Thursday, 30 July 2020

Reflections for the 18th Sunday in Ordinary Time (02/08/2020) by Fr. Benher Patil







सामान्य काळातील अठरावा रविवार

 

दिनांक: ०२/०८/२०२०

पहिले वाचन: यशया ५५:१-३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५; ३७-३९

शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१



 

अतुलनीय देवाची प्रीती

प्रस्तावना:

आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाच्या प्रीतीचे वर्णन करताना आढळतात. देव प्रीती आहे. आणि त्याची आपल्या लोकांवरील प्रीती ही मुक्त, अतुलनीय तसेच अपार आहे. त्याच प्रेम इतक अतूट आहे की, आपणास कोणीही  किंवा काहीही कधीच अलिप्त करू शकणार नाही. ह्या सुंदर प्रीतीचा अनुभव आपणा सर्वाना विपुल प्रमाणात मिळावा त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून ते इतरांना देण्याची सुबुद्धी आणि कृपा मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

 सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५५:१-३

            आजच्या पहिल्या वाचनात, बाबीलोनात हद्दपार झालेल्या निराशी आणि उदास यहुदी लोकांना, संदेष्टा यशया धीर देत आहे. परक्यांच्या गुलामगिरीत असताना इस्रायेली लोकंची अवस्था फार हलाखीची आणि केविलवाणी झाली होती. अश्या लोकांना संदेष्टा म्हणतो की, त्यांनी आपल्या सुटकेसाठी अथवा सांत्वनासाठी इतरत्र जायची काहीच गरज नाही. कारण, खुद्द परमेश्वर त्यांना शत्रूंच्या हातांतून सोडवून त्यांच्या सर्व गरजा पुरविण्यास समर्थ आहे. त्याचे वात्सल्य आणि औदार्य सर्व मानवी गरजांना पुरून उरणारे आहे असे सूचित तो करतो. मात्र त्यासाठी त्यांनी देवावर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळण्याची आणि त्याच्या शब्दानुसार वागण्याची आवश्यकता आहे असं आव्हान करतो.

 दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५; ३७-३९

रोमकरांस लिहिलेल्या पत्रात, संत पौल आठव्या अध्यायाच्या शेवटी देवाच्या सामर्थ्यशाली आणि अदभूत प्रेमाची प्रचीती दाखवतो. ख्रिस्तामुळे रोमी ख्रिस्ती लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आणि छळ सोसावे लागत असत. अशा विश्वासू लोकांची श्रद्धा डळमळू नये म्हणून तो लिहितो की देव जर आपणाबरोबर असेल, तर आपल्या विरुद्ध कोण असू शकतो? ख्रिस्ताच्या बलशाली प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकतो? या जगातील कोणीही किवा काहीही आपल्याला कधीच वेगळे करू शकणार नाही, असा दिलासा देत आहे. म्हणूनच प्रत्येक कठीण परिस्थितीत; आपल्या अडचणीत व संकटात आपण न घाबरता देवाच्या प्रेमावर विश्वास ठेवला पाहिजे, असा बोध संत पौल आपल्याला करत आहे.

 शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१

            आजच्या शुभवर्तमानात, मत्तय आपणासमोर येशू ख्रिस्ताने केलेल्या आणखी एका चमत्काराविषयी सांगत आहे. योहान बाप्तीस्ताच्या मृत्युनंतर येशू अरण्यात जातो. तेव्हा लोकांचा समुदाय त्याला शोधून त्या एकांत स्थळाकडे गेला. येशुभोवती जमलेले लोक खरोखर गरजवंत होते. काहीना शारीरिक भूक लागली होती,

          येशूला तहानेने आणि भुकेने कासावीस झालेल्या तसेच थकलेल्या लोकांचा खूप कळवला आला. त्याने संपूर्ण समस्या स्वतःच्या हाती घेतली. त्याने पाच भाकरी आणि दोन मासे ह्यावर आशीर्वाद देऊन त्या लोकांना वाटायला दिल्या. अश्याप्रकारे निव्वळ पाच भाकरी आणि दोन मास्यांद्वारे, ख्रिस्ताने चक्क पाच हजार लोकांची शारीरिक भूक शमवली आणि त्यांना तृप्त केले. दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी शिष्यानी सर्वस्वी येशूवर अवलंबून राहावे आणि त्याच्यासारखे दयाळू असावे असा बोध संत मत्तय ह्या चामात्काराद्वारे कळवू इच्छितो.

 मनन चिंतन:

आजच्या वाचनांची सुरुवात यशया संदेष्ट्याच्या आमंत्रणाने होते: “तहानलेल्यानो, या आणि पाणी प्या. तुमच्याजवळ पैसा नसला, तरी काळजी करू नका. या आणि पोटभर खा, प्या. जे खरोखर अन्न नाही, त्यासाठी पैसे वाया का घालविता?” आपली तहान-भूक तृप्त करणारे असे कोणते अन्न आहे की जे सेवन करण्यासाठी देव आपल्याला बोलावतो? ह्या प्रश्नाच उत्तर आपल्याला इतर वाचनात पाहायला मिळते.

पहिल्या प्रथम परमेश्वर आपणास सांगतो, की आपण नेहमी अश्या ऐहिक गोष्टीना महत्व देतो की ज्या खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान देत नाही. आम्ही आपले जीवन, संसाधने, वेळ इत्यादी आम्हाला पूर्ण करण्यात सक्षम नसलेल्या उद्दिष्टांचा शोध घेण्यासाठी घालवितो. ही ध्येये म्हणजे श्रीमंती, ऐहिक सुख, प्रसिद्धी होय. देव आपल्याला ह्यावून दुसरे काहीतरी शोधण्यासाठी सांगत आहे. काही प्रमाणात त्याच उत्तर आल्याला पहिल्या वाचनात सापडते: “मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल, तुम्ही माझ्याकडे या” ह्यातून आपल्याला स्पष्टपणे सांगण्यात येते, की पहिल्याप्रथम आपण देवाचे वचन ऐकलं पाहिजे. देवाचे वाचन जे आपल्या मानवी जीवनाचा पाया आहे (अनुवाद ३२:४७), ज्याच्याद्वारे आपलं पोशन केलं जात (मत्तय ४), ते आपण कान देऊन ऐकण्याची आवश्यकता आहे.

         आजच्या शुभवर्तमानाचा हाच मुख्य विषय संत मत्तय आपणापुढे मांडत आहे. येशू अरण्यात गेल्यावर मोठा लोकसमुदाय त्याचामागे गेला. त्याच्या मुखातून निघणाऱ्या वाणीने तृप्त होण्यासाठी म्हणजेच मनाचं आणि आत्म्याचं समाधान प्राप्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे देवाचे राज्य शोधण्यासाठी ते त्याच्यामागे गेले होते. पण येथे आपल्याला कदाचित प्रश्न पडत असेल की, जेव्हा माणसाचं पोट रिकामे असते, म्हणजेच त्याच्या मुलभूत गरजाच जर भागवल्या गेल्या नाहीत, तर प्रभूच् वचन ते कस ऐकतील? जगामध्ये कोरोना विषाणूमुळे उपासमारी होत असताना, लाखो, करोडो लोकांना जेव्हा अन्नाविना आपले प्राण द्यावे लागत असतील, त्यांना दारिद्र्यामुळे हलाखीचे दिवस काढावे लागत असतील, तर अश्या प्रसंगी देवाच्या राज्याची घोषणा देण्यात, त्याची सुवार्ता सांगण्यात काय अर्थ आहे? अस करून जणू आपण एकप्रकारे त्यांचा अपमान तर करत नाही ना? 

अशाप्रसंगी जर आपण ख्रिस्तासारखे वागलो नाही, तर नक्कीच तो त्यांचा घोर अपमान मानावा लागेल. जेव्हा येशूने लोकांचे तहानेने आणि भुकेने कासावीस झालेले चेहेरे पाहिले, तेव्हा त्यांना घालवून दिले नाही, त्यांना दूर केले नाही, किवां त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही, तर त्याने आपल्या शिष्यांना बजावले: त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला दया.” येथेच अदभूत चमत्काराची सुरुवात होते. शिष्यांना आव्हान करून येशूने त्यांना सहेतूक कृतीत प्रत्यक्ष सहभागी केले आणि त्यांनी आणलेल्या वस्तूंच त्याने उपयोगात आणल्या. आपणाकडे जे असेल-नसेल त्याचा जेव्हा त्याग करायला आणि इतरांना वाटायला आपण तयार असतो, तेव्हा खरा चमत्कार घडवून आणतो.

ख्रिस्ताने फक्त पांच भाकरी व दोन मासे आपल्या करुणेने आणि अदभूत सामर्थ्याने रुपांतरीत केल्या व त्या आपल्या शिष्यांना चक्क पाच हजार लोकांची भूक भागविण्यासाठी वाटायला सांगितलं. ह्या घटनेवरून आपल्याला हाच संदेश मिळतो, की आपला देव हा उदार आहे. तो आपल्या लोकांना मोफातपणे आणि उदारतेने त्याच्या गरजा पुरवितो. दुसरा संदेश म्हणजे त्याची आपल्यावरील करूणा आणि प्रेम हे अतूट आणि अमर्यादित आहे. त्याच्या प्रेमापासून काहीही संकटे, भूक, मोह इत्यादी आपल्याला विभक्त करू शकणार नाही.

ज्या परमेश्वराने आपल्यावर मुक्तहस्ते त्याच्या अगणित कृपा व आशीर्वादाचा वर्षाव केला आहे, ज्याने आपल्या सर्व भौतिक, मानसिक आणि अध्यात्मिक गरजा भागविल्या आहेत आणि भागवत आहे, आज तो आपल्याला त्याच्या औदार्याचे, प्रेमाचे आणि करुणेचे साधन बनून, आपल्या समाज्यात असलेल्या रंजल्या-गांजल्याची सेवा करण्यासाठी आमंत्रण देत आहे. ते स्वीकारून त्याला साजेसं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आजच्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला तुझ्या करुणामयी प्रेमाचे साधन बनव.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मागुरु तसेच धर्म-भगीनिनी, आपल्या सुवार्तिक आणि सामाजिक कार्याद्वारे देवाच्या लोकांची शारीरिक, तसेच आध्यात्मिक भूक शमविण्यासाठी प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 २. समाज्यात असलेल्या मोठ मोठ्या व्यावास्यीकांनी आणि उद्योगपतींनी त्यांना देवाने दिलेल्या विपुल संपतीचा सदुपयोग समाज्यातील गरजवंतासाठी करण्याची सुबुद्धी त्यांना मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ३. सर्व जगातील राष्ट्रांनी एकत्र येऊन ह्या जगातील गरिबी, उपासमारी आणि नैराश्य हटवण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.

 ४. सर्व ख्रिस्ती लोकांनी येशूचा कित्ता आपणासमोर ठेऊन, त्याच्याप्रमाणे इतरांसाठी उदार, करुणामयी व प्रेमळ जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ५. आपण आपल्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर सेवक सेविका आपले जीव धोक्यात घालून रोग्यांची विशेषतः कोरोना पिडीत रुग्णांची सेवा करत आहेत. परमेश्वराचा विपुल असा आशीर्वाद त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा यावा, तसेच सर्व धोक्यांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Friday, 24 July 2020

Reflections for the 17th Sunday in Ordinary Time (26/07/2020) by Br Aaron Lobo





सामान्य काळातील सतरावा रविवार

दिनांक: २६/०७/२०२०
पहिले वाचन: १ राजे ३:५, ७-१
दुसरे वाचन: रोमकरां२स पत्र ८:२८-३०
शुभवर्तमान: मत्तय १३:४४-५२





