सामान्य काळातील तिसावा रविवार
दिनांक: २५/१०/२०२०
पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६
दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस १:५-१०
शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०
प्रस्तावना:
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वराने नियमशास्त्राद्वारे दिलेल्या सर्वात महत्वाच्या आज्ञेवर मनन चिंतन करून ती आज्ञा आपल्या जीवनात पाळण्याचं आवाहन करत आहे. नियमशास्त्रातील सर्वात महत्वाची आज्ञा आहे: “प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’ आणि ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा.” एक बायबलपंडित हेनरी हम्मान या आज्ञेबद्दल सांगतात की, “प्रभू येशूने देवप्रीती ही शेजारप्रीतीपासून वेगळी केली नाही; कारण शेजारप्रीतीचा उगम देवप्रीतीमध्ये होतो आणि शेजारप्रितीशिवाय देवप्रीती अशक्य आहे.”
देवप्रीती आणि शेजारप्रीती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे आहेत. शेजारप्रीती आणि देवप्रीती हे प्रेमाचे दोन पैलू आहेत आणि नियमशास्त्रातील सर्व आज्ञा या पैलूंवर आधारित आहेत. आजची तिन्ही वाचने आपल्याला हेच सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६
आजचे पहिले वाचन आपणास सांगते की, इस्रायली लोकांनी एकमेकांबरोबर आणि खास करून गरीब, गरजू आणि समाजातील दुबळ्या लोकांबरोबर प्रेमाचे संबंध आणि नाते स्थापन केले होते. या गरीब लोकांमध्ये युद्ध, पीडा किंवा दुष्काळ यासारख्या परिस्थितीमुळे ज्यांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले होते, तसेच आपला देश सोडून आलेली बेघर लोकसुद्धा होती. परमेश्वर इस्रायली लोकांना आठवण करून देतो की, इस्रायली लोकसुद्धा मिसर देशात बेघर आणि परके होते. परंतु परमेश्वराने त्यांचा सांभाळ केला. आता नियमशास्त्र सांगते त्याप्रमाणे इस्रायली लोकांनी समाजातील गरीब आणि परक्या लोकांना मदत करणे, अनाथ आणि विधवांची काळजी घेणे ही त्यांची नैतिक जबादारी आहे. त्या जबाबदारीची आठवण परमेश्वर त्यांना करून देतो. परमेश्वर इस्रायली लोकांना सांगतो की जर त्यांनी त्याच्या आज्ञांचे पालन केले तर त्यांना परमेश्वराचा आशीर्वाद लाभेल.
दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस १:५-१०
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलनीका येथील भाविकांना ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास सांगत आहे. पहिल्या शतकातील थेस्सलनीकाचे ख्रिस्ती भाविक मुख्यत: मूर्तिपूजक शहरात राहत असत. परंतु ख्रिस्ती विश्वासात जगण्याचा त्यांचा उत्साह इतका प्रचंड होता की हे भाविक आपल्या उत्साहाने इतरांना ख्रिस्ताकडे आकर्षित करु शकले. म्हणूनच, प्रभूच्या शेजारप्रीती आणि देवप्रीतिची आज्ञा पाळल्याने इतर लोकांवर झालेल्या सकारात्मक परिणामाबद्दल पौल थेस्सलनीकाकरांचे अभिनंदन करतो.
शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०
शास्त्री आणि परुशी हे येशूच्या शिकवणुकीविरुद्ध होते. त्यामुळे प्रत्येक वेळेला येशूला नियमशास्त्रासंबंधित आणि कायद्यासंबंधित वेगवेगळे प्रश्न विचारून ते येशूला आपल्या पेचात पाडण्याचा आणि आपल्या विळख्यात पकडण्याचा प्रयत्न करीत. आजच्या शुभवर्तमानातसुद्धा आपण वाचतो की परूश्यानी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला: “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?” येशू अनेकदा लोकांच्या प्रश्नांची उत्तरं प्रतिवादाद्वारे किंवा स्वत: एक प्रश्न विचारून देत असे. पण या प्रकरणात तो सरळ उत्तर देतो. येथे त्याने दोन आज्ञा एकत्रित करून त्यांच्या प्रश्नाला त्वरित उत्तर दिले. त्याने त्यांना सांगितले: “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने आणि संपूर्ण मनाने प्रीति करा.” ख्रिस्ताचे उत्तर एकदम स्पष्ट होते की, देवावरील प्रीति आणि शेजारप्रीतिची आज्ञा जुन्या कराराचा सार आणि नवीन कराराचा आधार आहे.
मनन-चिंतन:
एक यहुदी तत्वज्ञानी मार्टिन बुबर यांनी आपल्या “द डायलॉजिकल प्रिन्सिपल” या पुस्तकात लिहिले आहे की “शेजाऱ्यांमध्ये” परमेश्वराचे दर्शन आपल्याला होते. हे खरोखर बायबलमधून आपल्याला ठाऊक असल्यासारखेच एक विधान मार्टिन बुबरने केलेले आहे: “माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.” (मत्तय २५, ४०)
प्रेम म्हणजे काय. करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात प्रेम हे सहनशील, दयाळू आणि नम्र म्हणून वर्णन केले आहे. कारण ते बढाई मारत नाही. मत्तयच्या शुभवर्तमानात (मत्तय २२, ३४-४०) येशू सांगतो की, प्रेम हे आपल्या सर्व कृत्यांचं मूळ असलं पाहिजे आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे जीवनाचा गाभा बनलं पाहिजे. खरं पाहता प्रभू येशू परुशाच्या प्रश्नाचं उत्तर देऊन सांगत नाही की अमुक-तमुक आज्ञा ही सर्वात महत्वाची आज्ञा आहे. येशू हा परुशांना अपेक्षित असं उत्तर देत नाही. त्याऐवजी येशूला असं सांगायचं होतं की, प्रत्येक आज्ञेला प्रेमाच्या दृष्टिकोनातूनच महत्व प्राप्त होते. प्रेमरूपी (देवप्रीतीचा, शेजारप्रीतीचा आणि स्व:प्रीतीचा) चष्मा डोळ्यांवर घालूनच नियमशास्त्रातील आणि संदेष्टयांनी दिलेल्या सर्व आज्ञांचा खरा अर्थ आपण लावू शकतो.
आज ‘प्रेम’ या शब्दाचा आपल्या समाजात बहुतेक वेळा अनर्थ केला जात आहे. ‘प्रेम’ या शब्दाचं मूल्य त्याद्वारे कमी आणि हळूहळू नष्टसुद्धा होत आहे. या गोष्टीला आपण कारणीभूत अहोत. अनेक वेळा आपण प्रेमाबद्दल बोलतो आणि वाचतो परंतु खऱ्या अर्थाने प्रेम कृतीत आणणे आपल्याला अवघड जाते. म्हणूनच ख्रिस्त आज आपल्याला आजच्या शुभवर्तमानद्वारे खऱ्या प्रेमाचा, ख्रिस्ती प्रेमाचा अर्थ सांगत आहे. आणि प्रेमाचं आपल्या मानवी जीवनातील ऱ्हास पावत चाललेलं महत्व प्रेमाला परत देण्यासाठी आमंत्रण देत आहे. ख्रिस्त ज्या प्रेमाचा संदेश आपल्याला देतो, त्या प्रेमाची काही वैशिष्ठये आहेत:
१) ख्रिस्ती प्रेम हे सार्वत्रिक आहे. याचा अर्थ असा की, ख्रिस्ताची प्रेमाची आज्ञा आपल्याला फक्त आपल्या कुटुंबावर आणि स्नेह्यांवर आणि आप्तेष्टांवरच प्रेम करायला सांगत नाही तर, इतर लोकांना आणि खास करून गरजू, गरीब व्यक्तींना आपले बंधू-भगिनी मानण्यास आमंत्रण देते. येशूने सांगितलेल्या दयाळू शोमरोनी मनुष्याच्या दाखल्यात (लूक १०, २५-३७) आपल्याला या वैशिष्ठ्याचं दर्शन होतं.
२) ख्रिस्ती प्रेमाचे दुसरं वैशिष्ठय म्हणजे, ख्रिस्ती प्रेम हे एक प्रमाण किंवा मापक आहे ज्याच्या आधारे आपल्या ख्रिस्ती जीवनाची पारख आणि पडताळणी केली जाईल. आपण प्रेमाबद्दल किती चांगलं बोललो किंवा किती मोठी कामं आपल्या जीवनात केली आणि काय साध्य केला त्याद्वारे परमेश्वर आपला न्याय करणार नाही, तर आपण आपल्या जीवनात ख्रिस्ताची प्रेमाची आज्ञा किती आणि कशी पाळली त्यावर आधारित आपला न्याय होईल.
३) ख्रिस्ती प्रेमाचं तिसरं वैशिष्ठय म्हणजे, देवप्रितीशिवाय शेजारप्रीती नाही. ख्रिस्ती प्रेम केवळ दान करण्यापुरते मर्यादित असू शकत नाही. देवप्रेमसुद्धा आवश्यक आहे आणि म्हणूनच येशू म्हणतो, पहिली आणि सर्वात महत्वाची आज्ञा म्हणजे देवावरचे प्रेम. देवप्रीती ही शेजारप्रीतीचा उगम आहे, शेजारप्रीतीचं मूळ आणि शेजारप्रीतीसाठी लागणारी शक्ती आहे.
जनसेवा ही ईशसेवेपासून म्हणजेच परमेश्वरी उपासना आणि परमेश्वराच्या आराधनेपासून विभक्त केली जाऊ शकत नाही. जो कोणी असे करतो तो, शेजारप्रीतीसाठी लागणारं शक्तोस्रोत बंद करतो. जेथे-जेथे प्रार्थना आणि उपासनेद्वारे देवप्रीतिची जोपासना होत नाही, तेथे-तेथे शेजारप्रीतीसुद्धा हळू-हळू कमी होत जाते आणि तिचं महत्व आणि मूल्य कमी होत जातं. देवप्रितीशिवाय शेजारप्रीती आपली प्रेरणा गमावून बसेल आणि लवकरच फक्त आणि फक्त सुंदर शब्दांपर्यंत मर्यादित होईल. कृत्याविना शब्द हे व्यर्थ आणि अप्रभावी आहेत हे आपल्या सर्वाना चांगलं ठाऊक आहे. परंतु खरी शेजारप्रीती ही वेगळीच असते.
अस्सीसीचा संत फ्रान्सिस, संत व्हिन्सेंट दे पॉल, मदर तेरेसा ह्या अशा व्यक्ती होत्या की त्यांनी फार मोठे आणि जगाला प्रभावित करणारी प्रवचने आणि शब्द आणि अलंकार त्यांच्या संभाषणात वापरले नाहीत. तरीसुद्धा ह्या व्यक्ती प्रार्थनामय आणि देवाशी अतूटपणे जुडलेल्या व्यक्ती होत्या. ह्या सर्वानी आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी इतरांमध्ये आपला शेजारी ओळखला, आपला गरजू बंधू, आपली पीडित भगिनी ओळखली आणि त्यांच्या सेवेद्वारे खरा शेजारधर्म पाळला. कारण ते संत पौलसारखं सांगू शकले, की “ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते” (२ करिन्थिकरांस ५, १४). ख्रिस्ताचे प्रेम हे आमचे प्रमाण आहे.
देवप्रीती आणि शेजारप्रीती क्रुसाच्या दोन खांबाप्रमाणे आहेत. उभा खांब हा आपल्या देवावरील प्रेमाचे आणि देवाबरोबर असलेल्या आपल्या नात्याचे चिन्ह आणि आडवा खांब हा आपलं लक्ष आपल्या शेजाऱ्याकडे, इतरांकडे वेधून घेतो आणि आपल्याला जणू सांगतो की शेजारप्रितीशिवाय देवप्रीती ही व्यर्थ आणि निर्जीव आहे. आपण क्रूसाचे दोन खांब एकमेकांपासून विभक्त करू शकत नाहीत. कारण जर तसं झाल, तर क्रूस क्रूस राहत नाही. त्याचप्रमाणे आपण प्रभुने आजच्या शुभवर्तमानात दिलेली आणि देव आणि मनुष्याला जोडणारी प्रेमाची श्रेष्ठ आज्ञा तोडू किंवा विभक्त करू शकत नाहीत. यासंदर्भातसुद्धा आपण येशूचे शब्द आठवू शकतो, की “जे देवाने एकत्र केले आहे, मनुष्याने वेगळे करु नये” (मत्तय १९, ६).
आजच्या समाजात प्रेम या शब्दाचा दुरुपयोग होऊन या शब्दाचं महत्व आणि मूल्य कमी होत आहे. जर आपल्या प्रेमाचं रूपांतर ख्रिस्ताच्या प्रेमाच्या प्रतिमेत होऊ शकलं, तर प्रेमाला पुन्हा त्याचं महत्व आणि मूल्य प्राप्त होऊ शकतं. जर आपलं प्रेम दोन्ही दिशा ओळखू शकलं, तरचं ते खरं, ख्रिस्ती आणि ख्रिस्ताच्या प्रेमासारखं होऊ शकतं. त्या दोन दिशा आहेत: देवाकडे दर्शविणारी दिशा आणि मानवाकडे दर्शविणारी दिशा.
आपल्याला ख्रिस्ताने आजच्या शुभवर्तमानात दिलेल्या श्रेष्ठ आज्ञेचा खरा अर्थ समजावा आणि आपणसुद्धा आपल्या जीवनात देवप्रीतीचा आणि तितकाच शेजारप्रीतीचं किंवा जनसेवेचा ध्यास घ्यावा म्हणून प्रभू परमेश्वराची कृपा आणि सहाय्य मागू या.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो,
आम्हाला प्रेमळ बनव.
१) आपले परमगुरु फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी, व्रतस्थ आणि ख्रिस्तसभेच्या कार्याची धुरा स्वीकारलेल्या सर्वानी प्रभूची देवप्रीती आणि शेजारप्रीतिची आज्ञा समजून आपल्या जीवनाद्वारे आणि कार्याद्वारे या प्रेमाच्या आज्ञेची शिकवणूक इतरांना द्यावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू या.
२) आपल्या समाजातील आणि कुटुंबातील ज्या व्यक्ती आजारी आहेत तसेच सर्व कोरोनाग्रस्तांना प्रभुने स्पर्श करावा आणि त्यांना बरे करावे म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू या.
३) कोरोना साथीच्या रोगामुळे अनेक लोक बेघर, निराधार झाली आहेत आणि अनेकांची नोकरी गेल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. प्रभूच्या शेजारप्रीतिची शिकवणूक आपल्या आचरणात आणून आपल्याला सुद्धा अशा लोकांना आपल्या परीने होईल, तितके सहाय्य करण्यास प्रभूची कृपा आणि प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४) कोरोनाला आळा घालण्यासाठी लागणाऱ्या औषधावर संशोधन करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांना आणि वैद्यांना त्यांच्या प्रयत्नात प्रभूचे सहाय्य आणि लवकरच यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा आपण प्रभुचरणी मांडूया.
No comments:
Post a Comment