Wednesday, 30 December 2020

Reflection for the SOLEMNITY OF MARY, MOTHER OF GOD AND NEW YEAR 2021 (01/01/2021) by Fr. Suhas Pereira



देवमातेचा सोहळा

दिनांक: ०१/०१/२०२१

पहिले वाचन: गणना ६:२२-२७

दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७

शुभवर्तमान: लूक २:१६-२१



प्रस्तावना:

          आज जानेवारी २०२१, नवीन  वर्षाचा पहिला दिवस. जुने वर्ष अंतास गेलेलं आहे. गतवर्षात आपल्या जीवनात अनेक चांगले, वाईट, सुखाचे-दुःखाचे, सकारात्मक-नकारात्मक अनुभव आले. जग कोरोना महामारीच्या भयानक मायाजालात अडकून पडलंय आणि अनेक लोकं बेघर, निराधार, भुकेली, बेरोजगार झालेली आहेत. परंतु या सर्वात परमेश्वराने आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुखी ठेवले, आपला सांभाळ केला आणि आपल्याला त्याच्या कृपाछत्राखाली ठेवले म्हणून त्या विधात्याचे आभार मानण्यासाठी आणि त्याचबरोबर नवीन वर्षातसुद्धा परमेश्वर सदैव आपल्याबरोबर असावा आणि त्याच्या प्रेमाने आणि शांतीने, त्याच्या दयेने आणि कृपेने आपलं जीवन त्याने भरून काढावं म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण मरीया, देवाची माता हिचा सण साजरा करत आहोत. पवित्र मरीया, देवाची माता ही आपल्या सर्वांचीसुद्धा माता आहे. परमेश्वराने आपल्या पवित्र पुत्राची माता म्हणून मरियेची निवड केल्यानंतर मरीयेच्या जीवनातसुद्धा भविष्याबद्दलची अनिश्चितता, चिंता आणि भीती निर्माण झाली असेल. परंतु तिची देवावरील श्रद्धा बळकट होती. या श्रद्धेच्या जोरावर ती पुढे गेली आणि देवाच्या योजनेचा आपल्या जीवनात स्वीकार केला. या नवीन वर्षात पदार्पण करत असताना मरीया मातेने आपल्या सोबत राहून आपल्याला मार्गदर्शन करावं आपल्या जीवनमार्गाचा दीपस्तंभ बनुन आपल्याला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवावा म्हणून आज विशेष प्रार्थना करू या.

पहिले वाचन: गणना ६:२२-२७

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर अहरोन आणि त्याच्या पुत्रांद्वारे म्हणजेच याजकवर्गाद्वारे इस्रायली लोकांना सदैव आशीर्वादित करण्याचं वचन देतो. जेव्हा जेव्हा इस्राएलचे याजक इस्रायलला परमेश्वराच्या नावाने आशीर्वाद देतील, तेव्हा-तेव्हा परमेश्वर स्वतः लोकांना आशीर्वादित करील आणि त्यांचा आशीर्वाद फलद्रुप होईल. हा आशीर्वाद इस्राएली लोकांच्या परमेश्वरी कराराबरोबर असलेल्या निष्ठेचे, विश्वासूपणाचे फळ असेल. त्याचप्रमाणे परमेश्वराने अब्राहामाद्वारे संपुर्ण मानवजातीला दिलेल्या आशीर्वादाच्या अभिवाचनाच्या पूर्ततेची शाश्वती आजच्या वाचनातील आशीर्वाद आहे.

दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७

मनुष्याचा या पृथ्वीवरील इतिहास आणि खास करून जुन्या कराराचा काळ हा अभिवचने आणि तयारीचा काळ होता. परंतु परमेश्वराने जेव्हा त्याच्या प्रिय पुत्राला या जगात पाठविले, तेव्हा देवाने जगाला दिलेल्या अभिवाचनांची पूर्तता होण्याची वेळ आली. ख्रिस्ताच्या येण्याद्वारे आणि ख्रिस्ताद्वारे आपण सर्वजण स्वर्गाच्या वतनाचे वारसदार बनलो आहोत. ख्रिस्तामध्ये आपण स्वर्गीय बापाची लेकरे झालो आहोत आणि पवित्र आत्म्याच्या कृपाप्रसादाद्वारे आपण देवाला अब्बा-पिता असं संबोधू शकतो.

शुभवर्तमान: लूक २:१६-२१

आज आपण देवमातेचा सोहळा साजरा करत असल्यामुळे आजच्या शुभवर्तमानात आपण पुन्हा एकदा प्रभू येशूच्या जन्माचे वृत्त ऐकतो. परंतु आजच्या दिवशी देऊळमाता मरीयेने परमेश्वराच्या तारणाच्या योजनेत देवाच्या पुत्राला या जगात आणण्याची जी महत्वाची भूमिका बजावली त्या भूमिकेवर जास्त भर देत आहे आणि लक्ष केंद्रित करत आहे. मरीया ही आपल्या सर्वांसारखी सर्वसाधारण व्यक्ती होती. परंतु परमेश्वराने आपल्या पुत्राची माता म्हणून तिची निवड केली. आपल्या पुत्राची माता होण्याचे भाग्य, दान देवाने मरियेला बहाल केले. म्हणूनच आपण जेव्हा पवित्र मरीयेचा सन्मान करतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे खुद्द परमेश्वराचाच सन्मान करतो आणि  त्याच्या असंख्य कृपादनांबद्दल आपण त्याचे आभार मानत  असतो.

बोधकथा:

एका वृद्धाश्रमातील काही स्त्री-पुरुष एकदा नाताळच्या दिवशी ट्रेन ने त्यांच्या सुट्टीच्या जागेकडे प्रवास करीत होते. हा प्रवास खूपच लांब आणि कंटाळवाणा होता. का स्टेशनवर, लहान मुलासह एक तरुण आई ट्रेनमध्ये चढली. त्या लहान मुलाने त्या ट्रेन मधील त्या वृद्धांच्या थकलेल्या पडलेल्या चेहऱ्यांकडे स्मितहास्य केले. आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तो लहान मुलगा उड्या मारू लागला, त्यांच्याशी बोलू लागला, आणि आनंदाने ओरडत आणि सर्वांशी गप्पा मारू लागला. त्वरित, ट्रेनमधील निरास आणि शांत  वातावरण आनंदित आणि हर्षमय झाले. आज आम्ही आनंदाने आणि कृतज्ञतेने लक्षात ठेवतो की मरिया आणि तिचा दैवी पुत्र येशू याने कसे, निराश पापी जगाला आशेत आनंदात बदलले. आज मरीया-देवाची माता हा सोहळा साजरा करत असताना मरीयेने आणि तिच्या दैवी पुत्राने या पापी, नैराश्याने भरलेल्या आणि निरुत्साही जगाचे रूपांतर एका आनंदी, सुखकारक जगात कशे केले त्याची आपण कृतज्ञतापूर्वक आठवण करत आहोत.

मनन-चिंतन:

          मरीया देवाची माता हा सोहळा एक प्राचीन सोहळा आहे. आणि आजचा सण कॅथॉलिक ख्रिस्तसभा मरियेचा सन्मान का करते? या प्रश्नाचं अनेक लोकांना हवं असलेलं उत्तर देते. मरीयेला आपण परमेश्वराची जागा देऊन परमेश्वरासारखी तिची आराधना आणि पूजन करत नाही. आपण मरीयेचा सन्मान करतो, तिला मान देतो, तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्या मध्यस्थीद्वारे आपण परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करतो. खुद्द देवानेच आपल्या पवित्र पुत्राची माता म्हणून निवडून मरियेला सन्मानित केलं. म्हणून आपणसुद्धा मरियेला सन्मानित करतो. लुकलिखीत शुभवर्तमानात प्रभूच्या दूताने मरीयेला दिलेला संदेश त्याचप्रमाणे मरीया तिची मावसबहीण अलिशिबा हिला भेटायला गेलेली असताना अलिशिबेने मरियेबद्दल केलेलं विधान यांद्वारे आपल्याला मरीया देवाची माता असल्याची कल्पना येते.

          बायबलमधील अशा संदर्भांचा आधार घेऊन ख्रिस्तसभेच्या एफेसुस येथील ४३१ रोजी भरलेल्या विश्व-धर्मपरिषदेमध्ये जाहीर करण्यात आले, की मरीया खरोखरच थेओ-टोकोस म्हणजेच परमेश्वराची माता होती. कारण प्रभू येशू ख्रिस्त जो मरीयेच्या पवित्र आत्म्याद्वारे गर्भसंभवाच्या पहिल्या क्षणापासून खरा देव आणि खरा मनुष्य होता, त्याला मरीयेने आपल्या उदरात वाढवले आणि त्याला मानवी जन्म दिला. मरीयेची देवाची माता अशी परिभाषा करून एफेसूसच्या विश्व-धर्मपरिषदेने फक्त मरीयेला सन्मान देऊन उंचावले नाही, तर त्याद्वारे येशू हा खरो देव आणि खरोखर मनुष्य होता. या श्रद्धारूप तत्वाला किंवा या शिकवणुकला पुष्टी दिली. व्या शतकात नेस्टोरिऊस आणि त्याचे शिष्य शिकवत होते की, ख्रिस्तात दोन व्यक्ती होत्या: मानवी येशू आणि देवाचा पवित्र पुत्र. परंतु एफेसूसच्या विश्व-धर्मपरिषदेने या शिकवणुकीचं खंडन केलं आणि ठामपणे सांगितलं, की येशू ख्रिस्त हा दैवी आणि मानवी स्वभाव असणारी एकच व्यक्ती होती. आणि मरिया ही फक्त मानवी येशुचीच नव्हे, तर दैवी ख्रिस्ताचीसुद्धा-देवाची माता होती. येशू-ख्रिस्त हा देव आहे. मरीया येशूची माता, त्याची जन्मदाती असल्यामुळे मरीया ही देवाची माता, मसिहाची, ख्रिस्त आपल्या तारणाऱ्याची माता आहे. कालवारी टेकडीवर क्रुसावरून प्रभू येशूने मरीया त्याची प्रिय माता आपल्या सर्वांची माता म्हणून आपल्याला दिली. म्हणूनच मरिया ही फक्त ख्रिस्ताची माता नाही, तर ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या आणि  त्याच्या शिकवणुकीप्रमाणे आपलं जीवन आणि आचरण ठेवणाऱ्या प्रत्येकाची ती माता आहे.

          आज आपण नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. ३६५ दिवसांचा हा एक लांब, खडतर प्रवास असेल. हा प्रवास सरळ मार्गावर असेल की वाकड्या मार्गावर असेल ते आपल्याला माहित नाही. आणि या मार्गावर आपण काय अनुभव घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला माहित नाही. परंतु देऊळमाता आपल्याला मरियेचे उदाहरण आपल्या जीवनात घेऊन, परमेश्वराच्या अदृश्य हातात हात देऊन आपल्या जीवनाचा प्रवास करण्यास सांगत आहे. पवित्र मरीयेकडे श्रद्धेचं धैर्य होतं. म्हणूनच तिच्या जीवनाची नौका ती सुखरूपपणे पैलतीरी नेऊ शकली. आपणसुद्धा आज या नवीन वर्षाच्या सुरुवातीला पवित्र मरियेचा आश्रय घेऊ या आणि आपल्या जीवनाची नौका या नवीन वर्षातसुद्धा सुखरूपपणे या जगाच्या अथांग सागरात डोलत राहावी आणि पैलतीरी पोहचावी म्हणून मरीयेकडे तिच्या ख्रिस्ताकडे मध्यस्थीसाठी विशेष विनंती करू या आणि म्हणू या: पैलतीरी मज ने, माते पैलतीरी मज ने.”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना एक.

) हे प्रभो तुझ्या प्रिय ख्रिस्तसभेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ख्रिस्तसभेच्या प्रत्येक सदस्याने तुझ्या शिकवणुकीप्रमाणे आपलं जीवन जगून तुझ्या प्रेमाचा, सत्याचा आणि चांगुलपणाचा प्रकाश आपल्या जीवनाद्वारे या जगास द्यावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

) हे नवीन वर्ष आणि आमचं जीवन, आमचं भविष्य, आमचं कुटुंब, आमच्या सर्व योजना आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवतो. या नवीन वर्षात तुझ्या कृपेचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू दे आणि वाईटाच्या मार्गाला जाता तुझ्या प्रेमाच्या छत्राखाली आम्ही सदैव राहून आमचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

) जी लोकं आजारी आहेत त्या सर्वांना तुझ्या दयेचा नि प्रेमाचा अनुभव येऊन नवजीवनाचा आणि चांगल्या आरोग्याचा आस्वाद त्यांना मिळावा  म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

) आपण सर्व एकाच देवाची लेकरे आहोत. ही जाणीव सर्व धर्माच्या लोकांना व्हावी आणि सर्वानी सर्वधर्म समभावाच्या, सहिष्णुतेच्या, प्रेमाच्या आणि आदराच्या भावनेने  जीवन जगून स्वर्गराज्याची प्रस्थापना या जगात करण्याचा प्रयत्न करावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

५) आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.