सामान्य काळातील दुसरा
रविवार
दिनांक: १७-०१-२०२१
पहिले वाचन: १ शमुवेल ३:३-१०, १९
दुसरे वाचन: १ करिंथ ६:१३-१५, १७-२०
शुभवर्तमान: योहान १:३५-४२
आपलं ख्रिस्ती पाचारण
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी
माझ्या प्रिय भाविकांनो, गेले काही दिवस आपण विविध सोहळे साजरे केले. उदा. प्रभू
येशूचा जन्मोत्सव, त्याचं प्रकटीकरण, त्याचा स्नानसंस्कार इत्यादी. अशा रितीने आपण
नाताळ काळातून उपासने विधीच्या सामान्य काळात पदार्पण केलं आहे. आज आपण सामान्य
काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासने विधीतील विषेशत: पहिलं वाचन
आणि शुभवर्तमान आपल्याला आपल्या ख्रिस्ती पाचारणा विषयी सखोल जाणीव करून देत आहे.
परमेश्वर आपल्याला त्याचं कार्य करण्यासाठी आणि विशेष करून ख्रिस्ती या नात्याने
येशूच्या जीवनाचं अनुकरण करण्यासाठी नेहमी बोलावत असतो. त्याचं पाचारण आपण अगदी
मनापासून स्वीकारतो का की आपल्या सोयीप्रमाणे आपल्या ईश्वरी पाचारणात काही तडजोड
करतो असा प्रश्नं स्वत:च्या मनाला विचारू या आणि या पवित्र मिस्सात सहभाग घेऊ या.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: १ शमुवेल ३:३-१०, १९
पहिल्या
वाचनात आपल्याला शमुवेलाच्या पाचारणाविषयी सांगण्यात आलं आहे. परमेश्वर त्याला तिन
वेळा पाचारण करतो. प्रथम त्याला ईश्वरी पाचारणाची खरी जाणीव होत नसते परंतु
एलीच्या सल्ल्यानुसार त्याला तिसऱ्या वेळी देवच आपल्याला बोलावत आहे अशी जाणीव
होते आणि तो देवाला ‘बोल प्रभु, तुझा दास ऐकत आहे’ असं म्हणून सकारात्मक प्रतिसाद
देतो.
दुसरे वाचन: १
करिंथ ६:१३-१५, १७-२०.
आजच्या
दुसऱ्या वाचनात प्रेषित पौल आपल्याला सांगत आहे की आपलं मानवी शरीर हा देवाने
दिलेला एक अत्यंत मौल्यवान असा ठेवा आहे. आपण आपल्या शरीराचे मालक नाही आहोत. आपण
आपल्या शरीराचा आपल्या मर्जीप्रमाणे दुरुपयोग करू शकत नाही. आपल्या शरीराचा एकमेव
मालक हा केवळ प्रभु आहे. आपलं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. त्यामुळे ते
जारकर्मासाठी नसून केवळ प्रभूचा सदैव गौरव करण्यासाठी आहे.
शुभवर्तमान: योहान १:३५-४२
आजच्या
शुभवर्तमानात संत योहान आपल्याला सांगत आहे की येशू आपल्या प्रथम शिष्यांना पाचारण
करीत आहे. तो त्यांनी विचारलेल्या ‘’गुरुजी, आपण कोठे राहता?’ या त्यांच्या
प्रश्नाला उत्तर देताना म्हणतो: ‘या म्हणजे पाहाल.’ त्यांनी येशूच्या हाकेला ‘ओ’
दिला, ते त्याच्यामागे गेले, त्यांनी त्याचा अनुभव घेतला आणि त्यांनी जाऊन आणखी
दोघांना येशूकडे आणले.
मनन चिंतन :
या
भूतलावर आपणा प्रत्येकाला देवाने एका विशिष्ट कार्यासाठी पाचारण केलेले असते.
लहानपणापासून आपण जसजसे मोठे होत जातो तसतसं आपल्याला प्रत्यक्ष अथवा
अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनाच्या जबाबदारीची कल्पना येऊ लागते. कधी कधी आपण थोरांच,
धर्मगुरुंच, मित्रपरिवारांच्या मार्गदर्शन घेऊन एक खास असा निर्णय घेत असतो. एक
प्रकारे आपल्याला देवाने दिलेले ते एक जणू पाचारणच असते.
कधी
कधी काही लोकांकडून आपण ऐकतो की ‘अरे, मी माझ्या जीवनात खूपच महान चूक केली. मी
चुकीचा मार्ग निवडला. जर मी दुसऱ्यांच ऐकलं असतं तर आज माझ्यावर ही अशी वेळ आली
नसती.
