Reflections for the Third Sunday In Ordinary Time (24/01/2021) by Br. Julius Rodrigues
सामान्य काळातील तिसरा रविवार
दिनांक: २४/०१/२०२१
पहिले वाचन: योना ३:१-५, १०
दुसरे वाचन: १ करिंथ ७:२९-३१
शुभवर्तमान: १:१४-२०
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील तिसरा
रविवार साजरा करीत आहे. आजच्या वाचनांद्वारे पुन्हा एकदा आपणास पाचारणाची आठवण
करून दिली जात आहे. देवाचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी परमेश्वर आपली निवड करीत असतो. परंतु त्यासाठी आपल्याला आपली वाईट वर्तणूक
सोडून दिली पाहिजे. परमेश्वर आपल्याला बोलावीत आहे जेणेकरून आपण सर्व देवाने
दिलेली जबाबदारी पार पाडावी आणि सर्व वाईटापासून दूर राहून परमेश्वराच्या वचनांची
निवड करावी. शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे आपण देखील मासे धरणारे नसून माणसे
धरणारे बनू म्हणून लागणारी कृपा आणि शक्ती ह्या मिस्साबलीदानात आपण मागुया.
पहिले वाचन: योना ३:१-५, १०.
ह्या वाचनाद्वारे आपणांस सांगण्यात येत
आहे की परमेश्वराचे नियंत्रण योनाच्या जीवनातील प्रत्येक घटना वा प्रसंगावर आहे हे
तो जाणून होता. देवाचा शब्द निनवे ह्या ठिकाणी पसरविण्यासाठी योनाला पाठविण्यात येते.
देव प्रत्यक्ष योग्य ते शब्द त्याच्या मुखात घालणार, त्याला प्रेरणा देणार हेच
यातून ध्वनित होते व त्याने त्या आज्ञेचे पालन केले हे वचन ३ वरून स्पष्ट होते.
योनाला जो ईश्वरप्रेरीत संदेश सांगायचा होता त्यात चाळीस दिवसांचा अवकाश हा इशारा
होता. म्हणजे पश्चताप केला तर होणारी शिक्षा टळेल असे त्यातून सूचित केले गेले आहे.
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ७:२९-३१.
दुसऱ्या वाचनाद्वारे आपणांस सांगण्यात
येत आहे की शेवट अगदी जवळ आलेला आहे, कोणत्याही क्षणी शेवट होईल असा ह्याचा अर्थ
असल्याचे आपणांस सांगण्यात येत आहे. जग अविनाशी आहे. जगाचा भविष्यकाळ बदलणारा नाही
या रह्स्यवादी दृष्टिकोनावर पहिल्या शतकात नित्य वादविवाद चालू होते. ख्रिस्ती
माणसाच्या दृष्टीने काळ, कैरोस ही संकल्पना बदलली आहे. आता जीवनाला एक नवी दृष्टी
लाभली आहे. म्हणून घरदार, शोक, पैसा मिळवणे यातच सर्व शक्ती खर्च करायची नाही.
कारण सध्याच्या स्वरूपातील हे जग अविनाशी नसून विनाशी आहे. त्यामुळे देवाच्या
सानिध्यात राहा असे आपणांस सांगण्यात आले आहे.
शुभवर्तमान: १:१४-२०.
आपल्या सेवाकार्याला आरंभ केल्यावर
सुमारे एक वर्षभर येशूने यहुदियात देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली. ख्रिस्त
आपल्या देवराज्याबद्दल सांगत होता आणि ऐकण्याऱ्यांना त्याच्या संदेशावर विश्वास
ठेवायचा होता. जो सुवार्तेवर विश्वास ठेवतो त्याला देवाच्या राज्यात प्रवेश करता येईल
हे ह्याठिकाणी दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे जर आपण येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे
हे मानले तरच आपण देखील शिमोन, आंद्रिया, याकोब ह्यांच्याप्रमाणे त्याच्या आज्ञा
पाळल्या पाहिजेत.
मनन
चिंतन:
‘वल्हव
रे नाखवा हो वल्हव रे रामा
मी
डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा
घर
पाण्यावरी बंदराला करतो ये जा!’
