सामान्य काळातील सत्ताविसावा
रविवार व असिसिकर संत फ्रान्सिसचा सण
दिनांक: ०४/११/२०२०
पहिले वाचन: यशया ५:१-७
दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र ४:६-९
शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. तसेच आज पवित्र देऊळमाता निसर्गप्रेमी व महान संत असिसिकर संत फ्रान्सिस ह्यांचा सण साजरा करीत आहे. संत फ्रान्सिस नेहमी नम्र राहून त्यांनी देवावर अतोनात प्रेम केले आणि गरीबीचे जीवन जगले. आजची उपासना आपल्याला परमेश्वराची दया आणि मानवी वागणूक ह्यांवर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला द्राक्ष मळ्याचा दृष्टांत देऊन परमेश्वराचा इस्राएल लोकांवर असेलेला राग व्यक्त करतो; कारण इस्राएल लोक देवाच्या आज्ञेशी एकनिष्ठ नव्हते. दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीप्पीकरांस परमेश्वराचे आभार व स्तवन करण्यास प्रोत्साहित करून सदोदित आनंदी राहण्यास सांगत आहे. तसेच आजच्या मत्तयलिखित शुभवर्तमानातदेखील प्रभू येशू द्राक्षमळा व माळेकरी याचा दाखला देत आहे. ह्या दाखल्यात इस्राएल लोकांनी देवाच्या संदेष्ट्यांचा व ख्रिस्ताचा केलेला धिक्कार ह्याचे वर्णन करतो. देवाची दया मिळण्यासाठी आपण नेहमी नम्र राहिले पाहिजे. आपण द्वेष, राग व कठोरता ह्यापासून दूर राहिले पाहिजे. ह्यासाठी ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रभू परमेश्वराजवळ खास प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५:१-७
हा छोटासा दाखला अतिउत्कृष्ट आहे. याचा आरंभ प्रेम गीतासारखा आहे. तो कर्णमधुरकल्पक आहे. हा दाखला वाचत असताना आपण स्वतःचीच चौकशी करून घेत आहोत असे आढळते. तसेच ह्या दाखल्याद्वारे पापाचे खरे रूप स्पष्ट होते व ते सर्वस्वी असमर्थनीय आहे असे जाणवते.
दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र
४:६-९
ह्या पत्रामध्ये आनंद हा विषय मांडला आहे. प्रेषिताने आपल्या वाचकांना सदोदित आनंद करण्यास सांगितले आहे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. हेच त्याचे आव्हान आहे. ख्रिस्ती लोकांच्या जीवनात चिंतेला अजिबात थारा नसावा, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना, विनंती करता येते व ती करावी. ख्रिस्ती व्यक्तींचे विचार जीवनाला धरून असावेत. आपले उच्चार व आचार-कृती सर्वांना चांगले वळण लावतील, कारण ह्या गोष्टी खऱ्या, प्रामाणिक, योग्य, शुद्ध, सन्मानीय आणि प्रिय अशा आहेत.
शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३
ह्या दाखल्यात द्राक्षमळा व माळेकरी
यांचे उदाहरण दिले आहे. परगावी राहणारा जमीनदार व त्याचे माळेकरी यांचा हा
वृत्तांत आहे. मळ्याचा खंड म्हणून उत्पन्नाचा काही ठराविक हिस्सा मालकास देण्यास
ते नकार देत होते व हेच कारण त्यांना काढून टाकण्यास पुरेसे होते. परंतु जमीन
मालकाच्या मुलाचा खून केल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले. या दाखल्याचे मर्म याजक व
परुशी यांना ताबडतोब उमजले कारण संदेष्ट्याचे पुस्तक माहीत असणाऱ्या कोणालाही ते
समजले असते. इस्रायल देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्यास ते नेहमी उणे पडले, हे यशयाने
त्या सर्वश्रुत द्राक्षमळ्याच्या दाखल्यातून प्रतीक रूपाने दाखवले आहे. हे पुढारी
लवकरच देवाच्या पुत्राला ठार करणार होते. त्याहून गतकाळात त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांचा
पुन्हा-पुन्हा अव्हेर केला होता. या वाचनातून या दाखल्याचा गंभीर अर्थ स्पष्ट केला
आहे. इस्रायलच्या पुढाऱ्यांनी ज्याला नाकारले, त्याला सन्मानाच्या सर्वोच्च
पदासाठी निवडलेले आहे हे सिद्ध होते. द्राक्षमळा या चिन्हाचे दर्शविलेले राज्य
त्यांचे नव्हे, तर देवाचे आहे आणि देव ते जबाबदार व्यक्तीस सोपवून देईल.
मनन चिंतन:
देवाने ही सुंदर अशी पृथ्वी उत्पन्न करुन
मनुष्याच्या हाती सोपवलेली आहे. मनुष्य ह्या सृष्टीचा रक्षणकर्ता बनला पाहिजे;
परंतु आज आपल्याला वेगळेच चित्र दिसते. मनुष्य हा जास्त भक्षक बनला आहे. मनुष्य
स्वार्थी आणि कठोर बनला आहे. जगात पाप आणि दुःख आले आहे. जर मनुष्य देवाचे आणि
देवाच्या वचनाशी प्रामाणिक राहिला, तरच मनुष्याचं तारण होऊ शकते. हीच गोष्ट
प्रामुख्याने आजची वाचने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मनुष्याने आपल्या
अंगी नम्रता, सौम्यता बाळगली पाहिजे. मनुष्याने देवाने दिलेल्या किंवा पाठविलेल्या
संदेष्ट्यांवर विश्वास ठेवला पाहिजे; परंतु तसं होत नाही आणि म्हणून आपणावर
मनुष्यावर आपत्ती कोसळते. देवाने आपल्या उद्धारासाठी आपला एकुलता एक पुत्र हा या जगात
पाठवला. शास्त्री व पुरुशी यांनी त्याचा धिक्कार केला नाही, तर त्यांनी त्याला
क्रुसावर खिळवून जीवे मारले. परंतु देवाने मानवाला देवाने कधीच सोडले नाही, तर
मानवावर त्याने नेहमी प्रीतीच केली. जो कोणी देवावर आणि त्याच्या पुत्रावर प्रीती
करतो व त्याचा सन्मान करतो त्याचे तारण होइल.
असिसिकर संत फ्रान्सिस हयांनी देवावर
पूर्णपणे प्रेम केले. तो देवाच्या पुत्र येशूच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेला होता.
ह्याचच प्रतीक म्हणून येशू ख्रिस्ताने संत फ्रांसिसला पाच पवित्र घायांचे वरदान
दिले होते. संत फ्रान्सिसला गोरगरीबांमध्ये येशू ख्रिस्त दिसला म्हणून त्यांनी
आमरण गरिबीची व्रत स्वीकारले. देवाने आपल्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला या
भुतलावर पाठवले हे संत फ्रांसिस यांना समजत नव्हते, त्याहीपेक्षा श्रेष्ठ म्हणजे
ख्रिस्ताने क्रूसावर केलेले बलिदान हे त्याच्या प्रार्थनेचा व चिंतना विषय होता.
तो नेहमी प्रार्थनेमध्ये हरवून जायचा त्याला देव सृष्टीत दिसत होता म्हणून त्यांने
‘कँटिकल ऑफ ब्रदर’ हे गीत ते आजही प्रसिद्ध आहे.
संत फ्रांसिसचं निसर्गावर फार प्रेम होते
म्हणून तो निसर्गाची काळजी घ्यायचा. ‘निसर्गाचा संत’ म्हणून त्याची गणना केली
जाते. आपले पोप फ्रान्सिस यांची पोप पदाची निवड झाल्यावर असिसिकर संत फ्रान्सिस या
नावाची त्यांनी निवड केली. तसेच त्यांनी पर्यावरणावर ‘लावदा तो सी’ हे परिपत्रक 2016 साली
प्रसिद्ध केले. आपल्या समाज्याला आमंत्रित केले की, असिसीकर संत फ्रान्सिसप्रमाणे
निसर्गावर प्रेम करा व काळजी घ्या.
बोधकथा:
एकदा एक युवकाचा ग्रुप एकत्रपणे एका
उजाड किंवा पडीत जमिनी जवळून जात होता. तेथे एक वृध्द माणूस झाडे लावत होता. युवकांनी
त्या वृध्द माणसाची चेष्टा केली. ते म्हणाले, ‘तू म्हातारा आहेस आणि लवकर मारणार आहेस
तु झाडे कशाला लावतोस?’ तू त्याची फळे खाऊ शकणार नाहीस मग तेव्हा तो म्हातारा माणूस उत्तरला मी
हे माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्या पिढीसाठी करतो. काही वर्षांनंतर हे युवक जे आता
प्रौढ झाले होते ते त्याच मार्गाने जात होते. तेव्हा त्यांना तिकडे फळांनी भरलेली
झाडे दिसली, जी त्या वृध्द व्यक्तीने लावलेली होती. तेव्हा त्यांना त्या वृध्द
व्यक्तीचे ते शब्द आठवले की, ‘हे मी तूम्हासाठी करतो.’
आपण संत फ्रान्सिसप्रमाणे निसर्गाची
काळजी घेतली पाहिजे. तरच पर्यावरण आपली काळजी घेईल. आपण सुद्धा देवावर प्रेम केले,
तर देव आपल्यावर प्रेम करील व आपलं तारण होईल. आज आपण देवाजवळ प्रार्थना करूया की
हे देवा असिसिकार संत फ्रान्सिस प्रमाणे तुझ्यावर व निसर्गावर प्रेम करण्यास
आम्हास सुबुद्धी दे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू असिसिकर संत
फ्रान्सिसच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना ऐक.
१. आपण आपले पोप फ्रान्सिस, महागुरू व सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांच्यासाठी खास प्रार्थना करूया की संत फ्रान्सिस प्रमाणे ते दयेचे व शांतीचे साधन बनावेत.
२. आपण सर्व तरुणासाठी जे मार्ग चुकले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करूया. संत फ्रान्सिस असिसिकरचे उदाहरण त्यांनी जीवनात पाळावे व त्यांनी जीवनात योग्य मार्ग निवडावा.
३. पर्यावरणाचा आश्रयदाता संत फ्रान्सीसप्रमाणे आपण देखील निसर्गाच संवर्धन कराव आणि ही पृथ्वी सगळ्यांना जगण्यासारखी करून सर्वांनी गुण्या गोविंदाने रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज आपण आपल्या ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया की, ह्या कोरोना विषाणूच्या वेळी आपण चर्चला जात नाही. परंतु देवाच्या अधिक समीप आहोत. देवाने आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डिनल्स, महागुरू, धर्मगुरू, तसेच सर्व श्रद्धावंतांना आशीर्वादित करून, सुखी-समाधानी व नीरोगी ठेवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक विनंत्या परमेश्वरास अर्पण करूया.
No comments:
Post a Comment