जर
आपण पवित्र शास्त्राची पाने चाळली तर आपल्याला दिसून येते की देवाने
प्रारंभापासूनच मानवाला एक विशेष असं जीवन जगण्यास पाचारण केलं होतं. उदा. आदाम,
एवा, अब्राहाम, मोशे, सर्वं विविध संदेष्टे, इस्त्रायलाचे विविध राजे, प्रशस्ते
आणि खास करून इस्त्रायली प्रजा. परमेश्वर देव त्यांना वेळोवेळी त्यांच्याशी संवाद
साधून त्यांना एका विशेष कार्यासाठी पाचारण करीत होता. त्यांपैकी कुणी देवाच्या
पाचारणाला सकारात्मक प्रतिसाद दिला तर कुणी देवाचं पाचारण नाकारून आपलाच आणि भलताच
मार्ग निवडला. अर्थातच मार्गभ्रष्ट झाल्याने त्यांना त्याची किमंत मोजावी लागली.
याउलट ज्यांनी ज्यांनी देवाच्या हाकेला ‘ओ’ देऊन त्याच्या मार्गाने चालेले त्यांना
जीवनाची अवीट गोडीही चाखावयास मिळाली.
प्रत्येक
पाचारण ही एक वैयाक्तिक हाक असते, ते एक विशिष्ट असं आमंत्रण असते. देव जेव्हा
एखाद्या माणसाला पाचारण करतो तेव्हा त्या माणसावर देवाने जणू आपला भरवसा ठेवलेला
असतो. तो मनुष्य आपलं काम निश्चितच करील, आपल्या जीवाची बाजी लावून ती जबाबदारी
पार पाडील अशी देवाला एक आशा असते. माणसाला आपल्या कार्यासाठी पाचारण करताना देव
जणू त्याच्यावर कसलीच सक्ती करीत नाही. तो केवळ संयमाने, सातत्याने, धीराने पाचारण
करीत असतो. माणसाने योग्य तो निर्णय घ्यावा म्हणून त्याला विचार करण्यास, इतरांच
मार्गदर्शन घेण्यास तो वेळ देतो.
शमुवेलला
देवाने एकदा नव्हे तर तीनदा पाचारण केले. शमुवेलला सुरुवातीला देवाची खरी ओळख
नसल्याने तो योग्य प्रतिसाद देण्यास तयार नव्हता. तरीही देव त्याला पुनःपुन्हा
पाचारित राहिला. जशी देवाची त्याला जाणीवपूर्वक ओळख झाली तसं तो म्हणाला, ‘बोल
प्रभु, तुझा दास ऐकत आहे.’ शमुवेलाच्या अंत:करणाच्या गाभाऱ्यातून निघालेला आणि
देवाला आनंद देणारा असा तो प्रतिसाद होता.
असं
म्हणतात की एखाद्या चांगल्या माणसाशी आपली भेट झाली नि गाठ पडली की मग त्या
माणसाचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. योहानाचे शिष्य येशूच्या पाचारणाला साद
देऊन येशूच्या मागे जातात. त्याच्यासह राहतात, त्याचा ते अगदी जवळून अनुभव घेतात
आणि आता त्याच्याच सानिध्यात राहावयाचा ते निर्णय घेतात. इतकच नव्हे तर ते
इतरांनाही येशूकडे आणतात. जो जो कुणी येशूला भेटतो आणि त्याच्यासह राहतो, त्याच्या
जीवनात आमुलाग्र बदल घडुन येतो.
आपलं
ख्रिस्ती जीवन म्हणजे देवाने आपल्याला त्याच्या एकुलत्या पुत्राचं अनुकरण करण्यास
दिलेलं एक पाचारण आहे. मग आपण कुणीही असो, धर्मगुरु, व्रतस्थ, प्रापंचिक, स्त्री,
पुरुष, अथवा तरुण, तरुणी. आपापल्या जीवनात आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून
चालावं हीच देवाची इच्छा आहे. आपलं शारीरिक, मानसिक आणि आत्मिक पावित्र्य जपून
देवाचा आपल्या जीवनात गौरव करणे आणि होमबली अथवा इतर कोणत्याही निरर्थक अर्पणाऐवजी
आपल्या जीवनाचं अर्पण देवाच्या चरणी समर्पित करणे ह्यातच देवाला आनंद आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.
१.
आपले परमगुरु, इतर सर्वं
महागुरु, धर्मगुरू, व्रतस्थ, आणि प्रापंचिक ह्यांनी देवाच्या हाकेला योग्य तो
प्रतिसाद देऊन येशूच सतत अनुकरण करावं म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.
आपल्या देशातील सर्वं राजकीय
नेत्यांनी त्यांच्यावर जनतेने दिलेली जबाबदारी योग्य मार्गाने पार पाडावी,
कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता लोकांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३.
जे कुणी देवाच्या मार्गातून
दूर गेलेले आहेत, जे मार्गभ्रष्ट झालेले आहेत अशांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊन
त्यांनी पुन्हा योग्य मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.
जगभरातील युवक-युवतींना
प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी प्रेरणा व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.
गेले अनेक महिने आपण सर्वच
कोरोना विषाणूमुळे हैराण झालेलो आहोत. या संकटातून देवाने आपल्याला मुक्त करावं
आणि आपण पूर्वीसारखं नियमित जीवन जगावं म्हणून आपण प्रार्थना करूया.
६.
थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी
ठेवूया.
Thanks
ReplyDelete