Thursday, 11 February 2021

6th SUNDAY IN ORDINARY TIME


Reflection for the 6th SUNDAY IN ORDINARY TIME (14/02/2021) By Br. Roshan Rosario.   





सामान्य काळातील सहावा रविवार




दिनांक: १४/०२/२०२१

पहिले वाचन: लेवीय १३:१-२, ४५-४६

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र १०:३१-११:१

शुभवर्तमान: मार्क १:४०-४५


 



प्रस्तावना:

आज आपण सामन्यकाळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्याला शिकवत आहेत की, दुसरी लोकं आपल्यापेक्षा कितीही भिन्न असली तरीही त्यांना त्यांचा हक्काचा सामाजिक मान मिळाला पाहिजे. पहिले वाचन लेवीय ह्या पुस्तकातून घेण्यात आले असून हे पुस्तक कुष्ठरोग्याला देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल सांगते. कारण, त्या काळामध्ये कुष्ठरोग हा महारोग गणला जात होता. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो, ‘मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.संत मार्कलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू कुष्ठरोग्याला बरे करून त्याचा विश्वास दृढ करतो. आजचे वाचन आपणास हे देखील सांगत आहे की, आपली शारीरिक व अध्यात्मिक शुद्धी देवाकडून येते. ज्यांना समाजाने नाकारले, धिक्कारले किंवा सोडून दिले आहे; त्यांना येशू स्पर्श करण्यास तयार आहे. ख्रिस्ताचे अनुयायी बनुन आपण हा देवाचा अनुभव गरजवंत लोकांना द्यावा, ह्या हेतूसाठी आपण नम्र हृदयाने प्रभूचरणी याचना करूया.

 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: लेवीय १३:१-२, ४५-४६

लेवीय हे पुस्तक प्रार्थनेचे नियम, याजकगण, जबाबदारी व हक्क, जेवणाचे नियम, अशुद्धता व पवित्रता इत्यादी बाबींचा उल्लेख करते. तसेच, शारीरिक रोगाबद्दलसुद्धा हे पुस्तक नियम देते. आजचे पहिले वाचन लेवीय (१३:१-२, ४५-४६) ह्या पुस्तकातून घेतलेलं असून येथे विशिष्ट शारीरिक रोगांबद्दल याजकांनी लागू केलेल्या नियमांविषयी लिहिलेलं आहे. अश्या रोगाने ग्रस्त, पिडीत असलेल्या व्यक्तीस अशुद्ध घोषित केले जाते ज्याने शेजार्‍यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शंका असते.

 

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र १०:३१-११:१

दुसरे वाचन संत पौलने करिंथीकरांस पाठवलेल्या पहिल्या पत्रातून (१०:३१-११:१) घेतलेले आहे. संत पौल करिंथकरांस ख्रिस्ताच्या जीवनाचे महत्व पटवून देत आहे. तो म्हणतो, “तुमचे खाणे, पिणे किंवा जे काही तुम्ही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी असले पाहिजे”. संत पौल आपल्याला त्याचे अनुकरण करण्यास प्रोत्साहित करत आहे. कारण, त्याने स्वत: सुवार्तेसाठी व ख्रिस्तमंडळाच्या ऐक्यासाठी ख्रिस्ताचे अनुकरण केले आहे.

 

शुभवर्तमान: मार्क १:४०-४५

येशूने सुरुवातीलाच म्हणजेच मिशन कार्याच्या प्रारंभीस गालील येथे पिडीत लोकांना रोगमुक्त केले होते. तसेच, ज्यांचे जीवन वाईट / दृष्ट आत्म्याने भरले होते त्यांना देखील येशूने आपल्या स्पर्शाने बरे केले (मार्क १:२१-३४). दुसऱ्या दिवशी येशूने कुष्ठरोग्याला बरे केले, ह्याचे स्पष्टीकरण शुभवर्तमानकार (evangelist) मार्क सविस्तरपणे वरील उताऱ्यात देतो.

लेवीय पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, संत मार्क देखील कुष्ठरोगाविषयी आपल्याला सांगत आहे. त्याकाळी कुष्ठरोग हा महारोग गणला जात होता. ह्या काळामध्ये जी लोक त्या भयग्रस्त आजाराने पिडीत होते त्या लोकांना विशेष अशी वागणूक दिली जात असे. त्या वागणुकीबद्दल आपण लेवीय पुस्तकात वाचतो.