आज आपण
सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आज आपण मासेमारी या विषयावर मनन
चिंतन करणार आहोत. सुरुवातीच्या ह्या गाण्याने तुम्हाला सर्वांना कदाचित
समुद्रकिनारी पोहोचवले असेल. आपल्या प्रत्येकाच्या दृष्टिआड एक चित्र रेखाटले गेले
असेल. जिथे अथांग समुद्र, मंद वारे, मचवे, मासे, जाळ्या इत्यादी घटकांचा समावेश
असेल. मी वसई येथून आलो आहे; जरी आम्ही शेती करीत असलो तरी मच्छीमार किंवा
मासेमारी यांच्याशी मी फार जोडलेलो आहे. वसई ते उत्तन पर्यंत समुद्रात मोठ्या
प्रमाणात मासेमारी केली जाते. म्हणून आम्हांला खूप प्रमाणात मासे भेटतात व रोज
आम्ही यांचे सेवन करीत असतो. आपल्या प्रत्येकाला जर एखाद्या मच्छीमाराने विचारले
की, मी आज मासे पकडण्यासाठी जाणार आहे, तू येणार का? आपले उत्तर असेल ‘होय’. परंतु
माझ्या प्रिय बंधू- भगिनींनो हे इतके सोपे आणि सहज नाही, जर तुम्हाला मासेमारी
करायची असेल तर त्यासाठी लागणारी साधन- सामग्री, कौशल्य आणि कल्पकता असायला हवी.
आजच्या शुभवर्तमानाद्वारे येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला एक मासेमारणारा म्हणून
बोलावीत आहे. आपण मासे पकडणार नाहीत तर आपण माणसे धरणारे होणार आहोत. संत मार्कच्या
शुभवर्तमानात १:१६ मध्ये सांगितले आहे की,
येशू ख्रिस्त गालील समुद्राजवळ जात असताना त्याला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रिया हे
समुद्रात जाळे टाकताना दिसले. कारण, ते मासे धरणारे होते. त्यांच्या रोजच्या
गरजांसाठी ते हे काम करीत असत. येशू त्यांना सांगतो “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही
माणसे धरणारे व्हाल! असे मी करीन.” ह्यासाठी येशू त्यांना सांगत आहे की,
तुमच्याकडे जे कौशल्य आहे, ज्याच्याशी तुम्ही निगडित आहात, ते तुम्ही माणसे धरण्यासाठी
वापराल. जर, तुम्ही माझ्या मागे आला, जर, तुम्ही माझे सहकारी झालात तर, मग तुम्ही
माणसे धरणारे व्हाल.
होय
आणि हेच आज तुम्हाला सांगणार आहे. जर, तुम्ही ख्रिस्ती असाल तर, तुम्ही नेहमी कार्यक्षम,
सक्रिय मासेमारी करणारे आहात. आणि प्रत्येक क्षणी आपण त्या Catch च्या शोधात असतो. आपल्या स्वतःसाठी
नव्हे तर येशू ख्रिस्तासाठी. लोकांत देवाचे राज्य आणण्यासाठी, आणि लोकांना
देवाबरोबर जोडण्यासाठी.
मासेमारी
करणे म्हणजे साधी-सोपी गोष्ट नाही परंतु, ती शिकावी लागते. जर आपण मासेमारी करणारे
असलो तर, आपल्याला सर्व गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी योग्य ती पूर्वतयारी
करावी लागत असते. लागणारा मचवा, डिझेल, जाळे, लंगर, बर्फ इतर साधन-सामुग्री
इत्यादी गोष्टींची पूर्वतयारी करावी लागते. त्याप्रमाणे मासेमारी कार्यासाठी
लागणारे कौशल्य शिकावे लागते. कधी मासेमारी करावी?, किती खोल जाळे टाकावे? वारे
कोणत्या दिशेने आहे? या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ह्याच प्रकारे जर आपल्याला
माणसे धरणारे व्हायचे असेल तर, आपल्याला देखील या गोष्टींची गरज आहे. आपल्याला
पूर्वतयारी करावी लागणार आहे. जर आपण ख्रिस्ताचं अनुकरण करणार आहोत तर आपल्या
प्रत्येकाला पूर्व तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन गोष्टींची जाणीव असली
पाहिजे १.) ख्रिस्ताचा संदेश:- हा आपणाला बायबल वाचन करून मिळणार आहे. त्याचप्रमाणे
देवाची इच्छा काय आहे? व काय संदेश आहे? ह्याची आपल्याला कल्पना मिळत असते. जर आपण
माणसे धरणारे होणार असलो तर, मग आपल्याला त्या परमेश्वराचा संदेश समजने गरजेचे आहे.