स्वर्गाचे राज्य: जीवनातील खरी संपत्ती

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहोत आजची उपासना जीवनाची खरी संपत्ती काय आहे? आणि ती मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे, ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे.
पहिल्या वाचनात, शलमोन इतर गोष्टी पेक्षा, दैवी ज्ञानाला महत्त्व देतो आणि ती देवाने त्याला द्यावी अशी याचना करतो. त्याची प्रार्थना ऐकून देव प्रसन्न होतो आणि दैवी ज्ञानासोबत इतर संपत्तीसुद्धा त्याला बहाल करतो. दुसऱ्या वाचनात देव आपणा सर्वांना त्याच्या योजनेनुसार एक नवा जन्म घेण्यास आमंत्रण देत आहे. त्याच्या इच्छेनुसार चालल्यानेच आपल्याला खऱ्या गौरवाचा अनुभव प्राप्त होईल. आजच्या शुभवर्तमानात स्वर्ग राज्याविषयी येशू ख्रिस्त आपल्याला तीन दाखले सांगतो व जाहीर करतो की, स्वर्ग राज्य म्हणजे देवाच्या इच्छेनुसार चालणे हीच खरी संपत्ती आहे, तसेच ती प्राप्त करण्यास आपण काय केले पाहिजे हे सुद्धा स्पष्ट करून देतो.
हया मिसा बलिदानात भाग घेत असताना आपण देवाकडे त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्यास तसेच जी योजना त्याने आपल्यासाठी ठरवली आहे, ती संपन्न व्हावी म्हणजेच स्वर्गाचे राज्य आपणास प्राप्त व्हावे, म्हणून देवाची विशेष कृपा आपणास लाभावी म्हणून आजच्या मिसा बलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: १ राजे ३:५, ७-१
इस्रायल देशाचा राजा असे नेमून आल्यावर, शलमोन आपला बाप दावीद याच्या पावलावर देवाच्या अनुशासनाप्रमाणे आणि धर्मशास्त्रानुसार चालण्याचा प्रयत्न करतो. राज्यकारभार सांभाळण्यासाठी संपत्ती किंवा स्वतःचे बळ किंवा बुद्धी याची नव्हे, तर देवाची कृपा त्याची दैविक बुद्धी याच्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे, असे देवा समोर तो जाहीर करतो व ते त्याला मिळवुन देण्यास याचना करतो. प्रसन्न होऊन देव त्याला बुद्धी तर देतोच, पण त्याही पेक्षा संपत्ती आणि यशस्वी राजा बनण्याचे आशिष देतो.

दुसरे वाचन: रोमकरां२स पत्र ८:२८-३०
देवाने आपल्या योजनेनुसार, प्रत्येक विश्वासणऱ्याला म्हणजेच नवजन्म पावलेल्या व्यक्तीला बोलाविले आहे. आपल्यावर कठीण परिस्थिती येत राहतात, परंतु या सर्वांवर देवाचे नियंत्रण आहे; व तो कार्य करीत असतो. अशा प्रकारे देव त्याच्या योजना आपणा प्रत्येकाच्या जीवनात पूर्ण करीत असतो.

शुभवर्तमान: मत्तय १३:४४-५२
स्वर्गाचे राज्य काय आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे हे आपल्याला देव तीन दाखल्याद्वारे स्पष्ट करून देतो. स्वर्गाचे राज्य हीच खरी संपत्ती आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी सर्वकाही त्यागून देण्याची आपली तयारी असली पाहिजे.

बोधकथा:  
एका गावात एक श्रीमंत असा शेतकरी राहत होता. त्याची स्वतःची खूप मोठी शेती होती. तसेच फुलांचे फळांचे इत्यादी निरनिराळ्या प्रकारची झाडांच्या बागासुद्धा होत्या. आणि अशाप्रकारे हा शेतकरी आपल्या जीवनात असलेल्या संपत्तीमुळे खूप संतुष्ट होता.
एके दिवशी एक परराष्ट्रीय व्यक्ती त्या गावात येते, आणि त्याची भेट या शेतकऱ्याशी होते. बोलता-बोलता ती व्यक्ती त्या शेतकऱ्याला त्याच्या प्रवासाचे कारण सांगतो. हा मनुष्य हिर्‍यांच्या खाणीच्या शोधात निघाला होता. हिऱ्यांची काय किंमत आहे आणि ती सापडल्यावर माणूस कसा श्रीमंत होणार हे त्या परराष्ट्रीय व्यक्तीने ह्या शेतकऱ्यास सांगितले.
त्या माणसाचे बोलणे ऐकून शेतकरी सुद्धा विचार करायला लागतो काही क्षणा पूर्वी तो संतुष्ट होता, मात्र आता त्याच्या मनात चलबिचल आणि अस्वस्थपणा अनुभवायला सुरुवात होते. त्याची अधिक श्रीमंत होण्याच्या ह्या कल्पनेने तो शेतकरी आपली जमीन व शेत विकतो आणि हिऱ्याच्या शोधात निघून जातो. हिऱ्याच्याशोधात तो सगळे जग फिरतो परंतु त्याला हिरे सापडत नाहीत आणि शेवटी निराश होऊन आत्महत्या करतो.
काही दिवसानंतर ज्या व्यक्तीने त्या शेतकऱ्याकडून ती जमीन विकत घेतली होती, तो त्याच्या बगीच्यामध्ये असलेल्या एका छोट्याशा झऱ्याचे पाणी पिण्यास जातो. पाणी पीत असताना, त्याची नजर त्या झऱ्यात असलेल्या एका चमकदार धातूवर पडते. ते तो उचलतो आणि त्याला समजून येते की हा दगड काही साधारण दगड नव्हे, तर एक शुद्ध हिरा आहे. तसेच ज्या जमिनीवर तो उभा आहे, ती साधारण जमीन नसून त्या देशातील एक सर्वात मोठी हिऱ्याची खाण आहे. जर त्या शेतकऱ्यांने आपल्या स्वतःच्या जमिनीची मशागत केली असती, तर त्याला परदेशातून न जाता, स्वतःच्या देशात, स्व: भूमीवर अनंत व अपार संपत्ती सापडली असती.

मनन चिंतन:
खजिना म्हटल्यावर सोने, हिरे, मोती अशा निरनिराळ्या मौल्यवान वस्तूंची चित्र आपल्या मनात येतात. एखादी अधिक मूल्यवान असलेली वस्तू जी साधारणपणे आपल्याला आपल्या जीवनात भेटत नसते, अशा वस्तूंना आपण खजिना असे संबोधत असतो.
आजच्या शुभवर्तमानात सुद्धा प्रभू येशू, आपल्याला खजिनाच्या संदर्भात तीन दाखले सांगतो: पहिला दाखला एका शेतात लपवलेल्या खजिन्याबद्दल आहे, ज्या व्यक्तीला योगायोगाने किंवा अकस्मात ही संपत्ती सापडते, त्ती संपत्ती घेण्यासाठी तो मनुष्य आपली संपूर्ण संपत्ती विकतो आणि त्या पैशाने तो खजिना विकत घेतो. दुसऱ्या दाखल्यात येशू एका व्यापाऱ्याचे वर्णन करतो, जो आपले संपूर्ण आयुष्य सर्वात मौल्यवान मोती शोधण्याच्या शोधात खर्च करतो आणि जेव्हा त्याला तो मोती सापडतो, तेव्हा आपले सर्वस्व विकून त्या पैशाने तो मोती विकत घेतो. तिसऱ्या दाखल्यात प्रभू येशू स्वर्ग राज्याची तुलना किंवा स्वर्गाच्या राज्यातील लोकांची तुलना, एका जाळ्यात सापडलेल्या निरनिराळ्या मासळी बरोबर करतो. चांगली मासळी व वाईट मासळीचे विलगीकरण करून, चांगली मासळी ठेवण्यात येते व नको असलेली मासळी फेकून देण्यात येते.
अशा ह्या तीन दाखल्याद्वारे  येशू आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो, पहिले दोन दाखले आपल्यासमोर स्वर्गराज्याची खरी किंमत किंवा त्याचे खरे महत्त्व काय आहे हे दर्शवत आहे. शेतात लपविलेल्या खजिना अथवा तो अमूल्य मोती, हे दोन्ही स्वर्ग राज्याची प्रतिमात्मक चिन्ह आहेत. ज्याप्रमाणे खजिना शेतात लपविलेला आहे, त्याचप्रमाणे स्वर्गाचे राज्य सुद्धा ह्या जगात लपविलेले आहे, ते शोधण्यास मेहनत करावी लागते. ज्याप्रमाणे खजिना शोधणाऱ्याला खजिना सापडतो, त्याचप्रमाणे सत्य, दैवीक बुद्धी इत्यादी. दैविक देणग्या आपल्याला प्राप्त होत असतात.
जीवनाची  खरी संपत्ती ही पैसा, सोने, हिरे किंवा अन्य वस्तूमध्ये नसून, देवाच्या योजनेप्रमाणे जगण्यात आहे. जी त्याची इच्छा आहे, ती आपल्या जीवनात आपण जगळी पाहिजे. आर्थिक संपत्ती किंवा भौतिक संपत्ती आज आहे, पण उद्या नसणार; परंतु स्वर्ग राज्याची संपत्ती देवाने आपल्या सर्वांसाठी ठेवली आहे ती कधीही संपणार नाही
हे स्वर्गाचे राज्य, ज्याबद्दल प्रभू येशू आपणास सांगत आहे, ते आपल्या दैनंदिन जीवनात, दररोजच्या घडामोडीत सापडत असते. ते शोधण्यासाठी आपणास इतर कुठेही जाण्याची गरज नाही, गरज आहे ती फक्त डोळे उघडून पाहण्याची, अवती-भवती नजर फिरवण्याची.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१) ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आर्शिवाद यावा व त्यांना त्यांच्या या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) आपल्या देशात नेहमी शांती नांदत राहावी, द्वेष-मत्सर दूर व्हावा, सर्वांना समानतेचा हक्क व वागणूक मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) जगभरात अनेक लोक कोरोना व्हायरसने बाधित झालेले आहेतअशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श होऊन त्यांची ह्या रोगापासून मुक्तता व्हावी तसेच डॉक्टर्स, नर्सेस ज्या निस्वार्थी वृत्तीने ह्या रुग्णाची सेवा करतात त्यांना ही तुझा भरपूर आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) युवकांना नोक-या मिळाव्यात, गरजवतांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, आजा-यांचा आजार दूर व्हावा, भटकलेल्यांना मार्ग सापडावा, व्यसनाधीन झालेल्यांची व्यसनातून मुक्कता व्हावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) यंदाच्या वर्षात भरपूर पाऊस मिळावा, शेतक-यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात व सर्वांनी शांतीने, प्रेमाने रहावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. 

६) थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिककौटुंबिक व वयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

Thursday, 16 July 2020


Reflections for the 16th Sunday in Ordinary Time (19/07/2020) by Br Brijal Lopes 




सामान्य काळातील सोळावा रविवार

दिनांक: १९/०७/२०२०
पहिले वाचन: ज्ञान ग्रंथ १२:१३,१६-१९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२६-२७
शुभवर्तमान: मत्तय १३:२४-४३



स्वर्गाचे राज्य हे शेतात चांगले बी पेरण्यासारखे आहे.

प्रस्तावना:
आज देऊळ माता सामान्य काळातील सोळावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांना ख्रिस्तामध्ये नम्रता, सहनशीलता, न्याय व विश्वासू वृत्तीने व निष्ठेने जीवन जगण्यास आमंत्रण देत आहे. आजची तिन्ही वाचने आपणास ख्रिस्ती जीवन व त्याची असलेली उद्दिष्ट ह्यावर मनन चिंतन करत आहे. जीवन हे परमेश्वराने मानवजातीला बहाल केलेले फार मोठी देणगी आहे व या जीवनात परमेश्वर आपल्याला भरपूर संधी देत असतो, परंतु या संधीचा वापर हा त्याच्या (देवाच्या) इच्छेनुसार आपण केल्या पाहिजे; कारण आपला निर्माता हा देव आहे व आपण त्याची लेकरे आहोत. देवाचे सामर्थ्य, कृपा, शक्ती, दया, क्षमाशीलता व सहनशीलता ही देवाच्या न्यायाची साधने आहेत. ती मानवाच्या विनाशासाठी नसून त्यांना शाश्वत जीवन देण्यासाठी आहेत. मानवाने देवाकडे यावे व स्वर्गीय जीवनाचा आनंद घ्यावा ही देवाची इच्छा आहे; परंतु आपली इच्छा कोणती शाश्वत जीवनाची की विनाशी हे आपण पडताळून पाहावयाचे आहे यासाठी आपण या मिसा बलिदान प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: ज्ञान ग्रंथ १२:१३,१६-१९
पहिल्या वाचनात आपणास परमेश्वराचे पावित्र्य व शुद्ध जीवन याविषयी सांगितलेले आहे, न्यायाने, क्षमेने, नम्रतेने, दयेने व सहनशीलतेने राहुन लोकांस जवळ करतो व त्यांना देवाच्या स्वभावाची ओळख करून देतो.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२६-२७
रोमकरांस पाठवलेल्या पत्रात संत पौल सांगत आहे की, ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी व त्याचे पालन करण्यासाठी लागणारी शक्ती व कृपा हा पवित्र आत्मा आपणास देतो. मानवी दुर्बलतेतून त्यांना सक्षम बनवतो देवाकडे घेऊन जाण्यास मार्गदर्शन करतो.

शुभवर्तमान: मत्तय १३:२४-४३
प्रभू येशू ख्रिस्ताने निरनिराळ्या प्रकारचे उदाहरण देऊन स्वर्ग राज्याची तुलना केली आहे. विश्वास कसा असावा व त्याद्वारे ख्रिस्ती जीवन कसे जगावे याविषयी येशू ख्रिस्त आपणास सांगत आहे. वाईट जीवन जगून नुकसान करून घेण्यापेक्षा, चांगले जीवन जगून शाश्वत जीवनात प्रवेश करण्याबाबत सांगत आहे. जगाचा न्यायनिवाडा व पवित्र जीवन कसे जगावे ह्या विषयी आपणास येशू ख्रिस्त सांगत आहे.