येशू आपल्या तारणासाठी ह्या भूतलावर आला. म्हणून तो कुष्ठरोगाने पिडीत व्यक्तीला समाजाच्या कठोर नियमांतून मोकळे करून स्वर्गाची वाट दाखवतो; म्हणजेच त्याला रोगमुक्त करून समाजाचा पुन्हा अविभाज्य घटक बनवतो. कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा”. येशू त्याला म्हणाला, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो”. लगेच कुष्ठरोगी बरा झाला. येशूने त्याला याजकाला दाखव आणि आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण कर म्हणून सांगितले. पण त्याने येशूचे ऐकले नाही तर आपण बरे झालो आहोत ह्याची साक्ष तो सर्वांना देत राहिला. ह्या कारणास्तव येशूला उघडपणे शहरात जाता येईना म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला. तरीदेखील लोक रोगमुक्त होण्यासाठी मोठ्या संख्येने येशूकडे आले.

 

बोधकथा:

असिसीकर संत फ्रान्सिस, ह्यांना कुष्ठरोग्यांचं भयानक भय होतं, त्यांची किळस वाटत होती. एके दिवशी जेव्हा तो फिरायला बाहेर पडला तेव्हा, त्याने चेतावणीची घंटी ऐकली. संत फ्रान्सिसच्या काळात कुष्ठरोग्यांनी चेतावणीची घंटी वाजवणे हे गरजेचे होते. जेव्हा एक कुष्ठरोगीं झाडांच्या मागून बाहेर पडला तेव्हा संत फ्रान्सिसने पाहिले की, त्याचे मुख कुष्ठरोगाने विद्रुप झाले होते. त्याचे अर्धे नाक कुजलेले होते; त्याच्या हाताची बोटं त्या रोगाने झडून पडलेली होती, आणि त्याच्या ओठातून पू येत होता. ह्या विद्रुप माणसाला घाबरून मागे न जाता त्याच्या जवळ धावत जाऊन फ्रान्सिसने कुष्ठरोग्यास मिठी मारली व त्याचे चुंबन घेतले. त्या घटनेनंतर फ्रान्सिसचे आयुष्य पूर्वीसारखे राहिले नाही. इतरांसाठी एक नवीन संवेदनशीलता त्याच्या हृदयात निर्माण झाली, आणि त्याला सेवा करण्यास एक नवीन शक्ती प्राप्त झाली.

 

मनन चिंतन:

पुरातन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत, कुष्ठरोग ही देवाची शिक्षा मानली जात असे. हा आजार इतका भयंकर होता की, बायबलच्या काळात, कुष्ठरोग्यास गळयात बांधण्यास एक घंटी दिली जात असे; जेणेकरुन त्या घंटीच्या आवाजाने तो आपल्या जवळच्या लोकांना इशारा देऊन ओरडायचा की, “मी एक कुष्ठरोगी आहे, दूर रहा! मी एक कुष्ठरोगी आहे, दूर राहा!त्याचे जीवन अश्याप्रकारे भयानक होते. जिवंत असूनसुद्धा तो मृतासारखा होता. असं वाटायचं की, देव त्याला सोडून गेला आहे, आणि म्हणून लोकांनी त्यांच्या जवळ येऊ नये. अशा प्रकारे कुष्ठरोग हा एकांतात राहण्याचे प्रतीक होते. आपल्या सभोवतालच्या सर्व लोकांपासून दूर जाणे ही एक प्रकारची निराशेची परिस्थिती होती.

आजच्या शुभवर्तमानात आपण बघतो की, एक कुष्ठरोगी येशूकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणतो, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करू शकता!. हा एक अत्यंत अर्धवट असा विश्वास आहे. “मला बरे करा!” असे म्हणण्या ऐवजी तो म्हणत आहे, “जर तुम्हाला खरोखर बरे करायचे असेल, जर तुम्हाला माहित आहे की, तुम्ही खरोखर हे करू शकता तर”. याचाच अर्थ असा की, ‘तुम्ही ते करणार आहात की, नाही हे मला माहित नाही. कारण दुसऱ्या कोणाबरोबर माझा लेनं देणं नाहीं. मी एकटा आहे, आणि मी एकटाच मरेन’. ही एक भयंकर अशी त्याची परिस्थिती होती. परंतु त्याने हे पण ऐकले आहे की, येशू बरे करतो. आणि म्हणूनच तो येशूकडे जातो. ही त्याच्या विश्वासाची एक खूण आहे. कारण, तो येशूकडे येतो आणि दुसऱ्या कुष्ठरोग्यांसारखा चेतावणीची घंटी वाजवून येशूपासून तो लांब राहत नाही. पण, तो येशू जवळ जातो, गुडघे टेकून म्हणतो; जर तुम्हाला खरोखरच बरे करायचे असेल तर, तुम्ही मला बरे करू शकता!. आणि अश्यावेळी येशू काय करतो? “नक्कीच, मी तुला बरे करू इच्छितो.असे म्हणून तो त्याच्या जवळ जातो, त्याला स्पर्श करतो.

आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला आपल्या समजण्यापलीकडे प्रेम करण्याचे आव्हान देत आहे. आपणा प्रत्येकामध्ये प्रेम करण्याची एक मोठी क्षमता आहे जी न वापरल्यामुळे वाया जाते. आपल्याकडे अशा लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे ज्यांना दररोज नकाराचा त्रास सहन करावा लागतो. आमच्या दयाळूपणाने आणि प्रेमळ कृत्याद्वारे आम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचू शकतो, आणि त्यांचे जीवन आशेने भरू शकतो. आज आपल्या जगात कुष्ठरोगी कोण आहेत का? गरीब, बहिष्कृत, एड्स सारख्या जीवनघेण्या आजाराने ग्रस्त लोक. एकदा माझ्यासमोर कोरोनाचा एक गंभीर रुग्ण डॉक्टरांनी घेतला तेव्हा आजूबाजूच्या प्रत्येकाने संरक्षक कवचं परिधान केली होती. असे वाटत होते की, हा आजारी माणूस आपल्या जवळच्या सगळ्या लोकांचा नाश करेल म्हणूनच त्यांना संरक्षणाची गरज होती. कोविड कक्षात डॉक्टरांशिवाय दुसऱ्या कुणालाही परवानगी नव्हती. कुटुंबातील सदस्यांनापण काहीही करण्यास परवानगी नव्हती. ह्या रोगाबद्दल प्रत्येकजण घाबरून गेले आहेत. आपण अनेक वेळा वाचले किंव्हा बघितले असेल, पाहिले की, कितीतरी मृतदेहांना प्लास्टिक पिशव्यामध्ये कचऱ्यासारखे बांधून खड्ड्यात टाकले गेले. आजपण आपणास असहाय्यता आणि निराशेने वेढलेले आहे. आणि अशा परिस्थितीत येशूचा एकच संदेश आहे. येशूला दु:ख किंवा वेदना काय असते हे माहित आहे, आणि इतरांच्या प्रेमासाठी त्यांने आपले जीवन वधस्तंभावर अर्पण केले आहे. दु:खातून देव मुक्तता आणतो म्हणूनच आज आपण त्या सर्व लोकांचा विचार केला पाहिजे ज्या लोकांना आपल्या मदतिची किंवा प्राथनेची गरज आहे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : “प्रभो, आमची प्रार्थना ऐक.”

१.    आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना आपल्या पाचारणाद्वारे ख्रिस्तसभेची निस्वार्थपणे सेवा करण्यास प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२.    आपले राजकीय नेते स्वत:च्या इच्छेचे गुलाम झालेले आहेत. लोकांची इच्छा न स्विकारता आपली इच्छा, योजना व कृतीला फार महत्व देतात. ह्या कारणाने समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण झाला आहे. परमेश्वराच्या कृपेने त्यांनी मीपणा, अहंकार, नावलौकीकता, इत्यादींचा त्याग करावा व लोकांच्या इच्छा समाजाच्या प्रगतीसाठी स्विकाराव्यात म्हणून परमेश्वर चरणी प्रार्थना करूया.

३.    आज आपला समाज राग, द्वेष व अशांतेने व्यापून गेलेला आहे म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती भाविकांनी येशूचे अनुकरण करून आपल्या समाजात प्रेम, एकोपा व शांतीची ज्योत पेटवण्यासाठी सदैव तत्पर असावे म्हणून प्रभूकडे याचना करूया.

४.    ज्या लोकांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे, विशेषकरून आजारी, गरीब, शोकांकीत, तुरुंगात अडकून पडलेले आणि व्यसनाधीन झालेले इत्यादी. ह्या सर्वांवर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आनंदाचा, कृपेचा आणि चांगल्या आरोग्याचा वर्षाव व्हावा म्हणून प्रभूकडे दयेची याचना करूया.

५.    थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment