सामान्य काळातील सव्विसावा रविवार
दिनांक: २७/०९/२०२०
पहिले वाचन: यहेज्केल १८:२५-२८
दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र २:१-११
शुभवर्तमान: मत्तय २१:२८-३२
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार साजरा
करीत आहोत. आज देऊळमाता ‘पश्चाताप करा व आज्ञाधारक राहा’ हा शुभ संदेश आपणा
सर्वांना देत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल संदेष्टा असे सांगतो की, देवाचा
न्याय सर्वांसाठी समान आहे. प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या कृत्यामुळे – ‘दुष्कृत्यामुळे
नाश व सत्कृत्यामुळे तारण’ – असा न्याय
केला जाईल. म्हणून पापमय जीवनाचा त्याग करून, पश्चाताप करून
धार्मिकतेच्या मार्गावर चालाण्यास परमेश्वर आपणास बोलावित आहे. आजच्या दुसऱ्या
वाचनात फिलिप्पीकरास पाठविलेल्या पत्रात संत पौल असे सांगतो की, सर्वांनी एकमेकावर प्रेम करून एक दिलाने व मनाने राहावे व ख्रिस्ता सारखे
जीवन जगावे. शुभवर्तमानात येशू ख्रिस्त दोन पुत्रांच्या दृष्टांताद्वारे, पश्चातापाचे व आज्ञाधारकतेचे जीवन जगण्यास आपणास आमंत्रण देत आहे.
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालण्यास व पश्चाताप
करण्यास आपण कमी पडलो असाल तर क्षमा मागूया व आज्ञाधारकतेचे व पश्चातापाचे जीवन
जगण्यास कृपा-शक्ती आपणास लाभावी म्हणून ह्या मिसा बलिदान आपण प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहेज्केल १८: २५-२८
बाबिलोन देशांत बंदिवासात असलेल्या इस्त्राएल
लोकांना मुक्त करण्यासाठी देवाने यहेज्केलची निवड केली. यिर्मयाप्रमाणे यहेज्केलही
संदेष्टा होता जो लोकांना विश्वासाने देवाचे वचन सांगत असे. देवाची सुवार्ता
लोकापर्यत पोहवचण्याचे काम करत असे. यहेज्केल लोकांना चागले जीवन कसे जगायचे
याबद्दल उपदेश करतो. जेणेकरून ही लोक चांगले जीवन जगून देवाकडे वळू शकतात.
दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र
२:१-११
“वैयक्तिक नम्रतेद्वारे ऐक्य
राखण्याची विनंती”: आवाहन केले आहे व येशूच्या प्रीतीचा
आशीर्वाद आम्हांला मिळाला आहे म्हणून आम्हीही तशीच प्रीती कोणताच भेदभाव न करता
इतरांना दिली पाहिजे.
“ख्रिस्ताचा आदर्श”: नम्रपणे जीवन जगण्यासाठी पौलाने ख्रिस्ताचा आदर्श उदाहरणाचे पुन्हा
स्मरण केले आहे. येशूने स्वीकारलेली नम्रता, मानहानी आणि मग
सर्वांचा प्रभू म्हणून उच्चपदी बसवणे हे स्पष्टपणे सांगितले आहे.
शुभवर्तमान: मत्तय २१:२८-३२
ह्या येशूच्या दाखल्याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे.
शास्त्री व परुशी ह्यांनी देवाच्या आज्ञा काटेकोरपणे पाळण्याचे सांगुन त्या
पाळल्याच नाहीत. दुसरीकडे आपण पाहतो की जकातदार व वेश्या लोकांनी त्यांनी देवाच्या
आज्ञा न सांगता पाळल्या.
हा दाखला कोणाचीच स्तुती करण्यासाठी वापरलेला नाही
तर तो फक्त दोन प्रकारच्या अर्धवट किंवा अपूर्ण असणा-या लोकांची प्रतिमा दर्शविण्यासाठी
आपल्यासमोर ठेवण्यात आला आहे. ह्याचा अर्थ असा की एक गट दुस-यापेक्षा श्रेष्ठ
नाही. दाखल्यामधील एकही मुलगा वडिलांना आनंद देण्यासारखा नव्हता, दोघेपण असमाधानकारक होते; परंतू शेवटी ज्याने पश्चाताप करून वडिलांच्या आज्ञेचे पालन केले तो
अनिश्चितपणे दुस-यापेक्षा चांगला होता.
ज्या मुलाने वडिलांच्या आज्ञेचे पालन कोणताच
प्रश्न न विचारता किंवा त्याचा मान राखून केला असता तर तो परिपूर्ण किंवा उत्कृष्ट
मुलगा म्हणून संबोधण्यात आले असते. परंतू दाखल्यातील सत्य आपल्याला वेगळीच
परिस्थिती दाखवते. ही दाखल्यातील स्थिती ह्या जगात दोन प्रकारचे लोक असल्याचे
आपल्याला सांगते. एक गट असा जो धार्मिक प्रकारचा दिसतो परंतू जेव्हा ती धार्मिकता
आपल्या जीवनाद्वारे दाखविण्याची वेळ येते तेव्हा हे त्या धर्मिकतेमध्ये मागे पडतात
आणि दुसरा गट जो धार्मिक नसूनदेखील काही अनपेक्षित क्षणाला धार्मिक असल्याचे
आपल्याला दिसून येते. कृतीची जागा कोणीही दिलेले वचन कधीच घेऊ शकत नाही असे हा
दाखला स्पष्ट करतो. बोललेले चांगले शब्द कोणत्याही केलेल्या चांगल्या कृत्यांची
जागा घेऊ शकत नाही. ख्रिस्ती जीवन हे शब्दांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात घडणा-या
कृतीला जास्त प्राधान्य देते.
मनन चिंतन:
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू
भगिनींनो,
प्रत्येक मनुष्याच्या जीवनात खाच-खळगे, चढ-उतार,
असतात कारण या परिस्थितीतून जात असताना आपणा सर्वांना स्वतःच्या व दुसऱ्याच्या
अस्तित्वाची जाणीव होत असते. कित्येक वेळा आपण दुसऱ्या व्यक्तीचे ऐकून आपला निर्णय
घेत असतो; म्हणून जर आपण सत्याच्या म्हणजे देवाच्या मार्गावर चालत असाल, तर आपण
दुसऱ्याचे न ऐकता देव शब्द ऐकण्याचा व त्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला
पाहिजे. कारण ज्या प्रकारे चांगले शब्द आपल्याला प्रेरणा देतात, घडवतात व जोपासतात
त्याचप्रमाणे वाईट शब्द व विचारदेखील आपला आत्मविश्वास कमजोर व ठिसूळ बनवतात.
म्हणून आपण काय ऐकावे व काय नाही ह्यावर स्वतः विचार केला पाहिजे म्हणूनच अशी एक
म्हण आहे, ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे.’
आज देऊळमाता आपणासमोर दोन प्रकारच्या व्यक्तीचा
दृष्टांत ठेवत आहे. दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे दोघाही मुलांची मनोवृत्ती चांगली
नव्हती, परंतु जो छोटा मुलगा असतो त्याला नंतर कळून चुकते की त्यांने वडिलांच्या आज्ञेचा
भंग केला आहे आणि म्हणून त्याला पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापी अंत:करणाने तो
मुलगा वडिलांची आज्ञा पाळतो. शास्त्री परुशी व अधिकारी गर्वाने फुलले होते. कारण
त्यांना परमेश्वराने निवडलेले होते, ते मोशेचे नियम तंतोतंत पाळत होते आणि म्हणून
आपण स्वर्गाचे वारसदार आहोत असे त्यांस वाटत होते. परंतु येशू ख्रिस्त ही त्यांची
खोटी समजूत दूर करण्यासाठी दोन मुलांचा दाखला त्यांच्यासमोर ठेवतो आणि त्यांस सांगतो,
तुमच्या गर्वामुळे व पश्चाताप न केल्यामुळे तुम्हाला स्वर्गराज्याच्या बाहेर
टाकण्यात येईल. पण जकातदार व कसबिणी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातील कारण त्यांनी
संपूर्ण मनाने पश्चाताप करून ते खरेखुरे स्वर्गाच्या राज्याचे वारसदार बनले आहेत.
१. आज येशू ख्रिस्त आपल्यासमोर दोन पुत्रांची मनोवृत्ती समजावून देण्याचा
प्रयत्न करत आहे. जेव्हा पहिल्या मुलाला विचारले; तेव्हा तो म्हणाला मी ताबडतोब
जातो, पण गेला नाही. ह्या प्रकारची माणसे आपल्याला आपल्या
समाजामध्ये भेटतात. ह्या मुलाप्रमाणे ते सुद्धा आपल्याला खूप काही गोड शब्दाने
सांगतात. उदाहरणार्थ पॉलिटिशन खूप काही आश्वासन देतात, परंतु जे शब्दाने
सांगितलेले आहे ते कृतीमध्ये कधीच आणत नाहीत किंवा पाळत नाहीत.
२. दुसरा मुलगा ज्याला विचारलं होतं की, आज तू
द्राक्ष मळ्यात काम कर पण त्यांने नकार दिला, त्यानंतर त्याला पश्चाताप झाला व तो गेला. ह्या
प्रकारची माणसेसुद्धा आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. जे शब्दांनी नव्हे,
तर कृतीमधून आपल्याला त्यांच्या चांगुलपणाची जाणीव करून देतात. अशी
लोकं किंवा माणसे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालतात, वागतात
व कृतीतून ते सिद्ध करतात. येशू ख्रिस्ताने कित्येक अशे दृष्टांत आपल्यासमोर
मांडलेले आहेत. ह्या दृष्टांतामधून आपण आपल्या जीवनासाठी काहीतरी शिकलं पाहिजे. हे
दृष्टांत आपणा सर्वांच्या जीवनात दोन गोष्टी करतात: एक म्हणजे ‘आपलं जीवन चांगलं
जगण्यासाठी ते आपणा समोर एक प्रकारे आव्हान ठेवतात. दुसरं म्हणजे स्वतःचे निर्णय
स्वतः घेण्यास प्रेरणा देतात.
‘हो’ आणि ‘नाही’ हे दोन छोटे शब्द आहेत. पण ह्याविषयी
खूप विचार करावा लागतो. आपण बऱ्याच गोष्टी गमावतो, ‘नाही’ लवकर बोलल्यामुळे आणि ‘हो’
उशिरा बोलल्यामुळे. कारण आपल्या शब्दांमध्ये व कृतीमध्ये खूप फरक असतो. जे आपण
बोलतो ते करत नाही व त्याचा आपल्याला पश्चाताप होतो. बहुतेक वेळा आपणसुद्धा यहुदी
शास्त्री-परुशी व अधिकाऱ्यासारखे होतो. आपण फक्त आश्वासने देतो, पण कृतीमध्ये
आणण्याचा प्रयत्न करीत नाही किंवा कृतीमध्ये आणत नाही. आपण त्या शास्त्री
पुरुषांप्रमाणे गर्वाने चालतो, वागतो. पण आपण किती मोठे पापी आहोत हे मात्र विसरत
असतो. असे असूनही परमेश्वराच्या दयेचा दरवाजा आपणा सर्वांसाठी खुला आहे. दुसऱ्या
मुलाप्रमाणे मी द्राक्षमळ्यामध्ये काम करण्यास जात नाही असे म्हटले असाल, तरीपण
परमेश्वर आपणाला अजून एक संधी पश्चाताप करण्याची देत आहे. ज्याप्रमाणे
परमेश्वराच्या दये व करूणेमुळे जकातदार, कसबिणी, येशू ख्रिस्ताबरोबर ख्रुसावर
टांगलेला चोर, माग्दलाची मरिया, तसेच हिप्पोचा अगस्तीन हे संत झाले, त्याचप्रमाणे तोच परमेश्वर आपल्यालादेखील त्याच्या स्वर्गराज्यात प्रवेश
देऊन संताच्या मंडळात समावेश करू शकतो, केवळ पश्चाताप करणे आवश्यक आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रेमळ पित्या, आमची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व
व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांनी स्वतः सत्याच्या मार्गावर चालून इतरांना सत्याच्या
मार्गावर चालण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सर्व ख्रिस्ती भाविकांनी स्वार्थाचे जीवन सोडून इतरांच्या अडचणीत
त्यांना हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. सर्व युवक-युवती व लहान मुलांनी त्यांच्या आईवडिलांच्या
आज्ञेप्रमाणे वागावे व जीवनात चांगल्या गोष्टी आत्मसात करून वाईट गोष्टी टाळाव्यात
म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपण सर्वांनी येशू ख्रिस्तासारखे सेवाभावी आणि विनम्र जीवन जगावे
व देवाने दिलेल्या सर्व देणग्यांचा योग्य वापर करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूंच्या संसर्गाने भयभीत
झाले आहे. सामाजिक व आर्थिक जीवन विस्कळीत झाले आहे. हे भय पवित्र आत्म्याच्या
धैर्याने दूर व्हावे व संपूर्ण जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी आपण प्रभूकडे
प्रार्थना करू या.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वर चरणी समर्पित
करूया.
No comments:
Post a Comment