सामान्य काळातील
एकोणतिसावा रविवार व मिशन रविवार
दिनांक: १८/१०/२०२०
पहिले वाचन: यशया
४५:१, ४-६
दुसरे वाचन: १
थेसलोनिकाकरांस १:१-५ब
शुभवर्तमान: मत्तय
२२: १५-२१
“मग कैसराचे ते कैसराला आणि देवाची ते
देवाला द्या.” (मत्तय २२:२)
परमेश्वराच्या दहा आज्ञा पैकी पहिली
आज्ञा, “मी परमेश्वर तुमचा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत” (निर्गम २०:२-३).
जुन्या
करारामध्ये परमेश्वर आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या दैवी महत्त्वाची जाणीव पदोपदी
करीत असतो. नवीन करारामध्ये प्रभू येशू
परमेश्वराच्या राज्याची घोषणा करीत असतान, नेहमी परमेश्वराच्या महानतेची ओळख पटवून देत आहे.
आजचे पहिले वाचन परमेश्वरावर श्रद्धा ठेवण्यासाठी
आणि देवाला प्राधान्य देण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करीत आहे. आजचे दुसरे वाचन आपल्याला परमेश्वराची स्तुती
आराधना करण्यास सांगत आहे. देवाची आराधना नियमितपणे आणि दृढ
श्रद्धेने करणे गरजेचे आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभु येशुआपणांस पटवून देत आहे की, जे देवाचे ते देवाला द्या आणि जे कैसराचे ते कैसराला.
पैसे कैसराचे म्हणून जे काही त्याचे आहे ते कैसरला दिले पाहिजे. तसेच हे सर्व विश्व, निसर्ग, डोंगर, नदी, झाडे, वेली हे सर्व देवाचे आहे, आपण देखील देवाचेच आहोत. ह्या मिस्सा बलीदानात भाग घेत असताना आनंदाने स्तुती व आराधना करीत परमेश्वराला आपल्या जीवनात प्रथम स्थान देऊया.
‘मिशन’ हा ख्रिस्ती श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. ख्रिस्त हा
प्रथम आणि सर्वश्रेष्ठ मिशनरी असून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देऊळमाता
आपल्याला शुभवर्तमान जगभर पसरविण्यासाठी पाठवीत आहे. आज आपण
मिशन रविवार साजरा करीत असताना जे मिशनकार्य करत आहेत त्यांना त्यांच्या नि:स्वार्थी सेवेत परमेश्वराची साथ मिळावी व सर्व संकटापासून त्यांचे संरक्षण
व्हावे व आपणसुद्धा मिशनकार्यात सहभाग घ्यावा म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात विशेष
प्रार्थना करू या.
पहिले वाचन: यशया
४५:१, ४-६
यशया संदेष्टा सांगतो की परमेश्वराने
कोरेश (सायरस) ह्याला अभिषिक्त केले आहे. देवाच्या सामर्थ्याने राजा कोरेशने सर्व
राजांना नमविले. त्याने बंदिवासात असलेल्या सर्व यहुदियांना मुक्त करून त्यांना
त्यांच्या घरी पाठविले. देव हा सर्वसामर्थ्य आहे. तो आपला एकच परमेश्वर देव आहे जो
आपल्याला नावाने हाक मारून आम्हांला कामगिरी सोपवीत असतो असे यशया संदेष्टा
आपल्याला सांगत आहे.
ह्या पत्रात संत पौल सुरवातीला थेस्सलोनीकाकरांची स्तुती करत आहे असे आपल्याला दिसून
येते. पौल त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे ह्यावरून त्याची प्रीती व आस्था स्पष्टपणे दिसून येते. ह्याद्वारे तो त्यांना त्यांचे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी धीर व उत्तेजन देत आहे. संत पौल थेसलोनिकाकरांस सांगतो की आमची सुवार्ता केवळ शब्दाने
नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळविण्यात आली आहे.
येशू व परुशी ह्यांच्यात वादविवाद होत
असे. परुशी येशूच्या विरोधात बोलत होते कारण येशूची शिकवण त्यांना पटत
नव्हती. येशूला बोलताना पकडावे, त्याच्या तोंडाची उलट-सुलट विधाने
त्याच्यावरच उलटवावी हा त्यांचा उद्देश होता. परुश्यांनी आपल्या शिष्यांना येशूकडे पाठवून त्याला प्रश्न
केला.
स्टीव हा आफ्रिका खंडातील तिसरा व्यक्ती आहे. त्याचे जीवन हे खूप यशस्वी झाले आहे. पैसा, धन, दौलत बिजनेस हे सर्व काही त्याच्या जीवनातील यशस्वी व्हायचे कारण नाही. त्याने दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले आहे
की, “आज जर माझे जीवन यशस्वी आणि समृद्धीची झाले असेल, तर ते फक्त देवाच्या कृपेमुळेच.”
तो म्हणतो की मी देवाला माझ्या जीवनामध्ये
प्रथम स्थान दिले आहे आणि त्याची ओळख मला चांगल्या प्रकारे लाभावी म्हणून दररोज दोन तास मी बायबल वाचन करतो.
आज जे काही
माझ्याजवळ आहे, ते सर्व देवाच्या कृपा सामर्थ्याने मला लाभलेले आहे आणि जे काही मला मिळालेले नाही ते माझ्या भल्यासाठी आणि चांगुलपणासाठीच आहे.
स्टीव सारखी अशी अनेक उदाहरणे आज आपल्या समोर आहेत.
ज्यांनी देवाला
आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवलेला आहे आणि देवाने त्यांच्या जीवनाचा कायापालट करून उद्धार केला
आहे. असीसीकर संत फ्रांसिस ह्यांनी अशे म्हटले आहे, “माझ्या देवा, माझ्या सर्वा!” ह्या फ्रान्सिसला देवाने उंचाविले आहे. संत मदर तेरेसा हिने परमेश्वराला
आपलं सर्वस्व बहाल केलं कारण परमेश्वर तिच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता आणि परमेश्वराने तिला देखील उंचाविले आहे.
आजच्या शुभवर्तमान द्वारे आपल्याला तीन मुख्य बोध मिळत आहेत:
१)
येशूची परीक्षा किंवा येशूच्या ज्ञानाचे प्रकटीकरण
येशूला वादविवादात सापडून त्याला दोषी
ठरवण्याचा षड्यंत्रामध्ये शास्त्री आणि परुशी येशूला प्रश्न
विचारतात, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही? (मत्तयं २२:१७) परुशी येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात. परंतु येशू त्यांची मने ओळखतो त्यांचा दृष्ट विचार ओळखतो. आणि येशूचे उत्तर त्याच्या ज्ञानाचे आणि हुशारीचा एक नमुना आहे. “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.”
माझ्या कपटी व्यवहारामुळे मी देखील येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु येशू माझे आंत: आणि बाह्य मन जाणून आहे. माझ्या खोल अंतर मनातील प्रत्येक विचार तो जाणून आहे आणि माझी प्रत्येक बाह्य कृती तो पडताळतो. त्यामुळे आपण जसे आहोत तसेच किंवा त्याच प्रमाणे वागणे किंवा नम्रपणे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे
जगणे हे आपल्या हिताचे ठरेल.
२) देवाला प्रथम स्थान देणे
परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या
अंतकरणात त्याच्या विषयीची ओढ निर्माण केली आहे. देवाला जाणून घेण्यासाठी त्याचा शोध घ्यावा अशी ओढ मानवात सर्वत्र दिसून येते. संत अगस्तीन म्हणतात की, “तू आम्हाला तुझ्यासाठीच निर्माण केले आणि आमची हृदय तुझा शोध घेतल्याविना अस्वस्थच असतील.” परमेश्वराचा शोध घेणे हे मानवाला
स्वाभाविकच आहे. संत एडीथ म्हणतात, जेव्हा माणूस सत्याचा
शोध घेतो तेव्हा तो कळत न कळत परमेश्वराचा शोध घेत असतो.”
देवाला प्रथम स्थान देणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यातच आपले समाधान आहे. आपल्या यशस्वी जीवनाचा मंत्र आहे. जेव्हा देव आपल्या जीवनामध्ये प्रथम असतो, तेव्हा देवाचा आशीर्वाद, कृपा, वात्सल्य आणि त्याची प्रेरणा आपल्याला कधीच माघारी टाकणार
नाही.
३) देव आपला निर्माण करता आहे
देवाला जाणून घेणे, त्याला आराधन करणे हे आपले कर्तव्य आहे. कॅथोलिक श्रद्धा ग्रंथ क्रमांक १ ते ३ ह्यामध्ये असे सांगितले आहे, ‘परमेश्वराने त्याच्या नि:स्वार्थ व स्वयंस्फूर्त प्रेमाने आपणास आणि सर्वकाही निर्माण केली आहे... आपण परमेश्वराला ओळखावे, त्याच्यावर संपूर्ण हृदयाने प्रेम करावे, त्याच्या इच्छेनुसार सत्कृत्ये करीत राहावे आणि जीवनाच्या
शेवटी स्वर्ग मिळावा यासाठी आपले जीवन आहे.
प्रतिसाद: हे
प्रभो मिशन कार्य करण्यास आम्हांला सहाय्य कर.
१. आपले पोप, कार्डीनल्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना त्यांच्या मिशन कार्यात प्रभूचा
आशीर्वाद लाभावा व सर्व संकट व दु:खापासून त्यांचे
संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे कोणी जगात शांती, ऐकोपा, प्रेम प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहेत त्यांना
त्यांच्या कार्यात परमेश्वराचे सामर्थ्य व मार्गदर्शन
लाभावे व त्यांच्या कार्याद्वारे ह्या जगात शांतीमय
वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सर्व
राजकीय नेत्यांनी आपल्या डोळ्यासमोर न्याय, प्रेम, बंधुत्व
ह्यांना प्राधान्य द्यावे व सर्व मतभेत विसरून ‘सर्व-धर्म
समभाव’ ही संकल्पना आत्मसात करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील सर्व आजारी लोकांना विशेष करून जे कोणी कोरोना ह्या
रोगाला बळी पडले आहेत अशा सर्वाना देवाने
आरोग्यदायी स्पर्श करावा व त्यांना परत एकदा चांगले आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी माते मरियेच्या मध्यस्थी द्वारे प्रभूचरणी प्रार्थना करुया.
No comments:
Post a Comment