्राप्ती झाली आहे. जेव्हा आपण ह्या तारण प्राप्ती झालेल्या मेंढपाळाला अनुसरु तेव्हाच आपल्यला सुद्धा तारणदायी जीवनाचा अनुभव येईल.
          उत्तम मेंढपाळाला नेहमी मेंढरांबरोबर राहावं लागत, कारण लांडगा केंव्हाही येऊन मेंढरावर हल्ला करून त्यांना खाऊन टाकू शकतो. त्यामुळे उत्तम मेंढपाळ नेहमी जागृत व सावध राहत असतो. प्रभू येशू शुद्धा आपला उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्यावर नेहमी निगा राखतो. सैतान लांडग्याप्रमाणे आपल्यावर केव्हाही हल्ला करू नये म्हणून, तो आपल्या बरोबर नेहमी राहत असतो. सैतानाच्या मोहात केव्हाही पडू नये म्हणून; तो नेहमी आपल्याला वाट दाखवत असतो. आपल्याला तारणप्राप्ती करून अनंत जीवनाकडे नेत असतो. म्हणून आजच्या ह्या उपासना विधीत सहभागी होत असताना देवाकडे आपल्याला उत्तम मेंढपाळाप्रमाणे होण्यास प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा व शक्ती मागुया. 

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,३६-४२.
          पेत्र व इतर शिष्य या सर्वांना पवित्र आत्म्याचे दान मिळाले आहे आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत बोलतात व लोकांना उपदेश करतात. आजच्या ह्या वाचनात पेत्र याहुद्यांना त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्चाताप करण्यास सांगत आहे. पेत्र हा सर्व शिष्यामध्ये मोठा होता म्हणून पेत्राला घोषणा करण्यास शिष्यांनी सांगितले. पेत्र सांगत आहे की, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला मारले आहे. त्याला वधस्थंभावर खिळविन्यास मदत केली आहे. हे सर्व पेत्र संपूर्ण मानवजातीला निक्षून बोलत होता. कारण जेव्हा तेथे जमलेल्या याहुद्यांना त्यांच्या वागणुकीचा पश्चाताप झाला व ते पेत्राला विचारू लागले की, आम्ही आता काय करावे? यावर पेत्र त्यांना बाप्तिस्मा घेण्यास सांगत आहे व ते सांगत असता तो म्हणतो की, हे तुम्हाला व तुमच्या मुलांना व जीतक्यांना परमेश्वर देव बोलावत आहे त्यांना बाप्तिस्मा करावयास देव बोलावत आहे.

दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५.
          ह्या वाचनात पेत्र सांगत आहे की, परमेश्वर त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास आपणाला सांगत आहे. पेत्र सांगतो प्रभू येशू ख्रिस्ताने आपणा सर्वांसाठी खूप दु:ख सहन केले. त्याची चूक नसताना त्याची निंदा व थट्टा मस्करी केली. तरीही त्याने वाईट मानून घेतले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने कधीही उलट उत्तर दिले नाही. किंबहुना त्याने कोणाचीही तक्रार केली नाही. त्याने निमुटपणे सर्व काही सहन केले. हे सर्व त्याने आपल्या पापांकरिता केले. कारण, प्रभू येशू ख्रिस्त हा आपला मेंढपाळ आहे व आपण त्याची हरवलेली मेंढरे आहोत. तो आपल्याला जीवनात येणाऱ्या काटेरी मार्गावर मात करून बोलावत आहे. ज्या प्रमाणे त्याने केव्हा तक्रार केली नाही त्या प्रमाणे आपणही विनातक्रार जीवन जगण्यास बोलावत आहे.

शुभवर्तमान: योहान १०:१-१०.

          आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू स्वत:ची तुलना दरवाजाशी करत आहे. ह्या वाचनात आपण ऐकतो की, येशु म्हणतो चोर चोरी करावयास मेंढवाड्यात जेव्हा येतो तेव्हा तो दरवाजाने आत जात नाही. परंतु मेंढपाळ नेहमी दरवाजाने आत जातो. मेंढरे मेंढपाळाची वाणी ओळखतात. जेव्हा मेंढपाळ मेंढरांना हाक मारतो; तेव्हा ते त्याच्या हाकेला पळून येतात. परंतु मेंढरे मेंढपाळशीवाय दुसऱ्या कोणीही हाक मारली तर मेंढरे त्याला प्रतिसाद देत नाहीत. कारण, मेंढरे फक्त मेंढपाळाचा आवाज ओळखतात व ऐकतात. येशू ख्रिस्त पुढे सांगतो की, मी दरवाजा आहे. आणि जो माझ्यामधून आत जातो त्याला तारणप्राप्ती होईल. चोर फक्त चोरी करावयास व घात करावयास येतो परंतु येशूख्रिस्त जीवनदान देण्यासाठी आला आहे.  