२.) व्यक्तीचा अभ्यास:- ह्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यक्तीची जवळून जाणीव करून
घ्यावी लागणार आहे. त्याच्या अडचणी, समस्या, दुःख इत्यादी गोष्टींची आपल्याला
पूर्वतयारी करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या अंगी कौशल्य देखील असावे लागणार
आहे. मासेमारी करणारे लोक आपले कौशल्य वापरून मासेमारी करतात. कोणत्या क्षणी
मासेमारी करावी?, किती खोल मासेमारी करावी?, हे त्यांना ठाऊक असते. अगदी त्याच
प्रकारचे कौशल्य आपल्याला माणसे धरण्यासाठी वापरावे लागणार आहे. ते म्हणजे कधी
बोलावे?, केव्हा बोलावे?, कसे बोलावे?, आपल्यात प्रेम, दया, आणि ममता असणे गरजेचे
आहे. जेव्हा आपण लोकांसमोर जात असतो तेव्हा आणि ह्या गोष्टी आपल्याला हस्तगत होतात
जेव्हा, आपण परमेश्वरा बरोबर राहतो आणि चालतो.
अनेक
अशा वेळेस आपल्यामध्ये असलेली चिकाटी/जिद्द आपण गमावून बसतो आणि आणि म्हणून आपण
इतरांना देवाकडे आणण्यासाठी कमी पडतो. ज्यावेळेस आपण एखाद्या सरोवरावरती जात असतो
त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते की, खूप वेळ झाला आहे तरी जो मासे पकडत आहे
त्याला मासे मिळत नाहीत. एक तास, दोन तास, तीन तास, चार तास काहीच मिळत मिळाले
नाही. परंतु, तो हार मानत नाही तर आपले प्रयत्न चालूच ठेवत असतो. पुन्हा-पुन्हा जाळी
टाकत असतो. आकडा टाकत असतो. आणि त्याला शेवटी मासे मिळतात. त्याचप्रमाणे जर आपण
परमेश्वराचे कार्य करीत असलो तर, हार मानून चालणार नाही किंवा निराश होऊन चालणार
नाही. असे म्हणतात की प्रयत्न केल्याने देवही मिळतो. परंतु, प्रयत्न केले पाहिजे
आणि शेवटी माणसे आपल्याद्वारे, आपल्या चांगुलपणाद्वारे, प्रेमाद्वारे देवाकडे वळतात.
आणि म्हणून तीन गोष्टी मासे किंवा माणसे धरण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या
म्हणजे पूर्वतयारी (Preparation), कौशल्य (Skill), चिकाटी/जिद्द (Tenacity). जर ह्या तिन्ही गोष्टी आपण संपादन
केल्या तर, आपण देखील मासे धरणार्यांप्रमाणे देव-राज्यासाठी माणसे धरणारे होऊ
शकतो.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे परमेश्वरा आम्हांला आशीर्वादित कर.”
१. ख्रिस्त मंडळाची धुरा वाहणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप,
व इतर सर्व ह्यांना संपूर्ण जगास आध्यात्मतेच्यामार्गावर नेण्यास मार्गदर्शन व
प्रेरणा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपले जीवन परमेश्वराकडे वळवावे,
वाईटाचा त्याग करावा म्हणून त्यासाठी
लागणारी कृपा परमेश्वराने द्यावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. वेगवेगळ्या संघटना आपल्या धर्मग्रामात कार्यरत आहेत.
परमेश्वराचे शब्द व प्रेम त्यांच्या विविध कार्याद्वारे घडून येवोत व त्यांना
त्यासाठी परमेश्वराचे बळ मिळो म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्त सभेची सेवा करण्यास आपल्या धर्मग्रामातून
अधिका-अधिक तरुण-तरुणींना पाचारण व्हावे व देवाचे प्रेम त्यांनी अनुभवावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत, मृत्यूशी झुंजत
आहेत, आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत अश्या सर्व लोकांना प्रभूचे धैर्य व त्याची
शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक
व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment