Friday 4 September 2020

 Reflections for the 23rd Sunday in Ordinary Time (06/09/2020) by Dn. Isidore Patil



सामान्य काळातील तेविसावा रविवार

 

दिनांक: ०६/०९/२०२०

पहिले वाचन: यहेज्केल ३३:७-९.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:८-१०

शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०

 

 

 

 

जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा कराल, तेव्हा ती देवाकडून झालेली क्षमा असेल

 

प्रस्तावना:

आज देऊळमाता सामान्य काळातील तेविसावा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपल्याला इतरांबरोबर चांगले जीवन जगण्यास व देवाच्या प्रेमाचा, आणि क्षमेचा आदर्श इतरांसमोर ठेवण्यास आव्हान करीत आहे.

यहेज्केलच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचानात पापाच्या आहारी गेलेल्या आपल्या बंधू अथवा बहिणीला, त्यांची चूक समजावून सांगून पुन्हा एकदा चांगले जीवन जगण्यास त्यांना प्रोत्साहन करण्यास सांगत आहे, तर रोमकरांस लिहिलेल्या पत्राद्वारे संत पौल रोममधील ख्रिस्ती लोकांना आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्याच्या आपल्या कर्तव्याविषयी जाणीव करून देत आहे.

आजच्या शुभवर्तमानात प्रभूच्या मार्गावरून दूर जाऊन पापात गुरफटलेल्या आपल्या बंधू वा भगिनीला आपण कश्या प्रकारे परत प्रभूच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करायचा हे सांगण्यात आले आहे.

आज ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण समाजात आदर्शमय जीवन जगावे ह्यासाठी प्रभू परमेश्वराकडे कृपा मागुया.

 

पहिले वाचन: यहेज्केल ३३:७-९

देवाची वाणी लोकांपर्यत पोहचविण्यासाठी देवाला एका व्यक्तीची गरज होती. यासाठी देवाने यहेज्केलची निवड केली होती. यहेज्केलने निराश झालेल्या लोकांना बावीस वर्ष बोध केला. यहेज्केलचा संदेश हा आजच्या ख्रिस्ती व यहुदी माणसांसाठी आहे. आजच्या वाचनात आपल्याला असे दिसून येते की, इस्त्रायल लोकांना सावध करण्याचे काम संदेष्टा यहेज्केलवर सोपवले आहे. देवाने पाठवलेले इशारे, सूचना त्यानेच लोकांना कळवायच्या आहेत. त्याने हे इशारे एखाद्याला कळवले नाहीत तर त्या व्यक्तिच्या भवितव्य विकासासाठी यहेज्केलच जबाबदार राहील. पण त्याने इशारा दिला असला तर त्याचा स्वतःचा बचाव होईल.

 

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:८-१०

या अध्यायातील पहिल्या सात ओवीमध्ये पौल रोममधील ख्रिस्ती लोकांना सरकारी नियम व कायदे पाळण्याविषयी सांगत आहे तर पुढे आजच्या वाचनात तो ख्रिस्ती लोकांना आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्याच्या आपल्या कर्तव्याविषयी जाणीव करून देत आहे. समजा एखाद्याने खरोखर आपल्या शेजाऱ्यावर प्रीती केली तर तो कधीच  दहा आज्ञांतील दुसऱ्या भागाचे उल्लंघन करणार नाही. दहा आज्ञांपैकी पाचवी ते दहावी आज्ञा आपल्या शेजाऱ्यांबरोबर आपण कश्या तऱ्हेने वागावे ह्याविषयी माहिती देते. व जो व्यक्ती आपल्या शेजाऱ्यांवर खरोखर प्रीती करितो तो कधीच व्यभिचार करणार नाही, खून करणार नाही, चोरी करणार नाही किंवा लोभ सुटू देणार नाही.

 

शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०

मत्तयलिखीत शुभवर्तमानातून घेतलेल्या आजच्या वाचनात प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला, एखाद्या व्यक्तीने पाप केले तर त्याला परत मार्गावर कसे आणावे ह्याबद्दल माहिती देत आहे. आपला भाऊ परत मिळवणे व त्याला पूर्वपदावर आणणे हेच उद्दिष्ट येथे आहे. त्याला शिक्षा करणे हा तर या वाचनाचा मुळीच हेतू नाही. चुकलेल्या भावाला सर्वप्रथम एकट्याने एकांतात व नंतर ऐकाला किंवा दुसऱ्याला सोबत घेऊन भेटावे. यातून काहीच साध्य झाले नाही तर मग स्थानिक मंडळीला कळवावे. व याद्वारे अपराधी हा वळणावर येईल ही अपेक्षा ठेवावी. जर तसे झाले नाही तर त्या व्यक्तिला वाळीत टाकावे. यामुळे त्या व्यक्तिला धक्का बसून तो पश्चाताप करील आणि अशाप्रकारे त्याला पूर्वपदावर आणता येईल अशी आशा ठेवावी. अशाप्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा समाजातील सर्व लोकांना क्षमा करून त्यांना तारणाचे दार व मार्ग प्राप्त करण्यास पाचारण करीत आहे.

 

मनन चिंतन:

‘जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल, ते स्वर्गात मोकळे केले जाईल.’

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची उपासना आपल्याला आपल्या भाऊ-बहिणीबरोबर, इतरांबरोबर असलेलं नातं कसं ठेवावं ते सांगत आहे. आपलं नातं आपल्या भाऊ-बहिणीबरोबर, आई-वडिलांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर चांगलं आहे अस आपण नेहमीच जगाला सांगत असतो; परंतु आपल्या अंतकरणात आपल्याला माहित असते की, ते सर्व काही खरं नाही. कारण आपल्या आणि त्यांच्यात आपण जणूकाही एक प्रकारची भिंत किंवा कुंपण बांधलेलं असतं. 

एकदा एका गावात दोन भाऊ एकत्र राहत होते, त्यांच्या दोन शेतजमिनी होत्या व ह्या शेतजमिनी मधून एक छोटीसी नदी वाहत होती व त्यामुळे ह्या दोन्ही शेत जमिनी विभागलेल्या होत्या. हे दोन्ही भाऊ त्यांच्या वडिलांबरोबर चांगल्या प्रकारे शेती करत होते. काही वर्षानंतर त्यांचे वडील आजारी पडले, तेव्हा वडील दोन्ही भावांना बोलवतात व त्यांची ती दोन शेताच्या जमिनी त्या भावांमध्ये वाटून देतात. वडिलांच्या मरणानंतर हे भाऊ काही वर्ष चांगल्या प्रकारे मिळून-मिसळून शेती करत होते; परंतु कालांतराने त्यांच्यात भांडणं होऊन फूट पडली आणि आता ते एक-दुसऱ्यांबरोबर बोलत नव्हते. एका दिवशी एक सुतार एकाच्या घरी आला व म्हणाला, मला काम करायचं आहे, मला काहीतरी काम द्या. तेव्हा तो विचार करून म्हणाला की, माझ्या आणि माझ्या भावाच्या ह्या शेतजमिनीमध्ये एक भिंत बांध. मला माझ्या भावाचे तोंड बघायचे नाही. मी कांही दिवासांसाठी शहरामध्ये काही कामास्तव जात आहे, ह्या कालावाद्धीत तू हे काम पूर्ण कर. नंतर जेव्हा हा भाऊ घरी परतला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुताराने भिंत न बांधता त्या नदीवरून एक छोटासा पूल बांधलेला होता तेव्हा हा भाऊ रागात त्या सुताराकडे जाऊन त्याला ओरडणार एवढ्यात त्याचा दुसरा भाऊ आला आणि हा पूल बघताच त्याला फार आनंद झाला, त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले आणि त्याच्या तो धावत जाऊन आपल्या भावाला अलिंगन देऊन जोर जोरात रडू लागला आनी म्हणाला की, एवढी वर्ष मी तुला खूप त्रास दिला, तरीही तू आपल्या दोघांमध्ये पूल बांधला आहे. हा पूल म्हणजे प्रेमाचा पुल आहे. तदनंतर दोघे भाऊ पुन्हा एक झाले. त्या पहिल्या भावाने सुताराला सांगितले की, तू इथेच राहा मला तुला दुसरे काम द्यायचे आहे, त्यावर सुतार म्हणाला की, मला दुसऱ्यांचे सुद्धा पूल बांधण्यास जायचे आहे.

आपण सुद्धा आपल्या जीवनात कित्येक वेळेला आपल्या भावांबरोबर, मित्रांबरोबर, आई-वडिलांबरोबर काही क्षुल्लक गोष्टीविषयी भांडण करतो. त्यांच्याबरोबर बोलत नाही. आपल्याला त्यांच्या सानिध्यात राहायला वाटत नाही, आवडत नाही. अशाप्रकारे आपण एक प्रकारची भिंत किंवा कुंपण आपल्यामध्ये उभारत असतो; परंतु आज प्रभू येशू आपल्याला रागाच्या, द्वेषाच्या किंवा तिरस्काराच्या भिंती बांधण्यास नव्हे, तर प्रेमाचे, आपुलकीचे आनी बंधुत्त्वाचे पूल बांधण्यास  बोलावत आहे.

आपण ऐकलं असेल की नरक हे खूप मोठं असतं. सी. एस. लेव्हीस नरका विषयी म्हणताना आपल्याला सांगतात की, नरक हे एक मोठ्या शहरासारखे असते. नरकाच्या आत मधील घरं ही रिकामी असतात, कारण घरामध्ये राहणारी माणसे ही आपली घरं सोडून एका दुसऱ्या बरोबर भांडण करत, एक-दुसऱ्याला दोष देत जणूकाही शहराच्या वेशीवर किंवा शहराच्या कडेला वस्ती करू लागतात, अशाप्रकारे जणूकाही आपली घरं रिकामी किंवा ओसाड सांडून नरकाची जागा किंवा नरक मोठं करत असतात.

आपणही एक-दुसऱ्याला दोष देऊन नेहमी भांडण करत असतो. दुसरी व्यक्ती ही चुकीची आहे, आणि म्हणून त्या व्यक्तीने पहिली माझी क्षमा मागितली पाहिजे आणि नंतरच मी त्या व्यक्तीला क्षमा करणार किंवा माफ करणार असा विचार करत असतो. आपल्याला बेंजामिन फ्रेंक्लिन यांचं एक प्रसिद्ध वाक्य माहीतच असेल, ते म्हणतात की, ‘आपण जेव्हा आपलं एक बोट इतरांवर करतो, तेव्हा दुसरी चार बोट आपल्यावर असतात.’ सांगायचे तात्पर्य एवढेच की आपण इतरांना दोष न देता, शांतीने व सलोख्याने एकमेकांना आधार देत जगायला पाहिजे.

एक काल्पनिक गोष्ट सांगितली जाते, एकदा स्वर्गात पार्टी चालली असते. संत पेत्राने पाहीलं की येशू ख्रिस्त कुठेही दिसत नाहीत, आणि लागलेच येशूच्या शोधात ते निघाले. त्यांना येशू ख्रिस्त स्वर्गाच्या दरवाज्यासमोर उभा राहिलेला दिसला. पेत्राने येशू जवळ जाऊन विचारले की, प्रभू तुम्ही इथे दरवाज्याजवळ कशासाठी उभे आहात? तुम्ही कोणाचा शोध करत आहात काय? यावर प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर देऊन म्हटले की, मी जुदास(यहूदा) साठी थांबलेला आहे त्याची वाट पाहत आहे. इथे आपण पाहतो की जुदास (यहूदा) ज्याने येशूचा विश्वासघात केला होता, त्याला स्वीकारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मागे सरला नाही. मग जेव्हा आपलं इतरांबरोबर भांडण होतं, तेव्हा त्यांस क्षमा करण्यास आपण का मागे सरसावतो? त्यांना क्षमा करून स्वीकारण्यासाठी आपण नेहमी तयार राहिलो पाहिजे आणि हे सर्व काही तेव्हाच शक्य होऊ शकेल जेव्हा आपण प्रभू येशूच्या सानिध्यात राहू, आणि त्याच्या सानिध्यात राहणे म्हणजे, त्याच्या वचनाचे म्हणजेच बायबलचे वाचन करणे, घरात कौटुंबिक रोझरीची प्रार्थना करणे, तसेच पवित्र मिसाबलिदानात सहभागी होणे व कुमसाराच्या साक्रामेतांमध्ये परमेश्वराच्या दैवी करुणेचा व क्षमेचा अनुभव घेऊन तशा प्रकारे इतरांना क्षमा करणे होय. आपण आपल्या पोप साहेबांना (परमगुरु स्वामी) इंग्लिशमध्ये पॉन्टीफ असे म्हणतो, पॉन्टीफ म्हणजेच पुल बांधणारा. आज देऊळ माता आपल्याला प्रेमाचा व क्षमेचा पूल बांधण्यासाठी बोलावत आहे, प्रेमामुळेच जाती-गोती जोडली जातात. जेव्हा आपण द्वेषाचे, मत्सराचे व हेवेचे कुंपण बांधत असतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, ‘जे कुंपण इतरांना आत मध्ये येऊ देत नाही, तेच कुंपण आपल्यालासुद्धा बाहेर जाऊ देत नाही.’ प्रभू येशूच्या शब्दात, "Where two or three are gathered in my name, there am I in the midst of them.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू दया करून आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी प्रभू येशूची प्रेमाची व क्षमेची शिकवणुक साऱ्या जगात पसरावी म्हणून प्रार्थना करूया.

२. प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी अनेक युवक व युक्तींनी पुढे यावे व त्यांना योग्य असा पाठिंबा व मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.

३. सर्व आजारी व पिडीत लोकांनी विशेष करून कोरोना रोगाने पिडीत असलेल्या लोकांना प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून सुटका होऊन त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. आपण सर्व ख्रिस्ती भाविकांनी प्रभू येशूने दिलेल्या प्रेमाच्या व क्षमेच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगावे व समाजात योग्य असा आदर्श निर्माण करावा यासाठी प्रार्थना करूया.

५. आपण शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment