Tuesday, 26 January 2021


Reflection for the 4th 
SUNDAY IN ORDINARY TIME (31/01/2021) By Suhas Ferrel.




सामान्य काळातील चौथा रविवार

 

दिनांक: ३१/०१/२०२१

पहिले वाचन: अनुवाद १८:१५-२०

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ७:३२-३५

शुभवर्तमान: मार्क १:२१-२२



 

प्रस्तावना :

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू- भगिनींनो, आज देऊळमाता सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजच्या उपासनेमध्ये आपण देवाच्या अप्रतिम कृत्याविषयी ऐकणार आहोत. सामान्य माणसाद्वारे देव जेव्हा त्याचे कार्य करीत असतो, तेव्हा तो सामान्य माणूस सामान्य न राहता असामान्य अशी कृत्ये करू लागतो. कारण, त्याच्यावर देवाची कृपा असते; हेच आपण पहिल्या वाचनाद्वारे ऐकणार आहोत. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौलाद्वारे आपणास विवाहाबद्दल बोध करण्यात आला आहे. पती-पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवून, वैवाहिक जीवन कसे जगावे, आणि त्यांच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाला अधिकाधिक महत्त्व देऊन; देवाची सुवार्ता जगात पसरविण्याचे कार्य करण्याची शिकवण संत पौल करीत आहे. आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला येशू ख्रिस्ताची शिकवण ही इतर शास्त्री-परुषांप्रमाणे खोखली नसून स्वर्गातील पवित्र पित्याच्या अधिकाराने आहे हे लक्षात येते. त्यामुळेच सभास्थानातील माणसाच्या अंगात असलेला अशुद्ध आत्मा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो तेव्हा जोराने ओरडू लागतो, रडू लागतो, प्रभू येशूकडे विनवणी करू लागतो व कालांतराने निघून जातो.

आजच्या मिस्साबलिदानामध्ये आपण संपूर्ण तन-मन-धनाने सहभागी होऊन, एकचित्ताने आपल्या सर्व चिंता प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायथ्याशी ठेवूया. येशू आपला तारणारा आहे, तोच आपल्याला नवीन जीवन देणार आहे यावर विश्वास ठेवून आजच्या मिस्साबलिदानामध्ये देवाची कृपा आपल्या सर्वांवर नित्य राहावी म्हणून प्रार्थना करूया.

 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: अनुवाद १८:१५-२०

जेव्हा देव एखाद्या व्यक्तीची निवड करतो, तेव्हा त्या व्यक्तीवर देवाची विशिष्ट कृपा असते. आपण जर जुन्या करारावर नजर फिरवली तर आपणास कळून चुकते की, जगाच्या प्रारंभापासून देवाने अगणित अशा लोकांची निवड केली होती, ज्यामध्ये राजे, शास्त्री, संदेष्टे यांचा समावेश होता. हे संदेष्टे देवाच्या शब्दाद्वारे जीवन जगले, त्यांचा विकास झाला. आणि ज्या संदेष्ट्यांनी देवाकडे पाठ फिरवली त्यांचा ऱ्हास झाला. हेच आपण पहिल्या वाचनाद्वारे ऐकणार आहोत

 

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ७:३२-३५

आपल्या जीवनामध्ये आपण देवाला नेहमी अग्रस्थान देणे महत्त्वाचे आहे. माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याला इतर कसलीही काळजी नसते, तो बिनधास्तपणे देवाचे कार्य करू शकतो. परंतु, विवाहित माणसांच्या बाबतीत तसे नसते. विवाहित पती किंवा पत्नी हे नेहमी एकमेकांच्या सुख-दुःखाच्या विचारात व्यस्त असतात. आपल्या जीवनामध्ये इतर कोणत्याही गोष्टीला जास्त महत्व न देता देवाला प्रथम स्थान देण्याचा सल्ला संत पौलाद्वारे आपण आजच्या दुसऱ्या वाचनाद्वारे ऐकतो.

 

शुभवर्तमान: मार्क १:२१-२२

येशू जेव्हा त्याच्या शिष्यांबरोबर कफर्णहूम येथील सभास्थानामध्ये लोकांना शिकवण देऊ लागला, तेव्हा तेथील लोक आश्चर्यचकित झाले. सभास्थानातील भाषणे ही तेथील लोकांसाठी काही नवीन गोष्ट नव्हती. परंतु, ज्या अधिकाराने, ज्या विश्वासाने प्रभू येशू त्यांना बोध करीत होता, ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. सभास्थानातील सामान्य लोकच नव्हे तर, अशुद्ध आत्मेही येशूच्या उपस्थितीने हैराण झाले होते. येशूची कृत्ये पाहताच उपस्थित लोकांना विचार पडला की, ‘हा माणुस नक्की आहे तरी कोण?’ कारण, फक्त माणसेच नव्हे तर अशुद्ध आत्मेही त्याचे ऐकत होती. प्रभुची महती ही वणव्या प्रमाणे सर्वत्र पसरू लागली हे आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये वाचतो.

 

मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो. इथे जमलेली प्रत्येक व्यक्ती हा देवाची निर्मिती आहे. आपल्यापैकी कुणीही हा आकाशातून पडलेला किंवा आकस्मित तयार झालेला नाही. देवाने आपल्या प्रत्येकाला त्याच्या विशिष्ट योजनेप्रमाणे बनविले आहे. देवाची योजना ही आपल्या प्रत्येकासाठी वेगळी असते. आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे, ते सर्व देवाच्या इच्छेप्रमाणे घडत असते. आपल्या जीवनातील सर्व सुख- दुःख, सर्व घडामोडी ह्या देवाच्या योजनेचा एक भाग आहे. आपण प्रत्येकजण एका विशिष्ट कार्यासाठी या जगामध्ये जन्मलेले असतो. ते विशिष्ट कार्य म्हणजे आपल्या निर्मात्याची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे इतरांना प्रकट करणे. आपण यिर्मया संदेष्ट्याद्वारे ऐकतो की, ‘परमेश्वराने आपल्या सर्वांच्या चांगल्यासाठी योजना आखल्या आहेत. आपल्याला दु:खवण्याचा त्याचा बेत नसून; उज्वल भविष्य देण्याचे देवाने योजिले आहे.’ (यिर्मया २९:११)

देवाची योजना आपल्या जीवनामध्ये प्रात्यक्षित रूपात आणण्यासाठी आपल्यासमोर वेगवेगळे मार्ग उपलब्ध असतात. आपण करिंथकरांस पहिले पत्र १:२७ मध्ये वाचतो की, “आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि वैयक्तिकरित्या शरीराचे अवयव आहोत.” शरीराचे प्रत्येक अवयव हे आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. म्हणूनच, आपण सुखरूप पणे चांगले जीवन जगत असतो. अगदी त्याचप्रमाणे ख्रिस्ती म्हणून देऊळमातेने आपणा सर्वांना विशिष्ट अशी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी आपण चोखपणे पार पाडणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.  देवाची कृपा ही आपल्या सर्वांवर असते. आपणापैकी कुणी धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक किंवा इतर मार्गांद्वारे देवाची सुवार्ता पसरविण्याचे कार्य करू शकतो. देवाचे काम करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली एकनिष्ठता. जर आपण पूर्ण निष्ठेने, विश्वासाने आणि चांगल्या हेतूने काम करीत राहिलो तर, देव आपल्याला भरपूर यश आणि कृपा देत असतो. परंतु, आपण आपल्या कामाद्वारे इतरांचे वाईट करण्याचा प्रयत्न केला तर, कालांतराने आपलाही ऱ्हास होतो. हेच आपणाला आजचे पहिले वाचन आवर्जून सांगत आहे.

आज आपण समाजामध्ये ढुंकून पाहिले तर, आपल्या निदर्शनास येते की, आज कुटुंबा-कुटुंबांमध्ये भांडण-तंटे, घटस्पोट, हत्या गोष्टींचे प्रमाण वाढत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कुटुंबांमधील प्रार्थनेचा अभाव. आई-वडील दोघेही कामाला, सासू-सासरे हे त्यांच्या पलंगाला खिळलेले आणि मुलं-बाळ ही निवांतपणे वाऱ्यावर सोडलेली. तरुण आई-वडील हे आपल्याला सासु-सासर्‍यांना काही निर्णय घेण्याबाबत विचारणे गरजेचे समजत नाहीत आणि त्यांच्यावर बघून घरातील लहान मुलेही त्यांच्या आई-वडिलांना काही सांगायचे महत्त्वाचे मानत नसतात. घरामध्ये मोबाईल, कम्प्युटरचा वापर वाढल्याने संवादाला जागाच शिल्लक राहिली नाही. संवाद नसल्याने कुणाच्या जीवनात काय चालले आहे हे घरातल्यांना नंतर आणि बाहेरच्यांना आधी कळते. आज कितीतरी कुटुंब शुल्लक कारणासाठी उध्वस्त होत असलेली आपण पाहत आहोत. आजचा माणूस हा आध्यात्मिक गोष्टींना बाजूला सारून व्यवहारिक गोष्टींमध्ये जास्त गुरफटलेला आढळून येतो. ज्या देवाने निवारा, अन्न, श्रीमंती सर्व काही दिले त्या देवाला घरात दुय्यम स्थान दिले जाते. माणसाला देवाची आठवण तेव्हाच येते जेव्हा तो एखाद्या अडचणीत किंवा संकटात सापडतो. कारण, त्यावेळी त्याला साथ देणारा कोणीच नसतो. परंतु, देव हा कुणालाही कोणत्याही वेळेमध्ये सोडत नसतो. परमेश्वर नेहमी आपली वाट बघत असतो. आपण जेव्हा एक पाऊल परमेश्वराजवळ जाण्यासाठी उचलतो तेव्हा परमेश्वर दोन पावले आपल्याजवळ येतो. त्यामुळे इतर क्षणिक सुख देणाऱ्या गोष्टीला जास्त महत्व न देता आपण परमेश्वराच्या शब्दाला जास्त महत्त्व दिले पाहिजे. संत पौलाने त्याच्या जीवनामध्ये नेहमी रूढी-परंपरा ह्या गोष्टींना जास्त महत्त्व दिले. परंतु, पुनरुत्थित प्रभूशी भेट होताच ‘देवाची सुवार्ता पसरविणे’ हेच त्याच्या जीवनाचे मुख्य ध्येय बनले. तो आवर्जून लोकांना देवाची सुवार्ता सांगू लागला. त्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास, एक वेगळेच गांभीर्य होते. तो पूर्ण आत्मविश्वासाने प्रभू येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसविण्यात मग्न होता.

 आजकाल ऑनलाईनचा काळ असल्याने आपणास सर्वत्र पहावयास मिळते की, बहुतेकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या माध्यमांद्वारे देवाची सुवार्ता जगात पसरविण्याचे काम करीत आहेत. देऊळे, तीर्थक्षेत्रे ही बंद पडली आहेत. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. हिच खरी वेळ आपली ख्रिस्ती श्रद्धा, आपला ख्रिस्ती विश्वास तपासून पाहण्याचा. परिस्थिती अनुकूल नसली तरी आपला ख्रिस्ती विश्वास टिकून राहण्यासाठी कितीतरी धर्मगुरू, धर्मभगिनींनी  इंटरनेटद्वारे लोकांना मिस्साबली उपलब्ध करून देण्याचा जिम्मा हाती घेतला. त्यामुळे लोकांना जरी प्रत्यक्षरीत्या देऊळामध्ये जाता आले नाही तरी, घरी बसल्या मिस्सा ऐकणे शक्य झाले. चर्च म्हणजे केवळ विटा- दगडांनी बांधलेली इमारत नव्हे. तर, ज्याप्रमाणे संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हणतो की, “तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुमचे शरीर हे देवाचे मंदिर आहे” (१ करिंथ. ३:१६). परंतु, कटू सत्य म्हणजे लोक देवाला विसरू लागले आहेत. चर्च जसे बंद झाले तसे लोकांचे मनही देवाकडे वळण्याचे बंद झाले. लोकांच्या जीवनामधील प्रार्थनेचे महत्त्व कमी होताना दिसू लागले. ‘कोरोना’ ह्या प्राणघाती विषाणूने जगाची वित्तहानी तर झालीच परंतु, ह्या कोरोनाने भरपूर अशा गोष्टी शिकविल्या. माणूस हा कितीही मोठा झाला तरी, परमेश्वरापुढे तो वाळूच्या कणासारखाच आहे. ज्या परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिले आहे; तोच परमेश्वर ते सर्वकाही पुन्हा घेऊ शकतो. त्यामुळे माणसाने कुठल्याही गोष्टीवर गर्व करता कामा नये. यिर्मया संदेष्टा ९:२३ मध्ये म्हणतो की, “माणसा आपल्या श्रीमंतीवर किंवा बळावर बढाई मारू नको. जर बढाई मारायची असेल तर, ह्या गोष्टीवर मार की, मीच एक परमेश्वर आहे आणि तू मला ओळखतो.”

आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की, प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये सभास्थानातील लोक हे विचारात पडू लागले. की, “हा माणूस नक्की आहे तरी कोण?” कारण, प्रभू येशू हा अधिकाराने बोलत होता. त्याच्या शब्दांमध्ये सत्य होते. त्यामुळेच फक्त माणसेच नव्हे तर, अशुद्ध आत्मेही त्याला घाबरत होते. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा प्रभू येशू येतो तेव्हा, आपोआपच वाईट लोक, अशुद्ध सवयी ह्या गायब होऊ लागतात. आपण भरपूर लोकं पाहतो जी अगोदर अतिशय वाईट जीवन जगायची. परंतु, प्रभू येशूचा स्पर्श होताच त्यांच्या जीवनाचा कायापालट होतो. येशू त्यांच्या जीवनामध्ये असे कार्य करतो की, इतरांना आश्चर्याचा धक्काच बसतो.

आज बहुतेकजण हे पापांच्या अंधारात जीवन जगत आहेत. आपल्यापैकी बहुतेकजणांना प्रभू येशूच्या प्रार्थनेची, स्पर्शाची गरज आहे. आपण आपल्या जीवनातील वाईट गोष्टी, वाईट सवयी सोडण्यास तयार आहोत का? शंभर चांगली माणसं जगत असलेल्या जीवनापेक्षा एक पापी माणूस जेव्हा आपले जीवन बदलून चांगले जीवन जगण्यास चालू करतो तेव्हा, देवाला जास्त आनंद होतो. आजच्या मिस्साबलिदानात आपणा सर्वांना देवाचा स्पर्श व्हावा आणि आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगावे म्हणून प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.”

१.    आपले परमगुरु व इतर सर्व महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ, आणि प्रापंचिक यांनी देवाच्या हाकेला योग्य प्रतिसाद देऊन येशूचे सतत अनुकरण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया

२.    आपल्या देशातील सर्व राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर जनतेने दिलेली जबाबदारी योग्य मार्गाने पार पाडावी कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता लोकांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया

३.    ज्या व्यक्ती देवाच्या मार्गातून दूर गेलेल्या आहेत व मार्गभ्रष्ट झालेल्या आहेत, अशांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी पुन्हा योग्य मार्गावर चालाव म्हणून आपण प्रार्थना करूया

४.    जगभरातील युवा- युवतींना प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया

५.     गेले अनेक महिने आपण सर्वजण करोना विषाणूमुळे हैराण झालेलो आहोत या संकटातून देवाने आपल्याला मुक्त करावं आणि आपण पूर्वीसारखं नियमित जीवन जगावं म्हणून आपण प्रार्थना करूया

६.     थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, आणि वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी ठेवूया.

Friday, 22 January 2021

सामान्य काळातील तिसरा रविवार

 


Reflections for the 
Third Sunday In Ordinary Time (24/01/2021) by Br. Julius Rodrigues





सामान्य काळातील तिसरा रविवार

दिनांक: २४/०१/२०२१ 

पहिले वाचन: योना ३:१-५, १०

दुसरे वाचन: १ करिंथ ७:२९-३१

शुभवर्तमान: १:१४-२०


 

प्रस्तावना:

          आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजच्या वाचनांद्वारे पुन्हा एकदा आपणास पाचारणाची आठवण करून दिली जात आहे. देवाचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी परमेश्वर आपली निवड करीत असतो. परंतु त्यासाठी आपल्याला आपली वाईट वर्तणूक सोडून दिली पाहिजे. परमेश्वर आपल्याला बोलावीत आहे जेणेकरून आपण सर्व देवाने दिलेली जबाबदारी पार पाडावी आणि सर्व वाईटापासून दूर राहून परमेश्वराच्या वचनांची निवड करावी. शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे आपण देखील मासे धरणारे नसून माणसे धरणारे बनू म्हणून लागणारी कृपा आणि शक्ती ह्या मिस्साबलीदानात आपण मागुया.

 

पहिले वाचन: योना ३:१-५, १०.

          ह्या वाचनाद्वारे आपणांस सांगण्यात येत आहे की परमेश्वराचे नियंत्रण योनाच्या जीवनातील प्रत्येक घटना वा प्रसंगावर आहे हे तो जाणून होता. देवाचा शब्द निनवे ह्या ठिकाणी पसरविण्यासाठी योनाला पाठविण्यात येते. देव प्रत्यक्ष योग्य ते शब्द त्याच्या मुखात घालणार, त्याला प्रेरणा देणार हेच यातून ध्वनित होते व त्याने त्या आज्ञेचे पालन केले हे वचन ३ वरून स्पष्ट होते. योनाला जो ईश्वरप्रेरीत संदेश सांगायचा होता त्यात चाळीस दिवसांचा अवकाश हा इशारा होता. म्हणजे पश्चताप केला तर होणारी शिक्षा टळेल असे त्यातून सूचित केले गेले आहे.

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ७:२९-३१.

          दुसऱ्या वाचनाद्वारे आपणांस सांगण्यात येत आहे की शेवट अगदी जवळ आलेला आहे, कोणत्याही क्षणी शेवट होईल असा ह्याचा अर्थ असल्याचे आपणांस सांगण्यात येत आहे. जग अविनाशी आहे. जगाचा भविष्यकाळ बदलणारा नाही या रह्स्यवादी दृष्टिकोनावर पहिल्या शतकात नित्य वादविवाद चालू होते. ख्रिस्ती माणसाच्या दृष्टीने काळ, कैरोस ही संकल्पना बदलली आहे. आता जीवनाला एक नवी दृष्टी लाभली आहे. म्हणून घरदार, शोक, पैसा मिळवणे यातच सर्व शक्ती खर्च करायची नाही. कारण सध्याच्या स्वरूपातील हे जग अविनाशी नसून विनाशी आहे. त्यामुळे देवाच्या सानिध्यात राहा असे आपणांस सांगण्यात आले आहे.

 

शुभवर्तमान: १:१४-२०.

          आपल्या सेवाकार्याला आरंभ केल्यावर सुमारे एक वर्षभर येशूने यहुदियात देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली. ख्रिस्त आपल्या देवराज्याबद्दल सांगत होता आणि ऐकण्याऱ्यांना त्याच्या संदेशावर विश्वास ठेवायचा होता. जो सुवार्तेवर विश्वास ठेवतो त्याला देवाच्या राज्यात प्रवेश करता येईल हे ह्याठिकाणी दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे जर आपण येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे हे मानले तरच आपण देखील शिमोन, आंद्रिया, याकोब ह्यांच्याप्रमाणे त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत.

 

मनन चिंतन:

‘वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा

मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा

घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा!’

आज आपण सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आज आपण मासेमारी या विषयावर मनन चिंतन करणार आहोत. सुरुवातीच्या ह्या गाण्याने तुम्हाला सर्वांना कदाचित समुद्रकिनारी पोहोचवले असेल. आपल्या प्रत्येकाच्या दृष्टिआड एक चित्र रेखाटले गेले असेल. जिथे अथांग समुद्र, मंद वारे, मचवे, मासे, जाळ्या इत्यादी घटकांचा समावेश असेल. मी वसई येथून आलो आहे; जरी आम्ही शेती करीत असलो तरी मच्छीमार किंवा मासेमारी यांच्याशी मी फार जोडलेलो आहे. वसई ते उत्तन पर्यंत समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. म्हणून आम्हांला खूप प्रमाणात मासे भेटतात व रोज आम्ही यांचे सेवन करीत असतो. आपल्या प्रत्येकाला जर एखाद्या मच्छीमाराने विचारले की, मी आज मासे पकडण्यासाठी जाणार आहे, तू येणार का? आपले उत्तर असेल ‘होय’. परंतु माझ्या प्रिय बंधू- भगिनींनो हे इतके सोपे आणि सहज नाही, जर तुम्हाला मासेमारी करायची असेल तर त्यासाठी लागणारी साधन- सामग्री, कौशल्य आणि कल्पकता असायला हवी. आजच्या शुभवर्तमानाद्वारे येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला एक मासेमारणारा म्हणून बोलावीत आहे. आपण मासे पकडणार नाहीत तर आपण माणसे धरणारे होणार आहोत. संत मार्कच्या शुभवर्तमानात १:१६  मध्ये सांगितले आहे की, येशू ख्रिस्त गालील समुद्राजवळ जात असताना त्याला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले. कारण, ते मासे धरणारे होते. त्यांच्या रोजच्या गरजांसाठी ते हे काम करीत असत. येशू त्यांना सांगतो “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल! असे मी करीन.” ह्यासाठी येशू त्यांना सांगत आहे की, तुमच्याकडे जे कौशल्य आहे, ज्याच्याशी तुम्ही निगडित आहात, ते तुम्ही माणसे धरण्यासाठी वापराल. जर, तुम्ही माझ्या मागे आला, जर, तुम्ही माझे सहकारी झालात तर, मग तुम्ही माणसे धरणारे व्हाल.

होय आणि हेच आज तुम्हाला सांगणार आहे. जर, तुम्ही ख्रिस्ती असाल तर, तुम्ही नेहमी कार्यक्षम, सक्रिय मासेमारी करणारे आहात. आणि प्रत्येक क्षणी आपण त्या Catch च्या शोधात असतो. आपल्या स्वतःसाठी नव्हे तर येशू ख्रिस्तासाठी. लोकांत देवाचे राज्य आणण्यासाठी, आणि लोकांना देवाबरोबर जोडण्यासाठी.

मासेमारी करणे म्हणजे साधी-सोपी गोष्ट नाही परंतु, ती शिकावी लागते. जर आपण मासेमारी करणारे असलो तर, आपल्याला सर्व गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी योग्य ती पूर्वतयारी करावी लागत असते. लागणारा मचवा, डिझेल, जाळे, लंगर, बर्फ इतर साधन-सामुग्री इत्यादी गोष्टींची पूर्वतयारी करावी लागते. त्याप्रमाणे मासेमारी कार्यासाठी लागणारे कौशल्य शिकावे लागते. कधी मासेमारी करावी?, किती खोल जाळे टाकावे? वारे कोणत्या दिशेने आहे? या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ह्याच प्रकारे जर आपल्याला माणसे धरणारे व्हायचे असेल तर, आपल्याला देखील या गोष्टींची गरज आहे. आपल्याला पूर्वतयारी करावी लागणार आहे. जर आपण ख्रिस्ताचं अनुकरण करणार आहोत तर आपल्या प्रत्येकाला पूर्व तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन गोष्टींची जाणीव असली पाहिजे १.) ख्रिस्ताचा संदेश:- हा आपणाला बायबल वाचन करून मिळणार आहे. त्याचप्रमाणे देवाची इच्छा काय आहे? व काय संदेश आहे? ह्याची आपल्याला कल्पना मिळत असते. जर आपण माणसे धरणारे होणार असलो तर, मग आपल्याला त्या परमेश्वराचा संदेश समजने गरजेचे आहे. २.) व्यक्तीचा अभ्यास:- ह्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यक्तीची जवळून जाणीव करून घ्यावी लागणार आहे. त्याच्या अडचणी, समस्या, दुःख इत्यादी गोष्टींची आपल्याला पूर्वतयारी करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या अंगी कौशल्य देखील असावे लागणार आहे. मासेमारी करणारे लोक आपले कौशल्य वापरून मासेमारी करतात. कोणत्या क्षणी मासेमारी करावी?, किती खोल मासेमारी करावी?, हे त्यांना ठाऊक असते. अगदी त्याच प्रकारचे कौशल्य आपल्याला माणसे धरण्यासाठी वापरावे लागणार आहे. ते म्हणजे कधी बोलावे?, केव्हा बोलावे?, कसे बोलावे?, आपल्यात प्रेम, दया, आणि ममता असणे गरजेचे आहे. जेव्हा आपण लोकांसमोर जात असतो तेव्हा आणि ह्या गोष्टी आपल्याला हस्तगत होतात जेव्हा, आपण परमेश्वरा बरोबर राहतो आणि चालतो.

अनेक अशा वेळेस आपल्यामध्ये असलेली चिकाटी/जिद्द आपण गमावून बसतो आणि आणि म्हणून आपण इतरांना देवाकडे आणण्यासाठी कमी पडतो. ज्यावेळेस आपण एखाद्या सरोवरावरती जात असतो त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते की, खूप वेळ झाला आहे तरी जो मासे पकडत आहे त्याला मासे मिळत नाहीत. एक तास, दोन तास, तीन तास, चार तास काहीच मिळत मिळाले नाही. परंतु, तो हार मानत नाही तर आपले प्रयत्न चालूच ठेवत असतो. पुन्हा-पुन्हा जाळी टाकत असतो. आकडा टाकत असतो. आणि त्याला शेवटी मासे मिळतात. त्याचप्रमाणे जर आपण परमेश्वराचे कार्य करीत असलो तर, हार मानून चालणार नाही किंवा निराश होऊन चालणार नाही. असे म्हणतात की प्रयत्न केल्याने देवही मिळतो. परंतु, प्रयत्न केले पाहिजे आणि शेवटी माणसे आपल्याद्वारे, आपल्या चांगुलपणाद्वारे, प्रेमाद्वारे देवाकडे वळतात. आणि म्हणून तीन गोष्टी मासे किंवा माणसे धरण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे पूर्वतयारी (Preparation), कौशल्य (Skill), चिकाटी/जिद्द (Tenacity). जर ह्या तिन्ही गोष्टी आपण संपादन केल्या तर, आपण देखील मासे धरणार्‍यांप्रमाणे देव-राज्यासाठी माणसे धरणारे होऊ शकतो.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे परमेश्वरा आम्हांला आशीर्वादित कर.”

१.    ख्रिस्त मंडळाची धुरा वाहणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप, व इतर सर्व ह्यांना संपूर्ण जगास आध्यात्मतेच्यामार्गावर नेण्यास मार्गदर्शन व प्रेरणा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपले जीवन परमेश्वराकडे वळवावे, वाईटाचा त्याग करावा म्हणून त्यासाठी  लागणारी कृपा  परमेश्वराने द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    वेगवेगळ्या संघटना आपल्या धर्मग्रामात कार्यरत आहेत. परमेश्वराचे शब्द व प्रेम त्यांच्या विविध कार्याद्वारे घडून येवोत व त्यांना त्यासाठी परमेश्वराचे बळ मिळो म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    ख्रिस्त सभेची सेवा करण्यास आपल्या धर्मग्रामातून अधिका-अधिक तरुण-तरुणींना पाचारण व्हावे व देवाचे प्रेम त्यांनी अनुभवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    आपल्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत, मृत्यूशी झुंजत आहेत, आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत अश्या सर्व लोकांना प्रभूचे धैर्य व त्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

 

Wednesday, 13 January 2021

      Reflection for the 2nd Sunday in Ordinary Time (17/01/2021) By Fr. Ghonsalo D’Silva

सामान्य काळातील दुसरा रविवार

 

दिनांक: १७-०१-२०२१

पहिले वाचन: १ शमुवेल ३:३-१०, १९

दुसरे वाचन: १ करिंथ ६:१३-१५, १७-२०

शुभवर्तमान: योहान १:३५-४२



आपलं ख्रिस्ती पाचारण

प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय भाविकांनो, गेले काही दिवस आपण विविध सोहळे साजरे केले. उदा. प्रभू येशूचा जन्मोत्सव, त्याचं प्रकटीकरण, त्याचा स्नानसंस्कार इत्यादी. अशा रितीने आपण नाताळ काळातून उपासने विधीच्या सामान्य काळात पदार्पण केलं आहे. आज आपण सामान्य काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासने विधीतील विषेशत: पहिलं वाचन आणि शुभवर्तमान आपल्याला आपल्या ख्रिस्ती पाचारणा विषयी सखोल जाणीव करून देत आहे. परमेश्वर आपल्याला त्याचं कार्य करण्यासाठी आणि विशेष करून ख्रिस्ती या नात्याने येशूच्या जीवनाचं अनुकरण करण्यासाठी नेहमी बोलावत असतो. त्याचं पाचारण आपण अगदी मनापासून स्वीकारतो का की आपल्या सोयीप्रमाणे आपल्या ईश्वरी पाचारणात काही तडजोड करतो असा प्रश्नं स्वत:च्या मनाला विचारू या आणि या पवित्र मिस्सात सहभाग घेऊ या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: १ शमुवेल ३:३-१०, १९      

पहिल्या वाचनात आपल्याला शमुवेलाच्या पाचारणाविषयी सांगण्यात आलं आहे. परमेश्वर त्याला तिन वेळा पाचारण करतो. प्रथम त्याला ईश्वरी पाचारणाची खरी जाणीव होत नसते परंतु एलीच्या सल्ल्यानुसार त्याला तिसऱ्या वेळी देवच आपल्याला बोलावत आहे अशी जाणीव होते आणि तो देवाला ‘बोल प्रभु, तुझा दास ऐकत आहे’ असं म्हणून सकारात्मक प्रतिसाद देतो.

दुसरे वाचन: १ करिंथ ६:१३-१५, १७-२०.

आजच्या दुसऱ्या वाचनात प्रेषित पौल आपल्याला सांगत आहे की आपलं मानवी शरीर हा देवाने दिलेला एक अत्यंत मौल्यवान असा ठेवा आहे. आपण आपल्या शरीराचे मालक नाही आहोत. आपण आपल्या शरीराचा आपल्या मर्जीप्रमाणे दुरुपयोग करू शकत नाही. आपल्या शरीराचा एकमेव मालक हा केवळ प्रभु आहे. आपलं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. त्यामुळे ते जारकर्मासाठी नसून केवळ प्रभूचा सदैव गौरव करण्यासाठी आहे.

शुभवर्तमान: योहान १:३५-४२

आजच्या शुभवर्तमानात संत योहान आपल्याला सांगत आहे की येशू आपल्या प्रथम शिष्यांना पाचारण करीत आहे. तो त्यांनी विचारलेल्या ‘’गुरुजी, आपण कोठे राहता?’ या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतो: ‘या म्हणजे पाहाल.’ त्यांनी येशूच्या हाकेला ‘ओ’ दिला, ते त्याच्यामागे गेले, त्यांनी त्याचा अनुभव घेतला आणि त्यांनी जाऊन आणखी दोघांना येशूकडे आणले.

मनन चिंतन :

या भूतलावर आपणा प्रत्येकाला देवाने एका विशिष्ट कार्यासाठी पाचारण केलेले असते. लहानपणापासून आपण जसजसे मोठे होत जातो तसतसं आपल्याला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनाच्या जबाबदारीची कल्पना येऊ लागते. कधी कधी आपण थोरांच, धर्मगुरुंच, मित्रपरिवारांच्या मार्गदर्शन घेऊन एक खास असा निर्णय घेत असतो. एक प्रकारे आपल्याला देवाने दिलेले ते एक जणू पाचारणच असते.

कधी कधी काही लोकांकडून आपण ऐकतो की ‘अरे, मी माझ्या जीवनात खूपच महान चूक केली. मी चुकीचा मार्ग निवडला. जर मी दुसऱ्यांच ऐकलं असतं तर आज माझ्यावर ही अशी वेळ आली नसती.

जर आपण पवित्र शास्त्राची पाने चाळली तर आपल्याला दिसून येते की देवाने प्रारंभापासूनच मानवाला एक विशेष असं जीवन जगण्यास पाचारण केलं होतं. उदा. आदाम, एवा, अब्राहाम, मोशे, सर्वं विविध संदेष्टे, इस्त्रायलाचे विविध राजे, प्रशस्ते आणि खास करून इस्त्रायली प्रजा. परमेश्वर देव त्यांना वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना एका विशेष कार्यासाठी पाचारण करीत होता. त्यांपैकी कुणी देवाच्या पाचारणाला सकारात्मक प्रतिसाद दिला तर कुणी देवाचं पाचारण नाकारून आपलाच आणि भलताच मार्ग निवडला. अर्थातच मार्गभ्रष्ट झाल्याने त्यांना त्याची किमंत मोजावी लागली. याउलट ज्यांनी ज्यांनी देवाच्या हाकेला ‘ओ’ देऊन त्याच्या मार्गाने चालेले त्यांना जीवनाची अवीट गोडीही चाखावयास मिळाली.

प्रत्येक पाचारण ही एक वैयाक्तिक हाक असते, ते एक विशिष्ट असं आमंत्रण असते. देव जेव्हा एखाद्या माणसाला पाचारण करतो तेव्हा त्या माणसावर देवाने जणू आपला भरवसा ठेवलेला असतो. तो मनुष्य आपलं काम निश्चितच करील, आपल्या जीवाची बाजी लावून ती जबाबदारी पार पाडील अशी देवाला एक आशा असते. माणसाला आपल्या कार्यासाठी पाचारण करताना देव जणू त्याच्यावर कसलीच सक्ती करीत नाही. तो केवळ संयमाने, सातत्याने, धीराने पाचारण करीत असतो. माणसाने योग्य तो निर्णय घ्यावा म्हणून त्याला विचार करण्यास, इतरांच मार्गदर्शन घेण्यास तो वेळ देतो.

शमुवेलला देवाने एकदा नव्हे तर तीनदा पाचारण केले. शमुवेलला सुरुवातीला देवाची खरी ओळख नसल्याने तो योग्य प्रतिसाद देण्यास तयार नव्हता. तरीही देव त्याला पुनःपुन्हा पाचारित राहिला. जशी देवाची त्याला जाणीवपूर्वक ओळख झाली तसं तो म्हणाला, ‘बोल प्रभु, तुझा दास ऐकत आहे.’ शमुवेलाच्या अंत:करणाच्या गाभाऱ्यातून निघालेला आणि देवाला आनंद देणारा असा तो प्रतिसाद होता.

असं म्हणतात की एखाद्या चांगल्या माणसाशी आपली भेट झाली नि गाठ पडली की मग त्या माणसाचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. योहानाचे शिष्य येशूच्या पाचारणाला साद देऊन येशूच्या मागे जातात. त्याच्यासह राहतात, त्याचा ते अगदी जवळून अनुभव घेतात आणि आता त्याच्याच सानिध्यात राहावयाचा ते निर्णय घेतात. इतकच नव्हे तर ते इतरांनाही येशूकडे आणतात. जो जो कुणी येशूला भेटतो आणि त्याच्यासह राहतो, त्याच्या जीवनात आमुलाग्र बदल घडुन येतो.

आपलं ख्रिस्ती जीवन म्हणजे देवाने आपल्याला त्याच्या एकुलत्या पुत्राचं अनुकरण करण्यास दिलेलं एक पाचारण आहे. मग आपण कुणीही असो, धर्मगुरु, व्रतस्थ, प्रापंचिक, स्त्री, पुरुष, अथवा तरुण, तरुणी. आपापल्या जीवनात आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावं हीच देवाची इच्छा आहे. आपलं शारीरिक, मानसिक आणि आत्मिक पावित्र्य जपून देवाचा आपल्या जीवनात गौरव करणे आणि होमबली अथवा इतर कोणत्याही निरर्थक अर्पणाऐवजी आपल्या जीवनाचं अर्पण देवाच्या चरणी समर्पित करणे ह्यातच देवाला आनंद आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

१.    आपले परमगुरु, इतर सर्वं महागुरु, धर्मगुरू, व्रतस्थ, आणि प्रापंचिक ह्यांनी देवाच्या हाकेला योग्य तो प्रतिसाद देऊन येशूच सतत अनुकरण करावं म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    आपल्या देशातील सर्वं राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर जनतेने दिलेली जबाबदारी योग्य मार्गाने पार पाडावी, कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता लोकांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    जे कुणी देवाच्या मार्गातून दूर गेलेले आहेत, जे मार्गभ्रष्ट झालेले आहेत अशांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी पुन्हा योग्य मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    जगभरातील युवक-युवतींना प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी प्रेरणा व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    गेले अनेक महिने आपण सर्वच कोरोना विषाणूमुळे हैराण झालेलो आहोत. या संकटातून देवाने आपल्याला मुक्त करावं आणि आपण पूर्वीसारखं नियमित जीवन जगावं म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी ठेवूया.