१. मनन चिंतन:
          माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला दाराशी संबंध येत असतो. दरवाजा आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग किंवा अंग झालेले असते. घराचा दरवाजा बंद असले म्हणजे आपल्याला कळून चुकते की, घरात कोणी नाही. आज अनेक प्रकारची दरवाजे आपण पाहत असतो. एकेरी दरवाजा, दुहेरी दरवाजा, रिमोटने उघडला जाणारा दरवाजा, ओढून बंद किंवा उघडला जाणारा दरवाजा (Push and Pull door), पारदर्शक दरवाजे असे असतात की, बाहेर काय चाललेले आहे ते दिसते, परंतु आत काय आहे हे नाही. काही दरवाजे कडी कोंड्याविना(See through) असतात. काहिक स्वयंचलित (Automatic) असतात.
          दरवाजे आपले अस्तित्व दाखवतात. आपण कोठे आहोत ह्याची जाणीव देतात. ऊन्हा-पावसाळ्यात व हिवाळ्यात आपल्याला सांभाळतात. एखाद्याचा दरवाजा बंद असेल व आपण तो उघडला तर त्यांना आवडत नाही, त्याद्वारे आपल्याला समजते की, एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात अडचण आल्यासारखे होते.
          मानसशास्त्रज्ञ दरवाज्या विषयी बोलताना आपल्याला सांगत आहेत की, दरवाज्यावरून आपणाला व्यक्तीचे व्यक्तिमत्व कळत असते. जी व्यक्ती आपला दरवाजा दुसऱ्यांसाठी उघडा ठेवते; ह्याला खुले व्यक्तिमत्व (Open Personality) म्हणतात. तर एखादी व्यक्ती दरवाजा ठोकल्यावर दारा समोर येते व आपल्याला आत घुसू देत नाही त्याला बंद व्यक्तिमत्त्व (Close Personality) म्हणतात. बंद व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती दुसऱ्याला आपल्या जीवनात स्थान देत नाहीत. तर काही लोक असे म्हणतात, ‘कशाला बाहेर उभे राहिलात? घर आपलंच आहे दार उघडून आत यावे.’ ह्या प्रकारची लोकं पारदर्शक आणि मनाने, आत्म्याने आणि अंत:करणाने साफ असतात.
          दरवाजा कसा आहे हे जाणण्यासाठी ते कसे कार्य करते हे सांगितले जाते. त्याचप्रमाणे माणसे कशी आहेत याचा अनुभव आपल्याला त्यांच्या भावनांवरून येतो ज्याला आपण भावनिक दरवाजे म्हणतो (Doors in our lives indicate our emotional self). पण त्याहूनही अधिक आणि आपल्या जीवनातील अध्यात्मिक दरवाज्याकडे थोडे लक्ष देऊ या.
          आपण आपल्या अंतःकरणाचा, हृदयाचा, काळजाचा दरवाजा कसा ठेवला आहे ह्याची थोडक्यात पाहणी करू या. आपण आपल्या काळजाचा दरवाजा उघडा ठेवला आहे का? तिथे कोणाची वस्ती आहे? कोणाचे आपल्या हृदयावर राज्य चालते ते पाहूया!
          हृदयाचा आणि अंतःकरणाचा दरवाजा पवित्र मानला जातो. रुफी कवी रुमी म्हणतात, “आपल्या अंतःकरणाचा अध्यात्मिक दरवाजा हा महामंदिरा (Cathedral) प्रमाणे असावा, जिथे गोडव्याचा किंवा मधुरलेचा अनुभव येतो (Sweet beyond telling). अविलाची संत तेरेजा म्हणतात, “आपल्या हृदयाचा दरवाजा म्हणजे मोठ्या किल्लेवजा वाडा (Castle) किंवा किल्ल्यासारखा असावा जो आंतरिक महाल, जिथे मला माझ्या हृदयाची, काळजाची, साफ-सफाई दिसते.
          अंतःकरणाचा दरवाजा उघडणे म्हणजे, देवाला आपल्यामध्ये राहण्यासाठी जागा तयार करणे. तो प्रकटीकरण ३:२० मध्ये म्हणतो, “पहा मी दाराशी उभा आहे व दार डोकावीत आहे. जर, कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर, मी त्याच्याजवळ आत जाऊन त्याच्याबरोबर जेवेण आणि तो/ती माझ्याबरोबर जेवेल.” संत पौल आपल्याला सांगत आहे, १ करिंथ ३:१६-१७ मध्ये की, ‘तुम्ही देवाचे मंदिर आहात, आणि तुम्हांमध्ये देवाचा आत्मा वास करीत आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, व तेच तुम्ही आहात.” ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा, आता उघड दार देवा!’
          Teilhard de Chardin नावाचे ईशज्ञानी म्हणतात, “जेवढे आपण आपल्या अंत:करणाचे दरवाजे सतत उघडे ठेवू, तेवढेच आपल्याला आज जाता येईल व आपल्यामध्ये असलेल्या देवाची आपल्याला ओळख भेटेल. Thomas Mentor नावाचे अध्यात्मिक लेखक म्हणतात, “देवाचे प्रेम शोधायचे असेल तर, अंतःकरणातील गाभाऱ्यात जाण्याची गरज आहे. तिथे तो लपलेला आहे. हेच देवाचे रहस्य आहे.”
          ‘शोधीशी मानवा राहुरी मंदिरी नांदतो देव तो आपुल्या अंतरी.’ जेव्हा आपण आपल्या अंतःकरणाचा दरवाजा उघडा ठेवतो, तेव्हा देव आपल्यात जागृत होतो. कारण तो आपल्यामध्ये व आपल्या बरोबर आहे. आपण त्याच्या सानिध्यात राहतो. म्हणून संत पौल गलतीकरांच पत्र २:२० मध्ये म्हणतात, “जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी.”
          तोच ख्रिस्त माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आपल्या जीवनाचे दार आहे. आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की, “जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे.” होय ख्रिस्त आपल्या जीवनाचे स्वर्गीय दार आहे. तो आपला मेंढपाळ आहे, आपण त्याची वाणी ऐकतो. तो आपल्यासाठी दार उघडतो व आपल्याला नावाने साद घालतो. आपण त्याची व तो आपली वाणी ओळखतो.
          “मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर, त्याला तारण प्राप्त होईल. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.” ख्रिस्त आपल्या जीवनातील अध्यात्मिक दार आहे. त्याच्या शिवाय आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. तो आपल्याला लुक लिखित शुभवर्तमानात ११:९-१० मध्ये सांगत हे की, “मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. होय ख्रिस्त आपल्या जीवनाचा दरवाजा आहे. आपल्याला सतत अरुंद दरवाजाने स्वर्गराज्यात प्रवेश करण्यासाठी सांगतो.
          हेच सत्य आजच्या पहिल्या व दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्यापुढे मांडत आहे. तो यहुदी व यरुशलेम रहिवाशांना सांगत आहे, “ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” तो म्हणाला, “आपल्या अंत:करणाचे दरवाजे उघडे करा. पश्चाताप करा आणि आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. अनेकांनी आपल्या अंतःकरणाचे, हृदयाचे, काळजाचे दरवाजे ख्रिस्तासाठी उघडले आहेत.” अंतःकरणाचा दरवाजा उघडा करणे म्हणजे, पापाला तिलांजली देऊन सदाचारण्यासाठी जगावे. कारण आपण मेंढरासारखे भटकत होतो, परंतु, आता तुमच्या जीवनाचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे आपण परत फिरले पाहिजे.
          आजच्या उपासनाविधीत सहभागी होत असताना; येशू ह्याला आपल्या जीवनाचा दरवाजा म्हणून स्विकारूया, त्याद्वारे आत शिरून त्याची वाणी ऐकू या. तो आपल्यासाठी सदोदित तारणाचा दरवाजा उघडून ठेवेल, त्याच दारातून आपण जीवण प्राप्ती व ती विपुल प्रमाणे करणार आहोत. त्या स्वर्गीय दरवाजातून स्वर्गात जाण्यासाठी ह्या उपासनाविधीत ख्रिस्त स्वर्गीय दार ह्याकडे विशेष प्रार्थना करू या.

२. मनन चिंतन:
“चोर आया चोरी करणे,
घात हत्या करणे
येशू आया जीवन देणे,
बहुतायक का जीवन देणे”.
ख्रीस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज देऊळमाता आपल्याला प्रभू येशू हा उत्तम मेंढपाळ व जीवन देणारा दरवाजा आहे ह्या दोन रहस्यांविषयी शिकवत आहे. आपण देवाची मेंढरे आहोत आणि येशू ख्रिस्त जो आपला मेंढपाळ आहे तो आपल्याला नेहमी चांगल्या वाटेने नेत असतो. चांगला मेंढपाळ हा कधीही आपल्या मेंढरांना चुकीच्या मार्गाने नेणार नाही. त्याच प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला चांगल्या आणि योग्य त्या वाटेने म्हणजेच तारणाच्या वाटेने नेत असतो. जेव्हा तो आपल्याला बोलावतो तेव्हा तो आवाज आपण ओळखतो. आपण त्याच्या मागे जातो; कारण आपल्याला त्याच्यावर विश्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे की तो आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा अंतर देणार नाही. प्रभू येशू आपला उत्तम मेंढपाळ आपल्याला तारणाची वाट दाखवतो व पुनरुत्थान व अनंतकाळच्या जीवनाकडे नेत असतो.
          आजच्या ह्या जगात आपल्याला खूप प्रकारचे आवाज ऐकायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती सामाजिक माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. काही जाहिराती जीवनात कसं जगायचं. आपण ह्या वस्तू घेतल्या तर आपले जीवन सुखी होईल. आपलं जीवन आनंदाने भरून जाईल. ह्या सर्वांपेक्षा आपण प्रभू येशूची वाणी ऐकली पाहिजे. परंतु अनेक वेळेला आपण भरकटतो व वाईट मार्गाला लांगतो, त्यामुळे आपल्या जीवनातील सुख, आनंद व शांती नाहीशी होते. प्रभू येशू हा आपला उत्तम मेंढपाळ आहे आपण त्याचा आवाज ओळखला पाहिजे व त्याच्याच आवाजावर विश्वास ठेवला पाहिजे. तसे केले तर आपल्याला तारण प्राप्ती होईल. आपल्याला अनंतकाळाच्या जीवनाचा लाभ घेता येईल. ह्या उत्तम मेंढपाळाने आपल्यासाठी दु:ख सहन केले. आपल्यासाठी निंदा व मार सहन केला. जेणेकरून आपल्या वाटेवर काटे न येता; आपला मार्ग मोकळा होईल. आपल्याला अनंतकाळचे जीवनाचा अनुभव घेता येईल.

बोधकथा:

एकदा एक मेंढपाळ त्याच्या मेंढरांना त्याचा मेंढवाड्यात चारत होता. त्याच्या शेजाऱ्याकडे काही कुत्रे होते. एकेदिवशी त्या कुत्र्यांनी येऊन मेंढरावर हल्ला केला व काहीक मेंढरे खाऊन टाकली. असे खूप दिवस चालू होते. कुत्रे नेहमी येऊन त्या मेंढपाळाची मेंढरे खात असत. याला उपाय म्हणून त्या मेंढपाळाने तीन प्रकारचे उपाय सुचवले. पहिला उपाय म्हणजे; तो त्याच्या शेजाऱ्याला कोर्टात नेऊन बंदिवासात टाकावे. दुसरा म्हणजे; तो त्याच्या मेंढवाड्याभोवती मोठी भिंत बांधून कुत्र्यांना त्याच्या मेंढवाड्यापासून दूर ठेवणे. परंतु मेंढपाळाने तिसरा उपाय निवडला तो असा की, मेंढपाळाने त्याच्या त्या शेजाऱ्याला दोन मेंढर विकत आणून दिली.  यामुळे तो शेजारी त्याच्या त्या मेंढरांची चांगली देखबाळ करू लागला.  लागलीच थोड्या दिवसांनी ती दोन मेंढरे मोठी झाली. त्या दोन मेंढरांना अजून पिल्लं झाली. यामुळे शेजाऱ्याने उपाय म्हणून त्याच्या कुत्र्यासाठी पिंजरा बांधून कुत्र्यांना पिंजऱ्यात ठेवले. अशाप्रकारे मेंढरे खाण्याची जी समस्या होती, ती निराकरण झाले. त्या मेंढपाळाने थोडया धीराने व स्वतःच्या म्हणाच ऐकून घेऊन त्याच्या त्या समस्यावर चांगल्या कार्याने नाइनाट केला. मनातला आवाज म्हणजेच प्रभू येशू ख्रीस्ताचा आवाज. तोच आवाज नेहमी ऐकण्यास आपण तत्पर असलं पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्या मेंढरांचे पालन-पोषण व रक्षण कर”.
  १. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मगुरूभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य बहाल करावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आर्शिवाद असावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
   २. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कुपा दृष्टी आमच्या देशांच्या सर्व नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर असू दे. त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास मदत कर व त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गांवर चालण्यास मदत कर, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
   ३. जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श लागून त्यांचे ह्या रोगापासून मुक्तता मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
   ४. हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी माणसांसाठी प्रार्थना करितो, त्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे जाण्यास त्यांना शक्ती दे. पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे व सर्व आजारातून त्यांची सुटका करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
   ५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

1 comment:

  1. Beautiful comments on 'Door' but not to the point of the Gospel, as Jesus the door of the Church protesting the faithful from those who mislead them.
    Fr. Michael G. Vasai. (9326433487).

    ReplyDelete