मनन चिंतन:
प्रत्येक दाखल्याची सुरुवात ही देव शब्दाने होते. येशू ख्रिस्त प्रत्येक दाखला लोकांच्या समुदाया समोर शासाठी बोलत आहे की, त्यांना स्वर्ग राज्याची रहस्य जी जगाच्या स्थापनेपासून गुपीत ठेवण्यात आलेली आहे ती प्रकट व्हावी म्हणून. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे गहू आणि निंदण ह्यांच्या वेगळे करण म्हणजे स्वर्ग राज्यात स्वीकार व नाकार ह्या रहस्याविषयी सांगितलेले आहे. जे लोक हा दाखला ऐकतात, त्यांना सांगण्यात येत आहे की अंतिम न्यायाच्या दिवशी प्रकाशाची मुलेअंधकाराची मुले अशे विभाग केले जातीह्या विषयी ख्रिस्त आपणास जाणीव करून देत आहे.
परमेश्वर माणसाच्या अंत:करणात शब्द ठेवतो, परंतु सैतान गुप्तपणे वाईट शब्द किंवा विचार ठेवतो निंदणाबरोबर चांगले गहू सुद्धा निघेल, म्हणून मालक आपल्या सेवकांना निंदण काढण्यासाठी मनाई करतो व ज्याप्रमाणे वेळेनुसार निंदण व गहू वेगळे केले जातात, त्याचप्रमाणे चांगली व वाईट माणसे देखील वेगळे करण्यात येतील अशे सांगण्यात येत आहे. आजचा विषय स्वर्गराज्यसाठी निवडली जाणारी व नाकारली जाणारी प्रजा ह्याचे विश्लेषण निसर्गाच्या दृष्टिकोणातून गहू व निंदण ह्या दाखल्याद्वारे करण्यात आलेले आहे. निसर्गाच्या नियमानुसार, निंदण गहू बनूशकत नाही तसेच गहू निंदण बनू शकत नाही, परंतु देवाने मानवाला पापापासून मुक्त होऊन पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण केले आहे. माणसाने त्याच्या पापात मारावे अशी देवाची इच्छा नाही, तर त्याने पापावर पश्चाताप करावा व पवित्र जीवन जगावे अशी देवाची इच्छा आहे. गहूबरोबर निंदणसुद्धा वाढावे याचाच अर्थ मानवी स्वभाव हा कितीही दृष्ट पणाचा असला, तरी त्याचे परिवर्तन होऊ शकते. वाईट मार्गाचा तिरस्कार करून नवजीवन जगण्यास किंवा पवित्र जीवन जगण्याचा ध्यास धरण्यास हा दाखला आपणासमोर एक आव्हान ठेवत आहे. परमेश्वर हा दयाळू, क्षमाशील व मंदक्रोध आहे तो प्रत्येक व्यक्तीला सुधारण्याची संधी देत असतो, त्यासाठी तो वेळही  देत असतो. काही व्यक्ती स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणतात व परिवर्तन करतात, ते केवळ ख्रिस्ताच्या क्षमेमुळे व त्याच्या प्रेमामुळे; परंतु काही व्यक्ती ज्यांना संधी मिळून सुद्धा आपलं परिवर्तन करीत नाहीत किंबहुना सुधारणा घडवून आणत नाहीत, अशा व्यक्ती त्याच्या चुकीमुळे स्वर्गीय सुखासाठी व त्याच्या राज्यासाठी अपात्र ठरतात.
ख्रिस्त सभा आज आपणासमोर प्रभू शब्दाविषयी व त्याच्या स्वर्गीय राज्याविषयीची महती आपणास पटवून देत आहेत. प्रत्येक व्यक्ती जगासमोर कशी असली, तरी देवासमोर आपण समान आहोत. परमेश्वर आपणावर न्याय दृष्टीनी व  क्षमेने पाहत असतो. त्या परमेश्वराचे राज्य आपणात यावे व त्याद्वारे आपण देवासमोर पात्र ठरावेत म्हणून आपण या मिसा बलिदानात विशेष प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१. विश्वव्यापी ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमचार्य पोप फ्रान्सिस सर्व व कार्डिनल, बिशप्स धर्मगुरु, धर्म-भगिनी यांना चांगले स्वास्थ्य लाभावेरमेश्वराचा शब्द लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याद्वारे परमेश्‍वराचे राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

२. कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराने खूप जणांनी आपला जीव गमावला आहे त्या सर्वांना चिरका शांती लाभावी, तसेच जे या आजाराने ग्रासलेले आहेत अशा सर्वांना परमेश्वराने बरे करावे व त्यांना निरोगी स्वास्थ्य मिळावे म्हणून प्रार्थना करूया.

३. आपल्याला या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस मिळावा व आपल्या शेतकरी बांधवांना चांगले पीक मिळावे आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे लोक निस्वार्थीपणे देवाची सेवा करत आहेतजे लोक या जीवघेण्या आजारात लोकांना अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करत आहेत, त्याचप्रमाणे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, शासकीय कर्मचारी यामध्ये सहभागी असलेली इतर सर्व लोक यांना परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे, तसेच त्यांना निरोगी स्वास्थ्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.

५. जे लोक बेघर आहेत अन्न-पाण्याविना जीवन जगत आहेत. जे आजारी आहेत अशा सर्वांना योग्य वेळी मदत मिळावी व त्यांच्या ही गरज पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक घरासाठी प्रार्थना करूया.