सामान्य काळातील पंचविसावा
रविवार
दिनांक: २०/०९/२०२०
पहिले वाचन: यशया ५५:६-९
दुसरे वाचन: फिलीपीकरांस १:२०-२४,२७
शुभवर्तमान: मत्तय २०: १-१६
‘परमेश्वराचे मार्ग व कल्पना या मानवी मार्ग व कल्पनेपेक्षा उंच व खूप वेगळ्या आहेत.’
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील पंचविसाव्या आठवड्यात
पदार्पण करत आहोत.आजची उपासना आपल्याला परमेश्वराचा ‘न्याय व करूणा’ यावर मनन
चिंतन करण्यास आमंत्रण देत आहे. आपल्या आजूबाजूला, देशात, जगात
सर्व लोक न्यायाने वागण्यास तसेच कुठलाही गैरवापर किंवा भ्रष्टाचार न होता प्रत्येकाला
न्याय मिळावा ह्याची अपेक्षा करतात. ‘चांगल्या कृत्याला चांगल्या मोबदल्याची देण व
दुष्कार्माला शिक्षेची’ देण ह्या सूत्रावर आपण याची व्याख्या करतो; परंतु देवाच्या व्याख्येत न्यायाचे स्पष्टीकरण एवढ्या पुरतेच उरत नाही,
तर त्यात करुणेचीसुद्धा भर पडते. म्हणूनच परमेश्वर करूणेने न्याय
करतो तेच आजची उपासना आपल्याला सांगू इच्छिते.
आजच्या उपासनेवर नजर टाकली, तर पहिल्या वाचनात
यशया संदेष्टा सांगतो की, ‘परमेश्वराचे मार्ग व कल्पना या मानवी मार्ग व
कल्पनेपेक्षा उंच व खूप वेगळ्या आहेत.’ दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगू
इच्छितो की, प्रत्येक कृत्याने आपण ख्रिस्त प्रगट केला
पाहिजे. तसेच शुभवर्तमानात द्राक्ष-मळ्याचा दाखला देऊन ख्रिस्त परमेश्वराची ‘करुणाबद्ध
न्यायता’ याची ओळख करून देतो.
आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात ‘जशास तसे न
वागता, त्यात करुणेची भर घालावी.’ यासाठी लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून आपण या
मिस्सा बलिदानात प्रार्थना करूया.
पहिले वाचन : यशया ५५:६-९
आजच्या पहिल्या वाचनात प्रेरक गणला जाणारा
देवाचा संदेष्टा यशया ह्याच्याद्वारे देव सर्वांसाठी त्याच्याजवळ येण्याचा मार्ग
मोकळा करत आहे व त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास प्रोस्ताहन देत असून, पापी
लोकांस पाप सोडून नितीमत्व अंगी बाळगण्यास तसेच स्वत:च्या कल्पना सोडून देवाचे
विचार व कल्पना सिद्धीस नेण्यास जणू प्रेरणादायी उपदेश करत आहे. यशया
संदेष्ट्याद्वारे देव सर्वाना स्वत:कडे बोलावत असून, देव
म्हणतो की, “तुम्ही मजकडे या, मी
क्षमाशील आहे; माझ्या विचारांना, माझ्या
कल्पनांना तुमच्या जिवनात स्थान द्या, माझ्या मार्गावर चाला,
म्हणजे स्वर्गराज्यात तुमचा समावेश केला जाईल.” येथे आपणास देवाची उदारता दिसून येते. आपल्या प्रत्येकाच्या तारणासाठी
खुद्ध देव यशया संदेष्ट्याद्वारे तारणदायी संदेश आजच्या पहिल्या वाचनात देत आहे.
दुसरे वाचन : फिलीपीकरांस १:२०-२४,२७
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल फिलिपीकरांस
ख्रिस्ताला पांघरण्याचा, ख्रिस्तामध्ये जीवन जगून खुद्ध ख्रिस्त बनण्याचा
इशारा देत आहे. ख्रिस्ताची सुवार्ता अंगी धारण करून जगणे किवा मरणे हे केवळ
ख्रिस्तासाठीच असले पाहिजे, व शेवटी जगताना ख्रिस्तासमवेत
जगावे तर मरताना ख्रिस्त इतरांना देणे ह्या दोन बाबींचे अतिशय उत्कृष्टपणे वर्णन
केलेले आपणाला दिसून येते. आपल्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा हा नक्कीच होतो.
परंतू, आपल्या चांगल्या कार्याने मरणानंतर देखील त्याचा गौरव
होऊ शकतो म्हणून संत पौल आवर्जून सांगतो की मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे
लाभ आहे.
शुभवर्तमान : मत्तय २०:१-१६
मत्तयलिखीत शुभवर्तमानातून घेतलेल्या आजच्या
वाचनात प्रभू येशू ख्रिस्त एका दाखल्याद्वारे स्वर्गराज्याचे भागीदार होण्यास
आमंत्रण देत आहे, तसेच नीतिमान व पापी ह्यांच्यातील भेदाची तफावत
नष्ट करित आहे. देव कधीच भेदभाव करीत नाही. सर्वाना तो समानतेने वागवतो.
अशाप्रकारे प्रेमाच्या व क्षमेच्या उदारतेने व दानशूरतेने देव आपणा प्रत्येकास
स्वर्गराज्याचे हक्कदार होण्यास पात्र ठरवत आहे. शुभवर्तमानाच्या दुसऱ्या भागात
स्वतःची दुसऱ्याबरोबर तुलना न करता, स्वतःला श्रेष्ठ न समजता,
दुसऱ्याच्या कमीपणात स्वतःचे योगदान देऊन समाजात जणू समानता
प्रस्थापित करण्याचा संदेश ख्रिस्त आपणास देत आहे. अशाप्रकारे उदारता, दानशूरता व समानता ह्या तत्वाच्या माध्यमातून ख्रिस्त आपणास
स्वर्गराज्यासाठी झटण्यास आव्हान देत आहे.
बोधकथा:
काही महिन्या अगोदर मी एका फादरांकडे अनुभवासाठी
गेलो होतो. ते फादर चर्चच्या कमाबरोबर शेतीचीसुद्धा पाहणी करत. शेतं खूप
मोठं नव्हतं, त्याच्यातून येणार वार्षिक उत्पन्न सुमारे 30 ते
35 हजारच्या आसपास असेल. उत्पन्नातून सर्व खर्च वीस ते बावीस
हजार होता. त्यात फादरांनी एक मजूर ठेवला होता ज्याला दिवसाला पाचशे रुपये
प्रतिदिन मजुरी होती. अशाप्रकारे त्या मजुराची एकूण मजुरी सात ते आठ हजारपर्यंत
जात असे व जो वरील नफा उरत असे तो फक्त पाच ते सहा हजार. पण या सर्व गोष्टीत
माझ्या लक्षात आले की मजुराला कामावर ठेवणे जरुरी नव्हते, कारण त्याचे काम फक्त एक
किंवा दोन दिवसाचे होते, उरलेले दिवस फक्त शुल्लक काम असे जे
आपणही करू शकतो असे. जेव्हा हे मी फादरांच्या कानावर घातले, तेव्हा फादर म्हणाले,
ब्रदर मला समजते पण मी मुद्दामहून ह्या मुजराला कामावर बोलावितो
जेणेकरून त्यामुळे त्याच्या घरात चूल पेटेल.
मनन चिंतन:
माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आजची
उपासना आपल्याला ‘न्याय व करुणा’ या विषयावर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे. न्याय
म्हणजे काय? न्याय म्हणजे लोकांना दिलेली उचित वागणूक होय.
परंतु आजच्या शुभवर्तमानावर जर आपण नजर टाकली, तर देव
अन्यायी असल्याचं आपल्या कल्पनेला भासते. जर आपण न्यायाची व्याख्या, दुसऱ्यांना उचित वागणूक देणे किंवा त्याला त्याचा योग्य मोबदला देणे ह्या
प्रमाणे केली, तर आजच्या शुभवर्तमानातील दाखल्यात देव नक्कीच
अन्यायी आहे किंवा त्याची वागणूक अनुचित आहे. यावर आपण शिक्का मारल्याशिवाय राहणार नाही. शुभवर्तमानाची
सुरुवात स्वर्गाचे राज्य हे द्राक्ष मळ्याच्या धन्यासारखे आहे अशी केलेली आहे. जो
दिवसाच्या सुरुवातीला आलेल्या व अखेरीस आलेल्या मजुरांना सारखाच मोबदला देतो आणि
म्हणून जर परमेश्वराची तुलना आपण या द्राक्ष मळ्याच्या धन्या बरोबर केली, तर नक्कीच परमेश्वर अन्यायी आहे हे आपल्या मानवी कल्पनेला भासते.
पण देव मानवाप्रमाणे विचार करत नाही, ख्रिस्ताला
आजच्या दाखल्यातून सांगायचे आहे. याचाच प्रत्यय आपल्याला आजच्या पहिल्या वाचनात
येतो. तेथे परमेश्वर म्हणतो की, माझे मार्ग तुमचे मार्ग
नव्हेत, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत. म्हणून आपण
परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या कल्पना काय आहेत हे समजायला पाहिजे.
आजचा दाखला हा देव राज्याविषयी आहे. जेथे धनी
म्हणजे परमेश्वर मजूर म्हणजे आपण मानव व मोबदला किंवा मजुरी म्हणजे सार्वकालिक
जीवन. जर आपण ह्या प्रमाणे विचार केला, तर नक्कीच ‘देव अन्यायी नाही’ हे आपल्याला
उमगते. कारण जेव्हा आपण सार्वकालिक जीवनाची अपेक्षा करतो, तेव्हा ते आपण मिळविले
आहे असा दावा करू शकतो का? कारण चिरंतन जीवन ही परमेश्वराकडून आपणांस मिळालेली एक
मोफत भेट आहे. ते परमेश्वराच्या उदारतेच एक उदाहरण आहे. म्हणून ते आपण मिळवू शकतो
असा दावा आपण करू शकत नाही, तर त्याचा स्वीकार करण्यास फक्त तयारी करू शकतो. कारण
ते त्याच्याकडून आपल्याला मोफत मिळते. अशाप्रकारे परमेश्वराच्या करुणेची आपल्याला
जाणीव होते.
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की
द्राक्षमाळ्याचा धनी मजुरांवर करुणा दाखवितो. दिवसाअखेरीस शेवटच्या तासाला तो
मजुरांना मळ्यात कामास लावितो व त्यांना प्रमाणापेक्षा जास्त वेतन देतो; कारण त्या
धन्याला माहित आहे की, जर त्यांना कामावर घेतले नाही, तर त्यांचा दिवस व्यर्थ जाईल.
एवढेच नव्हे, तर त्यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा
राहील. कारण त्यांचे कुटुंब त्यांवर आवलंबून आहे. म्हणून त्यांच्यावर करुणा दाखवून
तो त्यांस कामावर ठेवितो व त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेस पुरेल एवढेवेतन त्यास
देतो. हेच आहे न्याय व करुणेचे उदाहरण.
परमेश्वर आपणा सर्वांना न्याय देतो. न्यायाने
वागवितो पण त्याचा तो उचितपणा करुणेविना अपुरा आहे. परमेश्वराच्या न्यायाचं आपण मानवी
शब्दात स्पष्टीकरण करू शकत नाही. कारण त्याच्या न्यायात करुणा ओसंडून वाहते.
त्याच्या न्यायाच्या शिक्क्याची दुसरी बाजू करुणा आहे.
अशाप्रकारे आपणसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात
फक्त न्यायास धरून नव्हे, तर त्यास करुणेची सुद्धा साय असावी. ज्याप्रमाणे देव
आपला न्याय करुणेने करतो, त्याचप्रमाणे आपणसुद्धा दुसऱ्यांचा न्याय करताना त्यांना
योग्यतेने वागविताना दुसऱ्यांवर करुणा करावी.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, आमची
प्रार्थना ऐकून घे.
१. आज आपण आपल्या पवित्र ख्रिस्तसभेसाठी विशेष प्रार्थना करूया.
आपले पोप, सर्व
महागुरू, धर्मगुरू, धर्मभागिनी
व धर्मबंधू यांना प्रभुची सुवार्ता पसरविण्यासाठी भरपूर असा आशिर्वाद मिळावा,
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व
स्वतःला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जागतिक मोह-मायेचा त्याग करून आपण
शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे जगावे, म्हणून आपण प्रभूकडे
प्रार्थना करूया.
३. हे प्रभू परमेश्वरा, जी कुटूंबे तुझ्यापासून दुर गेली आहेत व तुझ्या शब्दाचा मान करत नाहीत, त्या सर्वांवर तुझा पवित्र आत्मा पाठव व तुझ्या कृपेने त्यांचे मनपरिवर्तन
व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे कोणी कोरोना व्हायरस या
आजाराने आजारी आहेत अशांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे
व्हावेत, त्याचप्रमाणे ह्या व्हायरसवर लवकरच औषध मिळावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment