मरीयेचा जन्मदिवस सोहळा
दिनांक: ८/०९/२०२०
पहिले वाचन: मीखा ५:१-४
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२८-५०
शुभवर्तमान: मत्तय १:१-१६, १८-२६
प्रस्तावना:
हे पवित्र मरीये;
आज्ञाधारक बनलीस होऊनी
प्रभूची दासी;
शिष्य झालीस बनुनी
ख्रिस्ताची जन्मदाती!
पापमुक्त केलेस जगाला
करुनी त्याग पुत्राचा;
मुकुट परिधान केलास
होऊनी नम्र, लीन व सौम्य!
म्हणूनच आज तुला स्वर्गाचा व साऱ्या
जगाचा मान मिळाला आहे. आजच्या दिनी संपूर्ण ख्रिस्त सभा पवित्र मरीयेचा जन्म दिवस
सोहळा साजरा करीत आहे. पवित्र मरिया साधी, भोळी, निर्मळ, निष्कलंक व पापविरहित
स्त्री होती म्हणूनच अखिल ख्रिस्तसभा व मानवजात पवित्र मरीयेला महत्वाचे स्थान
देऊन तिचा गौरव करीत आहे. प्रभू ख्रिस्ताला जगात आणून त्यची जडण घडण केली व
त्याच्या प्रत्येक कार्यात सहभागी झाली व आजसुद्धा स्वर्गातून आपणासाठी प्रार्थना
करीत आहे. दुःखात व अपयशात कृपेचा वर्षाव करीत आहे. अंधाराच्या वाटेवर ती ज्योतिमय
बनत आहे. आजची उपासना आपणास मरीयेप्रमाणे देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्यास
आमंत्रण करीत आहे व चांगले जीवन जगण्यास आव्हान करीत आहे.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: मीखा ५:१-४
आता नवीन केलेल्या
सियोनेकडून नवीन केलेल्या दावीदाच्या घराण्याकडे लक्ष वळवले आहे. ‘आता’ ह्या
शब्दाने हा संदेश पूर्वीच्या संदेशाशी जोडला आहे (४:९, ११). नाकेबंदी केलेल्या नगराची
आध्यात्मिक दृष्टीने मजबुती करण्यासाठी मीखाने आज्ञा केलेली आहे. बेथलेहेमा,
एफ्राथा आणि यहूदा या नावांवरून दावीदचा पिता इशया ह्याच्या काळाचे स्मरण होते. बेथलेहेममध्ये
मसीहाचा जन्म झाल्याने सियोनाच्या नवयुगाचा प्रारंभ होईल या अभिवचनाच्या आधारे मीखा
सांगतो की, इस्राएलला सोडून देण्यात येईल. त्यांना कोणी मानवी राजा नसेल. जी
वेदनेत आहे, ती प्रसवेपर्यंत, मसीहाला जन्म देईपर्यंत अशीच स्थिती राहील. मग पुढे
सुमारे सातशे वर्षांनतंर हे भाकीत मारीयेद्वारे उरण होईल. तसेच सत्ताधीश, राज्यकर्ता,
मसीहा उभा राहील म्हणजे सर्वकाळ कायम राहील. तो आपला कळप चारील. त्यांची प्रत्येक
गरज भागविल. त्यांना आध्यात्मिक अन्न देईल आणि त्यांचे संरक्षण करील. तो मानवी
योजना, रचना व हातचलाखी यांनी नव्हे, तर विश्वासाच्याद्वारे, देवाच्या सामर्थ्याने
राज्य करील.त्याची प्रजा वस्ती करून सुरक्षित राहील, कारण सैतानाला जिंकून तो
आपल्या राज्याचा दिगंतापर्यंत विस्तार करील.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२८-३०
देवाने आपल्या योजनेनुसार,
प्रत्येक विश्वासणऱ्याला म्हणजेच नवजन्म पावलेल्या व्यक्तीला
बोलाविले आहे. आपल्यावर कठीण परिस्थिती येत राहतात, परंतु या
सर्वांवर देवाचे नियंत्रण आहे; व तो कार्य करीत असतो. अशा
प्रकारे देव त्याच्या योजना आपणा प्रत्येकाच्या जीवनात पूर्ण करीत असतो.
शुभवर्तमान: मत्तय १:१-१६, १८-२६
आजच्या
शुभवर्तमानामध्ये देवदूत योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन सांगतो की, मरियेच्या उदरी पवित्र आत्माच्या
सामर्थ्याने आलेल्या बाळचे नाव तू येशू ठेव, कारण तो
आपल्या लोकांचे पापापासून तारण करील.मरियेच्या उदरी येणारा येशू हा दाविद राजाच्या
वंशात जन्माला येणारा तारणारा अभिषिक्त (हिब्रु-मसिहा, ग्रीक-ख्रिस्त)
आहे. दाविदाचा पुत्र ‘येशू ख्रिस्त’ ह्याची वंशावळ हा या शुभवर्तमानाचा गाभा आहे.
देवाने आब्राहाम व दावीद ह्यांच्याशी दोन करार केले होते. हे करार ख्रिस्तामध्ये
पूर्ण झाल्याचे दिसून येते. ‘येशू
ख्रिस्त’ आब्राहाम व दावीद ह्यांच्या
कुळातलाच होता हे या उताऱ्यातून कळते. तसेच योसेफ व मरीयेचा वाड़निश्चय झाला
(वाग्दत्त) होता. ख्रिस्ताला मानवी देह धारण करता यावा याकरिता देवाने मरीयेची
निवड केली. तिचा योसेफाशी सहवास येण्यापूर्वीच ती पवित्र आत्माने गर्भवती होती.
अशारितीने ख्रिस्ताने मानवी देह धारण केला. येशू ख्रिस्त सनातन देव आहे व तो
देह्धारी होणारा होता हे या घटनेपूर्वी सुमारे ६०० वर्षापूर्वी यशया संदेष्ट्याने
लिहून ठेवले होते.
मनन चिंतन:
भगवान
बोलते है की,
तू वही
करता है जो तू चाहता है,
फिर
वही होता है जो मै चाहता हुँ|
इसलिए
तू वही कर जो मै चाहता हुँ,
फिर
वही होगा जो तू चाहता है|
मरियेने ईश्वराच्या
वाणीला प्राधान्य दिले, स्वतःच्या इच्छेला नव्हे तर, ईश्वराच्या इच्छेनुसार जीवन
जगली. स्वतःचे संपूर्ण जीवन ईश्वराच्या हाती समर्पित करून घेतले ह्याच कारणास्तव
आज ख्रिस्तसभा मरीयेला निरनिराळ्या शीर्षकांनी संबोधित आहे. खरोखरच पवित्र
मारीयेचे मातृत्व, तिचे वात्सल्य माझ्या प्रवचानातून फेडता येणार नाही कारण आज
कोणाला ती प्रेमस्वरूप वाटते, कोणाला वात्सल्यमय वाटते, कोणाला गुरु तर कोणाला
कल्पतरू. कितीतरी रुपात ती आपली पाठ राखण करीत असते. तिच्या मायेच्या पंखाखाली संरक्षणाची,
क्षमेची व करुणेची ऊब मिळत असते. तिच्या प्रेमाची सावली सदैव आपल्या बरोबर असते. ज्याप्रमाणे
होकायंत्रे व मार्गदर्शक तारा भटकलेल्या लोकांना मार्ग दाखवतो तशाच प्रकारे पवित्र
मरिया ख्रिस्तभक्तांना ख्रिस्ताचा मार्ग व रस्ता दाखवते; अर्थात ती तिच्या
पुत्राकडे घेऊन जाते. कारण तिला ठाऊक आहे की सर्वकाही येशूला मिळत आहे. आज कितीतरी
लोक दुखी, अपयशी व निरागस असताना मरीयेचा धावा करतात, कारण त्यांचा विश्वास सांगतो
की पवित्र मरिया आपल्या सहाय्याला धावत येते व तिच्या पुत्राकडे मध्यस्थीची याचना
करून तिची झोळी आपल्या तारणासाठी पसरविते. पवित्र मरिया जणूकाही आपला आधारस्तंभ
आहे. एवेच्या आज्ञाभंगामुळे निर्माण झालेला गुंत्ता सोडवण्याचे काम मरीयेच्या
आज्ञापालनाने केले. कुमारी मातेने तिच्या श्रद्धेने जगाला तारणहार दिला. ‘एवेद्वारे
मृत्यू, तर मरियेद्वारे जीवन’.
आज आपण पवित्र
मरीयेचा जन्मदिवस (सोहळा) साजरा करीत आहोत, म्हणजेच मरीयेचा सन्मान गौरव व आदरभाव
करीत आहोत. एका बाजूला मरीयेला वंदन करतो व दुसऱ्या बाजूला स्त्रियांची विटंबना
करतो. स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, बलत्कार, स्त्रियांची भ्रुणहत्त्या,
स्त्रियांवर अॅसिड फेक, स्त्रियांचे लैंगिक शोषण जे काही अगोदरच्या शतकात घडून येत
ते आजच्या शतकात सुद्धा पहायला मिळत आहेत. स्त्री घरामध्ये व घराबाहेर सुरक्षित
नाही हिंस्त्र प्राण्यासारखे लोक स्त्रियांवर डाव रचून उभे असतात. ह्या
लॉकडाऊनच्या काळात कितीतरी लहान बालिकेवर व स्त्रियांवर लैंगिक शोषण झाले. त्यांचा
क्रूररित्या छळ केला जात आहे. आजसुद्धा मुलींना शिकण्याचा अधिकार मिळत नाही. हुंड्याच्या भीतीपायी आईवडील स्वतःच्या पोटातील रक्ताच्या
गोळ्याला मारून टाकतात, मग जेवणात विष घालतात तर विहिरीत ढकलून देतात. अशी ही
दयनीय अवस्था स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आपण
स्त्रियांना एक माणूस म्हणून समाजात वागवत नाहीत.
पवित्र मरीयेचे
आज्ञापालन, तिची नम्रता, तिची सेवावृत्ती, तिची ख्रिस्ताशी असलेली निष्ठा,
ख्रिस्ताशी असलेले तिचे आध्यात्मिक ऐक्य, तिची ख्रिस्त मंडळावरील प्रीती, तिचा
आध्यात्मिक आशावाद, तिची अपार सहनशीलता व सर्वांकरिता करीत असलेली मध्यस्थी
इत्यादि सदगुणांनी भरलेली ही आपली आई पवित्र मरिया. जर आपण पवित्र मरीयेची भक्ती
करत असणार व स्त्रियांना तुच्छ लेखत असणार तर आपली भक्ती व्यर्थ आहे. आपल्या
भक्तीबरोबर कृतीसुद्धा दिसली पाहिजे. आपण जेव्हा स्त्रीचा सन्मान करणार तेव्हाच
आपण पवित्र मरीयेचा गौरव करणार. आज आपण पवित्र मरीयेकडून खूप काही शिकून घेऊ शकतो.
ती ख्रिस्ताची पहिली शिष्य होती, तिने ख्रिस्ताच्या प्रत्येक कार्यात महत्वाची
जवाबदारी बजावली आहे. ख्रिस्त जे काही सांगत होता ते तिने आज्ञाधाराकतेपणे,
प्रामाणिकपणे, समजूतदारपणे व आनंदाने केले. ख्रिस्ताच्या दुःखात ती सहभागी झाली
त्याच्याबरोबर दुःखाचीवाट चालली, व शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या पुत्राबरोबर
राहिली म्हणूनच तिला एक धाडसी स्त्री असे
म्हणतात.
पवित्र मरीयेच्या
या गुणांचा मान सन्मान व गौरव करीत असताना आपणास असा दिलासा मिळतो की, ही आपली
वैभवशाली आई आम्हा दुर्बळ लेकरांकरीता सतत मध्यस्थी करते आणि तिच्या मायेची,
ममतेची व वात्सल्याची नजर आपल्यावर कायम ठेवते. ती आपली नित्यसहाय्य करणारी आई आहे
म्हणून आपण तिच्याकडे धाव घेतो व तिच्यापुढे नतमस्तक होतो.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: पवित्र माते
आम्हासाठी विनंती कर.
१. आपले
परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, आपले
आध्यात्मिक मेढ़पाळ व आपल्या धर्मप्रांतात कार्यरत असलेले सर्व धर्मगुरु व व्रतस्थ
ह्यांच्यावर परमेश्वराने भरपूर आशीर्वाद पाठवावा व त्यांचे आरोग्य चांगले रहावे, तसेच ख्रिस्तसभेचे कार्य
करण्याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. देवमातेच्या मध्यस्थीने आम्ही अनाथ, निराधार, परक्या
आणि पोरक्यांसाठी आशीर्वाद मागतो. आमच्या दानशूर वृत्तीमुळे त्याचे जीवन सदोदित
आशीर्वादमय ठरो म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी प्रार्थना
करूया. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात
प्रामाणिकपणे त्या कार्यरत आहेत. त्याची छळणूक होऊ नये म्हणून पवित्र मातेच्या
मध्यस्थीने परमेश्वर पित्याजवळ प्रार्थना करूया.
४. ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा आपल्या मनात
बाळगून आहेत अशांवर देवाचा आशीर्वाद यावा व त्यांना मातृपद प्राप्त व्हावे म्हणून आपण परमेश्वराकडे
प्रार्थना करूया.
५. आज मरीयेच्या मध्यस्थीने विशेष प्रार्थना करूया कोरोनाच्या विषाणूने पिडीतझालेल्या लोकांसाठी.
अशा लोकांना देवाचा स्पर्श व्हावा व लवकरात लवकर त्यांना चांगले स्वास्थ्य लाभावे,
तसेच लवकरात लवकर ह्या रोगावर लस शोधण्यास संशोधकांना यश लाभावे, व जे लोक विशेषकरून डॉक्टर्स,
नर्सेस, पोलीस आणि इतर लोक जे
निस्वार्थीपणे कोरोनाग्रस्त लोकांची सेवा करत आहेत त्यांना विशेष आशीर्वादाने
भरावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून
आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूसमोर ठेवूया.
No comments:
Post a Comment