Friday, 11 September 2020


Reflections for the
24th Sunday in Ordinary Time (13/09/2020) by Dn. Rahul Rodrigues

सामान्य काळातील चोविसावा रविवार

 

दिनांक: १३/०९/२०२०

पहिले वाचन: बेन सिरा ची बोधवचने २७:३३-२८:९

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १४:७-९

शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५


 


‘विनाअट क्षमा करा’

 

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील चौविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्या शत्रूला क्षमा करावयास संबोधित आहे. आपण ‘आमच्या बापा’ ह्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, ‘जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर.’ जर आपण क्षमा केली नाही, तर आपणालाही परमेश्वर क्षमा करणार नाही.

आजची तिन्हीही वाचने आपल्याला हेच समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजच्या पहिल्या वाचनात बेन सिराची बोधवचने आणि मत्तय लिखित शुभवर्तमानात आपणास सांगण्यात येते की, ‘इतरांना क्षमा करा, म्हणजे तुम्हालाही देव क्षमा करील.’ तर पौलचे रोमकरांस पत्र ह्या आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, बाप्तिस्माद्वारे आपण ख्रिस्ताशी एक झालो आहोत आणि आपले जगणे किंवा मरणे हे ख्रिस्ताठायी असावे.

क्षमा हा ख्रिस्त सभेचा एक महत्त्वाचा भाग किंवा मुलभूत घटक आहे. ख्रिस्ताने आपल्याला क्षमा करावयास शिकविले आहे. त्याच ख्रिस्ताकडे आपण मागूया की, ‘हे ख्रिस्ता आम्हाला तुझ्या सारखे इतरांना क्षमा करण्यास शिकव’.

 

पहिले वाचन: बेन सिराची बोधवचने २७:३३-२८-९

आजच्या पहिल्या वाचनात बेन सिरा आपल्याला सांगतो की, जर परमेश्वराने आपल्याला क्षमा करावी असे आपल्याला वाटत असेल, तर आपणही दुसऱ्यांना, इतरांना क्षमा करणे गरजेचे आहे. जर आपण इतरांविषयी सूड भावना ठेवली, तर परमेश्वरसुद्धा आपल्याविषयी सूडाची भावना ठेवील. जर आपणाला आपला शेवट समजला, तर आपण नक्कीच देवाच्या आज्ञा पाळू.

 

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १४:७-९

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की, तुम्ही तुमच्या भावाला तुच्छ मानू नये. खाणे-पिणे किंवा एखादा दिवस पाळणे याविषयी आपण एकमेकांचा अन्याय करीत बसू नये. ही गोष्ट आपल्या अधिकारात येत नाही. कारण आपण प्रभूसाठी जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. काहीजणांना एखाद्या गोष्टीविषयी अजून पूर्ण शिक्षण मिळाले नसेल, किंवा त्यांच्या अनुभवांची त्यांच्या भावनेवर परिणाम झाले असतील. आपल्या जीवनात प्रमुख हेतू प्रभूकरिता जगणे असावा. हा विचार मनावर बिंबवा व ज्या शुल्लक गोष्टी आहेत त्याबद्दल इतरांवर टीका करीत बसू नका.

 

शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५

विनाअट क्षमा करा. आपल्या बंधुचा दोष दाखविण्याची जबाबदारी पार पाडताना त्याला क्षमा करण्यास विसरु नकोस. सात वेळा पापक्षमा करून मी फारच उदारपणा दाखवित आहे असे पेत्राला वाटले. कारण फक्त तीनदा क्षमा करावी, असे शास्त्री शिकवीत होते. ख्रिस्ताने त्याला धक्काच दिला. सात वेळा नव्हे, तर सत्तर पट सातवेळा क्षमा कर.

ख्रिस्ताने ह्या विशाल क्षमेचे कारण एका उदाहरणाने सांगितले. एका मनुष्याला लाखो रुपयाचे कर्ज होते. ते त्याला करता येत नव्हते. तेव्हा राजाने त्याचे संपूर्ण कर्ज माफ केले. यानंतर त्या कर्जदाराला त्याचा एक सोबती भेटला, त्यांनी शंभर रुपये उसणे घेतले होते. त्याला जरासुद्धा दया न दाखविता व आपल्याला किती प्रचंड कर्जमाफी झाली आहे याचा विचार न करता, त्यांने आपल्या सोबत्याला तुरुंगात टाकले. या कर्जदाराची ही कृती दृष्टाइची होती. स्वतःवर जे उपकार झाले आहेत, त्याबद्दल तू कृतज्ञ-उपकार शील नव्हता. त्याच्या कृतीनेच त्याने दाखविले. जशी ख्रिस्ताने आपल्याला क्षमा केली, तशी क्षमा करण्यास तो आपणालाही आव्हान करत आहे.

 

बोधकथा:

एकदा पोप बेनेडिक्ट सोळावे आपल्या व्हॅटिकनच्या बाल्कनीतून आशीर्वाद देत असताना, एका डोकेफिरू माणसाने बंदुकीतून पोप साहेबांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्याने आपली बंदूक काढून पोप साहेबांवर नेम धरला आणि बंदुकीचा चाप दाबला, दुर्दैवाने त्यातून गोळी झाडली गेली नाही, मग शिपायांनी त्याला धरले व तुरुंगात टाकले. जेव्हा त्याला पोप साहेबा समोर उभे केले, तेव्हा तो म्हणाला की, मला खंत आहे की, माझी बंदूक खराब झाली. पोप साहेबांनी त्याला चांगल्या भाषेत म्हटले, तुझी बंदूक चालली नाही; कारण तू गर्दीत उभा होतास व मी लोकांबरोबर तुलासुद्धा आशीर्वाद दिला होता. तू घरी जा व पुन्हा असे करू नकोस. तुझी मुलं व पत्नी या गोष्टीने घाबरले असतील व तुझी वाट पहात असतील.

 

मनन चिंतन:

‘चुकणे हा मानवी स्वभाव आहे, परंतु क्षमा करणे हा दैवी स्वभाव आहे.’

आज जेव्हा आपण समाजाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला दिसून येते की आज प्रत्येक नात्यांमध्ये दरार पडलेली आहे. नवरा बायकोशी बोलत नाही, भाऊ बहिणीची बोलत नाही, मुलगा आईशी, मुलगी बाबाशी आणि सर्वांचं कारण एकच कोणीही एक दुसऱ्याला समजून घेण्यास तयार नाही. कोणीही क्षमा करण्यास तयार नाही. जर मी क्षमा मागितली, तर मला कमी लेखातील. माझी चूकच काय आहे? अशा प्रकारच्या विचारांनी कोणीही इतरांनाक्षमा करण्यास पुढे जात नाही. परंतु या सर्वात कोणाचा तोटा होत असतो, तर आपलाच. आपण दुसऱ्यांना क्षमा करत नाही, म्हणून कोणी आपल्याला क्षमा करत नाही.

मराठी मध्ये एक म्हण आहे, ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण.’ म्हणजे आपण जर मनात क्रोध, मत्सर, हेवा ठेवला, तर तो आपल्याला त्रास होणे हे निश्चितच आहे. आणि म्हणूनच काही व्यक्तीची अशी परिस्थिती झालेली आढळते: ‘दिवसा आपल्याला चैन पडत नाही, रात्री आपल्याला झोप लागत नाही.’ परंतु आजची उपासना आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या एका मूलभूत पाया आहे तो म्हणजे क्षमा यावर/किंवा याविषयी आठवण करून देत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आणि शुभवर्तमानातसुद्धा हेच आपल्याला सांगितलेले आहे की, दुसऱ्यांना समजून घ्या, क्षमा करा. संत पौल म्हणतो, आपलं जीवन ख्रिस्ताचे जीवन आहे. आपण जगलो, तर ख्रिस्तासाठी आणि मेलो तरी ते ख्रिस्तासाठीच. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली, त्याचप्रमाणे आपणही तशी क्षमा करणे गरजेचे आहे. आपण ख्रिस्ताचे हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाला एक नवीन कलाटणी द्यायला हवी.

आज समाजामध्ये अशी बरीचशी उदाहरण आहेत जी आपल्या ख्रिस्ताची शिकवण अनुसरण्यास मदत करतात. सिस्टर राणी मरियेच्या आईने आणि बहिणीने तिच्या मारेकऱ्याला तुरुंगात जाऊन क्षमा केली, एवढेच नव्हे तर त्याला भाऊ देखील मानले. तुम्ही नुसती क्षमा करणे इतक्यात संतुष्ट राहायला नको, तर ती क्षमा अनुभवायला सुद्धा हवी. आपण कितीवेळा क्षमा करतो हे गरजेचे नाही, तर कशाप्रकारे आपण क्षमा करतो हे फार महत्त्वाचे आहे. क्षमा करणे फक्त शब्दात नाही, तर ते आपल्या कृतीत उतरविणे देखील फार गरजेचे आहे. आपण जेव्हा इतरांना क्षमा करतो, तेव्हा परमेश्वरही आपल्याला क्षमा करत असतो व त्यामुळे आपण आपल्या जीवनात एक प्रकारची सुख, शांती अनुभवतो. आपले जीवन तेव्हाच सुखमय होते जेव्हा आपण ख्रिस्ता सारखे वागतो. परंतु क्षमा करणे तितकेच सोपे नाही, तर ते कठीण किंवा अवघड आहे. ते आपल्या सामान्य शक्तीने आपल्याला शक्य होणार नाही, तर त्यासाठी देवाची कृपा असायला हवी. जो कोणी ख्रिस्तामध्ये एकरूप आहे तोच मनुष्य हे करू शकतो. त्यासाठी लागणारी कृपा शक्ती या पवित्र मिसा बलिदानात मागुया. 


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

 

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरु, व्रतस्थ बंधू-भगिनी व इतर प्रापंचिक यांनी सतत ख्रिस्ताची शिकवण अंगीकारावी. आपल्या जीवनात उतरवावी, तसेच आपल्यासाठी एक चांगला आदर्श निर्माण करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

२. आज कोरोना व्हायरसमुळे बरेचशे लोक बेरोजगार झाले आहेत व मानसिक तणावाखाली आहेत अशांना प्रभूची कृपा लाभावी लवकरात लवकर त्यांना काम-धंदा मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

३. जे कोणी कोरोना व्हायरस या आजाराने आजारी आहेत अशांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत, त्याचप्रमाणे ह्या व्हायरसवर लवकरच औषध मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

४. या वर्षी आपल्याला चांगला पाऊस परमेश्वराच्या कृपेने लाभला आहे. येणाऱ्या दिवसातही चांगला पाऊस व्हावा व सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपला बचाव व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

५. आज जगभर मरियेच्या नोवेना चालू आहेत, तर मरिया मातेच्या मध्यस्थीने आपल्या प्रत्येकाला चांगले आरोग्य लाभावे व पुन्हा एकदा आपले जीवन सुरळीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

 






No comments:

Post a Comment