Reflections for the 28th Sunday in Ordinary Time (11/10/2020) by Fr. Wilson D’Souza
सामान्य काळातील अठ्ठाविसावा
रविवार
दिनांक: ११/१०/२०२०
पहिले वाचन: यशया २५:६-१०
दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र ४:१२-१४,
१९-२०
शुभवर्तमान: मत्तय २२:१-१४
प्रस्तावना:
आज आपण
सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास दैवी
मेजवानीत सहभागी होण्यासाठी तयार करीत आहोत. प्रत्येक दिवशी
आपण जेव्हा मिस्साबलीत
सहभागी होतो तेव्हा आपण हे प्रीती भोजन साजरं करतो. मिस्साबली
केवळ एक बाह्य देखावा नाही किंवा पूजापाठ नाही किंबहुना तो केवळ अर्पण किंवा विधी
नाही, तर संपूर्ण जीवनाचं समर्पण ह्या यज्ञात दडेलेल आहे. जो कोणी ह्या
समर्पणाद्वारे आपल्या स्वतःचं समर्पण करील त्या व्यक्तीला अनंत व सार्वकालिन
जीवनाचा अनुभव येईल. ह्या विधीत ख्रिस्ताने स्वतःस समर्पित केले. त्याच्या
समर्पणात सहभागी होवून दैवी मेजवानीत भाग घेण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून
आजच्या ह्या मिस्साबलिदानाच्या सुरुवातीला आपल्या मनाची, अंतःकरणाची तयारी करूया.
यशया
संदेष्टा मिष्टान्नाची मेजवानी आणि उत्तम द्राक्षरसाचं पेय आपणास देण्याची हमी देत
आहे. हे एक केवळ आश्वासन नाही, तर जेव्हा दैवी मेजवानीत आपण सहभागी होऊ, तेव्हा ते
आश्वासन पूर्ण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यूचा नायनाट केला जाईल व परमेश्वर
आपल्या चेहऱ्यावरील अश्रू कायम पुसेल अशी आशा आपणाला बाळगावी लागेल. तो काळ व समय
असेल उल्हासाचा, हर्षाचा व आपल्या तारणाचा असं भाकीत संदेष्टा करतो.
संत पौलाचे फिलीप्पीकरांवर अत्यंत प्रेम
होते. आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी फिलिप्पीकर आपल्या जीवनाचा भाग मानून
त्यात आनंद मानत असत. त्यांना सर्वकाही सहन करण्यासाठी ख्रिस्ताकडून शक्ती मिळत
असे. ते सर्व देवाच्या गौरवासाठी वापरत असत. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत
देवावरील भिस्त कमी न होवू देणे हा या वाचनाचा संदेश आहे.
प्रभू
येशू आज आपणासमोर मेजवानीस आमंत्रण दिलेल्या आमंत्रीतांचा दाखला ठेवीत आहे.
आमंत्रित मेजवानीस उपस्थित राहण्यास असमर्थ ठरले असे ह्या दाखल्याद्वारे सांगितलेले
आहे. आमंत्रितांनी अनेक सबबी व करणे देऊन राजाच्या आमंत्रणास नकार दिला. आजही अनेक
लोक देवाच्या व देऊळ मातेच्या आमंत्रणाला नकार देवून मिस्साबलीत व इतर धार्मिक व
सामाजिक बांधिलकीत सहभागी होण्या ऐवजी सबबी व कारणे देत असतात. थोडा वेळ शांत
राहून मनन चिंतन करूया. मी माझा परिपूर्ण सहभाग दाखवतो का? कि अनेक कारणे व सबबी
देऊन माझ्या जबाबदारीपासून दूर जातो?
प्रेम नगर नावाचं एक गाव
होत. ह्या गावात एक विचित्र कुटुंब रहात होतं. त्या गावात कोणताही कार्यक्रम असला
तरी हे कुटुंब दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत नसे. दुसऱ्यांशी मिळून मिसळून
राहणे,
शेजारधर्म पाळणे त्यांना जमत नसे.
गावातील काही मान्यवर
व्यक्तींनी ह्या कुटुंबाला भेट देऊन सांगितले की ‘आपलं कुटुंब कधी गावातील
समारंभात,
सुख-दुःखात, अडीअडचणीत तसेच कुठल्याही सभेला
उपस्थित नसतं, आपण ह्या पुढे गावातील कार्यक्रमात सक्रिय
सहभाग दाखवावा’. असे सांगून ते निघून गेले. परंतु ह्या कुटुंबाने त्यांच्या बोलण्याकडे
दुर्लक्ष केले. परिणामी काही वर्षानंतर ह्या कुटुंबावर जेव्हा संकट आले तेव्हा
त्याच्या मदतीस किंवा सहकार्यास कोणीही पुढे आले नाही. त्यांनी मदत व सहकार्य
विचारले असता गावकऱ्यांनी वेगवेगळ्या सबबी व करणे देऊन त्यांना मदत करायचे टाळले, त्यांना वाळीत टाकले.
आपला भारतीय समाज व कुटुंब
एकमेकांशी निगडित व जवळकीचे आहे. घरात कोणताही कार्यक्रम असला तर संपूर्ण गावाला
आमंत्रित केले जाते. एखादं घर विसरून गेलं, तर त्या
कुटुंबाला फार राग येत असतो. सध्याची कोविड १९ ची परिस्थिती वगळता आपले गावातील
समारंभ हे सामुदायिक असतात. आमंत्रण देणे, त्याचा स्वीकार
करणे, पाहुण्याचा पाहुणचार करणे, समारंभाला
उपस्थित राहण्याचे आश्वासन देणे ही प्रथा आजही आहे.
आजच्या शुभवर्तमानात
आपल्याला सांगण्यात आले आहे की, राजाच्या मुलाचा लग्न
सोहळा होता. तो श्रीमंत व प्रतिष्ठित असल्यामुळे आपल्या घरी लग्नाला खूप लोक येतील
ह्या आशेने त्याने मोठी मेजवानी तयार केली होती.
मेजवानीचा वेळ आल्यावर
लोकांना बोलविण्यासाठी दासांना पाठविण्यात आले. ज्या लोकांनी आमंत्रणाचा स्वीकार
केला होता व येण्याचे आशवासन दिले होते, त्यांनी नकार देण्यास सुरुवात केली. जेवण
तयार आहे. पुष्ट पशू कापले आहेत. दासानी लोकांना सांगितले, परंतु त्यांनी मनावर घेतले नाही. ते आपापल्या कामधंद्यात, शेतीत मग्न झाले, तर दुसऱ्यांनी अनेक कारणे व सबबी
देऊन लग्नाला व मेजवानीला येण्याचे टाळले. इतकेच नव्हे, तर
काही लोकांनी राजाच्या दासंचा अपमान केला व काहींना जिवे मारले.
परिणामी राजाला आपल्या
प्रजेचा राग आला, त्याने सैन्य पाठवून त्या
अत्याचारी लोकांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. राजाचा अपमान प्रजेला
महाग पडला. त्यांना शिक्षा मिळाली, ज्यांना बोलावले होते
त्यांची लायकी नव्हती.
होय, देव आपल्याला प्रत्येक रविवारी प्रीती भोजनसाठी मिस्साबलीत सहभागी
होण्यासाठी आमंत्रण देत असतो. वेळ येते तेव्हा आपण राजाच्या प्रजेप्रमाने अंग
काढण्याचा प्रयत्न करतो. अनेक सबबी व कारणे देवून मिस्साबलीत, धार्मिक विधीत व सामाजिक बांधिलकीत सहभाग दाखवत नाही, कधी कधी मिस्साला वेळेवर पोहचत नाही. जर मिस्सा चुकला, तर त्याचं दुःख आपणास होत नाही.
परंतु अशी वेळ येईल जेव्हा
परमेश्वर मिष्टान्नाची व द्राक्षरसाची मेजवानी आपल्या सर्वकालिक जीवनात मांडेल
तेव्हा आपला सहभाग होऊ शकत नाही; कारण आज आपण अनेक सबबी व कारणे देऊन
परमेश्वराचं आमंत्रण फेटाळतो. आपल्या जीवनाच्या शेवटी आपणास
समय व ठरलेली वेळ येताना त्याच्या दैवी मेजवानीत उल्हासित व हर्ष भरीत होण्याचे
भाग्य लाभणार नाही, अशी पाळी न येवो. ती दैवी मेजवानी एक आशेची
व तारणाची, आपल्या चेहऱ्यावरील अश्रू पुसणारी देव राज्यात असणारी मेजवानी असणार.
जो देवाच्या आमंत्रणाला
सदोदित होकार देईल त्याच्या भोजनावलीत सदोदित सहभाग दाखवेल त्याला आपत्ती-विपत्ती,
दैनव्यवस्था तसेच कोरोनासारख्या महामारित परमेश्वराचे सामर्थ्य व शक्ती लाभेल.
प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभेचे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे
ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत त्यांची
श्रद्धा ख्रिस्ताने शिकाविलेलेया प्रार्थनेद्वारे बळकट व्हावी व इतरांची
श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सर्व आजारी व पिडीत लोकांनी विशेष करून कोरोना
रोगाने पिडीत असलेल्या लोकांना प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांची
आजारातून सुटका होऊन त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना
करूया.
३.
आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व स्वतःला नाकारून जगातील
आनंदापासून वंचित राहून जागतिक मोह-मायेचा त्याग करून आपण शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे
जगावे, म्हणून आपण
प्रभूकडे प्रार्थना करूया.
४.
सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देव राज्याविषयी
शिकवण द्यावी. स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे
चांगला आदर्श ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment