Thursday, 18 February 2021

         Reflection for the Homily of 1st Sunday of Lent (21/02/2021) By Br. Brijal Lopes 



प्रायश्चित काळातील पहिला रविवार

दिनांक: २१-०२-२०२१

पहिले वाचन: उत्पती ९:८-१५

दुसरे वाचन: १ पेत्र ३:१८-२२

शुभवर्तमान: मार्क १:१२-१५



प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा प्रायश्चित काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास पापमार्ग सोडून पवित्र जीवन जगण्यासाठी बोलावीत आहे. आजची तिन्ही वाचने आपणास प्रायश्चित संस्काराद्वारे आपले जीवन किती मौल्यवान बनते ह्याची आठवण करून देत आहे. जीवन शुद्ध व निरागस ठेवण्यासाठी आपण देवाच्या अधिकाअधिक जवळ यावे व देवाच्या प्रेमाचा, दयेचा व शांतीचा अनुभव घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

पहिले वाचन: उत्पती ९:८-१५

          आजच्या पहिल्या वाचनात देवाशी मानवाने केलेला आज्ञाभंग व बेईमानी व यांचा विपरीत परिणाम मानवी अस्तित्वावर कसा होतो, ह्याचा बोध आपणास होत आहे. महाप्रयलाची कथा सांगण्यामागचा हेतू म्हणजे परमेश्वराची दैवी दया व क्षमा. मानव पापी व दृष्ट बनला होता. पापी जीवन संपुष्टात आणण्यासाठी देवाने महाप्रयलाद्वारे सृष्टी नष्ट केली पण नोहा व त्याच्या कुटुंबाचा निष्पाप व देवभिरू स्वभाव  पाहून देवाने त्यांना वाचवले व नवजीवन दिले.

दुसरे वाचन: १ पेत्र ३:१८-२२

          देवाने मानवाच्या तारणाची केलेली योजना आजच्या वाचनात आपणास दिसून येते. देवाने आपल्या एकलुत्या एका पुत्राला ह्या धरतीवर पाठविले व तो आम्हासारखा मानव झाला. दुखःसहन, यातना व मरण सहन करून त्याने आपणास सार्वकालिक जीवन बहाल केले ह्यावर मनन चिंतन करण्यास संत पेत्र आपणास सांगत आहे.

शुभवर्तमान: मार्क १:१२-१५

          “पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा” हे ख्रिस्ताच्या जीवनाचे सार होते. पापापासून मुक्ती मिळविणे व देवाच्या सानिध्यात परत येण्यासाठी आपणास येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाद्वारे सांगत आहे.

मनन चिंतन:

          थॉमस नावाचा एक गृहस्थ होता. तो एका व्यसनी वृत्तीने किंवा वाईट संगतीने जीवन जगत होता. मादक पदार्थाच्या सेवनाने तो पूर्णपणे बिघडला होता. त्यात तो एका खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत होता. एक दिवस असे झाले की, तो अंथरुणावर पडला असताना वाईट संगतीने व वाईट कृत्यांनी त्याच्या जीवनावर किती वाईट परिणाम झाला होता हे त्याला कळायला लागले. त्याला त्याचं फार दुःख वाटू लागले व त्यात त्याला प्रार्थना करण्याची इच्छा झाली. त्याने सर्वप्रथम गुडघे टेकले व प्रार्थना करू लागला. त्याच्या हृदयात असलेल्या सर्व गोष्टी तो देवाला सांगू लागला. त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा व ज्या गोष्टींची कमतरता होती, ते सर्व काही तो मुक्तपणे बोलत होता. एवढी वर्षे आपण काहीच चांगलं कार्य केले नाही त्यामुळे तो ढसाढसा रडू लागला. त्याला जाणवत होते की देव आपल्याबरोबर आहे पण मी देवाबरोबर नाही. आजच्या शुभवर्तमानात प्रभू आपणास सांगत आहे की, “पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.” आपण नम्र बनुन पश्चाताप करण्यास तयार आहोत का? आजच्या शुभवर्तमानात दोन ठळक मुद्दे आहेत.

          पहिला मुद्दा म्हणजे बदल: आपल्या जीवनाचा कायापालट करणे. पापी मार्ग सोडून पवित्र जीवन जगणे. आपल्या जीवनात स्वार्थ व गर्व ह्यांना स्थान न देता आपल्या पापाची जाणीव ठेवून, प्रायश्चित स्वीकारून देवाला शरण जाणे गरजेचे आहे. ह्या दृष्ट व पापी जीवनावर भर न देता त्याहून अधिक चांगले जीवन जगता येईल ह्यावर मनन चिंतन करावयाचे आहे.

          दुसरा मुद्दा म्हणजे सुवार्तेवर विश्वास ठेवणे: येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि तो आपणास जीवन देण्यासाठी आलेला आहे ह्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. प्रायश्चित संस्काराद्वारे क्षमा व शांती मिळवून ख्रिस्ताकडे जाणे किंवा त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. आपल्या जीवनातील पापी वृत्ती ओळखून देवाकडे मदतीची धाव घेतली पाहिजे. देवाने त्याचा एकलुता एक पुत्र जगाच्या उद्धारासाठी समर्पित केला कारण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन लाभावे (योहान:३:१६). पाप्यांना तारण देण्यासाठी ख्रिस्त ह्या जगात आला. उपवास काळ आपणास स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते ज्याद्वारे आपण आपल्या जीवनाचे आध्यात्मिक बदल घडवून आणतो व आपण एक सुंदर व पवित्र जीवन जगतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमचे आध्यात्मिक नुतनीकरण घडवून आण.

   १. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स व सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांना देवाने त्यांच्या कार्यात मदत करावी व त्यांच्याद्वारे ह्या उपवासकाळात देऊळमातेचे आध्यात्मिक नुतनीकरण घडवून यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. जे भाविक देवापासून दूर गेले आहेत, व्यसनाच्या आहारी गेले आहेत, एकाकी आहेत, मोह पाशात अडकलेले आहेत अशा सर्वांना परमेश्वराने धैर्य व शक्ती द्यावी व ह्या सर्वांतून बाहेर येण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. कोविड १९ च्या महामारीपासून आपणा सर्वांचे रक्षण व्हावे व जे ह्या आजाराने ग्रासलेले आहेत अशा सर्वांना परमेश्वराने बरे करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे व आपणा सर्वांना पर्यावरणाची नितांत गरज आहे. ह्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यास व त्याचा बचाव करण्यास आपणास प्रेरणा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. परमेश्वराची दया व क्षमा आपणास मिळावी व आपणा सर्वांना देवाच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.




No comments:

Post a Comment